नीना नाईक, पणजी
मनोहरभाईंनी शेवटचा श्वास आजच्याच दिवशी २०१९साली घेतला. त्यानंतर एक दिवस त्यांची आठवण झाली नाही, असे कधी घडले नाही. रंगपंचमी १४ तारखेला होती. त्यांनी अनेक रंग गोवेकरांत भरले. संस्कृती आहेच पण सांस्कृतिक विचार रुजवला.
समानता आणि ऐक्य कायम ठेवले. त्यांच्या पावलावर पाऊल टाकत उत्पलने हे बीज फुलवणे कायम ठेवले आहे. अर्थात हे सामर्थ्य पुष्कळाच्या अंगी नसते. काही होतात जागे झोपेतून काहीतरी टोचल्यामुळे. त्यासाठी जिगर लागते. अनुभूतीची संवेदना सचेतन व्हावी लागते. कल्पना, भावना, विचार हा त्रिवेणी संगम असावा लागतो. खाण तशी माती असावी लागते.
कॅलेंडर पहिले पाच वर्ष मागे गेले. अनेक अभिषेक, स्तोत्रे, दर्ग्यावर चादर, प्रार्थना, घंटानाद सर्व होते तसे नि:शब्द, स्तब्ध झाले. आमचे भाई फोटोत गेले. त्यांच्या सहवासात असलेला कार्यकर्ता ढसाढसा रडला. रडवी मुद्रा घेऊन अंत्ययात्रेत सहभागी झाला. कार्यकर्ता आणि भाई हे नाते दृष्ट काढण्यासारखे होते. ‘भाईने बोलवले आहे’ हा निरोप खुद्द भाई देत नसत, पण एक प्रकारचे वजन होते ‘बोलवले आहे’ या निरोपात. कार्यकर्ते भाग्यवान ज्यांनी भाईंच्या प्रेमाची बेरीज-वजाबाकी कधी मोजली नाही. जे होते ते अभिमान, कौतुक आणि प्रेम. सोपे गणित गोड आहे.
रात्री अपरात्री हाक मारा भाई पाठीशी उभे. आज तारखा पाहिल्या की वाटते टराटर पाच वर्षामागे जावे. डोंगरासारखे भाई खूप काही घेऊन वावरले. विचारांचे ज्वालामुखी सतत डोक्यात. आजारी असले तरी धबडग्यात जीव मेटाकुटीला आला तरी गोवा सांभाळला. आता दोन धृवांचे अंतर डसते. कार्यकर्ते मुके झाले. पण यज्ञकुंडात उत्पलसाठी उतरले. त्यांनी घंटानाद केला. आता जाणीव होते; त्या घटनांचा क्रम, उतरण दिसते. काय तो भाईंचा वचक सरकारात, कार्यालयात होता! साधे पान सळसळले तरी चोर दचकत असे. आता राक्षसी विचार मनात असलेले बसलेत तळघर, बीळ इथे दडून. कृष्णसर्पाप्रमाणे वावरत आहेत त्याला कोण काय करणार?
भाई गेले त्यावेळी काही श्वापदांच्या डोळ्यात भयानक तेज चमकले. त्या क्रूर आनंदाची लाट अजून ओसरली नाही. स्वाभाविक शोक दाखवणे प्रक्रियेचा विषय आहे. आम्ही कार्यकर्ते दूधखुळे नाही आहोत. पाठीला पाठ लावून असलेले सगळे निखारे गरम असतानाच हिरवीगार कुरणे कधी मिळणार यावर डोळे लावून होते. अवाक्षर न काढता उत्पल रखरखीत होरपळून निघत होता.
पंख छाटायला भाई नाहीत. पाण्यातले मासे तडफडत होते वेगवेगळी समीकरणे सतत कानावर पडत. कुठे काय, सरकार नावाची लाट खडकावर आपटत राहिली. पण फुटलेल्या लाटेने तिला परत कवटाळून स्वच्छ करून आपलेसे केले. हे ग्रहण भाई नसल्यामुळे आहे ते सुटेल. काही खुट्ट झाले तरी ‘आज भाई हवे होते’ हे सहजपणे सगळे म्हणतात.
भाई स्मृतीआड होणे नाही. त्यांच्या स्मृतीला अभिवादन करताना झाडावरून काढलेले फूल समाधीवर वाहताना शुभाला विचारले, ‘हे पडलेले फूल पुन्हा झाडावर जाईल का गं?’ त्यावर ती म्हणाली, ‘देवाला सगळं ठाऊक असतं ना गं? आपल्याला त्यांनी मार्ग दाखवला आहे. ते पणजीतच आहेत. मोहर अकाली गळला आहे.
आपली जबाबदारी वृक्षाला खतपाणी घालणे आहे. त्यांची सचोटी, मनोनिग्रह, स्वकष्ट त्याला मिळणार. ईश्वर स्मरून आपण आपले कुडीत प्राण असेपर्यंत आपण मूक प्रतिज्ञा घेतलेली आहे. ती तडीस नेणे आपले कर्तव्य’.
आज तोच दिवस डबडबलेल्या नेत्राने मनात आक्रोश लपवत, ‘भाईंच्या आत्म्यास शांती लाभो’, म्हणत संथपणे पायरी चढले सगळे कार्यकर्ते. भाईंचे नितीनियनीतिनियम पायाखाली तुडवून त्यांना गोवा पाहायचा नाही.
योजनांचे स्वप्नरंजित, गुळमुळीत, दिशाहीन राज्य पाहताना भाईंच्या जिवाची कोण तडफड होत असेल! देवा, प्रतिबिंब लवकर दाखव.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.