Adil Shahi Dynasty: युसूफ भारताकडे निघाला, 1461 मध्ये दाभोळ बंदरावर पोहोचला; आदिलशाही व तुर्की सल्तनत

Turkish queen role in Yusuf Adil Shah: फुझुनी अस्त्राबादी यांच्या मते, ‘तिने ख्वाजा यांना मोठ्या प्रमाणात पैसे आणि दागिने देण्याचे वचन दिले होते. राणीने दागिने आणि हिऱ्यांनी भरलेला एक पेटारा तयार केला.
Yusuf Adil Shah history
Yusuf Adil Shah historyDainik Gomantak
Published on
Updated on

युसूफ आदिल शाहने विजापूर येथे १४८९मध्ये आदिल शाही सल्तनतची स्थापना केली. २०० वर्षांच्या सल्तनत काळात, अनेक प्रसंगी राजेशाही महिलांनी राज्याच्या उदरनिर्वाहात योगदान दिलेले आपल्याला इतिहासात पाहायला मिळते. शाही महिलांमध्ये तुर्कीमधील कॉन्स्टँटिनापलची राणी आणि युसूफ आदिलशाहची आई हिचा खूप मोलाचा वाटा आहे. युसूफ आदिलशाहच्या आयुष्याच्या अस्तित्वात तुर्की राणीने खूप महत्त्वाची भूमिका बजावली. युसूफ हा तुर्की येथील कॉन्स्टँटिनापलचा सुलतान आघा मोराद यांचा धाकटा मुलगा होता. त्याचा जन्म सुमारे १४४३मध्ये झाला.

तुर्की सुलतान आघा मोरादच्या कुटुंबात फक्त एकच मुलगा जिवंत राहत असे. म्हणूनच, युसूफचा मोठा भाऊ ‘सलीम’ ज्याचे नंतर मुहम्मद-दुसरा म्हणून नामकरण झाले, तो सुलतान बनला, प्रसिद्ध अरब इतिहासकार फरिश्ताचा अहवाल जो या गोष्टीचा प्रमुख स्रोत मानला जातो,

तो म्हणतो की राणीने युसूफचा जीव वाचवण्याचा आग्रह केला, परंतु तिची विनंती नाकारण्यात आली. पण ती त्याला वाचवण्याविषयी दृढनिश्चयी होती. ख्वाजा इमाद-उद्दीन नावाच्या एका पर्शियन व्यापाऱ्याकडे तिने विचारले की त्याच्याकडे विक्रीसाठी काही पुरुष गुलाम मुलं आहेत का.

त्यावेळी व्यापाऱ्याकडे पाच जॉर्जियन आणि दोन सर्कॅशियन मुले होती. यापैकी तिने एका सर्कॅशियन मुलाला निवडले आणि विकत घेतले, कारण तो राजकुमारासारखा दिसत होता आणि युसूफला व्यापाऱ्याच्या देखरेखीखाली सोपवले.

दुसऱ्या दिवशी सकाळी, मंत्री राणीच्या राजवाड्याच्या दाराशी आले आणि त्यांनी तिच्या मुलाची मागणी केली. तिला एक मंत्री काहीसा विश्वासार्ह वाटला म्हणून तिने त्याला फसवणुकीची स्पष्टपणे माहिती दिली आणि मोठ्या भेटवस्तू देऊन तिच्या योजनेला फलद्रूप करण्यासाठी आपल्या बाजूने वळवले.

त्यानुसार बनावट युसूफचा गळा दाबून खून करण्यात आला, त्याचा मृतदेह मंत्र्याने गुंडाळून आच्छादनात बाहेर आणला, ज्याच्या प्रामाणिकपणावर संशय नव्हता आणि तपासणी न करता त्याचे दफन करण्यात आले. राणीने मुलाला युसूफ व्यापाऱ्याच्या ताब्यात दिले आणि त्याच्याकडून वचन घेतले की तो आयुष्यभर त्याचे रक्षण करेल. ख्वाजा इमाद-उद्दीनने दयाळूपणे आपले वचन पूर्ण केले.

इतिहासकार फुझुनी अस्त्राबादी यांच्या मते, ‘तिने ख्वाजा यांना मोठ्या प्रमाणात पैसे आणि दागिने देण्याचे वचन दिले होते. राणीने दागिने आणि हिऱ्यांनी भरलेला एक पेटारा तयार केला जो केवळ ख्वाजा इमाद-उद्दीनसाठीच नाही तर त्याच्या कुटुंबाच्या अनेक पिढ्यांसाठीदेखील उपयुक्त आणि पुरेसा होता.

तिने असेही म्हटले की तो कुठेही राहिला तरी त्याला दरवर्षी एक लाख अल्तून जे त्या वेळीचे तुर्की चलन होतं ते मिळेल.’ इतिहासकार फरिश्ता ख्वाजा युसूफची काळजी कशी घेतो याबद्दल तपशीलवार माहिती देतात.

