
प्रमोद प्रभुगावकर
दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची ६९वी जयंती नुकतीच साजरी झाली. भाईंनी इहलोकाचा निरोप घेतल्यास चार वर्षे उलटली, पण त्यांची जयंती व पुण्यतिथी त्यांचे चाहते पूर्वीच्याच भावनेने साजरी करतात. परवाच त्यांच्या जयंतीनिमित्ताने अनेकांनी त्यांच्या आठवणी उद्धृत केल्या. तर काहींनी ते असते तर आजच्या एकंदर परिस्थितीबाबत त्यांनी काय केले असते अशी विचारणाही केली.
खरे तर अशा ‘जर-तर’ला सद्य:स्थितीत काहीच अर्थ नाही. कारण भाई आज हयात नाहीत हे सत्य आहे. पण गोव्यात कोणताही प्रश्न उपस्थित होवो वा घटना घडो पण प्रत्येकाच्या मनात भाई असते तर हा प्रश्न उपस्थित होतोच. इतकी प्रत्येकाची भाई प्रती भावना जडलेली आहे. गोव्यात सध्या अनेक ज्वलंत प्रश्न तयार झालेले आहेत, त्या प्रत्येकाबाबत सर्वसामान्याची प्रतिक्रिया तीच असते. त्यामागील कारणही तसेच आहे. कारण एरव्ही राजकारणाप्रति नेहमीच उदासीन असलेल्या सर्वसामान्य व विचार करणाऱ्या गोमंतकीयांमध्ये मनोहर पर्रीकर यांनी एक विश्वास निर्माण केला होता व त्यामुळे राजकारण व निवडणुकांप्रति निरुत्साही असलेले असंख्य गोमंतकीय राजकारणात रुची घेऊ लागल्याचे नंतरच्या काळात दिसू लागले होते.
गोव्याच्या राजकारणाचा विचार करताना पर्रीकर यांना वगळून पुढेच जाता येत नाही असे राजकारण बरेच उशिरा म्हणजे नव्वदच्या दशकात राजकारणात पाऊल ठेवलेल्या पर्रीकर यांनी केले, असे म्हणावे लागेल. ते एक धूर्त राजकारणी ठरले. त्या काळातील म.गो.च्या अवसानघातकी राजकीय डावाचा त्यांनी अचूक लाभ भाजपला मिळवून दिला. तोपर्यंत रमाकांत खलप यांनाच भाई म्हणून ओळखले जात असे. पण नंतर भाई म्हणजे मनोहर पर्रीकर असेच समीकरण झाले.
पणजीत आमदार बनल्यावर तर त्यांचे कार्यक्षेत्र पुष्कळच फैलावले. त्यांची धडाडी, अभ्यासू वृत्ती यापुढे सत्ताधारीसुद्धा टिकाव धरू शकले नाहीत. त्यांनी नंतरच्या काळात खलप, रवि नाईक, दयानंद नार्वेकर यांना भाजपमध्ये आणून एक नवे राजकारण तयार केले. त्यांतील आज केवळ रवि नाईक भाजपमध्ये सत्तेवर आहेत तर नार्वेकर, खलप यांचे राजकारण संपल्यातच जमा आहे.
नव्वदच्या दशकात सत्तेवर असलेल्या काँग्रेसला त्यांनी गाठीशी तीन आमदार असताना कसे जेरीस आणले ते काँग्रेसवाल्यांनाच कळले नाही. नंतर काँग्रेसमध्ये फूट पाडून सार्दिन यांना मुख्यमंत्री करणे, ते करताना स्वतः मंत्रिमंडळात सामील न होणे पण एका मोक्याच्या वेळी पाठिंबा काढून घेऊन सरकार पाडणे व नंतर भाजप सरकार घडवून मुख्यमंत्री होणे ही त्यांची चाणक्य नीती म्हणायची की दुसरे काही ते कळण्यास मार्ग नाही. मात्र त्यातून भाजपचे पहिलेवहिले सरकार गोव्यात सत्तेवर आले हे खरे.
