Goa Opinion: गोवा पाहायला आलेले पर्यटक गोवेकरांनाच ‘भलतेच काहीतरी’ दाखवण्याचे प्रदर्शन मांडतात; विशेष लेख

Goa Infrastructure Challenges: राजकारण्यांच्या आमिषांना बळी पडून भावी काळात कलाकार म्हणून घेण्यासाठी, घरातले काम नवऱ्यावर सोडून फुगड्या व ढोल बजावण्याच्या प्रदर्शनाला जाणाऱ्या बायकांना काय म्हणावे?
Goa News Updates
Goa BeachDainik Gomantak
Published on
Updated on

विकास कांदोळकर

प्रदर्शनाची कला ही सर्जनशीलता, ‘क्युरेशन’ आणि कथाकथन यांच्या आकर्षक आणि गतिमान मिश्रणातून, प्रदर्शनाच्या जागांना मोहक आणि तल्लीन करणाऱ्या अनुभवांमध्ये रूपांतरित करते. प्रदर्शन मांडताना बारकाईने नियोजन करणे अति-महत्त्वाचे आहे. कलाकृती निवडण्यापासून ते प्रेक्षकांच्या मनात विशिष्ट ‘थीम’ निर्माण करण्यासाठी मार्गदर्शक रूपरेषा मांडणे महत्त्वाचे ठरते.

‘क्युरेटर’ म्हणजे कलासंग्रहांचा व्यवस्थापक ‘दृश्य-कवी’ म्हणून काम करताना, कलाकाराच्या विचारांना उत्तेजन देण्यासाठी आणि कलेला प्रतिसाद निर्माण करण्यासाठी कलेचा विषय आणि भावना यांची सुंदर गुंफण करतो. प्रकाशयोजना, अंतर आणि इतर प्रदर्शन तंत्रे यांचा योग्य वापर करून कला प्रदर्शनात सुसंवाद राखताना, प्रत्येक कलाकृतीचा प्रभाव वाढवतो. प्रदर्शने पारंपरिक ‘गॅलरी शो’ ते ‘अवांत-गार्डे’ प्रतिष्ठापनांपर्यंत असू शकतात. प्रत्येक प्रदर्शनात विविध प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्यासाठी एक अद्वितीय दृष्टिकोन आवश्यक असतो.

प्रदर्शने वस्तूंची योग्यता आणि खोली संतुलितपणे तपासण्यासाठी नवकलाकारांना आणि तज्ज्ञांना संधी निर्माण करतात. कला, कलाकृती, जागा आणि दर्शक यांच्यात प्रतिबिंबित किंवा वादविवादीत संवाद निर्माण करण्यात प्रदर्शने गुंतलेली असतात.

यशस्वी प्रदर्शने, कलाकार, ‘क्युरेटर’ आणि ‘डिझायनर्स’ यांना एका सामायिक दृष्टिकोनाने एकत्र आणून, कायमस्वरूपी छाप मांडून, बहुतेकदा आव्हानात्मक दृष्टिकोन किंवा सांस्कृतिक वारसा निर्माण करतात. थोडक्यात, प्रदर्शनाची कला म्हणजे शोधाचे क्षण तयार करणे, जिथे प्रत्येक तपशील एका परिवर्तनकारी अनुभवाचे दर्शन घडवितो.

हल्ली प्रदर्शन कलेचा विपरीत वापर होताना दिसून येतो. आपल्या बायकांकडे असणाऱ्या दागिन्यांचे प्रदर्शन घडवण्यासाठी त्यांच्या नवऱ्यांनी सत्यनारायणाची पूजा किंवा देवीची पालखी काढण्यासारखे अनेक प्रकार अस्मादिकाने पाहिलेले आहेत.

कुणीतरी डोक्यात घातल्यामुळे अशिक्षित किंवा अर्धशिक्षित पालक प्रदर्शनासाठी आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत घालतात व अभ्यास कर म्हणून त्यांना दरडावतात. मुलेही इंग्रजी ना बोलल्यास मार पडेल या भीतीने अशिक्षित पालकांसमोर ‘जिबरीश’ भाषेचे प्रदर्शन करतात. पालक खूश! मुलेही त्यांच्यापेक्षा खूश!! परिणाम? काही शिक्षित पालक आपल्या मुलांना लहान वयात डॉग, कॅट, काव म्हणायचे प्रदर्शन घडवितात. मुलांना त्या वयात प्रश्न पडतो की या प्राण्यांना बाकीचे लोक कुत्रा, मांजर, गाय का म्हणतात? कोकणातील घरे नळ्यांची व उतरत्या छपरांची असतात असे आपण लहानपणी शिकलो पण हल्ली घर प्रदर्शनीय बनवण्यासाठी निसर्गाचे नियम डावलून, काँक्रीटचे छप्पर घालून, कित्येक घरवाले उन्हाळ्यात तळमळताना दिसतात.