फरिश्ता लिहितात ‘तो मुलाला प्रथम अर्दबील येथे घेऊन गेला, जिथे त्याने त्याला आदरणीय शेख सुफीच्या शिष्यांमध्ये आणि नंतर पर्शिया इराणतील सावा येथे नेले. सात वर्षांचा असताना ख्वाजाने त्याला त्याच्या जन्माचे रहस्य सांगितले आणि त्याच्या संगोपनाची आणि प्रशिक्षणाची काळजीपूर्वक काळजी घेतली.’

पुढच्या वर्षी राणीने युसूफचे कल्याण जाणून घेण्यासाठी सावा येथे एक व्यक्ती पाठवली आणि दोन वर्षांहून अधिक काळ अनुपस्थित राहिल्यानंतर दूत राणीकडे परत आला आणि तिला युसूफने लिहिलेले पत्र सादर केले. नंतर, राणीने युसूफची दाई, तिचा मुलगा घुझुनफर बेग आणि तिची मुलगी दिलशाद आगा यांना तिचा माजी दूत आणि युसूफच्या वापरासाठी मोठी रक्कम सावा येथे पाठवली. त्यानंतर त्यांनी कधीही त्याला सोडले नाही. युसूफ सोळा वर्षांचा होईपर्यंत सावा येथेच राहिला.

युसुफच्या सुरुवातीच्या आयुष्यातील हे तपशीलवार वर्णन जे फरिश्ताने दिले आहे. पण सावा येथे एक राजपुत्र असल्याची कुजबुज पसरल्याने युसूफचा सावा येथे राहणे धोकादायक बनले. ते इराण मधील इस्फाहान आणि तेथून शिराजला पळून गेले. येथे स्वप्नात इशारा मिळालेला युसूफ भारताकडे निघाला आणि १४६१मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळ बंदरावर पोहोचला.

व्यापारासाठी दाभोळ येथे आलेल्या एका पर्शियन व्यापाऱ्याने त्याला त्याच्यासोबत बहमनी सल्तनतची राजधानी असलेल्या बिदर येथे जाण्याचे आमंत्रण दिले. येथे युसूफला, नाममात्र, मंत्री महमूद गवान यांना विकण्यात आले.

महमूद शाह बहमनीकडे गुलाम म्हणून कठोर प्रशिक्षणानंतर, तो एका पदावरून दुसऱ्या पदावर चढला आणि महमूद गवानचा विश्वासू बनला. त्या मंत्र्याने युसूफ आदिल खानची सैनिक आणि राजकारणी म्हणून क्षमता ओळखली आणि त्याला तर्फदार किंवा राज्यपाल पदावर पोहोचेपर्यंत त्याच्यावर जबाबदाऱ्या सोपवल्या. अशा प्रकारे, फला मनी सल्तनतमध्ये स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळाली.

सुरुवातीला मुहम्मद गवानने त्याला दौलताबादचा राज्यपाल म्हणून नियुक्त केले आणि महमूदच्या मृत्यूनंतर त्याला विजापूरला हलवले .१४८२मध्ये, महमूद शाह दुसरा (१४८२-१५१८)च्या राज्यारोहणानंतर, युसूफ आदिल खानने बिदरला भेट दिली. ही भेट प्रशंसेइतकीच ताकदीचे प्रदर्शनच होती, सर्व परदेशी सैन्याने त्याला त्यांचा नेता म्हणून पाहिले आणि त्याच्या सैन्यासह शहराबाहेर तळ ठोकला.

तेव्हा राज्याचे व्यवस्थापन होते महमूद गवानच्या हत्येमागील प्रमुख सूत्रधार निजाम-उल-मुल्क बहरीच्या हाती. आता निजाम-उल-मुल्कने युसूफला काढून आदिल खान दखनीला विजापूरचा राज्यपाल बनवण्याची योजना आखण्यास सुरुवात केली. त्याने तुर्कांचा नरसंहार सुरू केला. असा अंदाज आहे की सुमारे चार हजार लोक मारले गेले.

युसूफ आदिल खानला आता पूर्णपणे समजले की बिदर हे त्याच्यासाठी योग्य ठिकाण नाही आणि तो निजाम-उल-मुल्कला पूर्ण नियंत्रणात ठेवून विजापूरला निघून गेला. तो विजापूरला परतला आणि कधीही राजधानीला परतला नाही. बिदरच्या भेटीनंतर, युसूफ काही निर्णय घेऊन विजापूरला परतला.

त्याने १४८९पर्यंत स्वतंत्र सरदार म्हणून त्याच्या प्रांतावर राज्य केले. त्याने भीमापासून विजापूरपर्यंतचा देश स्वतःकडे घेतला, विजापूरला त्याची राजधानी म्हणून निश्चित केले. युसूफच्या आई आणि त्याची बहीण दिलशाद आघा यांची भूमिका त्याच्या आयुष्याच्या अस्तित्वासाठी खूप महत्त्वाची होती आणि शेवटी या अस्तित्वामुळे त्याला एका नवीन राज्याच्या स्थापनेकडे, म्हणजेच विजापूरच्या आदिलशाही सल्तनतकडे नेले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com