Lionel Messi retirement from Argentina national team after historic international career Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Lionel Messi Retirement: G.O.A.T. महानायक! 'मेस्सी मॅजिक'चा अखेरचा अध्याय; दोन दशकांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला लिओनेल मेस्सीचा निरोप

Lionel Messi Argentina Retirement: फुटबॉलच्या मैदानावर आपल्या जादुई खेळाने कोट्यवधी चाहत्यांना वेड लावणाऱ्या लिओनेल मेस्सी यांनी अर्जेंटिनाच्या राष्ट्रीय संघातून निवृत्ती जाहीर केली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

फुटबॉलच्या मैदानावर आपल्या जादुई खेळाने कोट्यवधी चाहत्यांना वेड लावणाऱ्या लिओनेल मेस्सी यांनी अर्जेंटिनाच्या राष्ट्रीय संघातून निवृत्ती जाहीर केली आहे. तब्बल दोन दशकांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला विराम देताना ३९ वर्षीय मेस्सी यांनी हा निर्णय वेदनादायी असला तरी योग्य वेळ आल्याचे म्हटले. अर्जेंटिनासाठी २०७ सामने खेळताना १२५ गोल करणाऱ्या मेस्सी यांनी २०२२ मध्ये विश्वचषक जिंकून आपल्या कारकिर्दीतील सर्वांत मोठे स्वप्न साकारले.

२०२६ च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात स्पेनविरुद्ध पराभव झाल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला. विक्रमी आठ वेळा ‘बॅलन डी ओर’ पुरस्कारांनी सजलेली त्यांची कारकीर्द फुटबॉलच्या इतिहासातील सुवर्णअध्याय ठरली आहे.लिओनेल मेस्सीने याअगोदर दोनदा निवृत्ती स्वीकारली होती. यातील पहिली होती २०१६ मध्ये. ‘कोपा’ अमेरिका स्पर्धेत अंतिम सामन्यात चिलीविरुद्ध पेनल्टी शूटआउटमध्ये गोल करण्यात अपयशी ठरल्यामुळे मेस्सीने निराश होऊन निवृत्ती जाहीर केली होती. मोठ्या मनधरणीनंतर मेस्सीने निवृत्ती मागे घेतली आणि पुढे याच ‘कोपा’अमेरिका स्पर्धेचे विजेतेपद तर मिळवलेच; पण २०२२ मध्ये विश्वकरंडकही उंचावला.

२०२२ ही आपली अखेरची विश्वकरंडक स्पर्धा असल्याचे मेस्सी अगोदरपासून सांगत होता. ही स्पर्धा जिकंल्यानंतर तो आपल्या निर्णयावर ठाम होता; परंतु प्रशिक्षक स्कोलोनी आणि सहकाऱ्यांच्या विनंतीवरून तो यंदाच्या विश्वकरंडक स्पर्धेत खेळला.मेस्सीची निवृत्ती अपेक्षित होती. त्याचे वय आत्ता ३९ वर्षे आहे. पुढील विश्वकरंडक स्पर्धेपर्यंत तो ४३ वर्षांचा होईल. तोपर्यंत खेळणे शक्य नसल्यामुळे त्याची निवृत्ती अपेक्षित होती. विशेष म्हणजे यंदाच्या स्पर्धेत स्पेनकडून अंतिम सामन्यात पराभव झाल्यानंतर त्याने आपला निर्णय निश्चित केला होता. निवृत्तीचे निवेदनही तयार केले होते. मात्र वडिलांचे आजारपण आणि त्यात त्यांचे झालेले निधन यामुळे निवृत्तीचा निर्णय त्याने आत्ता जाहीर केला.

