Goa Marathi Academy Controversy Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Goa Marathi Academy Controversy: 'आमच्या साहित्याचं संस्थान खालसा होणार?' गोवा मराठी अकादमीच्या कारभारावरुन धुमसणारा वाद चव्हाट्यावर

Anil Samant Resignation Demand: मागचे सलग दोन आठवडे एकच विषय घेतल्याने काहीजणांना मी अनिल सामंतांच्या मागे हात धुवून लागला आहे, असे वाटायला लागले आहे. डॉ. अनुजा जोशींना तर मी अनिल सामंतचा राजीनामा मागत असल्याचा भास होत आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

डॉ. मधू स. घोडकिरेकर

त्याग व योगदान, याद्वारे मराठीची सेवा करणारे पु. ल. देशपांडे हे एकमेवाद्वितीय नव्हते तर ते या परंपरेचे एक पाईक होते. आपल्याकडील, ‘ते पोदेर गेल्ये आणी ते उणेय गेल्ये’ या उक्तीप्रमाणे, आजच्या साहित्यिकांना ‘त्याग व योगदान’ या पेक्षा ‘लाभ व लाभांश’ याची भाषा समजते. याच अनुषंगाने प्रश्‍‍न समोर येतो - गोवा मराठी अकादमीला ‘संस्था’ म्हणावे की एक ‘संस्थान’?

पु. ल. देशपांडे यांनी बराच काळ सरकारी नोकरीतील अनुभवांवरून अनेक विनोदी लेख लिहिले, ‘अंमलदार’ हे नाटक लिहिले होते. यात सरकारी बाबूंची मानसिकता, फायलींचा प्रवास आणि कामाची संथ पद्धत यावर ते सडकून साहित्यिक टीका करायचे. अखेर, सरकारी बंधनांना वैतागून त्यांनी सरकारी नोकरी सोडून दिली व स्वतःला कला आणि साहित्यासाठी वाहून घेतले. त्याग व योगदान याद्वारे मराठीची सेवा करणारे पु. ल. हे एकमेवाद्वितीय नव्हते तर ते या परंपरेचे एक पाईक होते. आपल्याकडील, ‘ते पोदेर गेल्ये आणी ते उणेय गेल्ये’ या उक्तीप्रमाणे, आजच्या साहित्यिकांना ‘त्याग व योगदान’ या पेक्षा ‘लाभ व लाभांश’ याची भाषा समजते. याच अनुषंगाने प्रश्‍‍न समोर येतो, की गोवा मराठी अकादमीला ‘संस्था’ म्हणावे की एक ‘संस्थान’?

मागचे सलग दोन आठवडे एकच विषय घेतल्याने काहीजणांना मी अनिल सामंतांच्या मागे हात धुवून लागला आहे, असे वाटायला लागले आहे. डॉ. अनुजा जोशींना तर मी अनिल सामंतचा राजीनामा मागत असल्याचा भास होत आहे. गोवा मराठी अकादमीवरील कार्यकारिणी सरकार नियुक्त असल्याने त्यांच्याकडून राजीनामा मागण्याचा कुणालाच हक्क नाही, कारण ज्यांना आपण निवडून देतो, त्यांच्याकडून आपण राजीनामा मागू शकतो. मराठीच्या परंपरेचे जाणकार साहित्यिक प्रतिनिधी म्हणून त्यांची सरकारने नियुक्ती केली आहे. या परंपरेचे योग्य रक्षण - संवर्धन त्यांनी करावे, यासाठी त्यांचा करदात्यांच्या पैशांतून सरकारी मानपान केला जातो. अशा लोकांना त्यांच्या सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देण्याचा ‘पु. ल -प्र. के’ प्रयत्न आम्ही करत असतो. हे करताना पुढच्या व्यक्ती कोण आहेत, याकडे आम्ही लक्ष देत नाही, सर्वांना न्याय समान, हा आमचा नियम.

