Sudin Dhavalikar MGP statement Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Goa Politics: मगो पक्षाला ‘आप’ किंवा ‘आरजी’ने नव्हे, तर स्वकीयांच्या धोरणांनीच रोखले; ढवळीकरांच्या वक्तव्यानंतर पक्षाच्या पडझडीच्या कारणांचा जाहीर पंचनामा

Sudin Dhavalikar MGP statement: मगो पक्षाला रोखण्याकरता गोव्यात आम आदमी व आरजीला आणण्यात आले’, अशा प्रकारचे वक्तव्य वीजमंत्री तथा मगो पक्षाचे सर्वेसर्वा सुदिन ढवळीकर यांनी नुकतेच केले आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

मिलिंद म्हाडगुत

मगो पक्षाला रोखण्याकरता गोव्यात आम आदमी व आरजीला आणण्यात आले’, अशा प्रकारचे वक्तव्य वीजमंत्री तथा मगो पक्षाचे सर्वेसर्वा सुदिन ढवळीकर यांनी नुकतेच केले आहे. आरजीमध्ये सध्या सुरू असलेल्या संघर्षावर बोलताना त्यांनी आपवरही तोंडसुख घेतले. पण आप म्हणा वा आरजी म्हणा मगोला रोखू शकतात की काय, हाच मोठा प्रश्न आहे.

मगो पक्ष हा एकेकाळचा गोव्यातील सर्वात मोठा स्थानिक पक्ष. मग त्याची पडझड का झाली, याचे उत्तर प्रथम शोधावे लागेल. आणि त्याकरता १९९४सालात डोकावावे लागेल. तेव्हा भाजप हा पक्ष कोणाच्याच खिजगणतीत नव्हता. पण रवि नाईकांनी कॉंग्रेसमध्ये जाऊन आपले मुख्यमंत्रिपद हिरावून घेतले म्हणून दुखावलेल्या मगोचे तत्कालीन सर्वेसर्वा रमाकांत खलप यांनी भाजपशी युती केली. पण या युतीचा फायदा मगोपेक्षा भाजपलाच अधिक झाला. युतीचे मुख्यमंत्री म्हणून ज्यांना प्रोजेक्ट करण्यात आले होते ते खलपच मांद्र्यात पराभूत झाले.

त्यावेळी भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी फोंड्यात केलेला जल्लोष मला अजूनही आठवतो. त्यावेळी भाजपचे जरी चारच आमदार निवडून आलेले असले तरी त्यांनी - खास करून मनोहर पर्रीकरांनी - हातपाय पसरवायला सुरुवात केली. त्याचे फळ म्हणून १९९९साली भाजपचे चाराचे दहा आमदार झाले. मगोचा मात्र उलटा प्रवाह सुरू झाला. ९४साली बारा आमदार असलेला मगो, ९९ साली चार आमदारांवर येऊन धडकला. आणि तिथून मगोची जी पडझड सुरू झाली ती आजही कायम आहे.

सध्या मगोची भाजपबरोबर युती असल्यामुळे त्यांना सरकारच्या प्रत्येक निर्णयाला - मग, तो पटो वा न पटो - ‘मम’ म्हणावे लागत आहे. त्यामुळे पक्षाची वाढच खुंटल्यासारखी झाली आहे. आणि याच कारणाकरता युवक या पक्षाकडे पाठ फिरवताना दिसत आहेत. मगो सरकारचा घटक असल्यामुळे मगोपेक्षा भाजपकडे जाणे बरे अशी विचारसरणी अनेक युवक व्यक्त करायला लागले आहेत. नुकत्याच दिवंगत झालेल्या डॉ. केतन भाटीकर यांचेच उदाहरण घ्या.

एकेकाळी मगोचे निष्ठावंत पाईक असलेल्या भाटीकरांना कॉंग्रेसमध्ये जाण्याची वेळ का यावी, हा प्रश्न त्यावेळी अनेकांना पडला होता. पण मगो भाजपचा घटक असल्यामुळे आणि फोंडा मतदारसंघ भाजपला जाणार असल्यामुळे भाटीकरांना रद्द झालेल्या पोटनिवडणुकीत उमेदवारीकरता कॉंग्रेसचा आधार घ्यावा लागला हे यामागचे कारण नंतर स्पष्ट झाले. ती त्यांची चूक होती, असे कुणीही म्हणणार नाही.