राजकारण्यांच्या आमिषांना बळी पडून भावी काळात कलाकार म्हणून घेण्यासाठी, घरातले काम नवऱ्यावर सोडून फुगड्या व ढोल बजावण्याच्या प्रदर्शनाला जाणाऱ्या बायकांना काय म्हणावे? सणांच्या वेळी प्रदर्शनाचे प्रमाण नगण्य; आणि हो आता फुगड्यांमध्ये देव-देवतांच्या नावाऐवजी मंत्र्या-संत्र्यांच्या नावांचे भलतेच प्रदर्शन.

Goa News Updates
Panaji: 'पणजीतील बजबजपुरी हटवायची झाल्यास नागरिकांना स्वतःहून सत्ताबदल घडवावा', पर्रीकरांनी मांडले रोखठोक मत

सरकारने पणजीची स्मार्ट सिटी करण्याचे योजिले. ( याची माहिती फार वर्षांपूर्वी अस्मादिकाला मुंबईतील ‘इन्फोकॉम इंडिया’ या जागतिक दर्जाच्या प्रदर्शनात मिळाली. समस्यांपूर्वक प्रश्नांची त्यावेळी व्यासपीठावरील मान्यवरांनी व्यवस्थित उत्तरे दिली नाहीत.) स्मार्ट सिटी बनवता बनवता, पणजी जुगारी सिटी कधी बनली हे कळलेच नाही. रात्रीच्या वेळचे जुगारी कंपन्यांचे पणजीतील प्रदर्शन डोळे दीपवून टाकणारे आहे. गोवा पाहायला आलेले पर्यटक गोवा पाहण्याऐवजी इथे रात्रीच्या वेळेस गोवेकरांनाच ‘भलतेच काहीतरी’ दाखवण्याचे प्रदर्शन मांडतात.

गरीब ‘गोंयकाराने’ एखादे छोटे निवासी घर काढले तर त्याला कायद्याचे भय दाखवले जाते. राजकारण्यांची मर्जी संपादित केलेले लोक, सरकारी खाती आणि महामंडळे यांच्यामार्फत सरकार न्यायालयांना गृहीत धरून किंवा न जुमानता जनतेच्या पैशांची वाट लावून अनधिकृत कामे करून त्यांचे प्रदर्शन घडवते.

Goa News Updates
Climate Change In Goa: एकेकाळी पणजी जगातील सुंदर शहर होते! पण आता? तापमानवाढ आणि हरित फुफ्फुसांची संकल्पना

कुठेही फिरा सगळीकडे राजकारण्यांचे प्रदर्शन करणारे फलक! सार्वजनिक जाहिरातींच्या होर्डिंग्जवर मंत्र्यांचे फोटो लावल्याने राजकीय हेतू किंवा सार्वजनिक लाजिरवाणेपणा निर्माण होतो. उदाहरणार्थ, सरकारी योजनांना प्रोत्साहन देण्यासाठी बनवलेल्या होर्डिंग्जमध्ये सत्ताधारी लोक अनावश्यक प्रदर्शन मांडतात. हा मुद्दा सार्वजनिक निधीच्या गैरवापराबद्दल चिंता निर्माण करतो. चुकीच्या प्रतिमा प्रदर्शित केल्याने मोहिमांची विश्वासार्हता कमी होते आणि त्यांच्या उद्देशीत संदेशापासून लक्ष विचलित होते.

काही प्रकरणांमध्ये, अशा चुका जाणूनबुजून करून अयोग्य श्रेय मिळविले जाते. हे प्रश्न सोडवण्यासाठी, सामग्री पडताळणी आणि मंजुरीसाठी कठोर मार्गदर्शक तत्त्वे आवश्यक आहेत. स्थानिक प्रशासनांनी जबाबदारी सुनिश्चित केली पाहिजे आणि निष्काळजीपणाला दंड ठोठावला पाहिजे. असे वाद टाळण्यासाठी राजकीय पक्षांनी प्रचारापेक्षा पारदर्शकतेला प्राधान्य दिले पाहिजे. शेवटी, सार्वजनिक फलकांच्या अचूक आणि जबाबदार प्रदर्शनाने प्रशासनावरील विश्वास आणि प्रभावी संवाद सुनिश्चित होतो. संडास बांधले तरीही जाहिरातबाजीचे प्रदर्शन होते! संबंधितांनी अनावश्यक खर्च करून, संडासांचे ‘टराटरा’ फीत कापून उद्घाटनांचे प्रदर्शन करण्यापेक्षा ‘फराफरा’ करून उद्घाटन करणे योग्य वाटत नाही का?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com