Goa Marathi scribes history Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

मराठी आणि गोव्याचे सीमारेखन

Goa Marathi scribes history: मराठीची कूळकथा ह्या मालिकेत आपण गेल्या काही सदरात ज्ञातीधिष्ठित लेखनिकांनी केलेल्या कार्याचा ऐतिहासिक पट पहिला.

गोमंतक ऑनलाईन टीम

कौस्तुभ नाईक

मराठीची कूळकथा ह्या मालिकेत आपण गेल्या काही सदरात ज्ञातीधिष्ठित लेखनिकांनी केलेल्या कार्याचा ऐतिहासिक पट पहिला. त्यात भाषेच्या वापराचे काही कंगोरे आपल्याला पाहायला मिळाले. ह्यात मराठीच्या वाढत्या वापराचे स्पष्ट संकेत आपल्याला पोर्तुगीजांच्या आगमनाआधी आणि नंतर पाहायला मिळतात.

भक्तीसाहित्याच्या पलीकडे हळेकन्नड लिपीतील गांवकरीच्या नोंदी, सतराव्या शतकात मराठा साम्रज्याशी पत्रव्यवहार, ते नव्या काबीजादी समाविष्ट होऊन वाढत गेलेला मराठीचा प्रशासकीय परीघ ह्या सगळ्या प्रक्रियेचा आढावा आतापर्यंत आपण घेतला. एकोणिसाव्व्या शतकाच्या अखेरीस पर्यंत ह्या सगळ्या प्रक्रियेमुळे संस्थात्मक पातळीवर दुभाषी लेखनिकाची व्यवस्था गोव्यात प्रस्थापित झाली होती.

या दुभाषी व्यवस्थेच्या शिखरावर उच्चभ्रू, बहुभाषिक राज्य दुभाषी कार्यरत होते जे शेजारील राज्यांशी उच्च-स्तरीय आणि संवेदनशील राजनैतिक पत्रव्यवहार सांभाळण्यासाठी युरोपीय आणि भारतीय भाषांच्या गुंतागुंतीच्या जाळ्यातून मार्ग काढत असत.

गावगाड्याच्या स्तरावर ही रचना स्थानिक कोमुनिदादी आणि महाजनकीमध्ये असलेल्या द्विभाषिक कारकुनांच्या आणि लेखकांवर अवलंबून होती, जे शेती आणि सामाजिक-धार्मिक जीवनातील दैनंदिन स्थानिक कागदपत्रांची प्रक्रिया हाताळत असत. महत्त्वाचे म्हणजे, ही भाषिक श्रेणी केवळ पारंपरिक लेखक वर्गासाठी राखीव असलेली एक बंदिस्त व्यवस्था नव्हती.

सूर्याजींचा एका सामान्य सहायकापासून मुख्य प्रशासकीय पदापर्यंत झालेला वेगाने उत्कर्ष हेच सिद्ध करतो की भाषिक कौशल्याच्या गोव्यातल्या वाढत्या मागणीमुळे या नोकरशाहीला वैयक्तिक प्रगतीचा एक मार्ग खुला झाला ज्याने पोर्तुगीज सरकारच्या कार्याचा विस्तार आणि मराठी दुभाष्यांना एकमेकांशी जोडले. ह्यापुढे मराठीचे रीतसर शिक्षण गोव्यात सुरू झाल्याने सरकारी दुभाषी पदावर केवळ सारस्वत ब्राह्मणांची जी मक्तेदारी होती ती संपुष्टात आली. ह्या पदांसाठी रीतसर परीक्षा घेतली जाऊन इतर जातीधर्मांचेही लोक त्यात आले. १८७५ साली घेतलेल्या परीक्षेचे दस्तऐवज गोवा अभिलेखागारात आहेत.

