Govind Gaude Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Govind Gaude: शिवीगाळ, वादग्रस्त कारभार आणि बंडाची भाषा… गावडेंचं वळण चुकलंच! अखेर मिजास उतरवली

Goa Politics: मुख्यमंत्री सावंत यांच्या निर्णयाने अनेकांना आनंद झाला आहे. असे पाऊल आधीच उचलायला हवे होते. केंद्राच्या कोर्टात चेंडू टाकून आपण नामानिराळे राहण्याचा पवित्रा कुणालाही आवडलेला नाही.

Sameer Amunekar

कला अकादमीच्या दुरवस्थेअंती जेव्‍हा ठेकेदार नेमणुकीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले, तेव्हा ‘ताजमहाल बांधताना शहाजहाँने निविदा काढली होती का’, अशी उद्धट संभावना करणाऱ्या मंत्री गावडे यांना आपण शहाजहाँ नाही आणि जे बांधले तो ताजमहाल नाही, याचे भान उरले नव्‍हते. आता मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवल्‍यावर ‘ते’ भानावर येतील, अशी अपेक्षा आहे.

मुख्यमंत्री सावंत यांच्या निर्णयाने अनेकांना आनंद झाला आहे. असे पाऊल आधीच उचलायला हवे होते. केंद्राच्या कोर्टात चेंडू टाकून आपण नामानिराळे राहण्याचा पवित्रा कुणालाही आवडलेला नाही. गावडे हे नेहमीच वादग्रस्त राहिले. त्यांनी मनमानी पद्धतीने खाती सांभाळली. कला अकादमी हे कलेचे माहेरघर! कित्येक कोटी खर्चून कला अकादमीचे नूतनीकरण केले; पण प्रत्‍यक्षात वास्तूचा आत्माच हरवला.

या मुद्यावर सरकार दरबारी पाठपुरावा करणाऱ्या कलाकारांना गावडे यांनी सदैव तुच्छ लेखले, त्यांना शत्रू मानले. तत्‍पूर्वी एका सरकारी अधिकाऱ्याला केलेली शिवीगाळ तर सर्वत्र व्हायरल झाली होती. ढवळीकरांशी सवतासुभा सर्वज्ञात आहे. उद्धट, उद्दाम, मिजासखोर, अहंमन्य, गर्विष्ठ अशी बिरुदे गावडे यांनी आपल्या कृतीतून ओढवून घेतली आणि प्रत्येकाशी वैर पत्करले, ज्याची उपरती गावडे यांना कधी झाली नाही.

रमेश तवडकरांसोबतच्या ताणलेल्या संबंधांतून त्यांनी मुख्यमंत्र्यांना जेव्हा शिंगावर घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा कारवाई करण्यावाचून सरकारसमोर पर्याय राहिला नव्हता. गावडे यांच्यावर कुणाचाही व्यक्तिगत रोष असण्याचे कारण नाही; परंतु त्यांची कार्यशैली आक्षेपार्ह राहिली. कला व संस्कृती, क्रीडा आणि ग्रामीण विकास अशी महत्त्वाची खाती हाती असूनही ते फारसा प्रकाश पाडू शकले नाहीत.

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजनात कमालीचे शैथिल्य गोव्यावर टीकेस कारण ठरले होते. मुख्यमंत्र्यांनी स्वत:कडे नेतृत्व घेतले आणि स्पर्धा पार पाडून लाज राखली. खरे तर गावडे हे चळवळीतून उभे राहिलेले नेतृत्व. परंतु अलीकडच्या काळात तवडकरांसोबत दोन हात करण्यात त्यांची मूळ छबी हरवली.

सरकारातून हकालपट्टी केल्यावर गावडे यांनी बंडखोरीचा इशारा दिला आहे. त्यांनी जरूर आत्मपरीक्षण करावे. गावडे यांच्यावरील कारवाई हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्यासाठी यश आहे. भाजपमध्ये कोणीही यावे आणि वाटेल तसे वागावे, असा जो समज झाला होता, त्याला गावडेनाट्याच्या समाप्तीमुळे छेद मिळेल, असा दामूंचा आशावाद नक्कीच असेल. एरव्ही अनेक मंत्री जनहितापेक्षा कुरघोडीला प्राधान्य देत आहेत.

