डॉ. मधू घोडकिरेकर
काही बोली शब्द असे असतात की ते मूळ स्वरूपातच चांगले वाटतात. मी ‘गोवेकर’ असे कधी म्हणत नाही , आमच्यासाठी गोवेकर म्हणजे स्वातंत्र्यसैनिक राजाराम गोवेकर. मी एक तर ‘गोमंतकीय’ किंवा ‘गोंयकार’ असा उल्लेख करतो. तसेच ‘सुशेगाद’ हे ‘गोयकरां’चे पेटंटेड विशेषण.
आपल्याकडे अतिशय उच्च दर्जाच्या शिव्या आहेत. त्यामुळे कदाचित असावे, पोर्तुगीज आपल्या शिव्या मागे ठेवू शकले नाहीत. पण, त्यांच्या भाषेतले गोमंतकीयांना यथोचित लागू होणारे विशेषण आपल्या भाषेच्या शब्दावलीत मिसळून गेले. तसे पाहिल्यास, या पोर्तुगीजही तसे ‘सुशेगाद’च.
त्यांच्या तीनशे वर्षांनंतर आलेल्या इंग्रजांनी संपूर्ण भारतवर्षावर राज्य केले तर ही मंडळी गोव्यातील केवळ तीन चार तालुक्यावर राज्य करीत होती. त्यात, मुंबईसारखा प्रदेश त्यांनी आपणहून इंग्रजांना दिला.
पुढे १८५७मध्ये इंग्रजांना भारतात मिळालेल्या यशानंतर, पोर्तुगिजांचा विस्तार एका जिल्ह्याइतकाच झाला, तोसुद्धा येथल्या मराठी व कन्नड संस्थानिकांनी इंग्रजांऐवजी पोर्तुगीज शरणागतीचा मार्ग स्वीकारला म्हणून. तीच गत फ्रेंच वसाहतीची होती. फ्रेंच व पोर्तुगीज फार आधी भारतात येऊनसुद्धा इंग्रजाच्या तुलनेत ‘सुशेगाद’ ठरले.
पोर्तुगिजांच्या ख्रिस्तीकरणाच्या धोरणामुळे, त्यांनी आधुनिकीकरण करण्यात दिलेले योगदान भारतीय इतिहासात नेहमीच झाकोळले जाणार. याचेच एक उदाहरण म्हणजे आपल्या गोव्याचा सरकारी छापखाना. या छापखान्याला पावणेपाचशे वर्षांचा इतिहास आहे. दुसरे उदाहरण पावणेदोनशे वर्षांचा इतिहास असलेले गोवा मेडिकल कॉलेज व तिसरे उदाहरण म्हणजे १५० वर्षांचा इतिहास असलेली ‘इन्स्टिट्यूट ऑफ मिनेझिस ब्रागांझा’ ही संस्था.
पोर्तुगिजांना १५१०मध्ये भारतीय भूमीवर वसाहत करण्यासाठी पहिली जागा गोव्यात मिळाली. त्यानंतर ३२ वर्षांनी म्हणजे मार्च १५४२मध्ये फ्रांसिस्को झेवियर भारतात आले. ते पंथप्रसारक होते यात वाद नाही, त्याचबरोबर ते उच्चशिक्षितही होते. ते येण्याच्या दहा वर्षे आधी त्यांनी मास्टर ऑफ आर्ट्सची पदव्युत्तर पदवी मिळविली होती.
तसेच तेथील विद्यापीठात तत्त्वज्ञान विषयात अध्यापनही केले होते. त्यांच्या कामाची सुरुवात गोव्यात नव्हे तर तामिळनाडूत झाली होती. तेथे त्यांनी बायबल शिकविण्याचे काम केले. पुढे, गोव्यात पोर्तुगीज शाळा सुरू झाल्यावर ते येथे आले व तेथील काम येथे करू लागले.
शिकवायचे असेल तर, पाठ्यपुस्तके हवीत म्हणून त्यांनी पोर्तुगाल व्हाइसरॉयकडे गोवा, जपान व युथोपिया येथे छापखाने पाठविण्याची मागणी केली. ते हयात असेपर्यंत त्यांना छापखाना मिळाला नाही. ते १५५२मध्ये धर्मप्रसारासाठी चीनमध्ये गेले असता तेथे वारले, तशी छापखान्याची मागणी बाजूस पडली.