पर्रीकर यांचा मुख्यमंत्री म्हणून तो पहिला कार्यकाळ, प्रत्येकाच्या स्मरणात तो दीर्घकाळ राहिला तो त्यांनी त्यावेळी दाखविलेली धडाडी व विकासकामांचा लावलेला धडाका यामुळे. बायणातील कुप्रसिद्ध वेश्यावस्तीवर बुलडोझर चढविला गेला तो याच काळात, तसेच प्रतिकूल परिस्थिती असतानाही पहिला इफ्फी अगदी दिमाखात आयोजित करण्याचे धाडस त्यांनी याच काळात दाखवून देशविदेशांतील प्रतिनिधींकडून कौतुकाची थाप तर घेतलीच पण गोव्याच्या कानाकोपऱ्यांत इफ्फीविषयी कुतूहलही तयार केले.
पण त्यांचा हा धडाका त्यांच्यानंतरच्या कार्यकाळांत दिसला नाही. त्यामागील कारणे कोणतीही असोत पण ते त्यांचे समर्थकही मान्य करतात. नेमकी हीच गोष्ट थोरले खाशे अर्थात प्रतापसिंग राणे यांच्या बाबतीतही घडली होती. १९८०मध्ये त्यांनी गोव्यात पहिले काँग्रेस सरकार घडविले तेव्हा त्यांच्या मंत्रिमंडळात तरुण मंत्री होते व त्या सरकारने अनेक विकास योजना राबवून गोव्याला वेगळी दिशा दिली.
पण नंतर दोन अडीच वर्षांतच त्यांना (मंत्र्यांना) वगळून बाबू व विली यांची मंत्रिपदी वर्णी लावली गेली. त्या वेळी त्याबाबत बरीच चर्चा झाली होती. नंतर ८५च्या निवडणुकीत पुन्हा राणे सरकार सत्तेवर आले खरे पण बरीच उलथापालथ झाली. त्या कार्यकाळात घटकराज्य कोकणी मान्यतासारखे निर्णय झाले नंतर ९०मधील निवडणुकीत आणखीन घडामोडी झाल्या व त्याची बरीच झळ राणे यांना बसली त्यामुळेच सुरुवातीचा बाणा त्यांना दाखवणे शक्य झाले नसावे.
पर्रीकरांबाबतही नेमके असेच घडले. पहिल्या कार्यकाळांत त्यांनी विधानसभा विसर्जित करून निवडणूक घेतली व बहुमत मिळविले खरे, पण ते काठावरील होते. दुसरे म्हणजे केंद्रात वाजपेयी सरकार जाऊन काँग्रेस सत्तेवर आले होते व गोव्यात जमीर राज्यपाल झाले होते. त्यांतून भाजपमधील असंतुष्टांनी काँग्रेसबरोबर सलगी करून त्यांचे सरकार पाडले. त्याचा अधिक तपशील देण्याचे कारण नाही.
माझ्यामते त्याचा सर्वांत मोठा फटका गोव्याच्या विकासप्रक्रियेला बसला व गोवा कित्येक दशके मागे गेला. जर पर्रीकर यांना जर तो पहिला कार्यकाल पूर्ण करता आला असता, तर गोव्याने विकासात प्रचंड झेप घेतली असती. कारण त्याकाळात आजच्यासारखे तांत्रिक अडथळे नव्हते. त्यासाठी पणजीतील नवा पाटो पूल व जोडरस्ता याचे उदाहरण घेता येईल. आज तो करणे कदापि शक्य नव्हते. पहिल्या कार्यकाळात त्यांनी मडगावच्या वेगवेगळ्या दिशांनी तयार केलेले रावणफोंड, खारेबांध व कोलवा रस्त्यावरील पूल ही उदाहरणे आहेत. केंद्रीय झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतून मोतीडोंगर झोपडपट्टीची सुधारणा करण्याचेही त्यांच्या डोक्यात होते. पण ते प्रत्यक्षात आले नाही. त्यांच्यामुळे राजकारणात काही अनिष्ट प्रथाही रूढ झाल्या खऱ्या, सामूहिक पक्षांतर हे त्यातील एक. पण त्यांचा तो कार्यकाल पूर्ण झाला असता तर गोव्याचे चित्र वेगळेच दिसले असते हे खरे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.