डॉ. नाऊ वरक
गोव्याचा प्रादेशिक आराखडा व विकास आराखडे तयार करण्यासाठी १९७५ मध्ये गोवा, दमण आणि दीव नगर नियोजन कायदा संमत झाला. १९९२ मध्ये गॅम्बलिंग कायद्यात बदल करून कॅसिनोंना परवानगी दिली. आज मांडवी नदीत सहा कॅसिनो तरंगताना दिसतात. वॉल्टर बॅजेट यांच्या तर्काप्रमाणे गोव्यातील हा बदल एकट्या राज्यव्यस्थेने केलेला नसून हे भौतिकशास्त्रातील विकासाचे प्रतिबिंब आहे.
गोव्याला घटकराज्य हा दर्जा मिळाल्यापासून गोव्यात अतोनात भौतिक बदल झाल्याचे बोलले जाते. पोर्तुगीज गोवा, मुक्तीनंतरचा गोवा आणि आत्ताचा गोवा यामध्ये तुलना केली जाते. अशावेळी वॉल्टर बॅजेट यांच्या १८७२ साली प्रकाशित झालेल्या ‘फिजिक्स अँड पॉलिटिक्स’ या पुस्तकाची आठवण येते. ‘१९व्या शतकाच्या उत्तरार्धात भौतिक जगाविषयीच्या ज्ञानात अचानक वाढ झाली आहे’, या ओळीने पुस्तकाची सुरुवात होते. त्यांच्या मते भौतिकशास्रात अचानक विकसित झालेल्या ज्ञान आणि संशोधनाचा राज्य आणि शासनप्रणालींवर दूरगामी परिणाम झाला.
सर आयझॅक न्यूटन यांनी आपल्या ‘ऑप्टिक्स’ मध्ये अणु (ॲटम) हा पदार्थातील अविभाज्य व दैवी कण असतो, असा सिद्धांत अठराव्या शतकाच्या सुरुवातीस मांडला होता. भौतिकशास्त्र येथे थांबले नाही. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात अँत्वान लाव्हॉझिए यांनी पदार्थाचे वस्तुमान रासायनिक प्रक्रियांवेळी उत्पन्नही करता येत नाही किंवा नष्टही करता येत नाही, असे म्हटले. रासायनिक संयुगे नेहमी वस्तूच्या ठराविक समान प्रमाणातच एकत्र येतात, असे मत जोसेफ लुई प्रूस्त यांनी मांडले. १९ व्या शतकाच्या सुरुवातीस जॉन डाल्टन यांनी ‘मूलद्रव्ये ही समान वैशिष्ट्यपूर्ण वस्तुमानाच्या अविभाज्य अणूंनी बनलेली असतात आणि हे अणू रासायनिक संयुगे तयार करण्यासाठी साध्या पूर्णांक गुणोत्तरात एकत्र येतात’ हा नवीन अणुसिद्धांत मांडला.
यातूनच पुढे मॅक्स प्लांक यांच्या संशोधनातून क्वांटम सिद्धांताचा शोध लागला. या सिद्धांतानुसार मूलद्रव्यातील अणू, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, फोटॉन अशा अतिसुक्ष्म कणांचे वर्तन आणि त्यांच्यातील विविध पातळ्यांवरील ऊर्जा-विनिमय समजून घेता येतो. याच काळात आईन्स्टाईन यांनी सापेक्षतावादाचा सिद्धांत लावला. भौतिकशास्त्रातील क्रांतीमुळे उद्योगक्षेत्रात अमूलाग्र बदल झाले. अर्थव्यवस्थांचा कायापालट झाला. मात्र, राज्यव्यवस्थांमध्ये भौतिकशास्त्राप्रमाणे बदल झालेले दिसत नाहीत. शासन आणि नागरिक यांमधील संबंधांना क्वांटम किंवा रिलेटिव्हिटीचा सिद्धांत लागू पडत नाही. आजही शासन हे न्यूटनच्या अणू सिद्धांताप्रमाणे कार्यरत असते. आधुनिक भौतिकशास्त्राने मान्य केले की, अणू विभाज्य आहे.
राज्यव्यवस्था मात्र सर्व नागरिकांना एकाच तराजूत मापते. शासन व इतर विविध घटकांमधील ऊर्जा विनिमय हा क्वांटमच्या सिद्धांताप्रमाणे हाताळण्याची गरज आहे. आधुनिक राज्यव्यवस्था नागरिकांत एकरूपता आणण्याचा प्रयत्न करतात. भौतिकशास्त्र एकरूपतेवर (युनिफॉर्मिटी) अवलंबून नाही. राज्यवस्थेतील विविध अणूंचा (ॲटम) म्हणजेच महत्वाच्या घटकांचा शोध घेऊन त्यांच्या स्वरूप व व्याप्तीचा अभ्यास करणे गरजेचे आहे. नागरिकांचे अधिकार व कर्तव्ये कडक नियमांमध्ये बंदिस्त करणे हे जगातील कोणत्याच वैज्ञानिक सिद्धांतात बसत नाही. उपजत मानवी कल्पना या भौतिकशास्त्रातील इलेक्ट्रॉनप्रमाणे असतात. बौद्धिक प्रबोधन ही भौतिक प्रक्रिया आहे.
बऱ्याचदा उपजत कल्पनांना समजून न घेता समाजात एक कृत्रिम नैतिक संरचना तयार केली जाते. जे लोक अशी कृत्रिम व्यवस्था स्वीकारतात ते अवैज्ञानिक व अनैसर्गिक जीवन जगू लागतात. गोव्याच्या इतिहासाकडे भौतिकशास्त्र दृष्टिकोनातून पाहिले गेले नाही. पोर्तुगीज काळात जमिनींचे संहितीकरण करून सामान्य जनता आणि जमीन यांना विभक्त केले गेले. भौतिक वास्तव आणि सामान्य लोक परस्पर वेगळे झाले. २०व्या शतकाच्या पूर्वार्धात भूवैज्ञानिक अन्वेषणामुळे गोव्यातील खाणक्षेत्रे निश्चित करण्यास मदत झाली. १९६१ नंतर खाणउद्योगाचा विकास झाला. मात्र राज्यव्यवस्थेने विज्ञानाच्या नियमांचे पालन केले नाही.
सर्वोच्च न्यायालयाने २०१२ मध्ये गोव्यातील खनिज व्यवसाय अवैध ठरविला. ज्यावेळी राज्यव्यवस्था विज्ञान धाब्यावर बसवून सत्तेच्या जोरावर निर्णय घेते, त्यावेळी अर्थव्यवस्था कोलमडते. राजकीय सत्ता आणि राजकीय ऊर्जा या भिन्न संकल्पना आहे. राजकीय सत्ता राजकीय उर्जेला नष्ट करू शकत नाही. राजकीय उर्जेला भौतिकशास्त्राचे नियम लागू पडतात. सार्वजनिक सोयीसुविधांसाठी भू-अधिग्रहण कायदा १८९४ नुसार गोवा, दमण आणि दीव सरकार जमिनी संपादन करू लागले. गोव्याचा प्रादेशिक आराखडा व विकास आराखडे तयार करण्यासाठी १९७५ मध्ये गोवा, दमण आणि दीव नगर नियोजन कायदा संमत झाला.
१९९२ मध्ये गॅम्बलिंग कायद्यात बदल करून कॅसिनोंना परवानगी दिली. आज मांडवीत सहा कॅसिनो तरंगताना दिसतात. वॉल्टर बॅजेट यांच्या तर्काप्रमाणे गोव्यातील हा बदल एकट्या राज्यव्यस्थेने केलेला नसून हे भौतिकशास्त्रातील विकासाचे प्रतिबिंब आहे. मात्र, भौतिकशास्त्राच्या नियमांप्रमाणे लोकप्रशासन बऱ्याचदा काम करत नाही. राज्यव्यस्थेने नागरिक, शासन, नैसर्गिक स्त्रोत यांची उपअणुकणीय (सबॲटोमिक) प्रणाली निर्माण केली पाहिजे. राज्यव्यवस्थेच्या उपअणूकणीय प्रणालीमधील अंतर, विस्थापन, वेग, प्रवेग आणि संवेग या घटकांचा भौतिकीय अभ्यास केल्यास लोकशाहीस उपकारक विकास करता येईल. गोव्याच्या भविष्यासाठी गोव्याचे भौतिकशास्त्र व राज्यशास्त्र समजून घेतले पाहिजे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.