

Big Bash League 2025: क्रिकेट जगतात पाकिस्तानचे खेळाडू अनेकदा आपल्या कामगिरीमुळे किंवा इतर वादग्रस्त कारणांमुळे चर्चेत राहतात. नुकताच पाकिस्तानच्या वनडे संघाचा कर्णधार आणि वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी याला ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीग स्पर्धेदरम्यान अत्यंत मानहानिकारक प्रसंगाला सामोरे जावे लागले. एकाच ओव्हरमध्ये दोन धोकादायक 'बीमर' चेंडू टाकल्यामुळे अम्पायरने त्याला ओव्हर पूर्ण करण्यापासून रोखले.
ऑस्ट्रेलियामध्ये (Australia) बिग बॅश लीगची सुरुवात झाली. सोमवारी (15 डिसेंबर) मेलबर्न रेनेगेड्स आणि ब्रिस्बेन हीट यांच्यात दुसरा सामना खेळला गेला. शाहीन आफ्रिदी ब्रिस्बेन हीट संघाकडून गोलंदाजी करत होता. तो आपल्या तिसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करत असताना त्याने एक मोठी चूक केली. त्याने आपल्या ओव्हरच्या तिसऱ्या आणि पाचव्या चेंडूवर दोन बीमर चेंडू टाकले.
क्रिकेटच्या नियमांनुसार, असा चेंडू जो गोलंदाजाने न टप्पा देता, थेट फलंदाजाच्या कमरेच्या उंचीच्या वर येतो, त्याला बीमर (Full Toss above Waist Height) म्हणतात. हा चेंडू अत्यंत धोकादायक मानला जातो. नियमांनुसार, एका ओव्हरमध्ये दोन बीमर चेंडू टाकणाऱ्या कोणत्याही गोलंदाजाला अम्पायर ओव्हर पूर्ण करण्यापासून थांबवू शकतात.
आफ्रिदीच्या बाबतीतही नेमके हेच घडले. तिसऱ्या ओव्हरमध्ये त्याने दोन बीमर टाकल्यामुळे अम्पायरने त्याला ओव्हरच्या मध्यातच गोलंदाजी करण्यापासून रोखले. शाहीन आफ्रिदीला ओव्हर पूर्ण न करताच पॅव्हेलियनकडे जाण्यास सांगण्यात आले. आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणाऱ्या कर्णधारासाठी ही अत्यंत लाजिरवाणी घटना ठरली. या सामन्यात शाहीन आफ्रिदी आपली गोलंदाजी प्रभावीपणे करु शकला नाही. त्याने एकूण 2.4 ओव्हर गोलंदाजी केली. या दरम्यान, त्याने एकही विकेट मिळवली नाही. विशेष म्हणजे, त्याने 16.12 च्या अत्यंत महागड्या इकोनॉमी रेटने धावा खर्च केल्या, ज्यामुळे प्रतिस्पर्धी संघाला मोठा स्कोअर उभारण्यास मदत मिळाली.
मेलबर्न रेनेगेड्स संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 212 धावांचा डोंगर उभा केला. मेलबर्नच्या डावात टिम सीफर्टने 56 चेंडूत शानदार 102 धावांची शतकी खेळी केली, तर ऑलिव्हियर पीकने 57 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. लक्ष्याचा पाठलाग करताना ब्रिस्बेन हीट संघ 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून केवळ 198 धावाच करु शकला. यामुळे मेलबर्न रेनेगेड्सने हा सामना 14 धावांनी जिंकला आणि ब्रिस्बेन हीटला, ज्यात शाहीन आफ्रिदीसारखे मोठे खेळाडू होते, पराभवाचा सामना करावा लागला.
शाहीन आफ्रिदीच्या (Shaheen Afridi) खराब गोलंदाजीमुळे आणि अम्पायरने त्याला ओव्हरमधून हटवल्यामुळे त्याच्या संघाला केवळ पराभवाचा सामना करावा लागला नाही, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानच्या कर्णधाराची मोठी नाचक्की झाली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.