भारतीय संस्कृतीने पूर्वापार ज्या वृक्षांना महत्त्वाचे स्थान दिलेले आहे, त्यात वड, पिंपळ, औदुंबर, आंबा आदींचा समावेश आहे. हे सारे वृक्ष पर्यावरण आणि लोकधर्म या दृष्टीने विशेष महत्त्वाचे मानले आहेत. त्यांची सरसकट तोड करण्यास सहसा कोणी धजत नाहीत. भारतीय संस्कृती अशा वृक्षांत देवत्व अनुभवते. आजही त्यांच्यासमोर नतमस्तक होत त्यांचे संवर्धन करण्यात येते.
मोरासी कुळात समाविष्ट करण्यात येणारे नांदरुख हे झाड गोवा, महाराष्ट्र येथील लोकमानस पूर्वीच्या काळी सावलीसाठी लावून, त्याचे रक्षण करण्यासाठी प्रयत्न करत. मध्यम आकारमानाचा हा सदापर्णी वृक्ष असून, एकेकाळी त्याची लागवड रस्त्याच्या दुतर्फा केली जात होती.
पायी प्रवास करत जाणाऱ्या लोकांना उन्हाळ्यात थंडगार सावली देण्यात हा वृक्ष पर्यावरणीय दृष्टीने उपयुक्त ठरला होता. आज आपण अशा वृक्षांना पूर्णपणे विसरत आहोत आणि त्यामुळेच नांदरुख म्हटल्यावर त्याची ओळख नव्या पिढीला सहसा नाही.
नांदरुख, पायरी, आष्टा हे वृक्ष जुन्या काळी लोकमानसाने महत्त्वाचे मानले होते आणि त्यामुळे स्थलनाम, ग्रामनाम यांसाठी त्यांची नावे वापरली गेली. गोड आणि चवीची फळे देणारी झाडे लावण्याचा आपण सदैव प्रयत्न करत असतो, परंतु निसर्गातले चक्र अबाधित चालू राहील यासाठी त्यांचे योगदान महत्त्वाचे असते, याची जाणिव आपणाला अभावानेच असते. ग. दि. माडगूळकर यांनी ‘सुखाची सावली’ या चित्रपटासाठी जे एक सुंदर भावगीत लिहिले त्यात नांदरुखीच्या वृक्षाचा उल्लेख केलेला आहे
एक होता चिमणा, एक होती चिमणी
नांदरुखीच्या झाडावर त्यांची झाली ओळख
ग्रामीण भागात बालपणाचे दिवस रम्य झाल्याने कवीने नांदरुखीचे महत्त्व ओळखून गीतात त्याचा उल्लेख केला होता. हे झाड जरी वडाच्या कुळातले असले, तरी त्याला वडासारख्या खूपच कमी पारंब्या असतात. असे असले तरी हे झाड असंख्य प्राणिमात्रांसाठी जीवनाधार ठरलेले आहे. या झाडावर राहणारे पशुपक्षी त्याची फळे आवडीने खातात आणि आपल्या विष्ठेतून बीजाचा प्रसार करण्यास हातभार लावतात. उन्हाळ्यात पशुपक्षी यांच्यासाठी आश्रय देणारे आहे.
या झाडाचे लाकूड मध्यम आणि कठीण असून, त्याचा वापर जळणासाठी ते कोसळून पडल्यावर लोक करायचे. भारतीय आयुर्वेदिक परंपरेत या वृक्षाचे महत्त्व ओळखून, त्याच्या पानांचा, सालीचा वापर औषध म्हणून करण्याला प्राधान्य दिले होते.
सालीचा रस यकृत विकारावर देतात. साल आणि पानाचे चूर्ण संधिवातावर तेलात उकळून दिले जाते. संत तुकाराम महाराजांच्या जीवनात नांदरुखीचे झाड महत्त्वाचे मानले जाते. त्यांच्या क्रांतिकारी विचारांमुळे पदोपदी त्यांना मानहानी सोसावी लागली होती. लोकसंकेतानुसार विठ्ठल नाम संकीर्तन करत असताना त्यांना मोक्ष प्राप्त झाला तो या वृक्षावर आणि त्यामुळे देहू येथे शतकोत्तर परंपरा असलेले नांदरुखीचे झाड पवित्र मानलेले आहे. होळीनंतर येणाऱ्या तुकाराम बीज प्रसंगी दुपारी हा वृक्ष सळसळत असल्याचे भाविक मानतात. तुकाराम बीज प्रसंगी वारकरी हमखास या वृक्षाच्या सावलीत नाम संकीर्तन करतात आणि तुकाराम महाराजांच्या जीवन कार्याचे स्मरण करतात.
वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. श्री. द. महाजन यांनी ‘आपले वृक्ष’ या पुस्तकात नांदरुख वृक्षासंदर्भात लिहिताना गोव्यातील वास्को शहरात, मांगोर टेकडीवर नावेलकर कॉलनीत सुमारे २० मीटर उंचीचा, एक मीटर व्यासाच्या खोडाचा सदर वृक्ष पाहिल्याचे नोंद केलेले होते.
फलटण-सातारा रस्त्यावर दुतर्फा लावलेले नंदीवृक्ष आवर्जून जाऊन पाहण्याजोगे आहेत. महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही प्रकारच्या जमिनीत, विविध प्रकारच्या हवामानात ते वाढू शकतात. वनखाते, खासगी रोपवाटिका, स्वयंसेवी संस्था, निसर्गप्रेमी व्यक्ती अशा सर्वांच्या प्रयत्नाने लक्षावधी रोपे तयार करून रस्तारुंदीत तोडल्या गेलेल्या वडाच्या झाडांच्या जागी आणि जुन्या-नव्या मार्गांवर जागा असेल तेथे नांद्रुकची झाडे लावता येतील. पर्यावरणशास्त्रात ज्यांना अतिमहत्त्वाच्या संसाधन जाती (की स्टोन रिसोर्स स्पीसीज्) म्हणून गौरविले जाते त्यापैकी नांद्रुक ही एक आहे. असे या वनस्पती शास्त्रज्ञाने नमूद केलेले आहे.
आज मोपा येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू आहे. या विस्तीर्ण पठाराला पूर्वी बाराजण म्हणून ओळखत. या विमानतलावर जाताना उजव्या बाजूला जी वाट जाते तेथे बाराजण देवाचा पवित्र वृक्ष आहे, तो नांदरुखचा आहे. डेरेदार आणि थंडगार सावली देणारा हा वृक्ष कष्टकरी लोकसमूहासाठी अदृश्य रूपात वावरणाऱ्या शक्तीसाठी आश्रय ठरला होता. विमानतळाच्या उभारणीनंतर त्याचे रक्षण करण्यात आलेले आहे.
पेडण्यातील इब्रामपूर गावातल्या धनगर लोकवस्तीत दसऱ्याच्या दिवशी जेथे पारंपारिक पद्धतीने कुलदेवतेचे पेठारे आणतात तेथे नांदरुखीचे खूपच जुने झाड सुरक्षित ठेवलेले आहे. डिचोली शहरात जेथे जुने बसस्थानक आहे तेथे शतकोत्तर परंपरा असलेला नांदरुखीचा डेरेदार वृक्ष होता, त्याठिकाणी उन्हाळ्यात थकलेले कष्टकरी दुपारी विश्रांती घेण्यासाठी यायचे. आ
ज हा वृक्ष इतिहासजमा झालेला आहे. रस्त्याच्या दुतर्फा लागवड करण्यास हा वृक्ष उपायुक्त असून, तो भक्कम असल्याने वादळ वारा समर्थपणे तोंड देत उभा राहतो. दीर्घ आयुष्य लाभल्याने त्याचे महत्त्व अधिक आहे आणि त्यामुळे पर्यावरणीय, लोकधर्माने त्याला आदराचे स्थान दिलेले आहे.
वड, पिंपळ, नांदुरुख आदीं वृक्षाची तोड करण्यावर मुंबई उच्च न्यायालयाने एका खटल्यात बंदी घातली आहे, यावरून त्यांचे असाधारण महत्त्व समजते. उन्हाळयाचा वाढता ताप आणि गोव्यातील दमट वातावरणामुळे होणारी शरीराची लाही लाही होत असताना, नांदरुखीच्या झाडाची सावली आल्हाददायक वाटते. त्यामुळे त्यांचे संवर्धन आणि संरक्षण गोव्यासारख्या राज्यासाठी लाभदायक ठरत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.