प्रतिभावान खेळाडूंचे माहात्म्य

आजच्या व्यावसायिक क्रीडाविश्वात प्रतिभावान खेळाडूंचे आर्थिक मूल्यही प्रचंड आहे. पण त्यांचे खरे मूल्य जाहिराती, जर्सी विक्री किंवा सोशल मीडिया फॉलोअरमध्ये मोजता येत नाही. असे खेळाडू केवळ उत्तम खेळ करतात, असे नाही तर खेळाची ‘इकोसिस्टिम’ उभी करण्यास समाजाला, सरकारला भाग पडतात. एवढेच नव्हे तर एका संपूर्ण पिढीला स्वप्न देतात. सचिनला पाहून क्रिकेट खेळणारी पिढी, रॉजर फेडररला पाहून टेनिसकडे वळलेली मुले, जॉर्डनमुळे बास्केटबॉलकडे आकर्षित झालेले तरुण किंवा उसेन बोल्टला पाहून धावपटू होण्याचे स्वप्न पाहणारी मुले जेव्हा दिसतात, तेव्हा त्या त्या खेळाडूंची ती महान कामगिरी ठरते; त्यांच्या वैयक्तिक यशापेक्षाही महान.

खेळ सुंदर करणे...

सर्वांत मोठा वारसा म्हणजे त्याने जगाला फुटबॉलकडे पाहण्याची एक दृष्टी दिली. त्याने दाखवले की छोट्या शरीरयष्टीचा खेळाडूही मोठा प्रभाव निर्माण करू शकतो. ताकदीपेक्षा बुद्धिमत्ता प्रभावी ठरू शकते. वेगापेक्षा योग्य क्षण महत्त्वाचा असू शकतो. स्वतः गोल करण्यापेक्षा सहकाऱ्याला गोल करू देण्यातही महानता असू शकते. आणि सर्वांत महत्त्वाच्या खेळात जिंकणे महत्त्वाचे असले तरी खेळ सुंदर करणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

आकड्यांपलीकडे...

मेस्सीच्या निवृत्तीचा क्षण हा केवळ एका खेळाडूचा निरोप नाही. तो एका कलाकाराने घेतलेला निरोप आहे. फुटबॉलच्या मैदानावर त्याने जे निर्माण केले ते आकड्यांत पूर्णपणे मोजता येणार नाही. कारण विक्रम विसरले जाऊ शकतात; पण सुंदर खेळ पाहिल्याची अनुभूती विसरता येत नाही. मेस्सी मैदानावरून निघून जाईल. पण एखादा मुलगा चेंडू पायाशी घेऊन दोन खेळाडूंमधून वाट काढताना, एखादा पास योग्य क्षणी सहकाऱ्याकडे देताना, किंवा एखादा खेळाडू पराभवानंतर पुन्हा मैदानात उतरताना मेस्सीची आठवण पुन्हा जागी होईल. अशा खेळाडूंचे महत्त्व त्यांच्या पदकांमध्ये किंवा विक्रमांमध्ये संपत नाही. ते लाखो लोकांना खेळ पाहायला लावतात, हजारो मुलांना तो खेळ खेळायला प्रवृत्त करतात आणि त्या खेळाभोवती नवे आर्थिक-सांस्कृतिक विश्व उभे करतात.

स्वप्नपूर्ती

मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो हे या युगाचे मोठे फुटबॉल सुपरस्टार म्हणून ओळखले जातात; परंतु सुपरस्टार असलात तरी प्रत्येक स्वप्न पूर्ण होते असे नाही. रोनाल्डोही आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्त झाला; परंतु विश्वकरंडक जिंकण्याचे त्याचे स्वप्न अपूर्णच राहिले. यात मेस्सी मात्र भाग्यवान ठरला. विक्रमी आणि प्रभावशाली खेळाडू असे वर्गीकरण असते, विक्रमांची शिदोरी कितीही मोठी असली तरी प्रेक्षकांच्या मनात मिळवलेले स्थान सर्वोच्च असते. म्हणूनच पिढी बदलली तरी पेले, मॅराडोना यांचे नाव आजही कायम आहे. मेस्सी याच पंक्तीतला खेळाडू असणार.

