गोव्याची ओळख नेहमीच त्याच्या निसर्गरम्यतेशी जोडली गेली आहे. समुद्रकिनारे, जंगले, खारफुटी आणि धबधबे हे केवळ पर्यावरणीय संपत्ती नाही, तर पर्यटन आणि स्थानिक जीवनाचा महत्त्वाचा भाग आहेत.
परंतु आता या ठिकाणी एक नवी समस्या अवतरू लागली आहे, ती म्हणजे- कचरा! आता कचरा फक्त शहरांमध्ये किंवा रस्त्यावरील कचरापेट्यांभोवती मर्यादित राहिलेला नाही.
तो ट्रेकिंगच्या मार्गांवर, धबधब्यांच्या परिसरात, खारफुटीच्या जंगलात आणि किनारपट्टीवरही वाढत्या प्रमाणात दिसत आहे. पर्यटकांनी किंवा वसाहतींमध्ये टाकलेला कचरा वारा, पावसाचे पाणी आणि मानवी उपस्थितीमुळे दूरवरच्या नाजूक परिसंस्थांमध्ये पोहोचू लागला आहे.
या भागात नियमितपणे जाणाऱ्या लोकांना हा बदल स्पष्टपणे दिसतो. ‘ईको ट्रॅक्स- गोवा’च्या आरती दास, ज्या नियमितपणे जंगलात ट्रेक्सचे (पदभ्रमण) आयोजन करतात, त्या म्हणतात, “ट्रेकिंग करताना आम्ही अनेकदा मार्गावर पडलेला कचरा परत आणतो.
आम्ही ट्रेकर्सना स्वतःचे कप आणि प्लेट्स आणण्यास सांगतो, जे फेकून देण्यासारखे नसतात. त्यामुळे कचरा कमी होतो आणि पर्यावरणपूरक ट्रेकिंगची सवयही लागते.” काही गट पर्यटकांनी टाकलेला कचरा साफ करण्यासाठी ‘क्लीन-अप ट्रेक्स’ देखील आयोजित करतात.
दास म्हणतात, की ‘हे प्रयत्न मर्यादित असतात. नेहमीच कचरा गोळा करणे शक्य नसते. खरे तर पर्यावरणाबद्दल जागरूकता वाढणे गरजेचे आहे. ट्रेकर्स आणि पर्यटकांनी स्वतःच्या बाटल्या, प्लेट्स आणि कप वापरावेत आणि अविघटनशील वस्तू टाळाव्यात.’
वन्यजीव बचावकर्ते म्हणतात, की कचरा प्राण्यांसाठी गंभीर धोकादायक ठरू शकतो. जंगलात टाकून दिलेल्या कचऱ्याला प्राणी अन्न समजतात. देसाई यांच्या मते, अन्नाचा कचरा उंदरांना आकर्षित करतो आणि त्यांच्या वासामुळे साप प्लास्टिक किंवा धातूच्या वस्तू गिळतात.
‘सेव्ह गोवा’चे श्रीचरण देसाई हे जंगल भागात बचाव मोहिमा आयोजित करत असतात. ते सांगतात, की जंगलातील कचऱ्यात अनेकदा प्राणी अडकलेले किंवा जखमी अवस्थेत दिसतात. ते म्हणतात, ‘जंगलात निष्काळजीपणे टाकलेल्या कचऱ्यामुळे काहीवेळा सापांचे तोंड बिअरच्या कॅनमध्ये अडकलेले तसेच कुत्र्यांचे डोके प्लास्टिकच्या बरणीत अडकलेले आम्ही पाहिले आहे. घोरपडसुद्धा प्लास्टिक कंटेनरमध्ये अडकलेली आम्हाला आढळली आहे.’
पर्यटनामुळे गोव्यातील सुंदर भागांवर दबाव वाढला आहे. गोव्यात दरवर्षी एक कोटीहून अधिक पर्यटक येतात, जी संख्या राज्याच्या लोकसंख्येपेक्षा खूप जास्त आहे.
बाटलीबंद पेये, स्नॅक्स पॅकेट्स यांसारख्या पॅकेजिंग वस्तूंचा वापर वाढल्याने सार्वजनिक ठिकाणी कचऱ्याचे प्रमाणही वाढले आहे. पर्यावरण अभ्यासकांच्या मते, लोकांच्या वर्तनात बदल घडविण्यासाठी कचऱ्यालाच ‘मूल्य’ देणे आवश्यक आहे. जेव्हा कचरा परत देऊन मोबदला मिळवला जातो, तेव्हा तो जंगलात, ट्रेकिंग मार्गांवर किंवा धबधब्यांच्या परिसरात टाकण्याची शक्यता कमी होऊ शकते.
‘ऑफ ट्रेल ॲडव्हेन्चर्स’च्या संस्थापक बियांका डायस यांच्या मते, समस्या फक्त कचऱ्याची नाही, तर निसर्गरम्य ठिकाणी वाढणाऱ्या गर्दीचीही आहे. त्या म्हणतात, “माझ्या मते फक्त कचरा नाही, तर या सुंदर ठिकाणी जबाबदारी न बाळगता जमणारी गर्दी ही मोठी समस्या आहे. माझ्यासाठी जंगल हे उपासनेचे ठिकाण आहे आणि धबधबे ध्यान करण्याच्या जागा आहेत.”
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.