Ponda Assembly Bye Election 2026 Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

रवी नाईकांचा वारसा की केतन भाटीकरांचे जनबळ? फोंड्यात वर्चस्वाची लढाई - संपादकीय

Goa Politics: मगोपची मते कुणाला मिळतात, यावर निकालाचा लंबक दिशा ठरवेल. भाजपची वाटचाल सोपी नसेल. त्‍यांच्‍या मार्गात काटे असू शकतील. नव्या समीकरणांच्‍या उभारणीतून काँग्रेससाठी ही निवडणूक पुनरुज्जीवनाची संधी आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

भारतीय क्रिकेट संघ आणि भारतीय जनता पक्षात एक साम्‍य आहे, खेळाचे मैदान अन् निवडणुकीचा आखाडा, तेथे विजयी पताका फडकविण्‍यासाठी जीवाचे रान होते. प्रचंड मेहनत, रणनीती आणि संघभावना हे पैलू प्रकर्षाने दिसतात.

फोंडा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने शड्डू ठोकला आहे. माजी मुख्‍यमंत्री रवी नाईक यांच्‍या मृत्‍युपश्‍‍चात पाच महिने उलटले, भाजपने या कालावधीत कटाक्षाने ‘वक्‍तव्‍ये’ टाळून केवळ पाणी जोखण्‍याचे काम केले. इच्छुकांची ‘धाव’ तपासली. संख्‍यात्‍मकदृष्ट्या बलशाली असूनही विखुरलेल्‍या भंडारी समाजाचा पुरता अदमास घेतला. अखेर रवीपुत्र रितेश नाईक यांना उमेदवारी जाहीर केली. तत्‍पूर्वी काँग्रेसने केतन भाटीकर यांच्‍या गळ्यात उमेदवारीची माळ घातली. ‘आप’ने गीतेश नाईक यांना पसंती दिली. ‘रिव्‍हॉल्‍युशनरी गोवन्‍स’ने अद्याप पत्ते उघडलेले नाहीत.

निवडणूक बहुरंगी होईल, अशी चिन्‍हे असली तरी भाजपचे रितेश नाईक व काँग्रेसच्‍या केतन भाटीकर यांच्‍यातच तुल्‍यबळ लढत होईल. तथापि, दोघांनाही बंडखोरीच्‍या ग्रहणाची भीती आहे. फोंड्यात जो विजय मिळवेल, तो पुढील राजकारणात वर्चस्व प्रस्थापित करेल; त्यामुळेच ‘अभी नहीं, तो कभी नहीं’ ही धारणा अधिक बळकट होत आहे.

राजकारणात निष्‍ठेपेक्षा विजयाच्‍या गणितालाच प्राधान्‍य मिळते. अपूर्व दळवींच्‍या आमदारकीच्‍या स्‍वप्‍नाआड हेच गणित आलेय. दोनदा नगरसेवक बनलेल्या दळवींच्‍या ‘अपूर्वाई’मुळे ते तिसऱ्यांदा ‘बिनविरोध’ आले. मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे ते निकट मानले जातात.

त्‍यांचा जनसंपर्क उत्तम आहे; परंतु रितेशना डावलून दळवींना उमेदवारी दिल्‍यास भंडारी समाजात चुकीचा संदेश जाईल, अशी शक्‍यता भाजपने विचारात घेतली असावी. भाजपने तिकीट नाकारल्‍याने धक्‍का बसलेल्‍या दळवी यांनी अद्याप बंडाळीची भाषा केलेली नाही, पण तसे पाऊल उचलल्‍यास भाजपसाठी चिंता ठरू शकते.

अर्थात साम, दाम, दंड, भेदाचा वापर करून दळवींना थोपवण्‍यास भाजप प्रयत्‍न करेलच. दिल्‍लीपासून गल्‍लीपर्यंत सत्ता गाजवणाऱ्या भाजपला आव्‍हान देणे सोपे राहिलेले नाही. दोनदा नगरसेवक बनलेले रवीपुत्र रितेश हे मृदुभाषी आहेत, त्‍यांची छबी स्‍वच्‍छ आहे. जनसंपर्क काहीसा कमी असला तरी त्‍यांच्‍यासोबत रवींचे राजकीय वारसदार अशी काहीप्रमाणात सहानुभूती नक्‍कीच राहील.

दुसरीकडे केतन भाटीकर यांनी वाक्‌चातुर्य, धाडस, दांडग्या जनसंपर्काच्‍या बळावर अलीकडच्‍या काळात फोंड्यात विशेष ठसा उमटवला आहे. गरज ओळखून दिशा ठरवण्‍याची हातोटी त्‍यांच्‍याकडे आहे. आरोग्‍यासारख्‍या मूलभूत प्रश्‍‍नी मुख्‍यमंत्र्यांचे लक्ष वेधून त्‍यांनी थेट सामान्‍यांच्‍या भावनांना हात घातला आहे.

