Goa Sunburn 2024 X
गोंयकाराचें मत

अग्रलेख : Goa Sunburn ची जागा बदलली, बळी मात्र नवा; कश्यपच्या मृत्यूचे गूढ

Goa Opinion: समस्या जगभर असेलही आमच्या गोमट्या गोव्यात ड्रग्ज नको. पर्यटन खाते धार्मिक पर्यटनाला चालना देऊ पाहत आहे. त्याला पाठिंबा मिळायला हवा.

गोमन्तक वृत्तसेवा

Goa Sunburn 2024 Delhi Youth Death

यंदा धारगळ येथे झालेल्या ‘सनबर्न’ची सुरुवात धार्मिक कार्यक्रमाने करण्यात आली. महोत्सव निर्विघ्नपणे पार पडावा, अशी त्यामागे सद्धारणा असावी. लोकांचा पराकोटीचा विरोध धीरोदात्तपणे मोडल्यानंतर महोत्सवाला प्रारंभ झाला, परंतु अनपेक्षितपणे(?) गालबोट लागलेच.

देव भक्तांच्या हाकेला पावतो आणि काही गैर घडल्यास शिक्षाही देतो, अशी सर्वमान्य श्रद्धा आहे. तिथे तसे काही घडले का ते माहीत नाही. मात्र, दिल्लीतील करन कश्यप या सव्वीस वर्षीय कोवळ्या युवकाचा नाचता नाचता मृत्यू झाला.

ईडीएम पार्टीमध्ये मृत्यू होणे नवीन नाही. इंटरनेटवर नेहा बहुगुणा, ईशा मंत्री, संदीप कोट्टा, व्यंकट सत्यनारायण आदी नावांसमोर ‘डेथ’ शब्द टाकल्यानंतर बरीच माहिती समोर येते. २००९पासून अशा किमान ६ जणांचा ‘ईडीएम’मध्ये अचानक मृत्यू झाला आणि योगायोग असा - ही मंडळी ‘सनबर्न’साठी दाखल झाली होती.

शवविच्छेदन अहवालातून अति अमली पदार्थ सेवनामुळे मृत्यू झाल्याचे कारण समोर आले होते. त्यामुळेच करन कश्यपच्या मृत्यूभोवती गूढ निर्माण झाले आहे आणि त्याचा नेमका उलगडा होणे नितांत आवश्यक आहे. हादेखील ड्रग्जचा बळी आहे का, हे कळायला हवे.

करन याच्या मूत्रपिंडाला इजा झाल्याने मृत्यू ओढवला, असे शवविच्छेदन अहवालातून समोर आल्याची वदंता आहे. त्या संदर्भात स्पष्टपणे खुलासा झालेला नाही. अचूक निदानासाठी व्हिसेरा वेर्णा येथील ‘फोरेन्सिक लेबोरेटरी’मध्ये पाठवले जाणार आहे. अर्थात तिथे बराच वेळ जाईल. प्रश्न असा आहे - एकाएकी असे काय झाले की, ज्यामुळे मूत्रपिंड बिघाड होऊन करनचा जीव गेला!

वास्तविक, आरोग्य व्यवस्था, फॉरेन्सिक तंत्रज्ञान वापरात गोवा आघाडीवर आहे, असा नेहमीच दावा राहिला आहे. हल्लीच नोव्हेंबर महिन्यात गोमेकॉमध्ये ‘फॉरेन्सिक मेडिसिन’मध्ये अत्याधुनिक रँडॉक्स यंत्रणा कार्यान्वित झाली. ज्यामुळे फॉरेन्सिक तपासणीची गती वाढेल, अशी आशा आहे. तरीही करन कश्यपच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्यास विलंब लागावा?

आरोग्य यंत्रणेने व्हिसेरा राखून ठेवला आहे, याचाच अर्थ मृत्यू नैसर्गिक नाही! शिवाय हा काही खुनाचा वा लैंगिक अत्याचाराचाही प्रकार नाही. विषबाधा वा गुंगीची मात्रा तत्सम संशयातून व्हिसेरा राखून ठेवला असण्याची शक्यता अधिक दिसते. पेशी परीक्षणांती सत्य समोर यावे. मृत्यू अमली पदार्थामुळे झाला का हे कळायलाच हवे.

‘सनबर्न’ धार्मिक विधीने सुरू झाला म्हणून तिथे नाचणारे तीर्थ घेणारेच होते, असे मानता येणार नाही. गोव्यात ड्रग्जची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. हिमाचल प्रदेशातून गोव्यात येऊ घातलेला हशीशचा २ कोटींचा साठा दिल्ली पोलिसांच्या गुन्हा शाखेने पकडणे आणि दिल्लीतूनच आलेल्या एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू होणे हा योगायोग नसावा.

पकडलेला साठा दोन कोटींचा होता तर न पकडता गोव्यात दाखल झालेला साठा किती असेल, याची गणना न केलेलीच बरी. ऑगस्ट महिन्यात आलेक्स सिक्वेरा यांनी अमली पदार्थ गोव्यात सर्वत्र सदासर्वकाळ उपलब्ध असतात; ते मिळायला ‘सनबर्न’ची वाट पाहण्याची गरज नसल्याचे विधान स्वातंत्र्यदिनाच्या आसपास केले होते. त्यावर मुख्यमंत्र्यांनी त्यांनी ते चुकून म्हटल्याचे सांगत ‘अमलीपदार्थांची समस्या जगभर असल्याचे त्यांना म्हणायचे होते’ अशी सारवासारव केली होती.

समस्या जगभर असेलही आमच्या गोमट्या गोव्यात ड्रग्ज नको. पर्यटन खाते धार्मिक पर्यटनाला चालना देऊ पाहत आहे. त्याला पाठिंबा मिळायला हवा. लोकांचा विरोध ईडीएमना नाही, त्याआड ज्या अपप्रवृत्ती पोसल्या जातात त्याला आहे. आज गावागावांतून अमली पदार्थाचे जाळे विणले गेले आहे. समुपदेशक, व्यसनमुक्ती केंद्र चालकांसोबत बोलल्यास धक्कादायक माहिती समोर येते.

विद्यार्थिदशेत अमली पदार्थांचा विळखा पडतो आहे. दुर्दैवाने, कळत असून वळत नाही. पर्यटन महसूल वाढावा म्हणून अमली पदार्थांच्या सहज उपलब्धतेवर लक्ष न देणे राज्याच्या हिताचे नाही. पर्यटनाला मार बसेल म्हणून वाहतूक नियमांत शैथिल्य, ध्वनिप्रदूषणाकडे दुर्लक्ष, मानवी तस्करीसकट अन्य गैरप्रकारांकडे जाणूनबुजून काणाडोळा; पर्यटनाच्‍या नावाखाली गोव्याची आणखी किती वाट लावाल?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एकाला अटक

Goa: 'राज्यात घरे कायदेशीर करताना दंडही वसूल करणार', मुख्‍यमंत्र्यांनी दिली माहिती; सहकार्याचे कोमुनिदाद पदाधिकाऱ्यांना आवाहन

Cristiano Ronaldo: रोनाल्डो 'गोव्यात' खेळणार की नाही? सुरक्षा यंत्रणा घेणार निर्णय; देशभरातील फुटबॉलप्रेमी आशावादी

Goa AAP: 'गोव्यात काँग्रेसने जनतेचा विश्‍वास गमावला'! आतिषी यांचे प्रतिपादन; आघाडी करणार नसल्याचा पुनरुच्चार

Goa Politics: खरी कुजबुज; फोंड्यात अशीही बनवाबनवी

SCROLL FOR NEXT