तेथे युथोपियाच्या राज्याने त्यावर्षी नवीन येणार्या पाद्—यांसोबत एक छापखानाही पाठवून द्या, अशी विनंती पोर्तुगाल व्हाइसरॉयकडे केली. परिणामी, १५५६मध्ये स्पेन बनावटीचे एक जहाज, पाद्—याची एक तुकडी व सोबत हे मशीन तसेच हे मशीन चालविण्यासाठी काही तंत्रज्ञ, यांना घेऊन युथोपियाला जायला पोर्तुगालहून निघाले. त्या जहाजातून गोव्यासाठीही काही पाद्री पाठविले होते.
त्यामुळे हे जहाज केप ऑफ गुड होप या बंदराला वळसा घालून गोव्यात आले. हे होईपर्यंत, ज्या युथोपियाच्या राजाने या छपाई मशीनची मागणी केली होती, त्याने या मशिनात रस नसल्याचे कळविले. या अचानक उद्भवलेल्या परिस्थितीचा फायदा गोव्यातील पाद्रींनी घेतला व छापखाना येथेच ठेवून घेतला.
हा छापखाना सुरक्षितपणे युथोपियाच्या राजाकडे पोहोचवण्याची जबाबदारी जुआंव बार्रेटो नामक पाद्रीवर सोपविली होती. या एकूण प्रकारात त्यांनीच हा ‘डबल गेम’ केला असावा असा संशय पोर्तुगालला होता. त्यामुळे त्याला त्यांनी गोव्याबाहेर जायला परवानगी दिली नाही. तो मरेपर्यंत गोव्यातच राहिला.
त्या वेळी पोर्तुगीज राजधानी जुने गोवे येथे होती, म्हणून तेथेच हा छापखाना कार्यान्वित झाला. नंतर तो पणजीत स्थलांतरित करण्यात आला व आजतागायत तेथेच आहे. छापखान्यासोबत तंत्रज्ञही आलेले असल्याने छापखान्या काम त्यावर्षी त्वरित सुरू झाले. पुढील दोन वर्षांत जी पहिल्या तीन पुस्तकांचे मुद्रण झाले, त्यात फ्रान्सिस्को झेवियरच्या जीवनावर आधारीत पुस्तकाचाही समावेश आहे. पुढे ५७ वर्षांनी त्यांना संतपद बहाल करण्यात आले त्यात या पुस्तकाचा मोठा वाटा आहे. तात्पर्य, गोव्यातील पाद्रींना हे मशीन आयतेच मिळाले.
गोव्यात छापखाना सुरू झाल्यावर इतर ठिकाणीही छापखाने पाठविण्यात आले. त्यातील एक जागा म्हणजे मुंबई. गोव्याच्या २४ वर्षांच्या अंतराने मुंबई पोर्तुगिजांच्या ताब्यात आली होती व १६६१ साली हुंड्याच्या स्वरूपात त्यांनी इंग्रजांना दिली.
त्यामुळे मध्यंतरीच्या काळात छापखाने मुंबईतही पोहोचले होते. १८३५साली इन्क्विझिशनची समाप्ती झाल्यानंतर एका पोर्तुगीज गव्हर्नरचे पोर्तुगाल राजाकडे बिनसले, म्हणून त्याला मुंबईत हद्दपार करण्यात आले. त्यांना पाठिंबा देण्यासाठी गोव्यातून मुंबईत गेलेल्या लोकांनी तेथे पोर्तुगीज व रोमन कोकणी नियतकालिके सुरू केली.
आज ज्याला ‘मिनी गोवा’ म्हणून ओळखले जाते ते वसई शहर या उठावाचे केंद्रस्थान होते. येथूनच पोर्तुगीज पत्रकारिता पश्चिम भारतात पसरली. त्यावेळी गोवा व मुंबई येथून विविध क्षेत्रात मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधने प्रसिद्ध होत होती. १८४२साली पोर्तुगीज वैद्यक शाळेची (म्हणजे आजचे गोमॅको) स्थापना झाली व या क्षेत्रातही प्लेग व मलेरिया या रोगांवर महत्त्वाची संशोधने गोव्यातूनच प्रसिद्ध झाली होती.
