Goa Crime Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Goa Crime: वकिलावर हल्ला, गोशाळा पाडली अन् नवऱ्याचं अपहरण! पूर्वीचा गोवा राहिला नाही; गुन्हेगारीनं ओलांडली सीमा

Goa Crime And Social Concerns: मडगावच्या कोंब भागात पॅथॅालॅाजी लॅबचालकाचे झालेले अपहरण गोवा पूर्वीचा गोवा राहिलेला नाही हेच दर्शवते.

दैनिक गोमन्तक डिजिटल

प्रमोद प्रभुगावकर

मडगावच्या कोंब भागात पॅथॅालॅाजी लॅबचालकाचे झालेले अपहरण गोवा पूर्वीचा गोवा राहिलेला नाही हेच दर्शवते. कारण या प्रकारामागे त्याच्या पत्नीचाच हात असल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे. त्यामुळे एकेकाळची कुटुंबव्यवस्था मोडकळीस आली आहे की काय, असा प्रश्न पडतो.

गोव्यात १९८० पूर्वी ‘मगो-युगो’ चे म्हणजे स्थानिक पातळीवरील राजकारण चालले होते. १९८० मध्ये ते संपले व कॉंग्रेस सरकार सत्तेवर आले त्यामुळे गोवा राष्ट्रीय प्रवाहांत सामील झाला, असे म्हटले गेले. पण नंतरच्या एकंदर घडामोडी पाहिल्या तर केवळ राजकीय अर्थानेच नव्हे तर अन्य सगळ्याच बाबतींत गोवा खराच राष्ट्रीय प्रवाहांत सामील झाला, असे म्हणावे लागते. गत सप्ताहांतील घडामोडी तर त्याच्या निदर्शकच ठरतात.

दिल्लींतील जंतरमंतर वर कॅाकरोच जनता पार्टीतर्फे सुरू असलेल्या आंदोलनाला वा वांगचूक यांच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी गोव्यात विविध भागांत झालेल्या आंदोलन व निदर्शनांना अनुलक्षून नव्हे तर अन्य ज्या घडामोडी या दिवसांत घडलेल्या आहेत, त्याच्या अनुषंगाने असे म्हणावे लागत असून त्याची गंभीर दखल घेण्याची वेळ आलेली आहे. या आठवड्याची सुरवात झाली ती पेडणेतील मोरजी येथील किनारपट्टी भागांत सीआरझेडचे उल्लंघन करून उभ्या झालेल्या अनेक बेकायदा बांधकामांवर न्यायालयाच्या आदेशावरून सुरू झालेली कारवाई व यावेळी तेथे पहाणीसाठी गेलेल्या एका वकिलावर झालेला प्राणघातक हल्ला.

त्या नंतर दोन ते तीन दिवसांनी जांबावली येथे ध्यान फाऊंडेशनने उभारलेल्या गोशाला जमीनदोस्त करून तेथील गायी व गोवंशांना पुन्हा रस्त्यावर सोडण्याचा प्रकार. तर आठवड्याच्या शेवटच्या टप्प्यांत मडगावांतून एका पॅथॅालॅाजी लॅबचालकाचे केले गेलेले अपहरण व त्या कटात घरांतील मंडळीचा-खुद्द धर्मपत्नीचा असलेला सहभाग. या घटना सर्वसामान्यांच्या चिंता वाढविणाऱ्या ठरल्या आहेत.

तसे पाहिले तर यापूर्वीही अशा घटना गोव्यात घडलेल्या आहेत पण त्यांत प्रत्यक्ष गोवेकरांचा म्हणजे स्थानिकांचा सहभाग नव्हता तर बाहेरील -राज्याबाहेरून आलेल्यांनी ती कृत्ये केली होती. पण या घटनांत थेट स्थानिक गुंतले असल्याचे प्राथमिक तपासात आढळल्याचा पोलिसांचा दावा असल्याने चिंता वाढली आहे.

मोरजी येथील प्रकरण तसे पाहिले तर अनेक वर्षांचे आहे. त्याने हरित लवाद ते सीआरझेड, न्यायालय असा लांबचा प्रवास केला असून नंतर न्यायालयीन निवाडा आल्यावरच कारवाई झाली आहे. प्रकरण अगदी स्पष्ट असताना पाहाणीसाठी गेलेल्या वकिलावर प्राणघातक हल्ला करावा व त्यात एका महिलेचा हात असावा ही बाब किती गंभीर आहे, ते स्पष्ट करतो. या मारहाणीची दखल खुद्द न्यायालयाने घेतली आहे. बेकायदा बांधकाम वा सीआरझएडचे उल्लंघन हे केवळ एका पेडणेत झालेले नाही तर संपूर्ण उत्तर गोव्यात किंबहुना संपूर्ण गोव्यात किनारपट्टीत झालेले आहे.

पण इतराकडे बोट दाखवले म्हणून तुम्ही कायद्याच्या कचाट्यांतून वा कारवाईतून सुटू शकणार नाहीत हे प्रत्येकाने लक्षांत ठेवण्याची गरज आहे. अशा पट्ट्यांतील घरे कितीही जुनी असली तरी दुरुस्तीच्या नावाने बहुमजली संकुले उभारली व त्या विरुध्द खुद्द जमीन मालकाने तक्रार केली तर कारवाई अटळ असते. ती टाळण्यासाठी पूर्वजांची घरे, अनेक पिढ्या रहात होत्या, असे कितीही दावे केले वा टाहो फोडले किवा इतर बांधकामांकडे बोट दाखवले म्हणून कारवाई टाळता येत नाही हे मोरजी प्रकरणातून स्पष्ट झाले आहे.

