Goa Inquisition and Sanskritization parallels Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

पोर्तुगीज अत्याचार की अदृश्य संस्कृतीकरण? गोव्याचे दोन वसाहतवाद; गावडा, कुणबी आणि वेळीप बांधवांच्या हक्कांवर कशी आली गदा?

Displacement of Goan: इतिहास हा नेहमी विजेत्यांच्या आणि सत्ताधाऱ्यांच्या सोयीनुसार लिहिला जातो. गोव्याचा इतिहास वाचताना आपण अनेकदा फक्त युरोपियन आक्रमकांकडे पाहतो.

दैनिक गोमन्तक डिजिटल

दिनेश शिवा जल्मी

इतिहास हा नेहमी विजेत्यांच्या आणि सत्ताधाऱ्यांच्या सोयीनुसार लिहिला जातो. गोव्याचा इतिहास वाचताना आपण अनेकदा फक्त युरोपियन आक्रमकांकडे पाहतो. पोर्तुगीज राजवटीने केलेल्या अत्याचारांवर आपली नजर खिळून राहते. पण या उघड आक्रमणाच्या शेकडो वर्षे आधी गोव्यात एक मोठे स्थित्यंतर घडत होते. हे स्थित्यंतर शांत, अदृश्य पण खोलवर परिणाम करणारे होते. आपण पोर्तुगिजांच्या इन्क्विझिशन म्हणजे धर्मसमीक्षणाबद्दल भरभरून बोलतो. पण गोव्यातील गावडा, कुणबी आणि वेळीप या मूळ बांधवांवर एक संस्कृतीकरण लादले गेले. त्याबद्दल आपण सोयीस्कर मौन बाळगतो.

डॉ. डी. डी. कोसंबी आणि प्रा. अ. का. प्रियोळकर यांनी याचा सखोल अभ्यास केला आहे. त्यांच्या विचारधारेतून एक गोष्ट स्पष्ट होते. इन्क्विझिशन आणि संस्कृतीकरण या वरवर दोन भिन्न प्रक्रिया वाटतात. पण या दोन्ही प्रक्रियांनी गोव्याच्या बहुजन समाजाला विस्थापित केले. या दोघांमध्ये एक अस्वस्थ करणारे साम्य दडलेले आहे. या दोन्ही प्रक्रियांमधील सर्वात मोठे साम्य म्हणजे धार्मिक मध्यस्थांची मक्तेदारी.

यामुळे मूळ पूजापद्धतीचे मोठे अवमूल्यन झाले. पोर्तुगिजांनी इन्क्विझिशनच्या माध्यमातून कठोर कायदे केले आणि मंदिरे पाडली. त्यांनी दहशतीचा वापर करून लोकांना त्यांच्या परंपरेपासून तोडले. परमेश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी चर्च आणि पाद्री यांची मध्यस्थी त्यांनी सक्तीची केली. संस्कृती करणाच्या प्रक्रियेतही नेमके हेच घडले. डॉ. कोसंबी यांच्या नोंदीनुसार, इथले मूळ भूमिपुत्र उघड्यावर निसर्गाची पूजा करत. ते वारूळ किंवा तांदळ्याची थेट भक्ती करत असत. पण जेव्हा वैदिक व्यवस्था आली, तेव्हा त्याच उघड्या वारुळांवर भव्य मंदिरे उभी राहिली. वारुळाच्या रूपात पुजली जाणारी सातेरी देवी शांतादुर्गा बनली. त्यामुळे देवाला भेटण्यासाठी विशिष्ट संस्कृत मंत्रांची सक्ती झाली. तसेच पुजाऱ्यांची आवश्यकता निर्माण झाली.

परिणामी भूमिपुत्रांचा ग्रामदेवतेशी असलेला थेट संवाद तुटला. त्याला स्वतःच्याच देवाच्या दर्शनासाठी नव्या पुरोहित वर्गावर अवलंबून राहावे लागले. दुसरे आणि सर्वात विदारक साम्य म्हणजे आर्थिक अधिकारांचे झालेले खच्चीकरण. इन्क्विझिशनचा मुख्य उद्देश केवळ धर्मप्रसार नव्हता. स्थानिक लोकांची संपत्ती आणि जमिनी हडप करणे हाही त्यामागील हेतू होता. संस्कृतीकरणाच्या प्रक्रियेतही मूळ भूमिपुत्रांची आर्थिक सत्ता अशीच संपुष्टात आली. गोव्यातील खाजन जमिनी आणि डोंगराळ भागातील कुळागरे इथल्या आदिवासी बांधवांनी फुलवली होती. येथील मूळ समाजाने यासाठी रक्ताचे पाणी केले होते.

