Kadamba temples in Goa Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Kelbai Goddess: हणजुणे धरणाच्या निर्मितीनंतर गाव जलाशयाखाली बुडाला, कदंबकालीन गुळ्ळेची 'केळबाय'

Kadamba Dynasty: इसवी सनाच्या ९६०मध्ये षष्ठदेवाने शिलाहाराकडून चंद्रपूर (चांदोर) जिंकून घेऊन नव्या राजघराण्याच्या सत्तेचा गोवा कोकणात शुभारंभ केला.

Sameer Panditrao

गोव्यावरती ज्या राजघराण्यांची सत्ता होती, त्यात गोवा कदंब राजवटीच्या असंख्य पाऊलखुणा आजही या प्रदेशात आढळतात. इसवी सनाच्या ९६०मध्ये षष्ठदेवाने शिलाहाराकडून चंद्रपूर (चांदोर) जिंकून घेऊन नव्या राजघराण्याच्या सत्तेचा गोवा कोकणात शुभारंभ केला. त्यापूर्वी चालुक्य राजा तैलप (द्वितीय) याने कदंबांची गोव्याचे महामंडलेश्वर म्हणून नियुक्ती केली होती आणि त्यामुळे त्यांचे राजकीय, सामाजिक महत्त्व वृद्धिंगत होत गेले.

इसवी सनाच्या ९६० ते १३१०पर्यंत गोव्यात कदंब सत्तेवरती होते. कला आणि संस्कृती यांचे भोक्ते असल्याने कदंबांच्या कारकिर्दीत शिल्पकला, वास्तुकला या क्षेत्राला राजाश्रय लाभला आणि त्यामुळे एकापेक्षा एक कलाकुसरीने युक्त मंदिरे मूर्तिशिल्पे गोवा, कोकणात निर्माण करण्यात आली होती. त्याचेच पुरातत्त्वीय पुरावे ठिकठिकाणी पाहायला मिळतात.

गोवा कदंबाच्या उत्तरार्धात सत्तेवरती आलेल्या राजे सरदार यांच्यातले मतभेद विकोपाला गेल्याने, त्यातल्या काहींनी होनाव्वरच्या सुलतानाशी हातमिळवणी केली व त्यांच्या सत्तेचा अस्त झाला.

त्यावेळी आणि त्यानंतर जे जे मूर्तिभंजक सत्तेवरती आले त्यांनी सर्वसामान्य जनतेला त्यांच्या धर्म आणि संस्कृतीपासून परावृत्त करण्यासाठी अटोकाट प्रयत्न केले. मंदिरे आणि मूर्ती शिल्पे उद्ध्वस्त केली आणि त्यामुळे आज त्यांच्या कारकिर्दीतला पुरातत्त्वीय वारसा विस्मृतीत गेलेला पाहायला मिळतो.

गोव्याचे सांस्कृतिक इतिहासकार अनंत धुमे यांना धारबांदोडा येथील तांबडी सुर्ल येथील भूसर्वेक्षणाचे काम करत असताना सह्याद्रीच्या पायथ्याशी आणि रगाडो नदीच्या डाव्या काठावरती वसलेल्या त्या परिसरात उपलब्ध असलेल्या काळ्या दगडात कोरलेल्या महादेवाच्या मंदिराचे दर्शन झाले.

गेली आठ शतके ऊन, पाऊस आणि वाऱ्याचा मारा सोसत उभ्या असलेल्या या मंदिरावरच्या प्रेक्षणीय शिल्पकला आणि मूर्तींवरचे कोरीव काम पाहून गोवा कदंबाच्या कारकिर्दीतील पुरातत्त्वीय वारशाच्या श्रीमंतीची कल्पना येते.

गोवा - कोकणात गेल्या काही वर्षांपासून चाललेल्या मंदिरांच्या नूतनीकरण आणि जीर्णोद्धारामुळे कदंबकालीन पुरातत्त्वीय वैभवाच्या खुणा झपाट्याने उद्ध्वस्त होत आहेत आणि त्यामुळे आगामी काळात हे संचित विस्मृतीत जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे.

