हरमल, बीचवरील प्रमुख आकर्षण असलेले स्वीट लेक दूषित झाल्याने प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे. येथील डोंगरावर उभारलेल्या झोपड्यांतील सांडपाणी झिरपत असल्याचा संशय असून त्यामुळे स्वीट लेकचे पाणी पूर्णपणे दूषित झाले आहे.
त्यात स्नान करणे धोकादायक बनले आहे, अशी माहिती काही पर्यटकांनी दिली.हरमल बीचवरील परशुराम टेकडीच्या पलीकडे टेकडीच्या पायथ्याशी गोड्या पाण्याचे हे तळे आहे. स्वीट लेक म्हणून ते ओळखले जाते. सर्गिक शांतता अनुभवण्यासाठी येणारे अनेक देशी विदेशी पर्यटक येथे भेट देतात.
समुद्र स्नान केल्यानंतर अनेकजण या गोड्या पाण्यातही स्नानाचा अनुभव घेतात. परंतु गेल्या काही वर्षात या शांत परिसरात व्यावसायिक अतिक्रमण झाले आहे. ज्या टेकडीच्या पायथ्याशी स्वीट लेकचा उगम होतो, त्या टेकडीवरही तात्पुरत्या झोपड्या उभारून पर्यटन व्यवसाय केला जात असल्याचे दिसून येते. टेकडीवर या झोपड्या उभारल्या असल्याने येथील सांडपाणी स्वीट लेकमध्ये झिरपत असल्या संशय आहे.
स्वीट लेक हे हरमलचे पर्यटन वैभव आहे. त्याचे अस्तित्व राखून ठेवणे आवश्यक आहे. या परिसरात झालेले पर्यटन अतिक्रमण रोखणे आवश्यक आहे.
हरमल भागात पर्यटकांची संख्या वाढत आहे. त्यांचा हिरमोड होणार नाही, याची प्रशासनाने काळजी घेणे आवश्यक आहे.
परवाने रद्द करा : निसर्गप्रेमी
पर्यटन विकासाच्या नावावर स्वीट लेक परिसरात अतिक्रमण वाढत चालले आहे. पंचायत वा अधिकारीही या तळ्याबाबत गंभीर दिसून येत नाहीत. या परिसारत दूरगामी विचार करून परवाने दिले पाहिजे. अतिक्रमण वाढत गेल्यासहे तळे नामशेष होण्यास वेळ लागणार नाही. या परिसरात दिलेल्या परवान्यांची झडती घ्यावी. तसेच तळ्याच्या अस्तित्वावर घाला घालणाऱ्यांचे परवाने रद्द करावे, अशी मागणी पर्यटक व निसर्गप्रेमींकडून होत आहे.
स्वीट लेकवर अनेक पर्यटक येतात. परंतु येथील डोंगरावर झोपड्या उभारल्याने तेथील सांडपाणी स्वीट लेकमध्ये झिरपत असल्याने पाणी दूषित झाले आहे. या पाण्यात स्नान करणे धोकादायक बनले आहे.
- ईशान सिंग, पर्यटक, दिल्ली
झोपड्यांची चौकशी करा :
स्वीट लेकबाबत स्थानिक पंचायत तसेच सरकार गंभीर नाही, याचा गैरफायदा व्यावसायिक घेत आहेत. या तळ्याचा उगम ज्या डोंगराच्या पायथ्याशी होतो, त्या डोंगरावर झोपड्या उभारण्यास परवानगी कोणी व कशी दिली याची चौकशी होणे आवश्यक आहे, अशी मागणी निसर्गप्रेमींकडून होत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.