सर्वेश बोरकर
गोव्याचा पोर्तुगीज व्हॉइसरॉय फ्रान्सिस्को डी ताव्होर कोंदि द आल्व्होर यांना मुघल मराठे संघर्षातून स्वतःचा फायदा करून घ्यावयाचा होता. मुघल व मराठे यांच्या लढाईत छत्रपती संभाजीचा, खात्रीने पराजय होईल असे व्हॉइसरॉय कोंदि द आल्व्होरला वाटत होते. तेव्हा वाहत्या गंगेत हात धुऊन मुघलांकडून दक्षिण कोकण काबीज करण्यासाठी त्याने प्रयत्न केला.
सबंध दक्षिण कोकणचा प्रदेश गोव्यास जोडणे हा पोर्तुगिजांचा फार जुना हेतू होता. व्हॉइसरॉय कोंदि द आल्व्होर याची वागणूक त्या धोरणाला अनुसरूनच होती. पोर्तुगीज व मुघल यांच्यातील तहामुळे संभाजी राजांनीही आपले सामोपचाराचे धोरण बदलून चढाईचे धोरण स्वीकारले. यातूनच पुढे पोर्तुगीज-मराठा युद्ध सुरू होऊन ही लढाई प्रथम चेऊल, वसई, दमण या पोर्तुगिजांच्या उत्तरेकडील प्रदेशात सुरू झाली. त्या भागात पोर्तुगिजांनी मराठ्यांना मारल्यामुळे, मराठ्यांनी सूड म्हणून दमण येथील काही घरे जाळली.
पोर्तुगिजांनी मुघलांशी हातमिळवणी केल्याने, मराठे मुघलांच्या धोक्यापुढे झुकतील असे गृहीत धरून पोर्तुगिजांनी फोंडा कोट जिंकण्यासाठी फोंड्यावर आक्रमण करण्याचा निर्णय घेतला. छत्रपती संभाजी महाराज यांना पोर्तुगिजांच्या संभाव्य धोक्याची कल्पना होती आणि त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी त्यांनी गोव्यातील फोंडा किल्ला आधीच सुरक्षित केला होता.
फोंड्याचा वेढा उठविल्यानंतर संभाजी राजे पन्हाळ्यास जातील अशी व्हॉइसरॉय कोंदि द आल्व्होरची समजूत होती. परंतु ही समजूत चुकीची ठरली. त्यातच पोर्तुगिजांनी मुघल आरमारास आपल्या हद्दीतून जाण्याची परवानगी दिली होती. मुघल आरमार धान्य घेऊन गोव्यातून कोकणात जाणार होते.
ही मदत थांबावी म्हणून संभाजी महाराजांनी आपले सैन्य गोव्याच्या परिसरात नेले होते. त्याचाच फायदा घेऊन मराठ्यांनी गोव्यावर स्वारी केली. ही माहिती आपल्याला इंग्रज वखारीचा पत्रव्यवहार व मराठी बखरी यांतून मिळते. यातील काही वर्णने पोर्तुगीज कागदपत्रांशी जुळतात. पोर्तुगीज कागदपत्रांत छत्रपती संभाजी महाराजांच्या हालचालीसंबंधी विस्तृत वर्णने आहेत.
सांतइस्तेंव्ह नावाचे एक छोटे बेट जुन्या गोव्यापासून कुंभारजुआ कालव्यामुळे अलग झालेले आहे. हे बेट धावजी ह्या तिसवाडीतील गावाच्या पैलतीरास आहे. ओहोटीच्या वेळी पायवाटेने गोवे शहरात धावजी मार्गे पूर्वी जुवे बेटावरून जाता येते होते. टोलटों हा एक लहान भाग याच जुवे बेटाचाब् ज्याला दौजीला जोडणारा एक रस्ता होता. त्याला ‘रामाची तार’ असे म्हणतात.
जुवे बेटावरील डोंगरात हा सांतु इस्तेव्हंवचा किल्ला बांधला होता. घावजीच्या बाजूने नदीच्या किनाऱ्यावर बुरूज बांधले होते. जुवे बेटाच्या एका बाजूस भतग्राम व फोंडे, हे नदीच्या अलीकडील भाग, मराठा राज्यातील प्रदेशात मोडत असत. दुसऱ्या बाजूस मांडवी नदीच्या पलीकडे गोवे शहराचा भक्कम तट होता.
दि. २४ नोव्हेंबर १६८३ रोजी रात्री ८ वाजता ४० मराठ्यांची एक तुकडी जुवे बेटावर गेली. त्यावेळी किल्ल्यावर पहारेकरी नव्हते. मराठ्यांनी शिड्या लावून किल्ल्यात प्रवेश केला तेव्हा त्यांना कोणीही प्रतिकार केला नाही. गडावरील किल्लेदारला मारण्यात आले. गडावर पोहोचल्यानंतर मराठ्यांनी दुसऱ्या बाजूस असलेल्या सैनिकांना इशारा देण्यासाठी तोफा उडविण्यास सुरुवात केली. यामुळे पोर्तुगिजांना ही बातमी लागली.