अनिल सामंतांनी कथित मुलाखतीत केलेल्या विधानाविषयी मी नमूद केलेल्या निरीक्षणाशी, निर्धार समितीच्या राजेंद्र सुभाष वेलिंगकरांनी पूर्ण सहमती व्यक्त केली, म्हणजे अनिल सामंतांचे तर्कट निर्धार समितीच्या सदस्यांना पचनी पडलेले नाही, हे उघड आहे. दुसऱ्या बाजूला, याच समितीच्या आंदोलनात कॅमेऱ्यासमोर रस्त्यावर विडंबन कविता गाणाऱ्या डॉ. अनुजा जोशी मात्र सोशल मीडियावर येऊन अनिल सामंतांची वकिली करू लागल्या आहेत. आंदोलनातून मराठीसाठी ‘योगदान’ देणारा एक घटक व मराठीच्या नावाने मिळणारा चिमटी चिमटी लाभही न सोडणारा दुसरा घटक. गोवा मराठी अकादमीवरील कार्यकारिणीवरचे लोक हे थेट पदलाभार्थी मानले तर डॉ. अनुजा जोशीसारख्यांचा चमू हा अशा थेट पद लाभार्थींचाच विस्तारीत लाभांशी गट असावा, असे त्‍यांची चलबिचल पाहता वाटते.

जेव्हा पर्रीकरांनी अनिल सामंतांकडे, गोमंतक मराठी अकादमीला पर्यायी संस्था तयार करण्याची जबाबदारी दिली तेव्हा, सामंताकडून चुकून ‘संस्थे’च्या ऐवजी ‘संस्थान’ची निर्मिती झाली की काय, अशी शंका या डॉ. अनुजा जोशींच्या वकिली दाव्यातून येते. कारण, त्यांच्या कमेंटमधील भाषा व सामंत स्वत: स्वत:ची बाजू मांडताना जी वापरतात ती भाषा, या दोन्ही एकसारख्या वाटतात. समाज माध्यमावर आपला बचावपक्ष ठेवण्यास वकिलपत्र डॉ. अनुजा जोशींना स्वत: अनिल सामंतांनी दिले, की त्यांनीच ‘जनहितार्थ’ ही केस घेतली, हे त्या दोघांनाच माहीत असेल.

डॉ. अनुजा जोशींची एकूण चडफड पाहता, अनिल सामंतांनी आपल्या पदाचा त्याग केल्यास, त्‍यांना स्वत:चे संस्थान कोसळण्याची भीती वाटते की काय, अशी शंका निर्माण होते. तसे पाहिल्यास, पुण्या-मुंबईत मराठी लोक स्वत:ला मराठी भाषेचे संस्थानिक समजतात, कोकणातील लोक मराठीबाबतीत मागासलेले, अशी त्यांची मानसिकता असते. मराठीची काळजी व ज्ञान, त्यांच्याइतके इतर कुणालाही नाही, असा त्यांचा तोरा असतो. डॉ. अनुजा जोशींनी याच तोऱ्यात टाकलेली कमेंट वाचा : “डॉ. घोडकिरेकर ज्या गोमंतक मराठी परिषदेचे बरीच वर्षे अध्यक्ष आहेत, तीही एक महत्वाची मराठी संस्था आहे.

अध्यक्ष म्हणून ते व ती बुजूर्ग संस्था मराठी राजभाषेसाठी म्हणून काय काय व कोणत्या प्रकारे प्रयत्नशील आहेत, हेही जाणून घ्यावेसे वाटते.” इति. आज माझ्या जागेवर कै. रामनाथ नाईक असते व त्यांनी ही कमेंट वाचली असती तर, गोव्यात ‘वानऱ्यो करणे’ म्हणजे काय याची प्रचिती डॉ. अनुजा जोशींना आली असती. मी फक्त ‘संस्थानिक’ अस सौम्य शब्द वापरला, ते पुण्यातील पेशवाईपर्यंत पोहोचले असते. पंचवीस वर्षाच्या ‘नव गोमंतकीयां’नी पंचवीस पिढ्यांचा वारसा असलेल्या गोमंतकीयांना सल्ला देताना शंभरवेळा विचार करावा, असे ठणकावून सांगितले असते.

येथे डॉ. अनुजा जोशी यांच्याकडे व्यक्ती म्हणून न पाहता त्यांच्या मानसिकतेकडे पाहूया. या मानसिकतेचा अनुभव आम्ही मागील चाळीस वर्षांपासून घेत आहोत. त्या तरी येथील स्नुषा म्हणून आल्या आहेत, आधीच्या काळात कुणी मराठीचे व्याख्याते, प्राध्यापक वैगेरे म्हणून येथे आले. नोकरीसोबत साहित्यिक म्हणवून स्वत:चे, जमेल तेवढे लाड करून घेतले व निवृतीनंतर परत गेले. येथे या प्रवासी मराठीप्रेमींचा एक स्वतंत्र पॅटर्न तयार झाला. संधी तयार करून त्यांनी मागाहून आपल्या कुटुंबीयांना, मित्र मंडळींना येथे आणले व त्यांचेही लाड पुरवून घेतले. हा प्रकार एका दोघा व्यक्तींपुरता मर्यादित न राहता एक लॉबीच तयार झाली. या लॉबीला थारा देणारी एक गोमंतकीय लॉबीही तयार झाली जी, मुंबई-पुण्यात जाऊन उपकार स्वरूप आपलेही लाड पुरवून घेऊ लागली. पूर्वी ती प्रथा होती आता ती व्यवस्था बनली आहे, या ‘अदलाबदली’ लाडाची व्याप्ती किती मोठी व खोल आहे, यावर सवडीने सविस्तर लिहू, येथे मी इतकंच सांगतो, की या लॉबीने आपली अंथरुणे मराठी व्यासपीठावर पसरवलेली आहेत.

