
Sunburn Festival 2024 Youth Death Newsक
म्हापसा/पेडणे : ड्रग्स तसेच इतर गैरप्रकारांमुळे बदनाम झालेल्या सनबर्न फेस्टिव्हलमध्ये यापूर्वी काहीजणांचा मृत्यू झाला असतानाच यंदाच्या महोत्सवातही शनिवारी एका युवकाचा मृत्यू झाल्यामुळे पहिल्याच दिवशी ‘सनबर्न’ महोत्सवाचा खरा चेहरा समोर आला.
एका युवकाचा मृत्यू होऊनही पोलिसांनी याची वाच्यता तब्बल १२ तासांनंतर केल्यामुळे यात गौडबंगाल असावे, असा संशय व्यक्त केला जात आहे.
वादग्रस्त सनबर्न महोत्सवस्थळी हजेरी लावलेल्या दिल्लीस्थित २६ वर्षीय तरुणाचा म्हापसा येथील खासगी इस्पितळात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. करण राजनबाबू कश्यप असे या युवकाचे नाव असून आपल्या मित्रांसोबत त्याने सनबर्नच्या पहिल्या दिवशी ईडीएममध्ये भाग घेतला होता. म्हापसा येथील खासगी इस्पितळातील आयसीयूमध्ये उपचार घेताना त्याचा मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २८ डिसेंबर रोजी घडली. करण हा आपल्या मित्रांसोबत सनबर्न महोत्सवस्थळी दाखल झाला होता. तिथे रात्री ९.४५ वाजता करण बेशुद्ध झाला. त्याला तात्काळ रुग्णवाहिकेद्वारे म्हापसा येथील खासगी इस्पितळात वैद्यकीय उपचारासाठी नेण्यात आले. तिथे उपचार सुरू असतानाच करणचा मृत्यू झाला.
करणचा मृतदेह गोमेकॉत पाठविला असून, तिथे उत्तरीय तपासणी करण्यात येणार आहे. त्यात जर काही गैरप्रकार निदर्शनास आल्यास आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पोलिस अधीक्षक अक्षत कौशल यांनी प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले. करणच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे नेमके कारण समजू शकेल.
दिल्ली येथील युवकांचा एक गट गोव्यात सहलीला आला होता. या सहलीवेळी सनबर्नचीही मजा लुटण्याचे ठरवून ते शनिवारी सनबर्न पार्टीला गेले होते. करणचा मृत्यू हा अमली पदार्थांच्या अतिसेवनामुळे झाला की आणखी काही दुसऱ्या कारणामुळे यासंबंधी पेडणे तालुक्यात उलटसुलट चर्चा सुरू असून या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.
यापूर्वी झालेल्या सनबर्न फेस्टिव्हलमध्येही काहीजणांचे संशयास्पद मृत्यू झाले असून या युवकाच्या मृत्यूमुळे लोकांमध्ये खळबळ उडाली आहे. त्याचा मृत्यू कसा झाला, याची चौकशी करून लोकांपुढे सत्य काय ते ठेवावे, असे समाजकार्यकर्ते भारत बागकर म्हणाले.
२००७ सालापासून सनबर्न महोत्सव गोव्यात होत आहे. २०१९ सालीही या महोत्सवाला गालबोट लागले होते. या महोत्सवात तीन पर्यटकांचा मृत्यू झाला होता. यात आंध्र प्रदेशहून आलेल्या दोघांचा रांगेत थांबले असताना मृत्यू झाला होता, तर बंगळुरू येथील तरुणाची महोत्सव सुरू असताना प्रकृती खालावली आणि तो अत्यवस्थ झाला होता. त्याचाही इस्पितळात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.
शनिवारी सनबर्न फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाल्यानंतर दिल्लीतील तरुणाचा मृत्यू झाला. मात्र, प्रसारमाध्यमांनी हे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतरच गोवा पोलिसांनी या प्रकरणाला दुजोरा दिला. घटना १२ तासांपूर्वी घडली असताना आणि प्रसिद्धी माध्यमांनी वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर पोलिसांनी हे प्रकरण उघड का केले, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
या महोत्सवात करणने संगीताच्या तालावर नृत्यही केले. पण रात्री ९.४५ च्या सुमारास त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णवाहिकेतून त्याला म्हापसा येथील एका खासगी इस्पितळातील अतिदक्षता विभागात दाखल केले. मात्र, इस्पितळात उपचार सुरू असतानाच रविवारी सकाळी त्याचा मृत्यू झाल्याचा दावा पाेलिसांनी केला. त्याचे कुटुंबीय गोव्यात येण्यास निघाले असून ते गोव्यात पोहोचल्यावर मृतदेह त्यांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.