आजची जी सुपरिचित ‘आयएमबी’ म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ मिनेझिस ब्रागांझा संस्था आहे, तिची स्थापना १८७१साली वास्को-द-गामाच्या नावाने झाली होती. विज्ञान व लुसोफोनिया साहित्य यांचे संशोधन करणे हे या संस्थेचे प्रयोजन होते. १९२०च्या दरम्यान या संस्थेचे एक मुखपत्र प्रसिद्ध व्हायचे. हे मुखपत्र ‘रेंजल प्रिंटिंग प्रेस’ या पोर्तुगीजकालीन पहिल्या छापखान्यातून छापले जायचे. या छापखान्याचे मालक, दोतोर फ्रान्सिस्को रेंजल हे एक डॉक्टर होते.
त्या काळच्या आमच्या मेडिकल कॉलेजमधून प्रसिद्ध झालेल्या शोधपत्रिका संग्रहाचे ते संपादक होते. गोवा मुक्तीनंतर इन्स्टिट्यूट ऑफ मिनेझिस ब्रागांझा संस्था एका सरकारी स्वायत्त संस्थेत रूपांतरित झाली. या संस्थेची एक ‘गोवापुरी’ ही त्रैमासिक पत्रिका आजही प्रसिद्ध होते. कोकणी-मराठी, इंग्रजी -हिंदी व संस्कृत अशा पाच भाषांना समान सन्मान या संस्थेत दिला जातो. भाषावादात विभागली न गेलेली ही संस्था आहे. आपल्या साहित्य व संस्कृतीचे मुद्रित स्वरूपात संवर्धन करण्याचा मार्ग सुशेगाद पोर्तुगिजांनी दाखविला, आपण ‘गोंयकार’ मात्र याबाबतीत अजूनही ‘सुशेगाद’च आहोत.
गोवा भारतात विलीन होताच, संपूर्ण राज्यकारभार इंग्रजीत स्थलांतरित झाला. ‘पोर्तुगीज वैद्यक शाळे’चे ‘गोवा वैद्यकीय महाविद्यालय’ झाले व भाषेचे माध्यम बदलले. त्यावेळच्या डॉक्टरांना एका वर्षाचा खास इंग्रजी अभ्यासक्रम पूर्ण करावा लागला. असे करूनही ते व्याख्याते, प्राध्यापक या पदासाठी पात्र ठरू शकले नाहीत. ज्यांनी मुंबईत किंवा इतर कुठून वैद्यक शिक्षण घेतले ते, या पदांना पात्र ठरले. पण त्यांची संख्या नगण्य होती.
परिणामी, गोवा केंद्रशासित प्रदेश असल्याने, यूपीएस्सीमधून आलेल्या भारतभरातील डॉक्टरांना ही पदे मिळाली. पुढे ते येथूनच निवृत्त झाले. भाषा माध्यम बदल्यामुळे पोर्तुगिजांनी गोव्यात रुजवलेली शेकडो वर्षांची वैद्यक संशोधन परंपरा विस्मृतीत गेली.
जे येथे आले, काही अपवाद वगळता, ते इथल्या पाहुणचारासाठीच आले होते. त्यांची संशोधन व आधुनिकीकरणाला कशी आडकाठी असायची याचे यथार्थ वर्णन डॉ. प्रेमानंद रामाणीसरांनी आपल्या पुस्तकात केले आहे. ही परिस्थिती इतर शैक्षणिक शाखांमध्येही होती. स्वत: कमी शिकलेल्या भाऊसाहेब बांदोडकरांची तुलना कुणाशीही करता येत नाही ते याच कारणामुळे.
शिक्षक नाही, त्यांनी शिक्षक आणले, पाठ्यपुस्तके नव्हती तेथे आधी पुणे व नंतर महाराष्ट्र शिक्षण मंडळाची पुस्तके लागू केली. विद्यापीठाची तरतूद केली, पण तोपर्यंत मुंबई विद्यापीठाचे एक दालनच गोव्यात आणले.