रात्री दहा वाजता गोवे शहरात घंटा वाजवून संकटाची सूचना देण्यात येताच नदीच्या बाजूस असलेल्या शहराच्या तटाकडे काही सहस्र लोक धावत गेले. घावजीच्या दिशेने मराठे येतील म्हणून व्हॉइसरॉय सबंध रात्र सैन्यासह तेथे जाऊन राहिला. तोपर्यंत मराठ्यांनी गड ताब्यात घेतला असल्याची व्हॉइसरॉय कोंदि द आल्व्होरला बातमी लागली. जवळची शेते पाण्याने भरून दोन सहस्र तुकड्यांनी मधली वाट अडवावी असे दों मानुयेल मस्कारेन्हास या अधिकाऱ्याला वाटत होते. हे काम व्हॉइसरॉयने दो फेरनन्डो द कॉस्ता याच्याकडे सोपविले. परंतु त्याने काहीही केले नाही.
जुवे बेटावरील गडावर छत्रपती संभाजी महाराजांचे सैन्य सज्ज होते. ही चढाई संभाजी राजांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली होती. दि. २५ नोव्हेंबर १६८३ रोजी सकाळी सात वाजता व्हॉइसरॉय कोंदि द आल्व्होरने ४०० शिपायांसह जुवे बेटावर कूच केले. व्हॉइसरॉयने सांतइस्तेंव्हच्या गडावर हल्ला करून लढाईस प्रारंभ केला. मराठ्यांनी आपल्या नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे पळून जाण्याचा आव आणला.
पळत असतानाच ३०० सैनिकांची कुमक त्यांना मिळाली. या सर्वांनी मिळून पोर्तुगिजांवर जोराचा हल्ला केला. जीव वाचविण्यासाठी अनेक पोर्तुगीज शिपाई डोंगरावरून नदीतीराकडे पळत सुटले. या धामधुमीत मराठ्यांकडील चार घोडेस्वारांनी व्हॉइसरॉयवर तलवारीने हल्ला केला. व्हॉइसरॉयवर कैद होण्याचा प्रसंग आला होता. दों रॉग्रिग्रो द कॉस्ता हा घोडा घेऊन व्हॉइसरॉयच्या संरक्षणासाठी धावला नसता तर व्हॉइसरॉयवर अनर्थ ओढवला असता, तरीदेखील व्हॉइसरॉय घायाळ झालाच.
मराठ्यांनी माघार घेणाऱ्या पोर्तुगिजांवर वरून मोठाले दगड ढकलून दिले. ते वर येणाऱ्या पोर्तुगिजांवर पडून काही लोक मेले. ४०० लोकांपैकी एकही जखमी झाल्याशिवाय राहिला नाही. शेवटी एका खंदकातून व्हॉइसरॉयने परत जावे, असे ठरले. एका माचव्यातून व्हॉइसरॉय व इतर अधिकारी नदीतून माघारी जाण्यास निघाले.
मराठ्यांच्या हातात जुवे बेट पडल्यावर गोवे शहराच्या बाजूस नदीला लागून ज्या खाजन शेतजमिनी होत्या त्यांचे बांध पोर्तुगिजांनी फोडून टाकले असल्यामुळे साहजिकच नदीचे पात्र मोठे झाले होते. पळून जाणाऱ्या पोर्तुगिजांपैकी बरेच जण मातीत व दलदलीत गाडले गेले. मराठ्यांनी त्यांना कापून काढले.
काहीजण वाचले ते वाढत्या पाण्यामुळे बुडाले. अशा तर्हेने मराठ्यांनी पोर्तुगिजांचा पराभव करून गोव्यानजीकचे हे बेट व किल्ला ताब्यात घेतला. ‘जशास तसे’ या न्यायाने वागून संभाजीराजांनी पोर्तुगिजांना आपल्या तेजाचे दर्शन घडविले. असे सांगतात की या प्रसंगानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी गोवे शहरावर धावजीच्या बाजूने नदीच्या किनाऱ्यावर हल्ला करण्याचे ठरविले होते. परंतु नदीला भरती आल्यामुळे ते शक्य झाले नाही.
खंडो बल्लाळ चिटणीस याच्या त्रोटक हकिकतीवरून वरील गोष्टीस दुजोरा मिळतो. या हकिकतीत म्हटले आहे, ‘ते दिवशी गोवे घ्यावयाचेच. परंतु फिरंगीयांचे दैव समुद्राने रक्षिले’. या भरतीच्या वेळी छत्रपती संभाजींंचा घोडा पाण्यात व दलदलीत फसला असावा. आणि याच वेळी खंडो बल्लाळाने स्वतःच्या जिवाची पर्वा न करता पाण्यात उडी टाकून राजांचे रक्षण केले. छत्रपती संभाजी राजांना पोर्तुगिजांच्या दुटप्पी धोरणाचा पहिल्यापासून अनुभव होता. मुघलांशी संधान बांधून कोकण काबीज करण्याचा त्यांचा बेत राजांनी आपल्या युद्धकौशल्याने हाणून पाडला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.