तेच या गावकारी म्हणजे कोमुनिदाद व्यवस्थेचे मूळ मालक होते. मात्र नंतर जातिव्यवस्था आणि नवी सामाजिक उतरंड प्रबळ झाली. तेव्हा या मूळ मालकांना गावकारीच्या अधिकारातून पद्धतशीरपणे बेदखल करण्यात आले. सासष्टीसारख्या भागातील जुन्या महसुली नोंदी याला साक्ष आहेत. १५२६च्या फोराल दे अफोन्सो मेक्सिया या कायद्याने नव्या उच्चवर्णीय गावकारांना कायदेशीर मालक म्हणजे जणकार बनवले. ज्यांनी या जमिनी फुलवल्या, ते भूमिपुत्र नव्या व्यवस्थेत दुय्यम ठरले. ते स्वतःच्याच गावात केवळ कूळ म्हणजे शेतमजूर आणि मुंडकार बनून राहिले. इतकेच नव्हे, तर त्यांना देवस्थानांच्या जमिनींवर राबण्यासाठी सेवक बनवले गेले.

परंपरेची सेवा या नावाखाली त्यांना विनामोबदला राबवले गेले. पोर्तुगिजांनी हे लष्करी बळाचा वापर करून केले. तर संस्कृतीकरणाने हे काम कागदोपत्री आणि जातिव्यवस्थेतून साध्य केले. हा इतिहास केवळ पुस्तकांत दडलेला नाही. आजही गोव्याच्या परंपरेत त्याचे जिवंत पुरावे पाहायला मिळतात. आज गोव्यातील म्हार्दोळच्या म्हाळसा किंवा प्रियोळच्या मंगेशी देवस्थानात याची प्रचिती येते. उत्सवाच्या वेळी पहिले नवं अर्पण करण्याचा मान गावडा समाजाला असतो. रथाचा दोर ओढण्याचा त्यांचा अधिकार दिल्याशिवाय उत्सव पुढे सरकत नाही. याचे सर्वात ज्वलंत आणि कृतज्ञतेचे उदाहरण म्हणजे कवळे येथील श्रीशांतादुर्गा देवस्थान.

थोडक्यात सांगायचे तर, पोर्तुगिजांचे इन्क्विझिशन हा एक हिंसक वसाहतवाद होता. पण संस्कृतीकरण हादेखील गोव्यातील भूमिपुत्रांवर लादलेला एक छुपा वसाहतवादच होता, हे आपण आता ठामपणे मान्य करायला हवे. संस्कृतीकरणाने रक्ताचे सडे पाडले नसतील, पण त्याने इथल्या मूळ मालकांची ओळख, त्यांचे जमिनीवरील हक्क आणि स्वाभिमान पद्धतशीरपणे हिरावून घेतला. त्यांनी फुलवलेल्या मातीतच त्यांना दुय्यम नागरिक बनवले. गोव्याचा इतिहास वाचताना आपण पोर्तुगिजांच्या इन्क्विझिशनला परकीय आक्रमण म्हणून सहज नावे ठेवतो. पण संस्कृतीकरणाच्या नावाखाली या व्यवस्थेने इथल्या भूमिपुत्रांना त्यांच्याच देवापासून आणि जमिनीपासून कायमचे बेदखल केले. मग शेकडो वर्षे चाललेल्या या स्वकीय वसाहतवादाला आपण आज काय नाव देणार? याबद्दल गौतम खट्टर बोलणार नाही, पण मग गोव्यातील गावडा समाज हा इतिहास सहज विसरून जाईल का?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर 'दक्ष'ची गरुडझेप! परिस्थितीशी झुंज देत गाठलं यश, आता ध्येय 'सीए' होण्याचं, पण आर्थिक मदतीची प्रतीक्षा

Handshake Controversy: 'हॅन्डशेकसाठी आम्ही भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुमपर्यंत गेलो', सलमान अली आगाचा खुलासा; क्रिकेट विश्वाचं वेधलं लक्ष VIDEO

Goa Crime: पोलिस कोठडीत मारहाणीमुळे तरुणाची आत्महत्या, वाळपई तणाव; पोलीस उपनिरीक्षकावर कारवाईसाठी कुटुंबीय आक्रमक

नेपाळच्या 'दीपेंद्र'चा मोठा धमाका! सलग दोनदा 6 चेंडूत 6 षटकार ठोकल्यानंतर आता वनडेत रचला अनोखा इतिहास; गोलंदाजांची उडवली दाणादाण

Goa Drug Case: राहत्या घरी 'गांजा'ची शेती! थिवीच्या रहिवाशाला कोर्टानं सुनावली सक्तमजुरी आणि दंडाची शिक्षा; सव्वाचार वर्षे चालला खटला

SCROLL FOR NEXT