Police Attacks Goa Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Police Attacks Goa: सामान्यांसाठी पोलिसी खाक्या, माफियांसमोर हुजरेगिरी; बेतूल, वास्कोत 'सिंघम'वर झालेले हल्ले

Gangwar in Goa: पोलिस फक्त गणवेशातील अधिकारी नाही तर तो न्यायाचा प्रहरी आहे, हा मूलभूत संदेश विसरल्यामुळेच मार खाण्याची वेळ पोलिसांवर आली आहे. जे पेरले तेच उगवते आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पोलिसांच्या गाडीवरील दिव्याचा सामान्यांना धाक वाटतो; कारण त्यामागे भक्कम राजदंड असतो. मात्र, राजदंडाचे जेव्हा बाहुले बनते, तेव्हा स्वत:च्या अधिकारांचे रक्षणही आव्हानात्मक बनते. गोव्यात तेच घडते आहे. दक्षिण गोव्यात उफाळून आलेले गँगवॉर आणि बेतुलनंतर वास्कोत पोलिसांना झालेली मारहाण रसातळाला गेलेल्या कायदा सुव्यवस्थेचे फळ समजावे.

ज्यांनी समाजाचे रक्षण करावे, त्यांच्याच सुरक्षेचा निर्माण झालेला प्रश्न व्यवस्थेच्या षंढपणाचा पंचनामा ठरतो. (अर्थात एखादा राजकीय पुढारी ह्यातही सकारात्मकता शोधू शकतो. शांती, सेवा, न्यायासाठी सामान्यांनी ‘आत्मनिर्भर’ बनावे, असा कुणी सल्ला दिल्यास बिलकूल आश्चर्य वाटणार नाही.)

सार्वजनिक जागी मद्यपान करण्यास अटकाव केल्याने बेतुल येथे कामगारांनी पोलिसांना लाथाबुक्यांनी तुडवले, दगडांनी मारले; वास्कोत मध्यरात्री भर रस्त्यात नशापान करून धुमाकूळ घालणाऱ्या तरुणांना हटकल्याने ‘ते’ पोलिसांना बदडतात, हे ऐकून, पाहून सुहृदयींची मने हेलावतात.

वास्‍तविक, पोलिसांनी मोकळीक दिल्यानेच मद्यासुर, गावगुंड सोकावलेत. विधानसभेत घोषणा होतात, सार्वजनिक जागी मद्यपान गुन्हा आहे; पण शिक्षा खुलेआम पिणाऱ्याला होत नाही, समाज भोगतो.

आज सुपातील पोलिस जात्यात आल्याने आगळीक ठरली. गैरकृत्ये करून वर पोलिसांवर हात उचलण्याची प्रवृत्ती बळावण्यास पोलिसांची मलिन प्रतिमाच कारणीभूत आहे. म्हणूनच असे प्रकार घडतात तेव्हा पोलिसांचीच ‘खोट’ असावी, असा प्रथमदर्शनी संशय उत्पन्न होतो.

आसगावात पोलिसांचा खासगी बाउन्सरप्रमाणे वापर करणाऱ्या पोलिस महासंचालक जसपाल सिंग यांना अक्षरशः दिल्लीत हाकलावे लागले. त्यांच्या जागी वर्षापूर्वी गोव्यात दाखल झालेले आलोक कुमार ‘कार्यरत’ आहेत, याची जाणीवही कधी होत नाही आणि त्याचमुळे उणीवही भासत नाही.

गोव्यात कायदा सुव्यवस्था राखण्याचे दायित्व त्यांच्या कृतीतून अथवा देहबोलीतून दिसत नाही. मुंगूल येथील गँगवॉर उजेडात आल्यानंतर पाच ते सहा दिवसांनी आलोक कुमार दक्षिण गोव्यात गेले. ‘गुन्हेगारांची गय करणार नाही’, असे गुळमुळीत वक्‍तव्‍य त्‍यांनी केले.

