ईश्वराने स्त्री पुरुषांना प्रेम व्यक्त करण्यासाठी लैंगिक इच्छा दिली. पण मानवाने त्या इच्छेचा बीभत्स आणि हिणकस बाजार मांडला, याचेच दुःख होते. जवळजवळ दहा वर्षांपूर्वी घडलेली ही सत्य घटना. मी महाराष्ट्रातील एका बस स्टॉपवर उतरलो. सायंकाळचे सात वाजले होते. मी मुंबईची बस पकडण्याच्या तयारीत. तिथेच पोहे खाल्ले, चहा घेतला, पैसे दिले. तेवढ्यात ‘मारा तिला, मारा तिला’, असे ओरडत एक गलका आला.
दहा पंधरा गुंड, एका कोवळ्या मुलीला मारायला हातात दगड घेऊन उभे होते. ‘ही इथे उभी राहून रोज धंदा करते. मारा तिला’. एक जण दगड घेऊन पुढे आला. अचानक मी कडाडलो. ‘थांबा!’ माझा आवाज आसमंतात गरजला. मी त्या मुलीच्या पुढे जाऊन उभा राहिलो. कशाला मारता तिला. ‘साहेब ही इथे राहून रोज धंदा करते.’ मी संथपणे बोललो, ‘तुम्हाला कोणी हक्क दिला तिला मारायचा?’ त्यावर तो म्हणाला, ‘साहेब तुम्ही उठा.
नाहीतर, तुमच्याच कपाळावर दगड मारू.’ मी चष्मा काढून जॅकेटमध्ये ठेवला. आता हे प्रकरण नियंत्रणाबाहेर जाणार हे मी ओळखले. माझे चार किलोचे टायर सोल बूट, मिलिटरी रंगाची पँट, हिरवे जॅकेट, हातात काळे ग्लोव्ज अशा पोशाखात मी हात पसरून त्या मुलीच्या पुढे खंबीरपणे उभा होतो. ‘फौजी हो क्या?’ एकटा ओरडला. मी पुन्हा त्यांना खडसावले. ‘कोणीही तिला मारणार नाही. हात लावायचा नाही. धंदा करते, धंदा करते. या संपूर्ण जगातील कोणतीही महिला स्वेच्छेने हा धंदा करीत नाही. परिस्थितीच अशी असते की माणसाला माती खायला भाग पाडते.’ माझी शाब्दिक चकमक चालूच होती. मी एकटा, ते दहा पंधरा गुंड.
मला आता त्यांच्या भावनिक मेंदूवर हल्ला चढवणे भाग होते. कोकणी, मराठी, हिंदी, इंग्रजी अधूनमधून बोलून मी त्यांच्या मेंदूत प्रचंड गोंधळ निर्माण केला. आता त्यांच्या मेंदूचा संपूर्ण ताबा माझ्याकडे होता. मी त्यांना अत्यंत सामोपचाराने म्हटले, ‘तिच्यावतीने मी तुमची माफी मागतो. पुन्हा ती इकडे उभी राहणार नाही याची हमी मी देतो.’ आता त्यांच्या हातात दगड खाली पडले होते. ‘तिला स्पष्टपणे सांगा.’, ते म्हणाले. मी म्हटले ‘हो सांगतो.’ मी त्यांची पुन्हा एकदा माफी मागितली. आता एक एक जण तिथून हळू हळू निघून गेले. की सुटकेचा नि:श्वास टाकला. ही सगळी घटना फक्त पाच दहा मिनिटाच्या अवधीत एवढ्या जलदगतीने घडली. मी थोडा भांबावलो.
मी मागे वळून बघितले. ती पोरगी थरथरत उभी होती. तिने चक्क माझे पाय पकडले. ‘साहेब, मला यातून बाहेर काढा.’ मी तिला खांद्याला धरून उठवले. ‘पोरी घाबरू नकोस, मी आहे इथे. तू हे का करतेस?’ माझा प्रश्न. ‘साहेब मला वडील नाहीत, घरी आई आजारी आहे, लहान भाऊ आहे. चार दिवस पोटात अन्नाचा कण नाही. म्हणून मी हे करते.’ मी मनात म्हटले ‘हे ईश्वरा काय ही परिस्थिती करून ठेवली आहेस?’ मी तिला घेऊन पोहेवाल्याकडे वळलो. ‘हिला जरा चहा आणि पोहे द्या.’ तो म्हणला ‘देतो साहेब.’ मी चमचा घेतला आणि तिला पहिला घास भरवला. ‘भिऊ नकोस, मी आहे इथे.’ ती खात होती व रडतही होती. मी पोहेवाल्याला म्हटले, ‘आणखीन सहा पोहे तिला बांधून दे.’ मी पैसे दिले.