परिणामी, मराठीच्या बाजूने असूनही मूळ गोमंतकीय युवक या व्यासपीठाकडे वळत नाहीत, कारण ‘या बसा, चहा बिस्कुट घ्या, आमच्या अस्सल मराठीतले तास दोन तास प्रवचन ऐका, टाळ्या मारा व चालते व्हा’ हे ऐकून घेणारी पिढी आता राहिली नाही. आता ही पिढी येथे नाही यातही या लॉबीला आनंद! कारण ही पिढी आली व ही व्यासपीठे हिरावून घेतली तर यांची ‘संस्थाने खालसा’ होणार ! आता सामंतांच्या राजीनाम्याच्या कल्पनेनेच घाबरलेल्या डॉ. अनुजा यांची कमेंट वाचा : “येन केन प्रकारेन, बरेवाईट दबाव निर्माण करून सामंतांचा राजीनामा पदरात पडला की (दहा वर्षे एवढा दीर्घ कालावधी सरकारी पदासाठी अयोग्य वाटत असला तरीही) त्यांच्या सर्वार्थाने सक्षम नेतृत्वाखाली उत्तमप्रकारे, चोख निष्ठेने, दर्जेदार व चौफेर भरघोसपणे चाललेल्या ‘मराठी संवर्धना’च्या मुलभूत कामावर कुऱ्हाड बसेल व सरकारी मर्जीतला/ कोकणी मर्जीतला एखादा मराठी माणूस मराठी अकादमीचा नवा अध्यक्ष म्हणून नेमला जाईल, असा धोका घोडकिरेकरांच्या सामंतांच्या राजीनाम्याच्या मागणीत आहे.” इति. या कमेंटवरून डॉ. अनुजा यांच्या धास्तीचे खरे कारण आपल्याला समजून आलेच असेल.

मराठीसाठी निर्धार समितीच्या आंदोलनाचे (Protest) योगदान व त्यांच्या योगदानास हातभार लावण्यास गोवा मराठी अकादमीकडून अपेक्षित प्रशासन पातळीवर योगदान, असा मागच्या दोन लेखांचा विषय होता; कारण आम्ही गोवा मराठी अकादमीला एक स्वायत्त सरकारी संस्था मानतो. येथे योगदानाची व त्यागाची अपेक्षा उचित की, अनुचित यावर चर्चा सोडून, जे विरोधाभासी वकिली दावे डॉ. अनुजा जोशी घेऊन सोशल मीडियावर समोर आल्यात, ते पाहता गोवा मराठी अकादमीच्या कार्यकारिणी सदस्यांनी आत्मचिंतन व आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. ही समस्त मराठी अभिमानी लोकांची संस्था आहे, की मर्जीच्या लोकांसाठीचे ‘संस्थान’ यातील एक काय ते ठरवा. आपण मुळात मराठी साहित्यिक म्हणून प्रतिनिधित्व करीत आहात, याची बूज राखा. अध्यक्षाची वकिली करण्यासाठी कार्यकारिणीबाहेरील व्यक्तीला सोशल मीडियावर यावे लागते, यातून या संस्थेचा योग्य संदेश बाहेर निघत आहे काय, यावर चर्चा करा. आभाळ फाटण्याआधी ठिगळ लावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Scam करणाऱ्यांचा प्लॅन होईल फेल! WhatsAppची 'ही' सेटिंग ON करा, संशयास्पद मेसेजपासून आधीच मिळेल सावधानतेचा इशारा

बॉल की बुलेट...! पोलार्डला टाकला खतरनाक बाउन्सर, चेंडू थेट सीमारेषेपार; विकेटकीपर बघतच राहिला Watch Video

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; निलंबनाची याचिका फेटाळली, ECI आणि कायदे मंत्रालयाला नोटीस!

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

SCROLL FOR NEXT