राजेंद्र पां. केरकर
गोव्यात लाकडावर कोरीव काम करण्याची पारंपरिक कला ही पिढ्यान् पिढ्यांपासून येथील च्यारी आणि चितारी या समाजाने जोपासलेली आहे. त्यामुळे लाकडावर कोरीव काम करताना, त्यांच्यावर भक्तीविजय, हरिविजय आदी पारंपरिक ग्रंथांतल्या कथासूत्रांचा जो प्रभाव पडलेला आहे, त्याचे प्रतिबिंब काष्ठशिल्पांवरही प्रकर्षाने पहायला मिळते.
सिंधू संस्कृतीपासून भारतात माती, धातूचा वापर करून मूर्ती करण्याची परंपरा आहे. इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात भारतात राज्य करणाऱ्या सम्राट कनिष्काने जेव्हा बौद्धाच्या महायान पंथाचा स्वीकार केला, तेव्हा सर्वप्रथम गौतम बुद्धाच्या रेखीव आणि सुंदर मूर्ती करण्याची परंपरा विकसित झाली. ग्रीक आणि भारतीय कलेच्या संयोगातून गांधार शैलीच्या एकापेक्षा एक सुंदर मूर्ती विकसित झाल्या आणि संपूर्ण भारतीय परंपरेतून मथुरा शैली विकसित पावल्यावर, विलोभनीय मूर्तीची निर्मिती हिंदू धर्म परंपरेत महत्त्वाचे स्थान मिळवण्यास कारणीभूत ठरली.
आपल्या आराध्य दैवतांच्या माती, मेण, पितळी, तांबे, सोने, चांदीसारख्या धातूंपासून मूर्ती जशा तयार केल्या जातात तशाच लाकडापासूनही शेकडो वर्षांपासून मूर्ती करण्याची परंपरा भारतात आहे. सागवान, शिसमासारख्या लाकडाच्या टिकाऊपणामुळे, त्याचा वापर मंदिराच्या छपराच्या मुख्य तुळ्या, खांबासाठी प्रामुख्याने गोव्यासारख्या कोकणपट्टीत करण्यात आलेला आहे. गोव्यात काही गावांत तेथील जंगलात उपलब्ध वृक्षांवरून, त्यांच्या लाकडांचा उपयोग मंदिरातले खांब, तुळ्या, मूर्तीसाठी करण्यात आलेला आहे.
सत्तरीतल्या सह्याद्रीच्या डोंगर माथ्यावरती वसलेल्या सुर्ल गावात गणेश चतुर्थीवेळी तेथील पठारावर आढळणाऱ्या दुडंग वृक्षाच्या लाकडाचा उपयोग देखाव्यासाठी ठेवण्यात येणाऱ्या रंगीत मूर्तींसाठी केला जायचा. पेडणेतील मोपा गावात दरवर्षी आम्रवृक्षाचा सरळसोट खांब होळीसाठी वापरला जातो आणि त्यानंतर गुढी पाडव्याला ही होळी कापून, तिच्या एका तुकड्यापासून च्यारी समाजातले कारागीर सकाळपासून व्रतस्थपणाने गिरोबाची मूर्ती कोरतात आणि तिचा परंपरेनं ठरलेला आकार पूर्णत्वास आल्यावर गिरोबाच्या मंदिराच्या गर्भगृहात स्थापना करून, पूर्ण वर्षभर त्याची ग्रामदेव गिरोबा म्हणून पूजा करतात. सावंतवाडीजवळच्या सांगली येथील गिरोबा फणसाच्या लाकडापासून कोरला जातो.
गोव्यातल्या काही मंदिरात वेताळाच्या लाकडी मूर्ती चाफ्याच्या लाकडापासून तयार केलेल्या आहेत. शमी, बेल, कुंभा, पलाश, काजरा, हुरा, बाभळी अशा झाडांच्या लाकडाचा उपयोग देवाच्या मूर्तींसाठी केला जात नाही. सागवानाचे लाकूड टिकाऊ असल्याने त्याचा वापर मंदिराच्या तुळ्या, खांबांसाठी विशेष केला जातो, तर मंदिरातल्या मूर्तींसाठी चंदन, मोय, पांगारा, फणस, शिसम, शिवण यांचा केला जातो. कोरीव काम करण्यासाठी फणसाचे लाकूड कारागिरांना आवडत असल्याने, त्या लाकडाचा देवाच्या मूर्ती कोरण्यासाठी केला जातो.