एका रात्रीत राज्यकारभार भाषा पोर्तुगीज भाषेतून ते इंग्रजीत स्थलांतरित झाला, ज्याचा सामना भाऊसाहेबांनी लीलया केला. पोर्तुगिजांचा त्यांच्या स्वत:साठी असलेला शैक्षणिक दृष्टिकोन गोमंतकीयांत रुजू व्हावा यासाठी आखणी केली.
इन्स्टिट्यूट ऑफ मिनेझिस ब्रागांझा संस्था भारतीय स्वरूपात पुढे आणली. गोवा विद्यापीठ, औद्योगिक वसाहती यांच्यासाठी जागा शोधल्या. पोर्तुगिजांनी शेवटची शंभरेक वर्षे एकदम ‘सुशेगाद’ घालविली, त्यामुळे या गोष्टी गोव्यात आल्या नाहीत. याबाबतीत भाऊंनी शून्यातून जग निर्माण केले, म्हणून त्यांची कुणाशीही तुलना करणे शक्य नाही.
त्यांनी ज्या ज्या गोष्टींची आखणी केली, त्या सर्व पुढील काळात मूर्त रूपात आल्या. सुविधा तळागळात पोहोचल्या. भाऊंना अपेक्षित असेला गोवा पूर्णत: निर्माण होतो आहे, असे मला वाटत नाही. ते आमच्या सर्वांहून वेगळे याच कारणासाठी वाटतात, की त्यांनी आयते काही घेतले नाही व ‘सुशेगादी’ वृत्ती कधी अंगीकारली नाही. आज गोव्यात सुपरस्पेशालिटीपर्यंत वैद्यक शिक्षण, आयआयटीपर्यंत अभियांत्रिकी शिक्षण व इतर शाखांत डॉक्टरेटपर्यंत शिक्षण सुविधा उपलब्ध झाली आहे. मात्र, पोर्तुगिजांनी सुरू केलेली स्वभूमीत संशोधन प्रकाशन करण्याची परंपरा अजून पुनर्जीवित झालेली नाही.
ज्या भूमीत आशियाखंडातील मुद्रण परंपरेचे बीजारोपण झाले, त्या गोव्यात मात्र वर्तमानपत्रे सोडल्यास इतर प्रकाराच्या प्रकाशनात अजून ‘सुशेगाद’पणा चालू आहे.
पुस्तके पुष्कळ प्रकाशित होतात, पण त्या पुस्तकाला राष्ट्रीय मान्यतेसाठी ‘आएसबीएन’ क्रमांक घ्यावा लागतो, तो क्रमांक क्वचितच लेखक घेत आहेत. शोधपत्रिकेसाठी ‘आयएसएसएन’ क्रमांक घ्यावा लागतो, तो आपल्या ‘सासय’ या कोकणी शोधपत्रिकेसाठी गोवा विद्यापीठ अद्याप मिळवू शकले नाही. ज्या भूमीत परकीय सत्तेच्या काळात आंतरराष्ट्रीय संशोधने प्रकाशित झाली, त्याच मुक्त भूमीत अर्धा शतकानंतरही मान्यता प्राप्त शैक्षणिक जर्नल उपलब्ध तयार होऊ शकले नाही. याचा अर्थ एकाच होतो की, आयते मिळाल्याशिवाय आम्ही काहीच घेत नाही.
याला मीही अपवाद नाही. एवढे शिकून जे आज आम्हांला जमत नाही त्याची पूर्वतयारी गोमंतक मराठी भाषा परिषदेच्या संस्थापकांनी ५० वर्षांपूर्वी करून ठेवली आहे. ‘गोमंतकाच्या अस्मिता’ या शोधपत्रिकेसाठी ‘आयएसएसएन’ क्रमांक मिळविण्यासाठी ज्या अटी लागतात, त्यांची पूर्तता तेव्हाच त्यांनी करून ठेवली आहे. आता अर्ज करताच त्याला केंद्रीय यंत्रणेकडून त्वरित सकारात्मक प्रतिसाद मिळाला तो याचमुळे. थोडक्यात, ‘सुशेगादां’च्या राज्यात आमच्यासाठीसुद्धा संस्थापक पिढीने सर्व तयारी करून ठेवल्यामुळे हा दुर्लभ क्रमांक आम्हांला आयताच मिळतो आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.