समाजकार्यकर्त्यांना मारहाणीपर्यंत मर्यादित असलेल्या घटना आता चक्क पोलिस चौकीसमोर त्यांचे वाहन जाळण्यापर्यंत येऊन ठेपल्या आहेत. कायदा-सुव्यवस्था किती रसातळाला गेली आहे, त्याचे हे मूर्तीमंत उदाहरण. सरकार तोंडदेखली कारवाई करते, म्हणूनच अशा लोकांचे धाडस दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. ‘कोणालाही सोडणार नाही, कोणाविरुद्ध गप्प बसणार नाही’ या वल्गनाही अजिबात पटत नाहीत. तशी वस्तुस्थिती असती तर असे करण्याचे धाडस होंडा येथील त्या तरुणांना झालेच नसते.
झुंडशाहीला बळी पडून तक्रार मागे घेतलेली असतानाही बाहेर समाजकार्यकर्ते रूपेश पोके यांच्या वाहनात फटाके फोडून ते जाळण्यात आले. समोर घडलेल्या या घटनेतील दोषींना ताब्यात घेण्यासही आदेशाची वाट पाहावी लागते, यातच सर्व काही आले! पोलिसांना बदडण्यापासून ते पोलिस चौकीबाहेरची ही घटना, हेच ओरडून सांगते की पोलिसांचे भय, जरब जराही उरली नाही. ग्रामपंचायतीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित झालेल्यांमध्ये काही अल्पवयीन तरुणही होते.
लोकपरंपरा व समाजाचे काहीही देणे-घेणे नसलेली पिढी वाट्टेल तसा धांगडधिंगा घालते, त्याच मुद्द्याचे भांडवल करून तथाकथित संस्कृतीरक्षक बहुजनांची लोकपरंपराच नष्ट करू पाहतात आणि सरकार मूग गिळून गप्प बसते. यातून धटिंगणांची फौज घडते व कायदा आणि सुव्यवस्था बिघडते.
नरकासुर हा गोव्याच्या लोकपरंपरेचा अविभाज्य भाग आहे. नरकासुर तयार करणे, नाचवणे व त्याचे दहन करून दुष्ट शक्तींवर सज्जनांनी मिळवलेल्या विजयाचा उत्सव साजरा करणे, ही आपली परंपरा आहे. विविध रंगांची आभूषणे, रंगीत कागदांनी वेढलेला नरकासुर, त्याचा आक्राळविक्राळ मुखवटा, हातात तलवार आणि त्याच्या समोर लयीत नाचणारा इवलासा कृष्ण. लोकवाद्यांनी सारा आसमंत भारावून जात असे. त्याच तालावर नरकासुर आणि कृष्णाचा नाच ही गोव्याची पारंपरिक दिवाळी. गावभर फिरवून झाला, की नरकासुरास जाळले जाई.
वाईट, दुष्ट शक्तींविषयी लोकांच्या मनात असलेली चीड त्या आगीच्या ज्वाळांत भस्मसात होत असे. तेव्हाही नरकासुराचे आकर्षक असले तरी कायम स्मरणात राही तो लहानगा कृष्ण आणि तमावर तेजाने मिळवलेला विजय. म्हापसा, मडगाव येथे पोर्तुगीज काळात नाचवण्यात येणारे नरकासुर हे पोर्तुगीज राजसत्तेच्या विरोधाचे एक प्रतीक म्हणून वापरले जात असे. हा प्रतिकात्मक जहाल विरोध असला तरी त्यात कलाकौशल्याचे मिश्रण, लोकवाद्ये, तालवाद्य वादन आणि त्यानुसार होणारे नृत्य याला महत्त्व होते; लोकपरंपरेला महत्त्व होते.