मग गुंडपुंड छाताडावर नाचल्यास नवल ते काय! पोलिसी खाक्या सामान्यांसाठी वापरला जातो. माफियांसमोर हुजरेगिरीच चालते. पोलिस राजकीय व्यवस्थेची प्यादी बनलेत. पैसे देऊन, मंत्री, आमदारांच्या वशिल्याने सेवेत दाखल झालेले सरकारी गुंड बनतात.

अशा प्रवृत्तीचे दीड वर्षात २२हून अधिक पोलिस निलंबित झालेत. अशाने निष्ठावान कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या नियतीवरही शंका व्‍यक्‍त होते. सामान्य माणसाची अडवणूक करण्यासाठी व गुंड, पैसेवाले यांची सोडवणूक करण्यासाठी नियम वापरले जातात, तेव्हा पोलिसांबद्दल आत्मीयता नाहीशी होते. गुंड व पोलिस यांच्यातला भेदच नष्ट होतो, तेव्हा सामान्य माणसाचा व्यवस्थेवरचा विश्वासच उडतो.

पोलिस खात्याविषयी गोमंतकीयांनी नेहमीच आदर बाळगला आहे. तो वृद्धिंगत होण्याऐवजी लोप का पावतो आहे, ह्याचा पोलिसांनी आता विचार करावा. प्रश्न दलाच्या लज्जेचा आहे. अन्यथा उद्या कोणीही उठेल, मारायला धावेल!

२०११साली अजय देवगणने साकारलेल्या ‘बाजीराव सिंघम’ने पोलिसांच्या मनाचा ठाव घेतला. पणजीतील ‘आयनॉक्स’मध्ये पोलिसांसाठी खास सिनेमाचे खेळ लावण्यात आले होते. ‘सिंघम’ केवळ चित्रपटसृष्टीपुरता मर्यादित नव्हता, त्याने समाजाच्या मनात पोलिसांची सकारात्मक प्रतिमा उभी केली.

गुन्हेगारी, राजकीय हस्तक्षेप आणि भ्रष्टाचारात सापडलेला पोलिस फक्त गणवेशातील अधिकारी नाही तर तो न्यायाचा प्रहरी आहे, हा मूलभूत संदेश सिंघमने दिला. दुर्दैवाने ‘जयकांत शिक्रे’सारखे दुर्जन पोलिसांनी पोसलेत. पूर्वी सिनेमाच्या शेवटी, हिरोने गुंडांना बदडल्यानंतर पोलिस आलेले हटकून दाखवले जायचे.

आता तोही आदर दिला जात नाही. गरज आहे पोलिसांनी स्वत:स बदलण्याची. आत्मपरीक्षण केले तरच बदल घडू शकतील. झालेल्‍या मारहाणीचा खेद आहेच; पण ती व्यवस्थेच्या गाली हाणलेली सणसणीत चपराक आहे. आता तरी जागे व्हा. सामान्यांना आदर व गुंडांना भय वाटेल, असे वर्तन ठेवा. जनतेला सुरक्षितता आणि विश्वास देणे हेच पोलिसांचे खरे काम आहे, मार खाणे नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

MRF Recruitment Controversy: एमआरएफ नोकरभरतीत नवा ट्वीस्ट! कुडाळमधील भरती खरीच, मनसेच्या जिल्हाध्यक्षांनी थेट पुरावाच केला सादर

Goa BJP Post: श्रीलंका, बांगलादेश, पाक & नेपाळमध्ये अस्थिरता पण मोदींच्या नेतृत्वात भारत खंबीर; गोवा भाजपची पोस्ट चर्चेत

Viral Video: 10 वर्षात त्यांना कॅन्सर होऊ शकतो पण, सरकारला फक्त वाहनांचा धोका मोठा वाटतोय; झुआरीनगरातील अमोनिया समस्येवरुन तरुण संतापला

World Cup 2025: 148 वर्षांत पहिल्यांदाच…! ICC ने उचलले महिलांच्या सन्मानाचे पाऊल, घेतला 'हा' मोठा निर्णय

Goa Crime: हैदराबादमधील युवकाला मैत्रीच्या बहाण्याने लुटले, पणजीतील हॉटेलात 5.7 लाखांचा गंडा; संशयितांना अटक

SCROLL FOR NEXT