गोवा सुरक्षा मंच, मगोपकडून यापूर्वी त्‍यांनी विधानसभा लढवली आहे. २०२२मध्‍ये रवी नाईक यांच्‍यापेक्षा केवळ ७७ मते कमी पडल्‍याने ते पराभूत झाले होते. भाजपकडून रितेशना संधी मिळेल, अशी शक्‍यता दिसताच त्‍यांनी काँग्रसचा हात धरला. त्‍यांच्‍यासमोर राजेश वेरेकरांची नाराजी थोपवण्‍याचे आव्‍हान असेल. वेरेकर यांनीही गत निवडणुकीत काँग्रेसतर्फे ६,८३९ मते मिळवली होती.

वेरेकर यांना काँग्रेसच्‍या तिकिटाची अपेक्षा असताना भाटीकरांना मिळालेली संधी त्‍यांना रुचली असण्‍याची शक्‍यता कमीच आहे. ते भाटीकर यांना साथ देणार की भाजपला छुपा ‘हात’ यावरही बरेच काही अवलंबून असेल. फोंडा मतदारसंघात जातीय आडाखे विचारात घेतले जातातच. रितेश भंडारी समाजाचे, तर भाटीकर सारस्‍वत समाजातून पुढे आले आहेत. या मतदारसंघात रवींना २०२२ वगळता काँग्रेसतर्फे नेहमीच ९,३०० पेक्षा अधिक मते मिळाली.

तर मगोपची साडेतीन हजार व भाजपची पाच ते सहा हजार मते मानली जातात. या पक्षांनी युती केल्‍याने रवींची परंपरागत मते वाढूनही (९,४७२) भाजप-मगोपचे लवू मामलेदार २०१२ला निवडून आले होते. पुढे २०२२ मध्‍ये रवी भाजपात आल्‍यानंतर चक्रे फिरली. भाजपची काही मते तेव्‍हा मगोपतर्फे लढणाऱ्या भाटीकरांकडे वळली होती, तर पारंपरिक काँग्रेसची काही मते रवींपासून दुरावली होती. परिणामी रवी काठावर निवडून आले होते.

आताही मगोपची मते कुणाला मिळतात, यावर निकालाचा लंबक दिशा ठरवेल. ज्‍या त्‍वरेने भाटीकरांना काँग्रेसने तिकीट दिले, ते पाहता निराळे राजकारण शिजत असल्‍याची शक्‍यता वाढते. मगोपचे अनेक कार्यकर्ते भाटीकर यांच्‍यासोबत दिसत आहेत. म्‍हणूनच भाजपची वाटचाल सोपी नसेल. त्‍यांच्‍या मार्गात काटे असू शकतील. एरवी ‘लेट लतिफ’ असणाऱ्या काँग्रेसने भाटीकर यांच्या रूपाने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

नव्या समीकरणांच्‍या उभारणीतून काँग्रेससाठी ही निवडणूक पुनरुज्जीवनाची संधी आहे. ‘आप’ने गीतेश नाईक यांना उमेदवारी दिलीय, पण स्थानिक पातळीवर प्रभाव मर्यादित असल्याने त्यांची भूमिका निर्णायक ठरेल का, याबाबत प्रश्नचिन्ह आहे. तथापि, ‘आप’सारख्या पक्षांची उपस्थिती मतविभाजनाला कारणीभूत ठरू शकते, जे थेट लढतीतील समीकरण बदलण्यास पुरेसे ठरते.

पुढील अठरा दिवसांत उमेदवारांना आपली भूमिका, कामगिरी आणि भविष्यदृष्टी मतदारांपर्यंत पोहोचवावी लागणार आहे. त्यामुळे प्रचार अधिक आक्रमक, वेगवान, कधीकधी भावनिक पातळीवर झुकणारा होण्याची शक्यता आहे. फोंड्याचा निकाल कोणाच्या बाजूने लागेल हे निश्चितच महत्त्वाचे; परंतु त्याहूनही महत्त्वाचे असेल या निवडणुकीतून उभे राहणारे व्यापक राजकीय संकेत. काँग्रेस व खासकरून भाजपसाठी ही केवळ एक निवडणूक नसून प्रतिष्ठेची लढत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Weather Update: वाढत्या उष्म्याने नागरिक हैराण, पारा 34 अंशांवर; शनिवारी पावसाची शक्यता

Nachinola: नास्नोळा येथे विचित्र अपघात! भिंतीवर आदळला ट्रक; ड्रायव्हर अडकला केबिनमध्ये, अग्निशमनच्या जवानांनी वाचवला जीव

पॉक्सो न्यायालयात 150 पेक्षा अधिक खटले तुंबले, राज्यात एकच न्यायालय; दक्षिण गोव्यातही न्यायालय स्थापण्याची होतेय मागणी

LPG Cylinder Shortage: व्यावसायिक सिलिंडरचा अजूनही तुटवडा, पणजीतील हॉटेलचालकांची अजूनही पळापळ सुरू

Goa Cancer Statistics: 5 वर्षांत गोव्‍यात 4,762 जणांचा कॅन्‍सरमुळे मृत्‍यू, प्रत्‍येक दिवशी सापडतात सरासरी पाच रुग्‍ण

SCROLL FOR NEXT