Shirgaon Mining Impact Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Shirgaon Mining Impact: खाणकामातून हजारो कोटींची कमाई, पण गावाचे पाणी, शेती अन् रोजगार संकटात

Goa Mining Damage: खाणकामाला सरसकट विरोध हा मुद्दा नाही. खाणकामाच्या नावाखाली गावांनी नुकसान सहन करायचे काय?

गोमंतक ऑनलाईन टीम

खाणकामाला सरसकट विरोध हा मुद्दा नाही. खाणकामाच्या नावाखाली गावांनी नुकसान सहन करायचे काय? सगळेच विकासाचा डंका वाजवत असताना निसर्गाचे, नागरी हिताचे भान ठेवणारे कुणीतरी हवेच. गोव्यात ही भूमिका गोवा फाऊंडेशनने बजावली आहे. क्लॉड-नॉर्मा आल्वारिस दाम्‍पत्‍याचे या भूमीप्रति अतुलनीय योगदान आहे. बेसुमार खाण उत्खननाला लगाम घालण्यासाठी गोवा फाऊंडेशनने लढा दिला. न्यायालयीन हस्तक्षेपामुळे खाणकामातील मनमानीला आळा बसला.

खनिज ब्लॉकचे लिलाव करावे लागले. सरकारच्या तिजोरीत हजारो कोटी रुपये जमा होऊ लागले. हीच संपत्ती पूर्वी मूठभरांच्या फायद्यासाठी वापरली जात होती. दुर्दैवाने, खाणखंदकांचे घाव कायम आहेत. खाणपीडित गावांचे प्रश्‍‍न बाकी आहेत. गोव्यात खाणकामाचा विषय निघाला की खाणबंदीमुळे राज्याचे किती नुकसान झाले, याची चवीने चर्चा होते. रोजगाराचे जुने आकडे फेकले जातात. पण खाणकाम सुरू असताना गावांचे काय झाले, याचा हिशेब कोण मांडणार? शिरगावच्या संदर्भात क्‍लॉड व स्‍थानिकांनी पणजीत सादर केलेल्‍या अहवालावर गांभीर्याने विचारमंथन व्‍हायलाच हवे.

पन्नास वर्षांत सुमारे सात हजार कोटी रुपयांचे लोहखनिज विकले गेले. त्याच काळात गावाचे प्रत्यक्ष नुकसान जवळपास एक हजार कोटी रुपयांचे झाले. पर्यावरणीय हानी - पुनर्स्थापनेचा खर्च धरल्यास हा भार चार हजार कोटी रुपयांवर जातो, असा अहवालाचा निष्कर्ष आहे. खाणकामामुळे शिरगाव उद्ध्वस्त होत असल्‍याचे आक्रंदन आहे. अर्थात हे आकडे प्राथमिक आहेत. त्यांची पडताळणी आवश्यक आहे.

शिरगावच्या एकूण क्षेत्रफळापैकी ५७.७ टक्के जमीन खाणकामाशी संबंधित आहे. गावाचा एवढा मोठा भाग खाणकामाच्या प्रभावाखाली आहे. त्यामुळे काजू, आंबा, दूध उत्पादन घटल्याचा दावा अहवालात आहे. विहिरींची पातळी घटली, शेतांत गाळ साचला. खाजन जमिनीच्या व्यवस्थेवर परिणाम झाला. मासेमारी, वनोत्पादन घटले, स्फोटांमुळे घरांना तडे गेल्याच्या तक्रारी आहेत. ग्रामस्थांच्या कैफियतीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. जमीन आहे; पण उत्पन्न नाही. पाणी आहे; पण त्याच्या सुरक्षिततेची खात्री नाही. याला विकास म्हणायचे?