ओडिशातल्या पुरी येथील जगन्नाथ, बलराम आणि सुभद्रा यांच्या मूर्ती १२ ते १९ वर्षांनंतर कडुनिंब वृक्षाच्या लाकडापासून तयार केल्या जातात. कडुनिंबाच्या लाकडाला दारू ब्रह्म म्हटले जाते आणि त्यामुळे पवित्र वृक्ष मानला जातो. गोव्यातल्या बऱ्याच मंदिरात लाकडात कोरलेल्या गणपती मूर्ती प्रामुख्याने गर्भगृहाच्या ललाट बिंबावरती बसवलेल्या असतात.
अंत्रुज महालातील मंदिरातील छपरे, खांब, गर्भगृह, प्रवेश द्वार त्याचप्रमाणे वार्षिक उत्सवावेळी वापरण्यात येणाऱ्या रथ, लालखी आणि पालखी यांच्यासाठी लाकूड वापरलेले असून, त्याच्यावर आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि धार्मिक मूल्यांवर आधारित जे कोरीव काम करण्यात आलेले आहे, त्यात गणपतीची एकाहून एक प्रेक्षणीय अशी काष्ठशिल्पे, मंदिराच्या एकंदर वैभवात भर घालत आहेत. गोव्यात लाकडावर कोरीव काम करण्याची पारंपरिक कला ही पिढ्यान् पिढ्यांपासून येथील च्यारी आणि चितारी या समाजाने जोपासलेली आहे.
त्यामुळे लाकडावर कोरीव काम करताना, त्यांच्यावर भक्तीविजय, हरिविजय आदी पारंपरिक ग्रंथांतल्या कथासूत्रांचा जो प्रभाव पडलेला आहे, त्याचे प्रतिबिंब काष्ठशिल्पांवरही प्रकर्षाने पहायला मिळते. श्रीस्थळ काणकोण येथील श्रीमल्लिकार्जुन मंदिरात तेथील च्यारी कारागिरांनी कला कौशल्याचा आविष्कार घडवणारी जी काष्ठशिल्पे कोरली होती, ती मंदिराच्या नूतनीकरण प्रक्रियेत विस्मृतीत जाणार होती, परंतु त्यांचे स्थलांतर यशस्वीपणे काशीपुरुष मंदिरात केल्याने, मल्लिकार्जुन मंदिरातल्या काष्ठ शिल्पांच्या गतवैभवाची प्रचिती येते.
गोव्यात चतुर्थीला प्रामुख्याने मृण्मयी गणेशमूर्तीच्या पूजनाला प्राधान्य असले तर काही कुटूंबात पूर्वापार कागदावर गणपतीचे चित्र रेखाटून तसेच कागदी लगद्यापासून आणि जंगलातील पत्रींद्वारे प्रतीकात्मक गणपतीचे पूजन करण्याची जशी परंपरा आहे, तशीच अंत्रुज महालातील शिरोड्याच्या वाजे वाड्यावर वैद्य नाईक घराण्यात लाकडी गणपती दरवर्षी लाला च्यारी कुटुंबीयांकडे रंगवून पूजण्याची परंपरा आहे. गोव्यात पारंपरिक वनौषधीकार म्हणून कार्यरत असणारी वैद्य नाईक कुटुंबीय काले, सावर्डे, बांदोळी, करमणे आदी ठिकाणी वास्तव्यास असले तरी दरवर्षी ही कुटुंबे गणेश चतुर्थीसाठी वाजे येथे येतात व पाच दिवस या लाकडी गणपतीचे पूजन उत्साहाने करतात आणि जेव्हा विसर्जनाची वेळ येते तेव्हा या मूर्तीचे प्रतिकात्मक पद्धतीने पाण्याचे सिंचन करून सदर मूर्ती दुसऱ्या वर्षी पूजण्यासाठी सुरक्षित ठेवली जाते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.