Mandrem Village Goa Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Mandrem: सफर गोव्याची! खाद्यसंस्कृतीने समृद्ध, हिरव्यागार शेतीने वेढलेले 'मांद्रे'

Mandrem Village Goa: मांद्रे गावच्या मातीची प्रिय अशी निराळीच संस्कृती आहे. खाद्यसंस्कृतीबाबत बोलायचं झालं, तर मांद्रे म्हणजे अस्सल चवींचं माहेरघर.

गोमन्तक डिजिटल टीम

माझ्या मांद्रे गावच्या मातीची प्रिय अशी निराळीच संस्कृती आहे. खाद्यसंस्कृतीबाबत बोलायचं झालं, तर मांद्रे म्हणजे अस्सल चवींचं माहेरघर. इथली हिरवी मिरची, काटे-कणगीसारखे पारंपरिक पदार्थ, मासळीचे विविध प्रकार, हे सगळं केवळ खाणं नाही, तर पिढ्यानपिढ्या चालत आलेली संस्कृती आहे.

या चवींमध्येच या मातीचा गंध दडलेला आहे. अभिमानाची बाब म्हणजे शिक्षणाची परंपरा. प्राथमिक शाळांपासून ते महाविद्यालयांपर्यंत शिक्षणाची मजबूत साखळी इथं उभी आहे. अनेक शिक्षक, प्राध्यापक, प्रशासकीय अधिकारी, कलाकार आणि साहित्यिक घडवणारी ही माती शिक्षणाला नेहमीच प्राधान्य देत आली आहे.

सर्वधर्मसमभावाचं जिवंत उदाहरण म्हणजे माझं मांद्रे. वाड्यावाड्यांतील ख्रिस्ती बांधवांची चॅपल्स आणि आश्वे -मधलामाज रस्त्यावर उभं असलेलं अवर लेडी ऑफ रोजरी चर्च मन वेधून घेतं. भगवती सप्तेश्वराच्या सप्ताहात सहभागी होणारी एकजूटही तितकीच पवित्र वाटते. ज्या तळमळीने आम्ही सप्ताहात सहभागी होतो, त्याच भक्तिभावाने आम्ही फेस्त साजरे करतो. इथे धर्म वेगळे असले, तरी माणुसकी आणि श्रद्धा एकच आहे.

आजही मांद्रे पूर्णपणे बदललेलं नाही, आणि म्हणूनच ते अधिक आपलं वाटतं. कृषिप्रधान ओळख अजूनही टिकून आहे. हिरवीगार शेती, जुन्या जाणत्यांनी जपून ठेवलेली जमीन आजही कसली जाते, पिकवली जाते. त्या मातीतूनच आमच्या अस्तित्वाची मुळे घट्ट रोवलेली आहेत. काळ बदलतो आहे, गरजा बदलत आहेत, आणि बदल हवाच आहे, पण तो बदल माणसाला माणूसपणापासून तोडणारा नसावा, इतकीच अपेक्षा आहे.

कधी कधी आधुनिकतेचा ध्यास घेत असताना एक प्रश्न मनात डोकावून जातो, आपण कुठेतरी स्वतःचं अस्तित्व हरवत चाललो आहोत की काय? आधुनिकता हवीच आहे, पाश्चात्त्यीकरणही हवंच आहे, आणि आर्थिक स्थैर्य, पैसा-अडका याचं महत्त्व नाकारता येणार नाही. पण या सगळ्या धावपळीत आपली माती, आपली माणसं, आपली संस्कृती आणि आपली ओळख आपण विसरत तर नाही ना, याचं भान ठेवणं तितकंच गरजेचं आहे.

मुळात आपण कोण आहोत, आपण काय होतो, आणि इथपर्यंत कसे आलो. याची जाणीव जपणं फार महत्त्वाचं आहे. डोळसपणे पाहिलं, तर आपण कुठे चुकतो आहोत, कुठे तडजोड करतो आहोत, आणि कुठे स्वतःपासून दूर जातो आहोत, हेही आपल्याला कळू शकतं. आणि हीच जाणीव जर आपण आज ठेवली, तर उद्याच्या येणाऱ्या पिढीसाठी आपलं गाव, आपली माती आणि आपली संस्कृती जपून ठेवणं नक्कीच शक्य आहे.

मांद्रे म्हणजे केवळ भूतकाळाचा अभिमान नाही, तर भविष्याची जबाबदारीसुद्धा आहे. ही जबाबदारी आपण सर्वांनी मिळून उचलली, तरच हे गाव फक्त आठवणीत नाही, तर अनुभवात, जगण्यात आणि पुढच्या पिढीच्या श्वासात जिवंत राहील.

विमल परेश नाईक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Best SUVs Under 15 Lakhs: रॉयल लूक अन् दमदार परफॉर्मन्स! 15 लाखांच्या किमतीत 'या' 5 एसयूव्ही ठरतायत ग्राहकांची पहिली पसंती

Electricity Bills Goa: वीज बिले चक्क 50 हजार ते लाखापर्यंत..! Video

Goa Drowning Death: मौजमजा बेतली जीवावर! पोळे बीचवर कर्नाटकातील 19 वर्षांचा तरुण बुडाला, शोध सुरू

Mumbai- konkan M2M Ferries: चाकरमान्यांना बोटीनं जाता येणार गावी! ट्रॅफिकच्या कटकटीतून सुटका; पाहा 'एम टू एम' फेरीचे वेळापत्रक

Bengaluru to Goa Vande Bharat: प्रवास सुखकर होणार! बंगळुरू ते गोवा आता फक्त 13 तासांत; रेल्वे मंत्रालयाकडून 'वंदे भारत एक्स्प्रेस'चा प्रस्ताव

SCROLL FOR NEXT