‘मेस्सी मॅजिक’

खेळ मोठा की खेळाडू, हा प्रश्‍न नेहमीच उपस्थित केला जातो. खेळ निश्चितच मोठा असतो; पण आता काळ बदललाय. लोकप्रियता आणि पर्यायाने येणारी आर्थिक सुबत्ता याला तेवढेच महत्त्व निर्माण झाले आहे. त्यामुळे काही खेळाडू हे त्या त्या खेळाचे चेहरे होतात. सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांनी क्रिकेटला मोठ्या उंचीवर नेले. रोनाल्डो किंवा मेस्सी खेळतोय म्हटले की उत्सुकतेचा आणि ‘टीआरपी’चा पारा किती वर जातो हे समजतही नाही. म्हणूनच ‘मेस्सी मॅजिक’ हे नाव प्रसिद्ध झाले होते.

देशासाठी सर्वस्व झोकणारा प्रेरणादायी मेस्सी

अ र्जेंटिनाचा लिओनेल मेस्सी याची फुटबॉलमधील महानता सर्वोच्च शिखरावर आहे. सर्वांगसुंदर खेळाने फुटबॉल जगताला मोहित केलेला हा जादूगर! त्याने जादुई आणि यशस्वी खेळाने उच्च कोटीचा वारसा निर्माण केला, जो नव्या पिढीसाठी नेहमीच आदर्शवत असेल. मेस्सीने जागतिक मैदाने गाजविली. क्लब पातळीवर विक्रमांसह इतिहास रचला. बार्सिलोना क्लबने मेस्सी संघात असताना सर्वोत्तम कालखंड अनुभवला. मला वाटते, मेस्सीने आपल्या शरीराचे योग्यवेळी ऐकले. तो आता ३९ वर्षांचा आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर देशवासीयांच्या अपेक्षांचे ओझे पेलत यशाला गवसणी घालणे शक्य होणार नाही हे त्याने जाणले असावे आणि विश्वकरंडक संपल्यानंतर आता आंतरराष्ट्रीय निवृत्ती जाहीर केली.

तो यापुढेही क्लब पातळीवर खेळेल, पण देशाचे प्रतिनिधित्व करताना दिसणार नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर अर्जेंटिनासाठी मेस्सी सर्वस्व झोकून खेळला. मातृभूमीप्रति तो प्रामाणिक राहिला. व्यावसायिक क्लब पातळीवर तो सफल ठरला. त्याने आपल्या देशासाठी पूर्ण क्षमतेने खेळ केला. आपल्या संघातील खेळाडूंना त्याने प्रेरित केले. त्यातूनच त्याला चार वर्षांपूर्वी अर्जेंटिनाला विश्वकरंडक जिंकता आला. यंदा थोडक्यात जगज्जेतेपद हुकले. मेस्सीच्या नेतृत्वाखालील अर्जेंटिनाने विश्वकरंडकात विजेतेपद आणि उपविजेतेपद पटकावले. हमखास गोल करणारा, भन्नाट ड्रिबलिंग साधणारा मेस्सी अचाट दैवी फुटबॉल गुणवत्तेसाठी सुपरिचित आहे. माझ्या मते तो आपल्या देशासाठी सर्वस्व देणारा प्रेरणादायी नेता ठरला. त्यामुळेच त्याला माझा कडकडीत सॅल्युट!

- ब्रुनो कुतिन्हो,

गोव्याचे अर्जुन पुरस्कारप्राप्त फुटबॉलपटू, भारतीय फुटबॉल संघाचे माजी कर्णधार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

महिंद्राची नवी CNG SUV बाजारात; 9.99 लाखांपासून किंमत, दमदार लूकसह टाटा नेक्सॉन आणि ब्रेझाला देणार टक्कर

Ranji Trophy 2026: पिठिया-भार्गवच्या फिरकीपुढे गोव्याची शरणागती! बडोद्याचा डाव व 135 धावांनी दणदणीत विजय

Dharashiv Child Welfare Committee: बालकांच्या कल्याणासाठी उचललेल्या पावलांचे प्रतिज्ञापत्र द्या; गोवा खंडपीठाचे धाराशिव समितीला निर्देश

SCROLL FOR NEXT