खरे म्हणजे बांधकाम करतानाच याची दक्षता घेणे हाच त्यावर उपाय आहे. राज्याच्या अनेक भागांत भर समुद्रांत तारांकित हॅाटेले उभी आहेत पण ती उभारताना संबंधितांनी आवश्यक ते सोपस्कार आडमार्गाने असले तरी पूर्ण केलेले असतात-म्हणून इतरांनी तसे बांधकाम केले तर ते पचत नसते व कारवाई होत असते.

जांबावली येथे ध्यान फाऊंडेशनने भटक्या गायी व गुरांसाठी उभारलेल्या तब्बल नऊ गोशाला तथा शे़डी जमीनदोस्त करण्याचा प्रकार वास्तविक आपण किती कोडगे बनलेलो आहोत, हे दर्शवणारा आहे. कारण ही गुरे वा गायी काही दूध व्यवसायासाठी पोसलेल्या नव्हत्या तर रस्त्यावर बेवारस भटकणाऱ्या त्या होत्या.

सरकार त्या पोटी त्या फाऊंडेशनाला दर गुरापोटी अनुदान देत होते. एक प्रकारे रस्त्यावर बेवारस भटक्या गुरांची समस्या त्यामुळे नियंत्रणात आली असती. एवढेच नव्हे तर कुठे जनावर जखमी वा आजारी असल्याचा संदेश आला तर फाऊंडेशनचे स्वयंसेवक तत्परतेने तेथे जाऊन त्याला उचलून आपल्या शेडमध्ये आणून उपचार करत असत. वास्तविक ते मानवीय काम होते. अशा संस्थेला खरे तर मदत करण्याची गरज होती, पण त्याऐवजी तिच्या शेड उद्ध्वस्त केल्या गेल्या.

त्यामागील कारण कोणतेही असो पण या आततायीपणा ऐवजी त्यावर उपाय काढणे शक्य होते. एकीकडे असंख्य लोक गोशालांसाठी दान देतात तर दुसरीकडे अशा प्रकारे त्या उद्ध्वस्त करणाऱ्या प्रवृत्तीही असतात हे या घटनेवरून दिसून येते व मन व्यथित होते. गोव्यात अनेक श्रीमंत देवस्थाने आहेत, त्यांनी मनावर घेतले तर सरकारी अनुदान न घेता अशा गोशाला अनेक भागांत सहज चालविणे शक्य आहे पण प्रत्यक्षांत घडलेली घटना वेगळेच दर्शवते. मडगावच्या कोंब भागांत पॅथॅालॅाजी लॅबचालकाचे झालेले अपहरण गोवा पूर्वीचा गोवा राहिलेला नाही हेच दर्शवते.

कारण या प्रकारामागे त्याच्या पत्नीचाच हात असल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे. त्यामुळे एकेकाळची कुटुंबव्यवस्था मोडकळीस आली आहे की काय असा प्रश्न पडतो. हल्ली होत असलेल्या कुटुंबांच्या सामूहिक आत्महत्या वा मालमत्तेच्या वादांतून होणारे नातेवाईकांचे खून यांतूनही हीच शंका बळावते.

खरे तर मानसोपचारतज्ज्ञांनी यावर अधिक प्रकाश पाडायला हवा. दीड-दोन वर्षांमागे एका मातेने आपल्या कोवळ्या बाळाचा खून केला होता. पण ती बंगळुरुची होती पण तो करण्यासाठी ती गोव्यात आली होती. त्या नंतर वाळपईंत एका जन्मदात्याने आपल्या तरुण पुत्राचा असाच शेवट घडविला होता. त्यामुळे गोवा खरेच पूर्वीचा राहिला नाही का , त्याची वाटचाल कुणीकडे सुरू आहे, असा प्रश्न पडतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Konkan Railway Ganpati Special Train: कोकणवासीयांना मोठा दिलासा! कोकण रेल्वे मार्गावर धावणार 248 'गणपती स्पेशल' गाड्या

Goa Anti Defection Case: गोव्यातील 8 आमदारांच्या विलीनीकरणाचा फैसला अधांतरी!पक्षांतरबंदी कायद्याची नवी व्याख्या ठरणार; 7 न्यायमूर्तींचे घटनापीठ निर्णय घेणार?

Surya Guru Yuti 2026: सूर्य-गुरुची अभूतपूर्व युती! 5 राशींचं नशीब रातोरात चमकणार; अफाट धनलाभासह राजयोगाचं मिळणार मोठं फळ

Train Puja Viral Video: धावत्या ट्रेनमध्ये चक्क दिवा लावून पूजा; प्रवाशांनी रोखलं तरीही हट्ट कायम, व्हिडिओ होतोय व्हायरल

NEET Protest In Goa: 'नीट'आंदोलनाआडून राष्ट्रविरोधी अजेंडा? पणजी अन् म्हापशातील आंदोलनावर भाजपचा थेट हल्लाबोल

SCROLL FOR NEXT