

पणजी: रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षातील (आरजी) मनोज परब गटाने पक्षाचे एकमेव आमदार असलेल्या वीरेश बोरकर यांची पक्षातून हकालपट्टी केल्याचे पत्र विधानसभा सचिव नम्रता उल्मन यांना सादर करून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली, परंतु परब गटाने सादर केलेल्या पत्रानुसार अभ्यास करूनच आमदार बोरकर यांच्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे सभापती गणेश गावकर यांनी ‘गोमन्तक’शी बोलताना सांगितले.
विधानसभा निवडणूक अवघ्या तीन महिन्यांवर येऊन ठेपलेली असतानाच, आरजीतील परब आणि बोरकर गटांतील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. दोन्ही गटांकडून एकमेकांवर आरोप–प्रत्यारोप सुरू असतानाच परब गटाच्या विश्वेश नाईक, अजय खोलकर आदींनी मंगळवारी विधानसभा सचिव नम्रता उल्मन यांची भेट घेत, आमदार बोरकर यांचे प्राथमिक सदस्यत्व २६ जुलै २०२६ पासून रद्द करण्यात आल्याचे पत्र त्यांना सादर केले.
प्राथमिक सदस्यत्व रद्द झालेले असल्याने वीरेश बोरकर यांना पक्षाचे प्रतिनिधित्व करण्याचा कोणताही अधिकार उरलेला नाही. त्यामुळे विधानसभेने त्यांची पक्षातून हकालपट्टी नोंदवून घ्यावी आणि त्यांच्या भविष्यातील कोणत्याही पत्रव्यवहाराला पक्षाचे अधिकृत प्रतिनिधित्व मानू नये, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.
वाद पुन्हा वाढण्याची शक्यता
आरजीतील परब–बोरकर गटांतील वाद वाढत असतानाच, २१ मे २०२६ रोजी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन राजकीय संन्यास जाहीर केलेले मनोज परब येत्या २२ नोव्हेंबर रोजी पुन्हा एकदा पक्षात प्रवेश करीत आहेत. त्यानंतर या दोन गटांतील वाद पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.
आरजीतील एका गटाने बोरकर यांच्याबाबत जे पत्र विधानसभेला सादर केलेले आहे. त्याचा अभ्यास केल्याशिवाय मला कोणताही निर्णय घेता येणार नाही. बोरकर यांचे पक्षातील प्राथमिक सदस्यत्व, त्यांना काढून टाकण्यामागील कारणे विचारात घेऊन मी योग्य तो निर्णय घेईन.
- गणेश गावकर, सभापती
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.