Goa Government Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Goa Opinion: गोव्यात मूलभूत सोयीसुविधा ज्या दिवशी निष्पक्षपणे मिळतील, तेव्हा ‘रामराज्य’ आले असे म्हणता येईल

Goa Government: सामान्य माणसाला रोटी, कपडा और मकान या प्राथमिक, मूलभूत सोयीसुविधा ज्या दिवशी विनासायास, निष्पक्षपणे साध्य होतील, तेव्हाच इथे खऱ्या अर्थाने ‘रामराज्य’ आले असे म्हणता येईल.

Sameer Panditrao

शंभू भाऊ बांदेकर

दिनांक १२ ऑगस्टच्या दै. ‘गोमन्तक’मधील ‘कुलगुरूंचे ‘राम’राज्य!’ हा विचारप्रवर्तक अग्रलेख आवडला. जरी हा अग्रलेख गोवा विद्यापीठाच्या कुलगुरूंवर व त्यांची बाजू घेणाऱ्या प्रा. रामराव वाघ यांचा मनसुबा जाहीररीत्या प्रकट करणारा असला, तरी या अग्रलेखाला अनेक कंगोरे असल्यामुळे तो सर्वसामान्य जनतेपासून सुसंस्कृत, सुशिक्षित माणसांंच्या भावना प्रकट करणारा आहे, याबद्दल संपादकांचे अभिनंदन.

योगायोगाने १२ ऑगस्ट हे आपल्या गोवा राज्याचे (तेव्हा गोवा, दमण, दीव हा संघप्रदेश) पहिले मुख्यमंत्री मा. भाऊसाहेब ऊर्फ दयानंद बाळकृष्ण बांदोडकर यांच्या पुण्यतिथीचा दिवस. भाऊसाहेबांनी गोव्यात खऱ्या अर्थाने ‘रामराज्य’ सुरू व्हावे म्हणून जे अहर्निश प्रयत्न केले त्यामुळे सर्वपक्षीय लोक त्यांचा आदर करतात व त्यांना मनोभावे मानवंदना देतात. गोव्यात रामराज्य येण्यासाठी भाऊसाहेबांनी शिक्षण, क्रीडा, आरोग्य, उद्योग आणि कृषी आदी क्षेत्रात जी महनीय कामगिरी केली, त्यामुळे त्यांना सदैव सर्व स्तरांतून आदरांजली वाहिली जाते व त्यांचे कार्य पुढे नेण्यासाठी युवकांना मार्गदर्शन केले जाते.

अशा पार्श्‍वभूमीवर गोव्यातल्या तळागाळातील माणसांना सहकार्याचा हात देऊन त्यांची मान उंचावणे व त्यात स्वत:ला धन्य समजणे या गोष्टींना तिलांजली देऊन तथाकथित ‘नीज गोंयकारां’नी गोवेकरांचा अवमान करून इतर राज्यांतील कुलगुरूंचा उद्धार करण्याचा प्रयत्न करणे हे त्या व्यक्तीच्या कुळावरच मूलाघात करण्यासारखे म्हणावे लागेल. अशा गोष्टी शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात घडणे हे खचितच योग्य नव्हे. इतकेच कशाला?

गोव्यात सरकारच्या अनेक खात्यांमध्ये मूळ गोवेकरांना डावलून इतरांना नोकरी, बढती, बदली आदींमध्ये प्राधान्य दिले जाते यावर विरोधक आपल्यापरीने आसूड ओढण्याचा प्रयत्न करतात. पण स्वकीयांशी पंगा घेण्याचा प्रयत्न करणारे सत्ताधारी स्वजनांवर सूड घेण्याच्या इराद्यानेच तर असे करत नसावेत ना, अशी शंका आल्यावाचून राहत नाही! सध्या आपल्या गोव्यात जीवनावश्यक वस्तूंचे वाढते दर डिझेल, पेट्रोल, गॅस सिलिंडर यांचे चढत असलेले दर, बेरोजगारांची वाढती संख्या आणि ग्रामीण भागांपासून शहरी भागांपर्यंतचे खड्डेमय रस्ते इत्यादी गोष्टींमुळे सामान्य जनता मेटाकुटीस आलेली आहे.

तरीही कोट्यवधींचे नवनवे प्रकल्प जाहीर करायचे, जुन्या योजनांना तिलांजली देऊन नवीन योजना कार्यान्वित करण्याचा प्रयत्न करायचा आणि आम्ही रोजगार वाढवण्यासाठी हरप्रकारचे प्रयत्न करीत आहोत असे सांगून परप्रांतीयांना झुकते माप द्यायचे व इतके सारे करूही आम्ही गोवा हे एक आदर्श राज्य बनविण्यासाठी गोव्याचे रामराज्य करण्यासाठी बांधील आहोत, अशी फुशारकी मारायची! आणि यासाठी सर्वांनी शाबासकी द्यावी म्हणून वाट पाहायची, याला काय म्हणावे बरे?

