Opinion Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

'AI' आभाळाला भिडलं तरी 'गुरु'ची जागा घेणार नाही; अमेरिकेतील वैमानिकांच्या 'त्या' प्रयोगातून जगाला मिळाला मोठा धडा!

Opinion: शिक्षक इतका प्रसन्न हवा की कुठल्याही प्रकारची नकारात्मक स्पंदने कुठल्याही रूपात वर्गात पसरू नयेत. उलट सात्त्विक आनंददायी कंपने वर्गाच्या भिंतीतसुद्धा भरली जावीत.

गोमंतक ऑनलाईन टीम

अमेरिकेतील वैमानिकांचं स्कूल. त्यात नव्या वैमानिकांना प्रशिक्षण दिलं जायचं. इतक्यात डिजिटल पावर पॉईंट सादरीकरण म्हणजे पीपीटी व इतर व्हिडिओ प्रणाली अवतरली. विद्यार्थ्यांना वाटलं की याद्वारे अर्ध्या तासाची कॅपसूल तयार करून सोडली तर शिक्षकांविना सैद्धांतिक भाग सोपा होऊन जाईल. काही शिक्षक हुशार अनुभवी असले तरी अधेमधे कंटाळा आणतच असतात.

काही शिक्षक लहरी, मुडी; तर काही शीघ्रकोपी. त्यापेक्षा या डिजिटल चित्रफिती प्रभावी होतील, हा त्यांचा अंदाज. त्यांनी प्रशासकीय अधिकार्‍यांना निवेदन दिले. बैठक झाली. नवी डिजिटल प्रणाली (शिक्षक विरहीत) लागू केली.

पडदा भव्य. दोन तीन दिवसांत विद्यार्थी कंटाळले. सशरीर शिक्षकाची उपस्थिती किती महत्त्वाची असते, शंकांचं निवारण तिथल्या तिथे कसं होतं, किंचित विनोदाची पखरण वातावरण कसं हलकं करते याचं महत्त्व त्यांना कळून चुकले. त्यांनी क्षमा मागितली. परत सैद्धांतिक पाठांचे शिक्षकी शिक्षण वर्गात सुरू केलं.

तंत्रज्ञान कितीही प्रगत झालं, एआय आभाळाच्या उंचीपर्यंत गेलं तरी ते सशरीर शिक्षकाची जागा घेऊ शकत नाही. शिक्षक हा मनुष्य असतो. यंत्रमानव (रोबोट) नव्हे. भावभावनांचे, गुणअवगुणांचे ते एक रसायन असते. घरी सहचराकडे भांडण झालेल्या तप्त बेचैन मुडांत शिक्षक वा शिक्षिका वर्गात प्रवेश करते. विद्यार्थ्यांना तात्काळ कळतं, आज शिक्षकाची मन:स्थिती ठीक नाही. चालतं. वर्गात हाडामासाचा शिक्षक हवा.

निरुपाय, पर्याय नव्हता म्हणून कोविड काळात ऑनलाइन वर्ग घेतले गेले. वर्गातील सशरीर शिक्षक जे शिक्षण विद्यार्थ्यांच्या अंगात संक्रमित करतो ती ज्ञानसंपादनाची सुंदर प्रक्रिया ऑनलाइनसोबत होऊच शकत नाही. केस पांढरे झाले तरी शिक्षक हा कायम विद्यार्थी असला पाहिजे. सभोवती काय घडतंय त्याचं अवधान शिक्षकाला हवं. सामान्य ज्ञान व आपल्या विषयाचं अद्ययावत ज्ञान हवं.

कोरियासारख्या प्रगत देशात शिक्षकाची निवड कडक परीक्षेतून होते. आमच्याकडे भारतीय प्रशासकीय सेवा असते त्याच पद्धतीने त्या देशांची एक प्रकारची शिक्षण सेवा असते. शिक्षकांची शारीरिक चाचणीही होते. एका वर्गात जास्तीत जास्त तीस मुलं असतात. सहनशीलता, वक्तृत्व, ऊर्जा, ज्ञान, पटवून देण्याची साभिनय क्षमता, खणखणीत वाणी असेल तर शिक्षकाची निवड तिथं सोपी होते.

आमच्या देशाचं आध्यात्मिक संचित फार मोठं आहे. एके काळी गुरुकुल पद्धत होती. गुरूकडे राहून मुलं शिकायची. एकदा शिष्यांसमवेत गुरू दुसर्‍या गावात चालले होते. जेवणासाठी त्यांनी दुपारी एका गावात झाडाच्या सावलीत थांबा घेतला. गुरू वर चौथर्‍यावर बसले. शिष्य खाली. जेवता जेवता एकाने पाहिले - गुरू मासे खात आहेत.

त्याने घास तोंडात कोंबणार्‍या जवळच्या गुरुबंधूच्या कानात पुटपुटून सांगितले - गुरूजींना बघ. आम्हांला मात्र बंधनं. आपण मासे खाताहेत. त्याने तिसर्‍याला संदेश दिला. एकही शिष्य लक्ष देऊन जेवत नव्हता. गुरू मात्र त्यांच्याकडे बिलकूल न पाहता शांतपणे अन्न ग्रहण करत होते. सगळ्यांचं जेवून झालं. शिष्यांचं, गुरूजींचं. गुरूंनी एक तिरपा कटाक्ष शिष्यांवर टाकला. भेदक, चमकदार, पाणीदार डोळे. गुरू अंतर्ज्ञानी, अंतर्यामी असतात हे शिष्यांना माहीत होतं.

