Gold Theft In Goa Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Goa Opinion: सोने, देवभोळेपण, चोरी; संपादकीय

Gold Theft In Goa: सोन्याने भलताच भाव खाल्ला; तितकेच सोने अंगावर बाळगणे कठीण बनले आहे. चोरट्यांनी सध्या भोळ्या-भाबड्या ग्रामीण महिलांना लक्ष्य करण्याच्या काढलेल्या युक्त्या चक्रावणाऱ्या आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

सोन्याला ‘सोन्यासारखे दिवस’ आले; पण ते अंगावर सांभाळणे जिकिरीचे बनले आहे. हे कनकाचे पिसे गोमंतकीयांना नवे नाही. लग्नकार्यास येणाऱ्या महिलांमध्ये जणू कुणाची आभूषणे अधिक अशी स्पर्धा भासावी अशी स्थिती असते. थोडक्यात महिलांसाठी सोने जीव की प्राण.

२०१५साली २६ हजार तोळा असलेले सोने २०२०साली ४६ हजारांवर पोहोचले, तर त्यानंतर आता १ लाख १७ हजारांच्या घरात घेतलेली धाव विस्मयचकित करणारी आहे. सोन्याने भलताच भाव खाल्ला; तितकेच सोने अंगावर बाळगणे कठीण बनले आहे.

चोरट्यांनी सध्या भोळ्या-भाबड्या ग्रामीण महिलांना लक्ष्य करण्याच्या काढलेल्या युक्त्या चक्रावणाऱ्या आहेत. अठरा दिवसांपूर्वी मये येथे केळबाई देवीच्या मंदिराबाहेर फुलांची विक्री करणाऱ्या ज्येष्ठ महिलेला मंदिरात नारळ ठेवून देवीला सांगणे करायचे असल्याचे सांगून तिला संमोहित केले व तिच्या गळ्यातील सुमारे २.५ लाख रुपयांची सोन्याची माळ लंपास केली होती.

अशीच पुनरावृत्ती नुकतीच साखळी बाजारात झाली. भाजी विक्रेत्या ज्येष्ठ महिलेला देवाला सांगणे करण्यास साह्य करण्याचा बहाणा करून, अंगावरील दागिने लांबवले. बोरीतही देवाला सांगणे घालण्याचा बहाणा करून उतार वयातील तरुणाला गंडवले. मांद्रेतही थोड्या फार फरकाने तेच घडले.

देवाचे नाव व देवभोळ्या वृत्तीचा चोरटे ईप्सित साध्य करण्यास वापर करत आहेत. त्यांना पकडण्यात अद्याप पोलिसांना यश आलेले नाही. अशा भोळ्या लोकांची रेकी करण्याचे काम चोर करत असतात.

चोरट्यांच्या विशिष्ट पद्धती किंवा ‘मोड्स ऑफ ऑपरेंडी’ असतात. त्याविषयी महिला पोलिसांनी जनजागृती करणे गरजेचे आहे. हाती आलेल्या, सोडवलेल्या केसेस त्यासाठी उपयुक्त ठरतील. चोरांच्या युक्त्या, कामाची पद्धत, फसवण्याची पद्धत याविषयी व्यवसाय करणाऱ्या महिलांना जागृत करणे गरजेचे आहे.

आयुष्यभर काबाड कष्ट करून कमावलेले सोने सहजपणे फसवून चोर घेऊन जातो हा धक्काच त्यांना सहन करण्यापलीकडचा असतो. त्यांनाच बोल लावणे चुकीचे ठरेल. लुबाडल्या गेलेल्या महिला श्रीमंत, अतिश्रीमंत नाहीत. त्या मध्यमवर्गीय आहेत.

चोरीच्या या प्रकरणांत बळी ठरलेल्या महिला व पुरुष वयस्क आहेत, देवभोळे आहेत हे साम्य चोरांच्या विशिष्ट पद्धतीकडे निर्देश करते. सोने आणि गोमंतकीय महिला यांचे नाते विलक्षण आहे. सण, समारंभ, दिवजा अशा प्रसंगी उसने मागून आणि सोने महिला घालतात.

सोन्याचा किंवा मिरवण्याचा सोस असे याला म्हणणे थोडे धाडसाचे ठरेल. कारण, तसे सोने सोडून अन्यत्र उसनी श्रीमंती महिला आणत नाहीत. सोन्यावरचे हे २४ कॅरेटचे प्रेम कुठल्याही अवगुणाशी जोडता येत नाही, जोडलेही जाऊ नये. प्रतिष्ठा, गुंतवणूक यापलीकडे या कनकाशी असलेले गोव्याच्या कामिनींचे नाते, चोरांच्या पत्थ्यावर पडत आहे. नाना प्रकारच्या युक्त्या, क्लृप्त्या हे चोर काढत असतात.

मुळातच स्वभावाने गरीब असलेल्या महिला या चोरांच्या भूलथापांना बळी पडतात. फसवणूक, चोरी झाल्याचे मागाहून लक्षांत येते. पोलिसांत तक्रार करण्यास जागा नसते, कारण कितीही झाले तरी ते मागून आणलेले असते. या महिलांची दुहेरी गळचेपी होते.

महिलांची चूक, वेंधळेपणा अशी संभावना न करता थोड्या वेगळ्या नजरेने या प्रकरणांकडे पाहणे गरजेचे आहे. त्यांना धीर देणे व लवकरात लवकर चोर मुद्देमालासह पकडणे म्हणूनच महत्त्वाचे ठरते. केवळ चोरच नव्हे तर, त्यांच्याकडील चोरीचा माल विकत घेणारे सावही यातून सुटता कामा नयेत.

हे सराफी करणारे पांढरपेशे या चोरांकडून सोने विकत घेऊन मदत करत असतात, चोरीस उद्युक्त करत असतात. सामान्यांना न परवडणारे हे सोने चोरांसाठी कमाईचा मोठा मार्ग बनत आहे. सोन्यासारखी साधीभोळी माणसे जपायची असतील तर चोऱ्यांची ही प्रकरणे आणखी वाढू नयेत म्हणून वेळीच उपाय योजना करण्याशिवाय तरणोपाय नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asia Cup Controversy: टीम इंडियाला ट्रॉफी मिळणार की नाही? सूर्यकुमार यादववर होणार कारवाई? नियम काय सांगतो? वाचा

Stomach Ulcer: पोटदुखीकडे दुर्लक्ष नको! पोटात अल्सर कशामुळे होतात? 'ही' गंभीर लक्षणे वेळीच ओळखा

Asia Cup 2025 Final: रन चेसिंगचा नवा बादशाह 'भारत'! टीम इंडियानं बनवला नवा रेकॉर्ड; अशी कामगिरी करणारा बनला जगातील पहिला संघ

'माँ तुझे सलाम...', फायनल सामना हरल्यानंतर पाकिस्तानच्या गोलंदाजाची पोस्ट चर्चेत, नेटिझन्स म्हणाले, "कल तेरी अम्मा हमारे..."

Health Tips: 'H3N2 Virus'ची लक्षणं किती दिवसांनी दिसतात? 'या' सामान्य लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष

SCROLL FOR NEXT