माधव गाडगीळ समितीने यापूर्वीच ‘विकासाचे निर्णय घेताना निसर्गाच्या मर्यादा ओळखा. स्थानिकांना विश्वासात घ्या. ग्रामसभेचा सहभाग महत्त्वाचा माना’, अशा सूचना केल्‍या होत्‍या. समितीच्या अहवालाचा हा गाभा होता. त्यावेळी या सूचनांकडे विकासाच्या आड येणाऱ्या शिफारशी म्हणून पाहिले गेले. आज शिरगावचा अहवाल समोर आहे. निसर्गाची हानी झाल्यानंतर भरपाई देण्यापेक्षा ती होऊच नये, याची काळजी घेणे अधिक महत्त्वाचे. पण खाणधोरणात या विचाराला किती स्थान मिळाले?

शिरगावच्या अहवालातील आणखी एक बाब अस्वस्थ करणारी आहे. श्री देवी लईराई मंदिरासह गावातील वस्तीचा भाग खाण ब्लॉकच्या क्षेत्रात समाविष्ट असल्याचे अहवालात म्हटले आहे. खनिज साठा दिसला की गाव, मंदिर, शेती, माणसे दुय्यम ठरतात? ग्रामस्थांच्या तक्रारींची शहानिशा न करता नव्या खाणकामाला परवानग्या देण्याची घाई कशासाठी? खाण कंपन्यांना उत्खननातून फायदा मिळतो. सरकारला महसूल मिळतो. मग नुकसान झाल्यास जबाबदारीही निश्चित झाली पाहिजे. जुन्या खाण कंपन्यांकडून नुकसानभरपाई वसूल करावी. पुनर्स्थापनेचा खर्च त्यांच्याकडून घ्यावा.

गोवा फाऊंडेशनची ही मागणी रास्त आहे. खाणींमुळे राज्याच्या तिजोरीत पैसे जमा होतात; पण त्या गावांच्या वाट्याला काय येते? सर्वोच्च न्यायालयाने २०२४ मध्ये खनिजयुक्त जमिनींवर कर आकारण्याचा राज्यांचा अधिकार स्पष्ट केला. रॉयल्टी म्हणजे कर नव्हे, असेही न्यायालयाने नमूद केले. त्यामुळे राज्याला महसुलाचा आणखी एक मार्ग खुला झाला. गोवा सरकारने या निर्णयाचा लाभ घेण्यासाठी काय केले?

खाण कंपन्यांकडून राज्याचा हक्काचा महसूल मिळवण्यासाठी कोणती पावले उचलली? सरकारने याचा खुलासा करावा. खाणकामातून मिळणाऱ्या महसुलाचा गवगवा करायचा; त्‍यासाठी राखून ठेवलेला जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधी इतरत्र खर्च होत असल्‍याचेही यापूर्वी समोर आले आहे. खाणकामाला सरसकट विरोध हा मुद्दा नाही. खाणकामाच्या नावाखाली गावांनी नुकसान सहन करायचे काय? खनिज संपत्तीचा हिशेब मांडताना गावांच्या उद्ध्वस्त झालेल्या जगण्याचा हिशेब विसरता येणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: प्रियांश आर्यचा 'रुद्रावतार'! 266 च्या स्ट्राइक रेटने गोलंदाजांची धुलाई; 19 षटकार आणि 7 चौकारांसह कुटल्या 181 धावा

Goa Short Films IFFI: 24 तासांत बनवला लघुपट, 19 वर्षांच्या दिग्दर्शकाचीही कमाल; इफ्फीत गोव्याच्या तरुणाईचा ठसा

Bangladesh Violence: बांगलादेशात राजकीय संघर्ष शिगेला! शेख हसीना यांच्या समर्थकांच्या रॅलीवर हल्ला; गोपालगंजमध्ये जाळपोळ आणि तोडफोड VIDEO

Youth Congress: 'युवकांचो सरकार'! गोवा युवक काँग्रेसचे घरोघरी अभियान; युवकांच्या अपेक्षा जाणून घेणार

Viral Video: रस्त्यावर सिंहांचा कळप, तरीही बाईकस्वार न थांबता निघून गेला! थरारक व्हिडीओ पाहून नेटकरीही अवाक्

SCROLL FOR NEXT