केदार साखरदांडे
भारतासारख्या देशात, जिथे हजारो प्रकारचे गोड पदार्थ आहेत आणि गोड खाल्ल्याशिवाय ज्यांचं जेवण अपूर्ण राहतं, अशा ठिकाणी जेवणानंतर गोड खा म्हणजे कॅडबरी खा असं सांगून गोडाची जाहिरात करणं म्हणजे साक्षात एस्किमोला बर्फात स्वेटर विकण्यासारखं आहे!
बंगाल्यांचे, राजस्थान्यांचे, गुजराथ्यांचे आणि पंजाब्यांचे गोड पदार्थ थाटाचे, भरपूर आणि जोरकस. पण गोव्याचे गोड पदार्थ-विशेषतः पारंपरिक-नजाकतीचे असतात. जिन्नस जास्त नाहीत, व्यंजनं भरमसाठ नाहीत; पण प्रमाण आणि कृती साचेबद्ध हवी.
अशा अनेक पदार्थांपैकी एक खास जोड म्हणजे ‘धोंडस’ आणि ‘तवसळी’! इथे मुद्दाम लक्ष देऊन वाचलंत तर ‘धोंडस किंवा तवसळी’ असं न म्हणता ‘धोंडस आणि तवसळी’ असं म्हटलं आहे, हे चौकस वाचकांच्या लक्षात येईलच. कारण धोंडस वेगळा आणि तवसळी वेगळी.
धोंडस हे बरक्या फणसांचा रस काढून-किंवा तो साठवून-केलं जातं. तर तवसळी ही तवश्याची. लोक म्हणतात तवसे म्हणजे काकडी; पण तसं नाही. गोंयकाराला विचारलंत, ‘तंवशे म्हणजे काकडी का?’ तर तो ठामपणे म्हणेल, नाही. जसं अळसांदे म्हणजे चवळी नाही-अगदी तसंच.
साधारण पावसाळ्यात तवसळी केली जाते, कारण त्या सुमारास तंवशी येतात. यात साठवणुकीची फारशी सोय नसते. त्यामुळे लगेच करून, त्या त्या सुमारास खाणं उत्तम. धोंडसाचं तसं नाही. एप्रिल-मे, फार तर जूनमध्ये रसाळ फणसाचा गर-गर कसला, रसच तो-साठवून ठेवायचा आणि वर्षभर धोंडस खायचा.
गोव्याबाहेर, म्हणजे महाराष्ट्र आणि कर्नाटकात, धोंडस म्हणजे काकडीचा किंवा फणसाचा करतात; पण तो सेम टू सेम नसतो. थोडा बदललेला, सांदणासारखा-जवळपास जाणारा. यात पडणारे जिन्नस मोजून चार-पाचच. सुजी रवा किंवा तांदूळ, तूप रवा, गूळ, वेलची, नारळ-चवीनुसार-आणि मुख्य जिन्नस तवश्याचा किस किंवा फणसाचा गर.
हे सगळं वाफेवर शिजवायचं. अगदी ‘ऑथेंटिक’ हवं असेल तर रेतीवर किंवा वाळूवर भाजायचं. रेती किंवा वाळू एकदम तापत नाही; हळूहळू तापत जाते.
तसा धोंडस किंवा तवसळीही हळूहळू शिजत जाते. नजाकतीचं, वेळेचं काम आहे हे. घाईगडबड नाही-फुरसत हवी.
उदाहरण दिल्याशिवाय राहवत नाही. जणू एखाद्या गवयाची मैफल-उत्तरोत्तर रंगत जाणारी. धोंडस-तवसळीचा सुमधुर सुगंध हळूहळू पसरत जातो आणि लाळरस पाझरत नेतो. उत्तम व्यंजन म्हणजे ते जे समोर आलं आणि फडशा पाडला नाही, तर पंचेंद्रियांना तृप्त करतं - गंध, दृष्टी, चव, शिजताना येणारा नाद, सेवन करताना येणारी चव आणि ताटातून ओठात घेताना होणारा स्पर्श.
हे सगळं जमलं की पदार्थ उत्तम. आपण मात्र काय करतो? पदार्थ झाकून ठेवतो, फ्रीजमध्ये घालतो - दृष्टीसुख तोडतो. चमच्याने खातो - स्पर्शसुख मुकतो. नाद तर कधी ऐकतच नाही. असं होऊ नये, पण होतं.
धोंडस आणि तवसळी रूढार्थाने पंचेंद्रिय तृप्त करणारी व्यंजनं आहेत. म्हणूनच ती आपली - ‘आमगेली’ - आहेत. त्यात कृत्रिमता नाही; नैसर्गिकता अधिक आहे. गोवन संस्कृती आहे, रूढी-परंपरा आहेतच. आणि यात अजून एक वाढीव सुख म्हणजे-हे पदार्थ जर आदल्या दिवशी उरले (तशी शक्यता कमीच), तर साजूक तुपावर किंवा लोण्यात भाजून खायचे. अधिकच उत्तम.
तेव्हा जेव्हा कधी ‘खाने के बाद कुछ मिठा हो जाए’ अशी जाहिरात कानावर पडेल, तेव्हा डोळ्यासमोर कॅडबरी न येता धोंडस, तवसळी, पायस, मणगणे-हे आपले गोडशे पदार्थ यायला हवेत. तेव्हाच या लेखाचं सार्थक.
बऱ्याच लेखांचा शेवट गोड होतो. पण हा लेख थोडा अपवाद आहे. कारण यात सुरुवातही गोड आणि शेवटही गोड.बाकी देव बरे करू. (ता.क.: माझं आडनाव साखरदांडे हा गोड योगायोगच!)
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.