Pickle Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Pickle: कैरीचे, लिंबाचे, गेला बाजार कारवार-दक्षिण गोव्यातले ‘आप्पेमिडी’ लोणचे; जेवणातील 'अमृतरस'

Indian Pickle Importance: मऊ भात आणि केवळ लोणचे - ही जोडही तितकीच परिपूर्ण आहे. लोणच्याच्या आंबट-खारट-तिखट रसामुळे साध्या भातालाही वैशिष्ट्य प्राप्त होते.

गोमन्तक डिजिटल टीम

केदार साखरदांडे

माझ्यासाठी लोणचे हे केवळ एक उपपदार्थ नाही; तर ती जेवणातील परमोच्च आनंदाची व्याख्या आहे. साधं वरण-मऊ भात असो, ताकभात, दहीभात, कढीभात, मेतकूटभात किंवा अगदी साधा तूपभात - लिंबाचे लोणचे सर्वांशी सहज मैत्री करते. ते प्रत्येक पदार्थाला आपली साथ देत त्याची चव वाढवते.

जेवण सुरू करण्यापूर्वी ‘वदनी कवळ घेता’ म्हणताच ताटातील लोणच्याच्या फोडीवर नजर जाते. हळुवारपणे त्या फोडीतील आंबट-तिखट-खारट रस जिभेच्या एका टोकाला चाटवला की एक अद्भुत लहर संपूर्ण शरीरभर पसरते.

जणू काही अश्वमेधाच्या यज्ञातील मुक्त सोडलेल्या घोड्याप्रमाणे ती चव जिभेपासून चेतनेच्या प्रत्येक कोपऱ्यापर्यंत दौडत जाते. जिभेवर लाळरूपी रसाचे गुर्‍हाळ सुरू होते आणि पुढे येणारा प्रत्येक घास आपोआपच अधिक चविष्ट वाटू लागतो.

मऊ भात आणि केवळ लोणचे - ही जोडही तितकीच परिपूर्ण आहे. लोणच्याच्या आंबट-खारट-तिखट रसामुळे साध्या भातालाही वैशिष्ट्य प्राप्त होते. जेवताना इतर पदार्थांना न्याय देत, प्रत्येक दोन घासांनंतर लोणच्याची चव चाखत जेवण पुढे सरकते.

जेवणाच्या मध्यावर एक सुंदर संगम घडतो. लोणच्याचा खारट रस हळूहळू वाहत येतो आणि ताक, दही, कढी किंवा वरणाच्या रसाबरोबर एकरूप होतो. हा संयुक्त रस म्हणजे जिभेवर अवतरलेले अमृतच. त्या क्षणी त्या मिश्र चवीचा एक भुरका मारला, की मन समाधानाने भरून जाते!

याच वेळी फोडीवर हलकेच नख दाबून ती दोन तुकड्यांत विभागावी. एक तुकडा मधल्या वरण-भाताबरोबर, तर दुसरा शेवटच्या ताकभातासाठी राखून ठेवावा. या नियोजनातच जेवणाची खरी रंगत आहे.

सर्व भात संपल्यावर उरलेला ताक, दही किंवा वरण आणि त्यात मिसळलेला लोणच्याचा पिवळट-लालसर रस - त्या क्षणी सभ्यतेचे सर्व संकेत विसरून ताट तोंडाला लावून भुरकून घ्यावासा वाटतो. समाधानाची ढेकर देत ‘इति सुमधुर भोजनं समर्पयामि’ असे म्हणून जेवणाची सांगता होते.

लोणचे जसे ताटात सहज जुळवून घेते, तितक्या सहज ते तयार मात्र होत नाही. लोणचे घालणे हासुद्धा एक सोहळा असतो. चिनीमातीच्या बरणीत पोहोचण्याआधी जो सोवळेपणा बाळगला जातो, तेवढा कर्मठपणा ब्रह्मवृंदही करत नसावा. अर्थात ही कर्मठ काळजी ते टिकावं यासाठीच घेतली जाते.