गोवा राज्याच्या पेडणे ते काणकोणपर्यंत एकेकाळी गोवा कदंबाची सत्ता होती. आज त्याचे अल्प प्रमाणात पुरावे दृष्टीस पडतात. त्यात दिघी घाटाच्या पायथ्याशी असणाऱ्या सांगे तालुक्यातल्या उगे गावातल्या सिद्धेश्वर मंदिराच्या पंचायतनात येणाऱ्या हेमाडदेवाची पाषाणी मूर्ती ही शिवचित्त पेरमाडीदेव या गोवा कदंब राजाची असल्याचे मत इतिहास संशोधकांत आहे.

तांबडी सुर्ल येथील महादेवाच्या मंदिराच्या परिसरातून कर्नाटकातल्या विरंजोळ गावात जाणारी राणीची पाज ही कदंब नृपती शिवचित्ताची राणी कमलादेवीशी निगडीत असल्याचे मानले जाते. विरंजोळहून खानापूर जवळच्या घाट माथ्यावरच्या हळशी राजधानीच्या शहरात ये -जा करण्यासाठी मार्ग अस्तित्वात होता.

आज दोडामार्ग तालुक्यातला पाटये हा गाव तिळारीच्या जलाशयाखाली बुडालेला असून या गावात जे केळबायचे जुने मंदिर अस्तित्वात होते, त्याच्या प्रवेशद्वाराच्या दुतर्फा गोवा कदंब राज्यकर्त्यांचे चिन्ह कोरलेले होते. कालांतराने जेव्हा पाटयेतल्या जुन्या मंदिरातल्या पाषाणी मूर्ती नेण्यात आल्या तेव्हा मागचा पुढचा विचार न करता राजचिन्ह असलेली शिल्पे बेशिस्तीने सासोलीच्या पुनर्वसन वसाहतीत आणलेली आहेत.

अशाच पुरातत्त्वीय संचितांत लक्षणीय भर घालणाऱ्या केळबायच्या दोन मूर्ती सत्तरीतल्या गुळ्ळे गावात आढळल्या होत्या.

हणजुणे धरणाच्या निर्मितीनंतर गुळ्ळे गाव जलाशयाखाली बुडाला त्यावेळी तेथील मंदिरात पुजली जाणारी केळबायची दोन्ही बाजूंना गोवा कदंब राजांची राजचिन्ह असलेली केळबायची मूर्ती मोर्ले येथील पुनर्वसन वसाहतीतल्या नव्या मंदिरात स्थलांतरित करण्यात आली. परंतु आणखी एक कदंब राजचिन्ह असलेली केळबायची जुनी मूर्ती मात्र जलाशयात राहिली. कालांतराने इतिहासप्रेमींच्या प्रयत्नांमुळे ही मूर्ती गोवा राज्य पुराणवस्तू संग्रहालयात स्थलांतरित करण्यात आली.

गोवा आणि गोव्याशी संलग्न कोकणातल्या बऱ्याच गावी सातेरी आणि केळबाय या देवतांच्या पाषाणी मूर्ती मंदिरात पूज्यस्थानी आहेत. हीच परंपरा सह्याद्रीच्या डोंगर कपारीत वसलेल्या गुळ्ळे गावात पाहायला मिळत होती.

येथील केळबाय देवीच्या दोन पाषाणी मूर्ती होत्या. या दोन्ही मूर्ती त्याच्यावर कोरलेल्या कदंबांच्या राजचिन्हामुळे इतिहास आणि पुरातत्त्व शास्त्रज्ञ आणि अभ्यासकांना आकर्षण ठरलेल्या होत्या. सिंहाचा उजवा पंजा या चिन्हात पुढे दर्शवलेला असून, मान सरळ, तोंड उघडलेले आणि शेपूट वाकलेले दाखवलेले आहे.

कदंब राजचिन्हाने अलंकृत असलेल्या अशा केळबाय देवतेच्या मूर्ती गुळ्ळे वगळता गोवा कोकणात किंवा कर्नाटकात अन्यत्र आढळलेल्या नाहीत. त्यामुळे गोवा कदंबाच्या राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक कारकिर्दीचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांना या मूर्ती लक्षवेधक अशाच आहेत. हणजुणे हा गुळ्ळे शेजारचा गाव, पर्शियन भाषेतल्या व्यापाऱ्यांच्या समूहाचे प्रतीक असणाऱ्या हंजामन या संज्ञेशी निगडीत आहे का?

जुन्या काळी घाट माथ्यावरच्या प्रदेशात ये - जा करण्यासाठी उपयुक्त चोर्ला घाटमार्ग या गावाच्या परिसरातून जात होता. त्यामुळे नाना प्रांतांतून आलेले लोक गुळ्ळेत स्थायिक झाले होते. धनधान्याची समृद्धी असल्याकारणानेच हा गाव अडलेल्या आणि नडलेल्या लोकांना आकर्षित करत होता. धारबांदोडा परिसरात जेव्हा दुष्काळ पडला तेव्हा तिथल्या आदिवासी जमातीने गुळ्ळेत स्थायिक होऊन, कुमेरी शेती करून गुजराण केल्याचे संदर्भ भरणूल या लोकनाट्यात पाहायला मिळतात.

देवीच्या मूर्तीत दोन्ही बाजूंना तिच्या माथी जलाभिषेक करणारे हत्ती आणि वाद्यवृंदासह नर्तनात वादनात रममाण असणारे लोककलाकार या मूर्तीत दाखवलेले असल्याने तिला धनधान्यांची आणि सुख समृद्धीची देवता केळबाय म्हणून पुजलेले आहे.

गजलक्ष्मीच्या शिल्पाशी साधर्म्य दर्शवणारी गुळ्ळे गावातली केळबायची ही मूर्ती तेथे गोवा कदंब राजघराण्याच्या इतिहासाच्या पूर्वीपासून नाना जाती जमातींनी वंदनीय मानली होती आणि त्याचीच प्रचिती इथे ये जा करणाऱ्या लोकांना प्राप्त व्हायची. त्यामुळे आज मोर्ले पुनर्वसन वसाहतीत स्थापन केलेल्या मंदिरांच्या परिसरात असलेल्या एका छोटेखानी वास्तूत केळबाय पाहायला मिळते.

कधीकाळी उसापासून इथे गुळाची निर्मिती होत असल्यानेच या गावाला गुळ्ळे ग्रामनाम लाभले असावे. सुखसमृद्धीचे सदासर्वकाळ सिंचन होत असलेल्या या गावी कदंबाच्या राजचिन्हाने युक्त वैशिष्ट्यपूर्ण गजलक्ष्मीची उपासना होत असावी. त्याच इतिहास आणि संस्कृतीचे दर्शन या गजलक्ष्मीच्या माध्यमातून भाविकांना होत असते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Birch Fire Case: हडफडे अग्निकांडातील मुख्य आरोपी लुथरा बंधू उद्या गोव्यात होणार दाखल; ट्रान्झिट रिमांड मिळाल्याने कारवाईला वेग VIDEO

IPL Mini Auction 2026: धोनीच्या चेन्नईत नव्या दमाच्या खेळाडूंची एन्ट्री! दोन अनकॅप्ड खेळाडूंवर 28 कोटींची उधळण; प्रशांत वीर आणि कार्तिक शर्मा कोट्यधीश

"लग्न केवळ कागदावर उरलं असेल तर ते तोडणंच बरं!" 24 वर्षांपासून रखडलेल्या घटस्फोटाच्या वादावर सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

IPL Mini Auction 2026: केकेआरचा 'मास्टरस्ट्रोक'! मथीशा पाथिरानाला 18 कोटींत केलं खरेदी; सीएसकेच्या 'बेबी मलिंगा'वर शाहरुखने लावली मोठी बोली

Luthra Brothers Arrested: 'बर्च बाय रोमिओ लेन' च्या मालकांचा खेळ खल्लास! दिल्ली विमानतळावर लुथरा बंधूंना गोवा पोलिसांकडून अटक

SCROLL FOR NEXT