मिलिंद म्हाडगुत
‘मगो’ने जर खरेच ‘एकला चलो रे’च्या दिशेने कुच करायला सुरुवात केली तर नुकसान भाजपचे होणार हे निश्चित आहे. युती न झाल्यास भाजपच्या हातातून चार ते पाच मतदारसंघ जाऊ शकतात, असा राजकीय विश्लेषकांचा होरा आहे. ‘मगो’जवळ मात्र गमावण्यासारखे काहीही नाही.
गोवा राज्याच्या विधानसभा निवडणुका आता अवघ्या अडीच महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. पण असे असून सुद्धा अजूनही काही प्रश्न अधांतरीच लोंबकळताना दिसत आहे. यातला एक प्रश्न आहे तो मगो भाजप युती होणार की नाही हा. ‘मगो’ने १५ डिसेंबर पर्यंत याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे सांगितले असले तरी सध्याची स्थिती पाहता मगो युतीच्या मूडमध्ये आहे, असे बिलकुल दिसत नाही. सध्या ‘मगो’ ने फोंडा तालुक्यातील चारही मतदारसंघात नेट लावल्यामुळे युती बद्दलची साशंकता अधिकच गडद होऊ लागली आहे. या तालुक्यातील शिरोडा व प्रियोळ हे दोन मतदारसंघ सध्या भाजपकडे असून मडकई ‘मगो’कडे आहे.
फोंडा मतदारसंघही २०२२ साली भाजपनेच जिंकला होता. पण आमदार रवी नाईक यांचे गेल्या वर्षी निधन झाल्यामुळे तो मतदारसंघ सध्या आमदारांविना आहे. आणि विशेष म्हणजे फोंडा व प्रियोळ हे दोन्ही मतदारसंघ भाजपने अगदी कमी फरकाने जिंकले होते. आता यावेळी ‘मगो’ने फोंडा व शिरोडा या दोन मतदारसंघांवर थेट दावा केला असून प्रियोळ मतदारसंघात बेतकी- खांडोळ्याचे झेडपी सुनील भोमकर यांना प्रोजेक्ट करण्यास सुरवात केली आहे. फोंडा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला कधीच नव्हता. या मतदारसंघात भाजपची मते असली तरी ती जिंकण्याकरता पुरेसी नाहीत, हे बऱ्याचदा सिद्ध झाले आहे.
यामुळेच भाजपला या मतदारसंघात विजय प्राप्त करणे कठीण जात होते. पण गेल्या वेळी काँग्रेसच्या रवी नाईकांना उमेदवारी दिल्यामुळे भाजपला हा मतदारसंघ केवळ ७७ मतांनी का होईना पण पहिल्यांदाच जिंकता आला. पण त्यावेळीही मगोच्या दिवंगत डॉ. केतन भाटीकर यांना ७४३७ मते प्राप्त होऊन ते दुसऱ्या क्रमांकावर आले होते. आता रवी नाईक नसल्यामुळे भाजपकडे त्या तोडीचा उमेदवार नाही, ही वस्तुस्थिती कुणीच नाकारू शकणार नाही. आणि याचाच फायदा घेऊन मगो सध्या आपले घोडे पुढे दामटताना दिसत आहे. ‘मगो’चे सर्वेसर्वा वीज मंत्री सुदिन ढवळीकर हे फोंड्यातून रिंगणात उतरणार असल्याचे सांगितले जात असल्यामुळे भाजप पुढे मोठे आव्हान उभे राहू शकते.
सुदिन हे मडकईतून सहा वेळा निवडून आल्यामुळे त्यांना राजकारणाचा चांगलाच अनुभव आहे. तसा अनुभवी उमेदवार भाजपकडे नसल्यामुळे युती न झाल्यास हा मतदारसंघ भाजपच्या हातातून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तीच गोष्ट शिरोड्याची. शिरोडा मतदारसंघावर ‘मगो’चे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी दावा केला असून त्यांनी तिथे मोर्चेबांधणी सुरू केल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. युती न झाल्यास या मतदारसंघात नेमके काय होईल हे सांगणे कठीण असले तरी भाजपला मोठ्या आव्हानाला तोंड द्यावे लागेल हे निश्चित आहे. २०१९ साली झालेल्या पोटनिवडणुकीत शिरोड्यात दीपक ढवळीकरांविरुद्ध सुभाषभाऊंचा फक्त ७०मतांनी विजय झाला होता हे विसरता कामा नये.
त्यामुळे यावेळी परत दीपक रिंगणात उतरल्यास भाजप व मगोमध्ये परत एकदा इथे अटीतटीची लढत होऊ शकते. प्रियोळवर मगोने थेट दावा केला नसला तरी त्यांचे सुनील भोमकर ज्या रीतीने घरोघरी फिरताना दिसत आहेत, ते पाहता ‘दाल में कुछ काला है’ असे निश्चितपणे म्हणता येऊ शकते. तीच गोष्ट मांद्रे मतदारसंघाची. या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व सध्या मगोचे जीत आरोलकर हे करत आहेत. पण नुकतेच भाजपमध्ये पुनःप्रवेश केलेले माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर व माजी आमदार दयानंद सोपटे यांचे जीत यांना आम्ही निवडून येऊ देणार नाही, हे वक्तत्व युतीत सर्व काही आलबेल नाही हेच दाखवून देते. आणखी काही मतदारसंघांतही सध्या मगोची तयारी सुरू असल्याचे दिसून येत आहे.
आता ‘मगो’ने जर खरेच ‘एकला चलो रे’च्या दिशेने कुच करायला सुरुवात केली तर नुकसान भाजपचे होणार हे निश्चित आहे. युती न झाल्यास भाजपच्या हातातून चार ते पाच मतदारसंघ जाऊ शकतात, असा राजकीय विश्लेषकांचा होरा आहे. ‘मगो’जवळ मात्र गमावण्यासारखे काहीही नाही. २००२ साला पासून ‘मगो’ला फक्त दोन वा तीन जागाच मिळत आल्या आहेत. २०१२ साली भाजपशी युती होऊनही यात फरक पडला नव्हता.
गेल्यावेळी पाच ते सहा जिंकण्याची ‘मगो’ची अपेक्षा होती. पण तीन जागा अगदी निसटत्या फरकाने गेल्यामुळे त्यांना दोनच जागावर समाधान मानावे लागले होते. त्यामुळे यावेळीही ते ‘गेम’ खेळू शकतात. गाजराची पुंगी वाजली तर वाजली याप्रमाणे ते स्वबळावर निवडणूक लढवून आपली ‘ताकद’ दाखवू शकतात. उमेदवारी न मिळालेले भाजपचे काही नेतेही त्यांच्या गळाला लागू शकतात. या प्रयासातून जर त्यांनी तीनचा आकडा ओलांडला तर ते ‘सिकंदर’ही ठरू शकतात. मात्र प्रत्यक्षात काय होते हे कळायला आणखी महिनाभर तरी वाट पहावी लागेल!.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.