सदर परीक्षेचे स्वरूप म्हणजे एका दिलेल्या मराठी उताऱ्याचा पोर्तुगीज अनुवाद व त्याचे मोडी लिप्यंतर करायचे व दुसऱ्या भागात दिलेल्या पोर्तुगीज उताऱ्याचे मराठी रूपांतर करायचे असे होते. चार परीक्षार्थीपैकी तीन उमेदवार हे कॅथलिक होते. पुढे विसाव्या शतकात गोमंतक मराठा समाजातील एका तरुणाची नेमणूक दुभाषीपदी झाली असे राजाराम रंगाजी पैगीणकर ह्यांनी आपल्या ‘मी कोण’ या आत्मवृत्तात लिहून ठेवले आहे.

१८६७ ते १८८२ या काळात पोर्तुगीज आणि ब्रिटिश राजवटीने गोव्याच्या सीमा निश्चित करण्यासाठी संयुक्त सीमांकन आयोग स्थापन केला. या मोहिमेचा मुख्य उद्देश गोवा आणि ब्रिटीश भारताच्या सीमांना एका आंतरराष्ट्रीय सीमेत रूपांतरित करणे हा होता. जरी हे काम वरवर पाहता युरोपीय लष्करी इंजिनिअर्स आणि सर्वेक्षकांचे वाटत असले तरी प्रत्यक्षात ही संपूर्ण प्रक्रिया स्थानिक दुभाष्याच्या भाषिक कौशल्यावर अवलंबून होती.

या प्रक्रियेत गावच्या स्तरावर काम करणारे कुळकर्णी हे सीमाप्रश्नाच्या माहितीचे मुख्य स्रोत ठरले. वसाहती अधिकाऱ्यांकडे जरी आधुनिक सर्व्हेची साधने उपलब्ध होती, तरी त्यांना या भूप्रदेशाचा इतिहास आणि तिथल्या कृषी संस्कृतीची पुरेशी जाण नव्हती. याउलट, स्थानिक लेखनिकांकडे मराठी आणि इतर प्रादेशिक भाषांत लिहिलेले जुने जमिनीचे उतारे आणि ऐतिहासिक दस्तऐवज उपलब्ध होते.

या व्यवस्थेच्या सर्वोच्च स्थानी सूर्याजी आनंद राव कार्यरत होते. त्यांनी स्थानिक लेखनिकांनी दिलेली माहिती आणि गावची कागदपत्रे गोळा करून त्यांचे पद्धतशीर संकलन केले होते. सूर्याजींनी या स्थानिक माहितीचे रूपांतर पोर्तुगीज प्रशासनाला समजेल अशा कायदेशीर चौकटीत केले होते. हे काम १८६८ साली सुरू झाले आणि यामध्ये नव्या काबिजादींच्या डोंगराळ व खडतर भूभागावरून त्यांना प्रवास करावा लागला. या कामाचा त्यांच्या आरोग्यावर परिणाम झाला आणि त्यांचे आरोग्य हळूहळू बिघडू लागले. अखेर ते फोंड्यातील केरी येथे वैद्य पांडुरंग वैद्य यांच्या घरी औषधोपचारासाठी राहण्यास गेले व २ मार्च १८८८ रोजी तिथेच वयाच्या ५७ व्या वर्षी मरण पावले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pilots Dope Test: वैमानिकांची आता वर्षातून एकदा होणार 'डोप टेस्ट'! DGCA लागू करणार नवा नियम; जाणून घ्या काय आहे नवा प्लॅन?

Headland Sada: पोस्ट खात्याची सदनिका बनली शेळ्यांचा निवारा! वर्षानुवर्षे दुर्लक्षामुळे सरकारी इमारत जीर्ण; भंगारवाल्याचाही शिरकाव

Lucky Zodiac Signs 2026: बुधाचे मघा नक्षत्रात गोचर! 'या' लकी राशींवर होणार पैशांचा पाऊस, रक्षाबंधनापर्यंत जॅकपॉट

Colvale Electricity Bills: कोलवाळात वीज बिले दुप्पट-तिप्पट! ग्राहकांना 17 हजारांपर्यंत बिलांचा फटका, फेरपडताळणीची मागणी

Tarun Tejpal Case: तरुण तेजपालला सुप्रीम कोर्टाचा दणका! अधिक वेळ देण्याची याचिका फेटाळली; दोन आठवड्यांत आत्मसमर्पणाचे निर्देश

SCROLL FOR NEXT