पारतंत्र्यात असलेले हे महत्त्व स्वातंत्र्योत्तर काळात लोप पावले. गेल्या वीस वर्षांत नरकासुर स्पर्धा आणि या प्रतिकृती विकृत पातळीवर जात आहेत. तरुण मुले नरकासुर तयार करतेवेळी दारू प्यायला शिकतात. नरकासुर हा सांस्कृतिक उपक्रमाचा भाग बनल्याने राजकीय नेते किंवा व्यापारी पैसे देण्यात कुचराई करीत नाहीत. त्यामुळे भरपूर पैसा येतो. हे तरुण रात्रंदिवस एकत्र जमतात. तरुण एकत्र आले की, आपोआपच मौजमौजेकडे कल असतो. त्यातून चार तरुण जमले, की दारू मिळवायची, हा गोव्यात सर्वसाधारणपणे एक वेगळ्या सामाजिक उपक्रमाचाच भाग झाल्याचे दिसते. हे पंधरा दिवस दारू किंवा जुगार हे प्रकार तेथे सर्रास घडतात आणि आसपासचे लोकही त्याकडे काणाडोळा करीत आलेे आहेत.
अनेक ठिकाणी अशा व्यसनबहाद्दरांचे अड्डे निर्माण झाले आहेत. नाक्या-नाक्यांवर नरकासुर तयार करून रस्ते अडवले जातात. पारंपरिक लोकवाद्यांचे संगीत आता बाजूला राहिले आणि आता डीजे साऊंड सिस्टमची मोठी भिंतच ठिकठिकाणी उभी केली जात आहे. संध्याकाळपासून कानठळ्या बसवणारे त्याचे आवाज आसपासच्या लोकांना त्रासदायक ठरू लागले आहेत. या ध्वनिप्रदूषणाने वृद्धांना तर खूपच त्रास सहन करावा लागतो. या काळात विद्यार्थी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करीत असतात. दिवाळीच्या निमित्ताने इतरांच्या शांततेवर अतिक्रमण करण्याचा अधिकार कोणालाही नाही. दिवाळीच्या दिवशी या नरकासुरांना आग लावून त्यांचे अवशेष रस्त्यांवरच टाकून दिलेल्या अवस्थेत अद्याप आहेत.
देशातील अनेक शहरे प्रदूषणामुळे संकटात आहेत. सध्या दिल्लीला गॅस चेंबरचेच स्वरूप आलेे आहे. सर्वोच्च न्यायालयाने फटाक्यांवर निर्बंध आणले आहेत. आवाजाच्या प्रदूषणावरही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तरीही तिथे संस्कृती रक्षणाच्या नावाखाली सर्रास ध्वनिप्रदूषण होतच आहे. गोव्यात रात्री ध्वनियंत्रणा वापरण्यावरही मर्यादा आहेत. दुर्दैवाने आपल्या सरकारकडे ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण आणणारी यंत्रणाच उपलब्ध नाही. डीजे लावून आवाजाचा कल्लोळ करण्याचे हे लोण केवळ शहरांतच नव्हे, तर गावा-गावांतही पोहोचले आहे.
झोपडपट्ट्यांमध्येही नरकासुरांचे प्रस्थ वाढले आहे. त्याचे कारण या काळात नेत्यांकडून सहज उपलब्ध होणारा निधी. अर्थात, यामागचे अर्थकारण लोकपरंपरा जपण्याऐवजी विकृतीलाच प्रोत्साहन देत आहे. एका बाजूला संस्कृती रक्षणाच्या नावाखाली गोव्यातील नरकासुराला होणारा सरसकट विरोध आणि त्याचवेळी मूळ स्वरूप बदलत यात घुसलेल्या विकृती; या दोन्ही गोष्टी लोकपरंपरेच्या मुळावर येत आहेत. इतकेच नव्हे, तर गोव्याची (Goa) ओळखच बदलण्याचा हा प्रयत्न आहे. गोव्यातील नरकासुराचे मूळ रूप जपण्यासाठी आता कृष्णालाच सत्यभामेसह पुन्हा यावे लागेल कदाचित, एरव्ही सरकारच्या हातून गप्प बसण्याशिवाय काही होईल, असे वाटत नाही!
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.