बरं, लोणच्याचे प्रकार तरी किती! साधे कैरीचे लोणचे घ्या, लिंबाचे लोणचे घ्या, गेला बाजार कारवार-दक्षिण गोव्यातले ‘आप्पेमिडी’ लोणचे घ्या. अगदी गाजर, फ्लॉवर, लसूण, आंबेहळद, मिरची - यादी संपत नाही. हे झाले शाकाहारी प्रकार. सामिष पदार्थांत बांगडा आणि सुंगटांचे लोणचेसुद्धा काय अप्रतिम लागते! यात खार नसला तरी, मसाला नसला तरी भागते की.

अगदी आंबाडी मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवली आणि पेजेबरोबर घेतली तरी ती (म्हणजे आंबाडी किंवा ‘आमली’) खालेल्या मिठाला अगदी व्यवस्थित जागते. बरं, लोणचे फक्त चव वाढवते असं नाही. कसं? तर एक अनुभव सांगतो.

माझ्या सासरी ‘छकुली’ नावाचा एक बोका होता. त्याने एकदा काहीतरी चुकीचं खाल्लं. त्याला ते पचलं नाही. प्रचंड प्रमाणात ऍसिडिटी झाली आणि जाम मलूल होऊन पडला. माझ्या सासूमाईंनी चक्क त्याला घट्ट धरलं. दोन बोटांनी त्याचा जबडा उघडला आणि काही समजायच्या आत खारवलेल्या आमलीचा एक तुकडा त्याच्या घशात सरकवून दिला.

त्याने बरीच धडपड केली; पण सासूमाईंनी त्याला अजिबात सोडलं नाही. आणि पुढच्या क्षणी कमाल झाली. खारवलेल्या आमलीने चक्क अल्कलीचे काम केले. अल्कलीने ऍसिडिटी न्यूट्रल केली आणि दुसऱ्या क्षणी छकुली एकदम तरतरीत होऊन धावू-खेळू लागला.

‘थ्री इडियट्स’ या गाजलेल्या चित्रपटात एक संवाद आहे - ‘सॉल्टी वॉटर इज गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. हमने किताब में पढ़ा था, साले ने अप्लाय किया’. बरं, वरील प्रसंग हा त्या चित्रपट प्रदर्शित होण्याच्या बऱ्याच आधीचा. असो. तर मथितार्थ हा की लोणचे औषध म्हणूनसुद्धा काम करते.

संत समर्थांच्या ‘उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म’ या उक्तीमागे केवळ पोट भरणे नव्हे, तर भोजनाचा आध्यात्मिक अनुभव दडलेला आहे. कदाचित ताटातल्या लोणच्याच्या उपस्थितीमुळेच हा विचार अधिक प्रखरपणे जाणवला असावा, असे वाटल्यावाचून राहत नाही.

लोणचे हे जेवणातील एक साधे, पण अनिवार्य तत्त्व आहे - जे चव, समाधान आणि आनंद या तिन्हींचा संगम घडवते. शेवटी जेवण ही कला असावी, क्रिया नसावी. आणि ती अंगात मुरावी लागते. लोणचे मुरते ना अगदी तशीच.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Omkar Elephant Goa: ‘ओंकार’ तोरसे, तांबोसेत घुसण्याच्या तयारीत, पिकांची हानी! तातडीने बंदोबस्ताची शेतकऱ्यांची मागणी

Goa Water Crisis: राज्यात पाणी संकट गडद! जलाशयांनी गाठला तळ; साळावलीत 48 टक्के, तर अंजुणेत 31 टक्के पाणी बाकी

Goa Drug Menace Crisis: अमली पदार्थांचा विळखा आता थेट शाळांपर्यंत! किनारपट्टीपासून गावागावांत ड्रग्जचं जाळं पसरलं तरी सरकार 'ढिम्म'; सरदेसाईंचा घणाघात

कदंब बसस्थानकात खासगी बसचालकांची मनमानी! म्हापशात प्रवासी, वाहनधारक त्रस्त: नागरिकांकडून कारवाईची जोरदार मागणी

CM Pramod Sawant: आंबेडकरांना काँग्रेसकडूनच खोडा, दोनवेळा लोकसभेत जाण्यापासून रोखलं; मुख्यमंत्री सावंतांचा घणाघात

SCROLL FOR NEXT