‘साहेब मी आता काय करणार?’ तिचा प्रश्न. भिऊ नकोस. मी आहे इथे. मी तिला जवळच्या बाकावर बसवले. मीही बसलो. मी म्हटले, ‘बघ पोरी ज्या मार्गावर तू चालली आहेस तिथे पुढे फक्त अंधारच अंधार आहे. या परिस्थितीतून तूच तुला बाहर काढायचे आहेस. मी तुला फक्त मार्ग दाखवतो. उद्यापासून हे काम करायचे बंद.’ ती म्हणाली, ‘पण साहेब माझ्याजवळ एक रुपयासुद्धा नाही.’ मी जॅकॅट उघडले. आतल्या कप्प्यातून पैसे काढले व तिच्या हातावर ठेवले. ‘एवढे पैसे?’ तिने विचारले. त्यावर मी ‘हो.’ म्हटले.
‘पण तुम्ही मला ओळखतसुद्धा नाही, मला एवढी मदत का करता?’ तिचा प्रतिप्रश्न. ‘बघ या विश्वात मी, तू या फक्त कठपुतळ्या आहेत. सर्व कर्ता करविता तो आहे ईश्वर. मी इथे निमित्तमात्र आहे. त्या ईश्वराने त्या क्षणाला, त्या मिनिटाला मला तुझ्यासमोर, तुझ्या संरक्षणार्थ उभे केले. त्याचा उत्तरार्ध फक्त कर्तव्य म्हणून पूर्ण करतो मानवतेच्या दृष्टिकोनातून. उद्या कुठेतरी नोकरी शोध. भांडी घासलीस तरी चालतील. पण हे काम करू नकोस. तू तुला शक्तिहीन समजू नकोस. ते तुला भलेही वेश्या म्हणोत. मला तर तुझ्यामध्ये आदिशक्ती दिसते.’ आता तिच्या डोळ्यामध्ये चमक होती. दृढविश्वास होता. तिच्या डोळ्यातील अश्रू माझ्या तळहातावर स्थिरावले. तिच्या सहअनुभूतीची ती पावती होती. माझे आभार मानून ती गेली. मी जड पावलांनी मुंबईच्या बसकडे वळलो.
मुंबईतील काम आटपून मी घरी परतलो. पाच सहा दिवसांनी एका वयोवृद्ध समाजसेविकेचा मला फोन आला. मी त्यांना मावशी म्हणतो. त्या माझ्या मातोश्रींच्या समवयस्क असाव्यात. त्या सात्त्विक संतापाने बोलत होत्या. ‘अरे तू म्हणे त्या महाराष्ट्रातील बसस्थानकावर रस्त्यावर राडा केला? एका वेश्येला वाचवण्यासाठी त्या गुंडाबरोबर पंगा घेतलास?’ मी म्हटले, ‘हो राडा केला. मग काय?’ त्यांनी विचारले, ‘त्या गुंडांनी तुझ्या कपाळावर दगड मारले असते तर?’ मी म्हणालो, ‘अहो मावशी, ते दगड तर समाजाने परमपूज्य येशू ख्रिस्तांवरही मारले होते. नंतर त्यांना खिळ्यांनी ठोकून क्रूसावर चढवले. माणसाला एकटे पाडून त्याचा छळ करायचा ही मानवी टोळ्यांची जुनी सवय.
समाज असाच असतो. समाजाकडून आपण फार अपेक्षा करू नका. संत ज्ञानेश्वर आणि भावंडांना संन्याशाची पोरं म्हणून हिणवणारा हाच तो समाज.’ मावशींचा संताप अजून कमी झाला नव्हता. ‘आता त्या पुण्याच्या बुधवारपेठेत जा आणि तिथेही भरभक्कम मदत देऊन ये. म्हणजे झाले.’ त्या म्हणाल्या. ‘अहो मावशी, ती मदत तर मी पंधरा वर्षापूर्वीच पाठवली आहे. तेही माझे नाव कुठेही उघड होऊ नये याची दक्षता घेऊन. अहो बिल गेट्सनी बुधवारपेठेत येऊन कुठलाही गाजावाजा न करता ‘कायाकल्पम’ला पंधरा लाख डॉलर दिले.
आपण दहा पंधरा हजार रुपये दिले तरी त्या वेश्यांच्या समस्या सुटणाऱ्या नाहीत.’ त्यावर त्यांनी विचारले, ‘आता काय करणार?’ मी म्हणालो, ‘आता सोनागाची कोलकाताला फुलं नाहीतर फुलांची पाकळी देण्याच्या विचारात आहे. मावशी तुम्ही समाजसेविका आहात. एकदा त्या पुण्याच्या बुधवारपेठेत जाऊन बघा तो नरक आणि नरकयातना.
तो कुजका वास, शेंबडी पोरं, दोन फुटांच्या वाटा. सतत ऐकू येणाऱ्या घाणेरड्या शिव्या, ते लैंगिक आजार आणि एड्सग्रस्त महिला. नको नको ते बघायला मिळते. आपण पाच दहा हजार रुपये दिले म्हणून त्यांच्या नरकयातना संपणार नाहीत. त्यांच्या समस्या असंख्य आहेत, दयनीय आहेत. ईश्वराने स्त्री पुरुषांना प्रेम व्यक्त करण्यासाठी लैंगिक इच्छा दिली. पण मानवाने त्या इच्छेचा बीभत्स आणि हिणकस बाजार मांडला, याचेच दुःख होते मला.’
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.