पण शंकांचे किडे डोक्यात वळवळत होते. क्षणार्धात गुरूजींनी खाल्लेल्या माशांचे तुकडे (कपे) जोडून पक्के करून मासे कालवणात होते तसे तोंडातून बाहेर काढले. शिष्य डोळे विस्फारून आशाळभूतपणे माफी मागितलेल्या अवस्थेत पाहत राहिले. फार उच्च अवस्थेत असलेल्या गुरूची ही ताकद असते. त्यांच्याकडे सिद्धी असतात. शिष्यांनी फक्त सांगितलेलं करावं, शिकावं, त्यात त्यांचं भलं असतं. जास्त डोकं लढवू नये.

ही हकिगत बघा. वर्ग सुरू झाला होता. शिस्तीप्रमाणे वेळात सुरू. एक विद्यार्थी दहा मिनिटं उशिरा आला. त्यानं दरवाजा गडबडीत धांदलीत जोरात मारला, चप्पल कोपर्‍यात फेकून दिली आणि येऊन बसला. गुरूजींनी त्याला सांगितलं - अगोदर मागे जा, चप्पल व्यवस्थित ठेव व चपलांना आणि दरवाजाला ‘माफी मागतो’ असं मनोमन विनवून परत येऊन बस. गुरू शिस्तप्रिय होते. तो मागे गेला, आज्ञेचं पालन करत.

पुढच्या रांगेतील एका विद्यार्थ्याने गुरूजींना विचारलं, ‘गुरुजी, चप्पल, दरवाजा यांची माफी का म्हणून?’ गुरुजी उत्तरले, ‘कारण आपल्या चुकीने आपल्याला झालेला राग व तळतळाट त्यानं त्या दरवाजावर व चपलांवर काढला. रागाचा धूर धुमसत आहे. राग घेऊन फिरू नये. मोकळं व्हावं.’ शिष्याने विचारलं, ‘पण या वस्तू तर निर्जीव आहेत’. ‘हो. आम्ही सजीव. मी तुम्हांला माणूस बनवत आहे.’

शिक्षण चारित्र्यवान माणूस बनवतं. शिक्षकाची जबाबदारी केवढी पाहा. संगीत वाद्यवृंदात जसा कंडक्टर वा दिग्दर्शक हातवारे करून कलाकारांच्या चमूतील प्रत्येक उठाव, विराम, गती, लय नियंत्रित करतो तसा शिक्षक, वर्गात उपस्थित असतो तेव्हा शिक्षणाचं संगीत मार्गस्थ होऊन नाचू खेळू लागतं. नदी सागराला जोडलेली असते. तसा विद्यार्थी, वर्गाचा स्रोत - शिक्षक याच्याशी जोडलेला असतो. तेव्हाच नदीची ताकद त्याला येऊ लागते.

वर्गात दोघांचं अस्तित्व महत्त्वाचं असतं. ‘शिक्षकाची गरजच का’, एका जिज्ञासूने विचारलं. त्याला एका तज्ज्ञानं उत्तर दिलं, ‘सूर्यकिरणे प्रकाश देतात, उष्णता देतात. तरीही ती फार दूरवरून येत असतात. त्या शलाका तितक्या प्रभावी नसतात. पण जेव्हा उष्णतेचा सशक्त गोळा वर्गात सशरीर हजर असतो, तेव्हा ती आभा व तिचा प्रभाव विद्यार्थ्यांवर पडतो. अध्यापन म्हणजे विशुद्ध प्रेम हे जाणलेला उष्णतेचा स्रोत म्हणजे अध्यापक. तो प्रेमाने कारुण्याने मुलांना शिकवतो. या हृदयीचे त्या हृदयी’.

शिक्षक इतका प्रसन्न हवा की कुठल्याही प्रकारची नकारात्मक स्पंदने कुठल्याही रूपात वर्गात पसरू नयेत. उलट सात्त्विक आनंददायी कंपने वर्गाच्या भिंतीतसुद्धा भरली जावीत.

लांब पल्ल्याच्या आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणात विमानचालकाला दोनदा शेविंग करायची सक्ती असते. तो कॉकपीटमध्ये असतो. आपणच आजारी असल्याची भावना त्याच्यात होऊ नये, ज्यामुळे एकाग्रता खुंटते, म्हणून ही काळजी.

शिक्षकांनी वर्गात नीटनेटके स्वच्छ जावे. कपडे व्यवस्थित असावेत. कधीही कसलाही कंटाळा नको. उत्कृष्ट द्यावं. कितीतरी इवल्याशा लुकलुकणार्‍या डोळ्यांच्या जोड्या कुतूहलाने, उत्कंठेने तुम्हांला आश्वासक वांच्छेने काही तास न्याहाळत असतात. अटळ विश्वासाने.

- मुकेश थळी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT