Goa Opinion Poll Dainik Gomantk
गोंयकाराचें मत

सालाझारने गोवा हा पोर्तुगालचाच एक ‘ऑफशोर’ प्रांत आहे अशी उठवलेली आवईही कुठल्याही तणावाशिवाय आपण पचवली; ओपिनियन पोलचे कवित्व

Goa Asmitai Dis: गोव्यातल्या पारंपरिक सत्तांध वर्गाला आपल्या भूतकाळातील पापांतून मुक्त करणारा एक ‘परफेक्ट व्हिलन’ सापडला.

गोमन्तक डिजिटल टीम

कौस्तुभ नाईक

सोळा जानेवारी आला की गोव्यात अनेकांना ‘ओपिनियन पोल’च्या आठवणींचे उमाळे येतात आणि गोव्याची ‘अस्मिताय’ कशी सांभाळून ठेवली ह्यावर ते सद्गदित होत असतात. यंदा जनमत कौलाची साठ वर्षे म्हणून अनेकांना फुटू नये तेवढा कंठ फुटला होता. ह्या सर्व विलापाचा एकच सूर - गोव्याचे महाराष्ट्रात विलीनीकरण होणे ही गोव्याच्या इतिहासातली सर्वांत धोकादायक घटना होती आणि ती जनमत कौलामुळे टळली!

म्हाळ पै वेर्णेकरने आपल्या धंद्याच्या फायद्यासाठी जेव्हा अल्बुकर्कला गोव्यात बोलावले आणि पोर्तुगिजांचे राज्य समस्त गोव्याच्या माथी मारले ते गोव्यासाठी धोक्याचे नव्हते.

नव्या काबिजादीत देसकत भोगणाऱ्यांनी जेव्हा इश्तादोच्या आजन्म सेवेची शपथ घेतली तेव्हाही गोव्याची अस्मिता डगमगली नाही. इतकेच का, गेला बाजार सालाझारने गोवा हा पोर्तुगालचाच एक ‘ऑफशोर’ प्रांत आहे अशी उठवलेली आवईही कुठल्याही तणावाशिवाय आपण पचवली. पण गोमंतकीय समाजाला महाराष्ट्रात विलीनीकरणाच्या कल्पनेने एवढी का धास्ती भरावी हा यक्षप्रश्न उरतोच.

विलीनीकरणाच्या ह्या नतद्रष्ट संकल्पनेचा मुख्य आरोपी कोण तर भाऊसाहेब बांदोडकर, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष, आणि साहजिकच ज्या ४४ टक्के लोकांनी विलीनीकरणाच्या बाजूने मतदान केले ते लोक. हे गोव्याचे खरे दुश्मन!

४४ टक्के म्हणजे काही महत्त्व देण्याइतका आकडा नसावा. गोव्यातल्या काही टक्का असलेल्या उच्चभ्रू वर्गाला आपल्या हातून सत्ता निसटून जाईल ही चिंता गोव्यातील सुमारे अर्ध्या जनतेच्या कौलापेक्षाही महत्त्वाची आहे हे आपण विसरता कामा नये.

भले महात्मा गांधींनी बाकीबाब बोरकरांना गोव्यातील साडेचार लाख लोकांनी पोर्तुगिजांची सत्ता नको असेल तर मुंबईत येऊन स्थायिक व्हावे असे सुचवले असेल, किंवा विलीनीकरणाचा एकूण मुद्दा हा बांदोडकरांच्याही आधी सुरू झाला असेल,

विलीनीकरणाला अगदी उंबरठ्यावर आणून ठेवणारे एकटे बांदोडकरांनाच ह्या पापाचे भागीदार ठरवणे सोयीस्कर आहे. ह्या विलापिकेचा एकूण अर्क काढल्यावर लक्षात येते की खरे तर गोव्यातील उच्चवर्णीयांनी बांदोडकरांचे आभारच मानले पाहिजेत.

बांदोडकर हे स्वतंत्र गोमंतकातील एक सोयीचे खलनायक आहेत ज्यांच्यामुळे पोर्तुगिजांशी सलोखा ठेवणाऱ्या समूहांना आज देशभक्त म्हणून मिरवता येते. इतिहासाची संपूर्ण नैतिक जबाबदारी विलीनीकरणावर एकवटून हे समूह पोर्तुगीज राजवटीत आपण शतकानुशतके जे फायदे लुटले त्यावरून लोकांचे लक्ष अत्यंत चलाखीने विचलित करू शकतात.

गोवा विलीन करायला निघालेले बांदोडकर जर ‘गद्दार’ असतील, तर ज्यांनी निष्ठेने पोर्तुगिजांची चाकरी केली ते आपोआप गोव्याचे ‘रक्षक’ ठरतात. त्यांना पोर्तुगीज राजवटीतल्या त्यांच्या सहभागाचे किंवा लाटलेल्या फायद्यांचे प्रायश्चित्त घेण्याची गरज उरत नाही.

त्यांनी फक्त बांदोडकरांकडे व मगोकडे बोट दाखवून ‘अस्मितायेचेर संकट’ म्हणून ओरडा करायचा. बांदोडकर हा एक अंधार आहे, ज्यामुळे यांचा डागाळलेला इतिहास प्रकाशासारखा उजळून निघतो. दुर्दैवाने बांदोडकरांनी ज्या वर्गाचा उद्धार करण्याचा प्रयत्न केला, त्या वर्गाच्या पिढीजात मौनामुळे ही मांडणी करणे उच्चवर्णीयांना अधिकच सोपे झाले आहे.

विषमतेच्या विळख्यातून ज्या बहुजन समाजाला त्यांनी बाहेर काढले, त्या समाजाने बांदोडकरांचा कोणताही भक्कम असा वैचारिक किंवा सार्वजनिक वारसा उभा केला नाही. त्यांच्या कूळ कायद्याचे लाभार्थी कदाचित त्यांच्या प्रलंबित मुंडकारी खटल्यात इतके व्यग्र आहेत की त्यांना या अस्मितेच्या सांस्कृतिक युद्धात उतरायला वेळच नसावा.

अशा प्रतिवादाचा अभाव असल्यानेच बांदोडकरांचे ‘खलनायकीकरण’ करणे अत्यंत सोपे जाते. यामुळे उच्चभ्रूंना आपसूक इतिहास कथनाची मक्तेदारी मिळते. ज्या माणसाने बहुजनांसाठी शाळा उघडल्या तो गद्दार आणि जे त्या शाळांचे दरवाजे इतरांसाठी अडवून बसले होते ते मात्र ‘अस्मितायेचे रक्षक’ म्हणून सन्मान मिळवतात.

आता कोणी हा प्रश्न विचारू नये की ही जपलेली तथाकथित ‘अस्मिता’ कुणासाठी होती? ज्या लोकांनी भाटकारांच्या अंगठ्याखाली राहण्यापेक्षा पारंपरिक सत्तेची गणिते कोलमडून पाडणाऱ्या एका नवीन राजकीय चौकटीची निवड केली त्या लोकांना ह्या ‘अस्मिताये’त स्थान आहे का?

आपण फक्त आभार मानले पाहिजेत की गोव्यातल्या पारंपरिक सत्तांध वर्गाला आपल्या भूतकाळातील पापांतून मुक्त करणारा एक ‘परफेक्ट व्हिलन’ सापडला आणि त्यांनी गोव्याला लोकशाही मार्गाने येऊ घातलेल्या समानतेच्या भयंकर संकटापासून वाचवले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

पालकांनो, मुलांच्या हाती फोन देताय? त्याआधी ऑन करा 'या' 5 सेटिंग्ज, अश्लील कंटेंटला बसेल कायमचा लगाम

VIDEO: 'मला वाटलं होतं खूप घाण असेल, पण...' भारतीय रेल्वेच्या प्रवासाने विदेशी तरुणी भारावली; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

IPL 2025: RCB फॅन्ससाठी मोठी बातमी! चिन्नास्वामी स्टेडियमवर सामने होणार की नाही? कर्नाटक सरकारने घेतला 'हा' मोठा निर्णय

Goan Solkadhi: गोंयकाराची पहाटेची स्वप्नं दाट गुलाबी असतात, कारण त्यात 'सोलकढी'तल्या सोलाचा गडद रंग आणि नारळाच्या रसातला दाटपणा असतो..

तेंव्हा इकडे स्वतंत्र भारत, तर तिकडे गोवा होता! याबाजूला भारतीय जवान तर तिकडे पाकल्यांचे ‘सोजीर’ बंदुका घेऊन ताठ उभे होते..

SCROLL FOR NEXT