गावडे यांना काढले तरी काही प्रश्नांची उत्तरे मिळायला हवीत. ‘आदिवासी कल्याण खात्यात देवाण - घेवाणीनंतर फायली क्लीअर होतात’ या गावडे यांच्या आरोपावर चौकशी व्हायलाच हवी. खरेच अधिकारी दोषी आहेत का, हे तपासायला हवे. त्याचप्रमाणे कला अकादमीचे वाटोळे कुणामुळे झाले, याचा माग लागला पाहिजे. गोविंद गावडेंचे उपकारमूल्य तात्पुरते संपले आहे; उपद्रवमूल्य अद्याप शिल्लक आहे.

त्यामुळे त्यांच्या भात्यात किती व कुठले बाण आहेत, याचा अंदाज मध्यंतरीच्या काळात घेतला गेला असेलच. त्यानंतरच ‘सुपारी’ न घेता गोविंदाच्या हाती नारळ देण्यात आला आहे. त्‍यामुळे ज्या लोकांची सत्तेत असताना आठवण झाली नाही, त्या ‘चिड्डल्या माडल्या’ लोकांचे स्मरण होणे स्वाभाविकच आहे.

ज्या कलाकारांबाबत ‘कोण ते?’ असा उद्धट प्रश्न विचारला ते चिरडलेल्या, दबलेल्या समाजातून आले नव्हते काय? निवड करायची वेळ मागे आली होती तेव्हा गावडेंनी सत्ता निवडली होती की सत्य? सत्तेचा माज सत्य विसरायला लावतो आणि सत्ता जाताच सत्य आठवू लागते. पण, हे खरे असले तरी ते स्मशानवैराग्य आहे. पुन्हा संधी येताच सत्ता निवडली जाईल, हेच सत्य आहे.

गावडेंना बाहेरचा रस्ता दाखवल्याने भाजप भ्रष्टाचार खपवून न घेणारा पक्ष ठरत नाही. वेळेत कारवाई हाच शिष्ट आचार असतो, सोय पाहून कारवाई होते त्याला सत्यतेची, शुचितेची चाड दूर दूरवर नसते.

२०२७च्या निवडणुकीनंतर गावडे पुन्हा जिंकून आले व बहुमतासाठी त्यांची गरज पडली तर त्यांचा उद्धटपणा, सर्वांशी वाकड्यात शिरणे, काम न करणे कुणास आठवणारही नाही. ‘राजकारणात कुणीच कुणाचे कायमचे शत्रू नसतात आणि मित्रही नसतात’, हे वाक्य समाजमान्य झाले आहे. त्याला आता ‘राजकारणात कुणीच कायमचे भ्रष्ट नसतात आणि कुणीही सत्याचे पुतळे नसतात’, अशी जोड करावी लागेल. हेच लोकशाहीचे दुर्दैव आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Edberg Pereira Assault Video: पोलिसांनी लाथा घातल्या, मारहाण केली; परेरा मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज आले समोर, पाहा व्हिडिओ

Edberg Pereira Assault Case: एडबर्ग परेरा मारहाण प्रकरणी निलंबित PSI निलेश वळवईकरांवर गुन्हा दाखल; पुढील तपास सुरु

Sleep Problem: झोपण्यापूर्वीच्या 'या' चुका तुम्हाला बनवत आहेत आजारी! वेळीच व्हा सावध

Poseidon Nuclear Drone: हिरोशिमा बॉम्बपेक्षा 6600 पट शक्तिशाली, पुतिन यांनी जगाला दाखवलं अणुशक्तीवर चालणाऱ्या ड्रोनचं विनाशकारी रुप; अमेरिका-नाटो चिंतेत VIDEO

Watch Video: हाय सायबा!! डोक्यावर धो-धो पाऊस तरीही पालिका इमारतीच्या छतावर चढला कामगार; म्हापशातला गजब प्रकार Viral

SCROLL FOR NEXT