Goa University Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Goa University: ‘पेपर फुटी’ प्रकरण! प्रश्न विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा, विद्यापीठाच्या इभ्रतीचा

Goa Opinion: केवळ विद्यार्थ्यांनीच नव्हे तर आता प्राध्यापकांनी सक्रिय होण्याची वेळ आली आहे. प्रश्न विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा आहे, विद्यापीठाच्या इभ्रतीचा आहे.

Sameer Panditrao

Goa University Professor Paper Leak Scam

पणजी: धूर येतो याचाच अर्थ कुठे तरी काही तरी जळत असते. ते लक्षात येताच विझवण्याचे प्रयत्न त्वरित व्हावे लागतात. संपूर्ण घर पेटेपर्यंत थांबायचे नसते. गोवा विद्यापीठात ‘पेपर फुटी’ घडल्याचा प्रकार माहिती नसल्याचा प्रारंभी दावा करणाऱ्या कुलगुरूंना पत्रकार परिषद घ्यावी लागली व चौकशीची ग्वाही देत संबंधित साहाय्यक प्राध्यापकाला निलंबित करावे लागले.

कुलपती नात्याने राज्यपालांनी अहवाल मागवला आहे. हे सोपस्कार होत असताना कुलगुरूंची कथनी मात्र पटण्याजोगी नाही. कुलगुरू मेनन सांगतात त्याप्रमाणे केबिनमधून प्रयोगासाठी काही रसायने घेण्यासाठी दुसऱ्या प्राध्यापकाची केबिन उघडण्याचा प्रयत्न झाला होता.

परंतु पेपर चोरी घडली असल्यास तशी कोणतीही तक्रार माझ्याकडे आलेली नाही. मुळात रसायने कुणाच्या केबिनमध्ये ठेवली जातात का? असतील तर संबंधिताच्या परवानगीशिवाय अन्य कुणी परस्पर प्रवेश करू शकतो का? तो प्रवेश स्वीकारार्ह असता तर वाद झाले असते का? इथे कळते काही तरी पाणी मुरते आहे.

दुसरे असे, तुमच्याकडे तक्रार आली नाही याचा अर्थ काय? तुमच्याकडील व्यवस्थेत त्रुटी आहेत वा तशी व्यवस्था नाही. केबिन उघडण्याचा प्रकार गतवर्षी सप्टेंबरमध्ये घडला ज्याची वाच्यता आता होत आहे. मुळात प्राध्यापकाने केबिन उघडल्याचे कळले कसे, याचे उत्तर आवश्यक होते. काही प्राध्यापकांना आगळीक होत असल्याचा संशय आला आणि त्यांनी संबंधिताला पकडले.

साहाय्यक प्राध्यापकाचे बिंग फुटल्यावर रीतसर तक्रार झाली होती. ती विभागप्रमुख तसेच कुलसचिवांपर्यंत पोहोचली. कुलसचिवांनी नंतर ती कुलगुरूंपर्यंत नेली. परंतु हे सोयीस्कर टाळले गेले आहे.

कुलगुरू म्हणतात तसे साहाय्यक प्राध्यापक केवळ रसायन घेण्यासाठी बनावट चावी वापरून दुसऱ्या प्राध्यापकांच्या केबिनमध्ये गेला होता तर इतर प्राध्यापकांनी या प्रकाराला गंभीर आक्षेप घेतला होता, त्याचे काय झाले? प्राध्यापकांच्या चर्चेत प्रश्नपत्रिका फुटल्याची चर्चाही झाली होती. ती चर्चा व तक्रार कुलसचिव व कुलगुरू यांच्यापर्यंत कशी काय गेली नाही?

कुलगुरूंपर्यंत खरोखरच तक्रार गेली नाही की या प्रकरणावर पांघरूण घालण्यासाठी ते हे सोंग वठवत आहेत? निश्चितच हे प्रकरण दिसते तितके सोपे नाही. आम्ही याला वाचा फोडली व त्यानंतर काशिनाथ शेट्ये यांनी रीतसर तक्रार नोंदवली; त्यावरून कार्यवाही केली, असे कुलगुरू स्वत:च म्हणत असतील तर त्याचे दोन अर्थ होतात.