तन, मन, धनाने सर्वस्व झोकून देणारे भाऊसाहेब बांदोडकर कुठे आणि भाऊसाहेबांचा एक तरी गुण अंगी बाणवावा म्हणून इतरांना हितोपदेश करणारे आजचे राजकारणी कुठे? असा प्रश्‍न आज लोकांनी विचारला तर त्यांचे काही चुकले आहे असे म्हणावे का?

नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी सरकारला ज्या तर्‍हेने धारेवर धरले व आकाशात झेप घेऊ पाहणाऱ्या सत्ताधाऱ्यांना धरतीवर आणले, ते पाहता सरकारने अंतर्मुख होऊन विचार करणे आवश्यक आहे.

विरोधकच नव्हेत, तर सरकार पक्षातील डॉ. देविया राणे, जेनिफर मोन्सेरात आणि डिलायला लोबो, गोविंद गावडे आणि मायकल लोबो आदींनी विविध प्रश्‍नांवर सरकारची सुसाट चालणारी सायकल रुळावर आणण्यासाठी जी कानउघाडणी केली ती स्तुत्य अशीच होती. पण दुर्दैवाने सत्ताधारी मात्र ‘नळी फुंकिली सोनार, इकडून तिकडे गेले वारे’ अशाच आकाशात वावरत आहे असे म्हणावे लागते.

तशात आता गोव्यात ‘गँगवॉर’ही होऊ लागले आहे. अर्थातच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा अपवाद म्हणावा लागेल. सर्वश्री सुदिन ढवळीकर, सुभाष शिरोडकर, रवि नाईक अशा काही मंत्र्यांचा अपवाद सोडला, तर मुख्यमंत्री इतर मंत्र्यांच्या खात्यांबाबतही विशेष सतर्कता दाखवून विरोधकांच्या विरोधाला सामोरे जाण्याचा प्रयत्न करतात, असेच एकूण चित्र पाहायला मिळते.

‘रामराज्य’वरून माझ्या विधानसभा-कालावधीत घडलेला किस्सा येथे उद्धृत करावासा वाटतो. १९८६-८७ च्या दरम्यान विरोधी पक्षात म्हणजे म.गो. पक्षात असलेले डॉ. काशिनाथ जल्मी आणि ऍड. बाबुसो गावकर हे दोन्ही आमदार ‘रामराज्य’ शब्दावरून मुख्यमंत्र्यांवर तुटून पडले.

म्हणाले, ‘तुम्ही रामराज्य, रामराज्य आणणार म्हणता, पण ते केव्हा? इथे महागाई वाढत आहे, बेकारी वाढते आहे.’ वगैरे... वगैरे... मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे विरोधकांनी कितीही गाजावाजा केला तरी आपल्या संयमी वृत्तीने विरोधकांना सामोरे जात. तो ‘खाशां’चा खास गुण एक म्हणता येईल. ते म्हणाले, ‘आम्ही नुसते बोलून दाखवत नाही. किंवा ते दिवास्वप्न नाही. ‘रामराज्य’ हे आमचे स्वप्न आहे. ते पूर्ण करण्यासाठी आमचा पक्ष, आमचे सरकार प्रयत्नशील आहे.’

तर रामराज्याचं आहे, हे असं आहे. लंकादहन झाल्यानंतर रावण जसा खवळून उठला होता, तशीच परिस्थिती आज आम जनतेची आहे. सामान्य माणसाला रोटी, कपडा और मकान या प्राथमिक, मूलभूत सोयीसुविधा ज्या दिवशी विनासायास, निष्पक्षपणे साध्य होतील, तेव्हाच इथे खऱ्या अर्थाने ‘रामराज्य’ आले असे म्हणता येईल. त्याला किती वाट पाहावी लागते, हे श्रीप्रभू रामाशिवाय कोण बरे सांगू शकेल?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

22 महिन्यांच्या मंत्रिपदानंतर बुधवारी संध्याकाळी सिक्वेरा; गुरुवारी सकाळी सभापती तवडकर देणार राजीनामा तर, कामतांना CM सावंतांकडून मिळाली हिंट

Rekha Gupta Attack: दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्तांच्या 35 वर्षीय व्यक्तीने मारली कानाखाली? हल्लेखोराचा चेहरा समोर, आतिषीनी केला निषेध

Bicholim: चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर, गोव्यातील 'या' मार्गावर वाहनांना बंदी; जाणून घ्या पर्यायी व्यवस्था

Porvorim Roads: 'त्या' रस्त्याची चांगली 'पर्वरी'श झाली नाही; निवासी आणि प्रवासी संतप्त

Horoscope: प्रमोशन मिळणार, व्यापार वाढणार; कसा असणार 21 ऑगस्टचा दिवस; वाचा..

SCROLL FOR NEXT