लक्षात घ्या, २०२२साली भाटीकरांना ७४३७ मते प्राप्त झाली होती आणि त्यांचा केवळ ७७ मतांनी पराभव झाला होता. त्यामुळे त्यांना आणखी एक संधी मिळणे आवश्यक होते. पण युतीत असल्यामुळे मगो त्यांना ती संधी देऊ शकला नाही आणि त्याचा परिणाम त्यांच्या कॉंग्रेसगमनात झाला. पण यामुळे मगोला एक जबरदस्त ताकदीचा युवा नेता गमवावा लागला या कटू सत्याकडे दुर्लक्ष करता येत नाही. एखाद्या मोठ्या वृक्षाच्या आवरणाखाली असलेल्या छोट्या झाडाची वाढ जशी खुंटते तसे मगोचे व्हायला लागले आहे.

याबाबत, ‘मगो संपल्याशिवाय भाजप गोव्यात प्रगतिपथावर येऊ शकणार नाही’ असे जे भाजपच्या एका नेत्याने काही वर्षांपूर्वी उद्गार काढले होते, ते आजही आठवतात. आणि ते उद्गार आज तंतोतंत खरे ठरताना दिसत आहेत. आज भाजप ’लार्जर दॅन लाइफ’ पक्ष बनला असून मगो दोन-तीन जागाच्या कुंपणात अडकलेला बघायला मिळत आहे. यातूनच मगोला कोण रोखतो वा कोणी रोखले हे प्रतीत होत आहे. यात आरजी वा आपचा कुठेही संबंध येतो, असे दिसत नाही.

आरजीला भवितव्य नाही, असे म्हणणेही चुकीचे ठरू शकते. आरजी हा सुप्त शक्ती असलेला पक्ष. गेल्या निवडणुकीत या पक्षाला दहा टक्के मते मिळाली ती याच शक्तीवर. त्यामुळे मनोज परब वा अन्य कोणी नेता पक्ष सोडून गेला म्हणून या सुप्त शक्तीत फरक पडेल असे सध्या तरी वाटत नाही. अर्थात जे काय आहे ते आगामी निवडणुकीत स्पष्ट होईलच म्हणा.

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या इशाऱ्यावर नाचणाऱ्या आपबाबतही हेच म्हणता येऊ शकेल. शेवटी, नवे पक्ष येणे ही काळाची गरज असते. जुने पक्ष ज्येष्ठ नागरिकांचे पक्ष होत चालल्यामुळे सळसळत्या रक्ताच्या युवकांचे पक्ष अस्तित्वात येणे हेही तेवढेच महत्त्वाचे असते. आरजी वा आप काटे ठरू शकतात ते कॉंग्रेस पक्षाकरता भाजप वा मगो करता नव्हे, हेही तेवढेच खरे आहे. म्हणूनच मगोला जर कोण रोखत असेल तर ‘स्वतःची ओळख पुसट करण्याचे त्यांचे धोरण’, असेच म्हणावे लागेल हेच खरे!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

''वैभव सूर्यवंशी-अभिषेक शर्मा जोडी टीम इंडियाचे लॉन्ग टर्म ओपनर असू शकत नाहीत...'' माजी क्रिकेटपटूचं मोठं वक्तव्य

Prison Gang War: जेलमध्ये 'हिंसेचा तांडव'! कैद्यांच्या हल्ल्यात 4 सुरक्षा रक्षकांसह 23 जणांचा मृत्यू; ड्रग्ज कनेक्शन आले समोर

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदच! एनआयएने बनवले मुख्य आरोपी; विशेष न्यायालयात चार्जशीट दाखल

IND vs ENG: Playing XI मध्ये मोठा ट्विस्ट! 'या' स्टार खेळाडूला बसावं लागणार बाकावर? इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 साठी टीम इंडियाचा मोठा निर्णय

"आम्हाला भारतात यायचंय!" POK च्या नेत्यांनी मोदी सरकारकडे मागितली मदत, एलओसी उघडण्याची केली मागणी; पाकड्यांना झटका

SCROLL FOR NEXT