एक तर सप्टेंबरपासून आजवर केलेले लपवण्याचे प्रयत्न अपयशी ठरले व प्रकरण अपेक्षेपेक्षा जास्त उघड्यावर पडले. खरोखरच कुलगुरूंना काही माहीत नव्हते, असे गृहीत धरायचे तरीही ही विद्यापीठात गैरकारभार चालतात व ते होऊ नयेत यासाठी काहीही केले जात नाही, असा त्याचा अर्थ होतो. आता जितके झाकाल, तितकेच उघडे पडत जाल, ही वस्तुस्थिती आहे.

कोलकाताच्या आर जी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील चेस्ट मेडिसिन विभागात दुसऱ्या वर्षाची विद्यार्थिनी असलेल्या महिला डॉक्टरच्या वडिलांनी तिच्यावर बलात्कार करून तिचा खून केल्याची तक्रार पोलिसांत नोंदवल्यानंतर सरकारी कॉलेजचे व्यवस्थापन जागे झाले होते. व्यवस्थापनाने स्वत: पोलिसांत तक्रार दिलीच नव्हती, उलट प्रकरण दडपण्याचेच सर्व प्रयत्न केले होते.

तेव्हा भाजपने हे प्रकरण ज्या पद्धतीने लावून धरले होते, ते पाहता या प्रकरणात दूर दूर असलेली नीरव शांतता खूप काही बोलत आहे. सरकारसाठी हे अवघड जागेवरचे दुखणे ठरले आहे. आम्हासही कुणा प्राध्यापक, कुलगुरू व कुलपतींविरुद्ध क्लेश असण्याचे काहीच कारण नाही. चीड तेव्हा येते जेव्हा स्वत:च्याच शिक्षकी पेशास काळिमा फासणारी, विद्यापीठाची मान शरमेने खाली घालायस लावणारी घटना घडते आणि कुणालाही कारवाई करावेसे वाटत नाही.

उलट झालेले प्रकरण लपवण्याकडेच कल झुकतो, तेव्हा डोळे झाकून गप्प बसणे शक्य नाही. गोवा विद्यापीठाचा आम्हाला अभिमान आहे. विद्यापीठाचा दर्जा उंचावला पाहिजे; परंतु अशी गैरकृत्ये होत असल्यास त्याकडे डोळेझाक करता कामा नये, ही आमची भूमिका आहे.

गोवा विद्यापीठाचा कारभार अलीकडच्या काळात वादाच्या भोवऱ्यात राहिला आहे. परंतु त्याला वाचा फुटत नाही. कोणी बोलू शकणार नाही, अशी मुस्कटदाबी करण्यात आली आहे. या प्रकरणाची दखल विद्यार्थी संघटनांनी घेतली ते एका अर्थी बरेच झाले. पेपरफुटीचा दावा करत एनएसयूआयने पोलिसांत तक्रार केली आहे. अभाविपनेदेखील मोर्चा काढला. असे आत्मभान यायलाच हवे.

पण, त्यांनाही राजकीय कोलदांडे पार करावे लागतील. कसलेही भय न बाळगता प्रकरण निकाली लागेपर्यंत विद्यार्थ्यांनी स्वस्थ बसता कामा नये. केवळ विद्यार्थ्यांनीच नव्हे तर आता प्राध्यापकांनी ही सक्रिय होण्याची वेळ आली आहे. प्रश्न विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा आहे, विद्यापीठाच्या इभ्रतीचा आहे. ‘चारित्र्य गमावले तर, सगळेच गमावले’, हे फक्त शिकवून त्याचा काही उपयोग नाही. ते प्राध्यापकांनी व विद्यार्थ्यांनीही आचरणात आणल्यास तोच कुलगुरूंसाठी व कुलपतींसाठी एक वस्तुपाठ ठरेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT