Toyyaar Lake Chimbel | Chimbel Wetland Goa Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Chimbel Toyyar Wetland: पोर्तुगीज काळापासून पणजीला पाणी देणारा ‘व्हडाचे मांड’, चिंबलातील ‘तोय्यार’चे महत्त्व

Chimbel Toyyar Lake: अरबी समुद्र आणि मांडवी नदीची खाडी या गावापासून जवळ असून उभा दांडा येथे उगम पावणारी चिंबल नदी पुढे मांडवी नदीशी एकरूप होत असल्याने कधीकाळी हा गाव जलमार्गामुळे इतर प्रांतांशी जोडलेला होता.

गोमन्तक डिजिटल टीम

अ‍ॅड. सूरज मळीक

तिसवाडी तालुक्यातील चिंबल हा गाव पणजी शहरापासून ६ किलोमीटर अंतरावर वसलेला आहे. अरबी समुद्र आणि मांडवी नदीची खाडी या गावापासून जवळ असून उभा दांडा येथे उगम पावणारी चिंबल नदी पुढे मांडवी नदीशी एकरूप होत असल्याने कधीकाळी हा गाव जलमार्गामुळे इतर प्रांतांशी जोडलेला होता.

जुने गोवेहून पणजीला जाताना पानवेली गावाहून पुढे लागणारा महामार्ग चिंबल गावामधून जातो. महामार्गाच्या उजव्या बाजूला दूरवर मांडवी नदी दृष्टीस पडते तर येथून डाव्या बाजूने ६०० मीटर अंतरावर ‘तोय्यार’ नामक पाणथळ आहे.

समुद्र सपाटीपासून ८० ते ९० मीटरपेक्षा उंचावर असलेल्या कदंब पठाराच्या पायथ्याशी कारो, कुमयो, आंबा, भेरली माड यांसारख्या वृक्षांनी समृद्ध असलेल्या डोंगराच्या कुशीत चिंबल गाव वसलेला आहे.

गोवा राज्य सरकारने तोय्यार नामक ५१,०८५ चौ. क्षेत्रफळ जलाशयाला पाणथळ यादीमध्ये समाविष्ट केलेले आहे. पाणथळ म्हणजे असा भूभाग जेथे वर्षाचे बहुतांश महिने किंवा बाराही महिने पाणी साचलेले असते. येथे विशेषत स्थानिक पक्ष्यांबरोबर हिवाळ्यात स्थलांतरित होऊन आलेले पक्षी आश्रय घेतात.

सकाळ ते संध्याकाळ कुठल्याही क्षणी हा पाणथळ पक्ष्यांच्या विविध आवाजांनी गजबजलेला असतो. ‘ग्रीन बी ईटर’सारखे पक्षी हवेत घिरट्या घेत शांतपणे कीटकांना पकडताना आढळतात; तर ‘ब्राह्मणी काईट’, ‘किंगफिशर’ यांसारख्या पक्ष्यांची नजर पाण्यातील माशांकडे लागलेली असते. काही पक्षी तर पाण्याला स्पर्श करत अगदी पाण्याला टेकून उडत आनंद लुटतात.

विस्तीर्ण पसरलेले कदंब पठार कातळांनी युक्त आहे. कातळाला मुरुड दगड अशी संज्ञा आहे. मान्सूनमध्ये कोसळलेल्या मुसळधार पावसाचे पाणी कातळामध्ये मुरते त्यामुळे भूगर्भातील पाण्याचा स्तर जुलै ऑगस्ट महिन्यांपर्यंत वाढलेला असतो.

त्यामुळे खालच्या भागास असलेल्या तोय्यार पाणथळाच्या कडेने विविध ठिकाणाहून पाझर फुटतात आणि पाणथळ तुडुंब भरते. येथे एकदा साचलेले पाणी अगदी एकसारख्या प्रवाहात बाहेर पडते. तेव्हा भूगर्भातून वर आलेले पाणी नितळ आणि निर्मळ बनते. तोय्यार हे पाणथळ कधीकाळीपासून येथील लोकमानसाला पेयजल आणि सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देत आलेले आहे.

भर पहाटे किंवा संध्याकाळी या तळ्याच्या सभोवतालच्या परिसरात दूरवरून कुणी तरी संथ लयीत शीळ घालत असल्यासारखा मधुर आवाज कानावर पडतो. हा आवाज विशेषत: जंगल वाटेने जाताना नदी, झरे, ओहोळाच्या ठिकाणी ऐकायला मिळतो.

हा आवाज आहे ‘मलबार शिळकरी कस्तुर’ या पक्ष्याचा. पणजीसारख्या शहराच्या कुशीत चिंबल येथे या पक्ष्याचा आवाज ऐकायला मिळणे म्हणजे हा गाव आजही निसर्ग आणि पर्यावरणीयदृष्ट्या समृद्ध असल्याची तो जणू सूचना देत असतो. गोव्यात ‘रडूऽऽ नको बाळा पाऽऽपी देतो’ असे बोल तो उच्चारत असल्याचे सांगितले जाते.

कधीकाळी आपण लागवड केलेल्या भात शेतीतून मिळालेल्या अन्नाचे सेवन करून हा गाव कृषिप्रधान व आत्मनिर्भर बनला होता. पावसाळ्यानंतर येथील कष्टकरी समाज वायंगणी शेती करायचा.

तोय्यार पाणथळाबरोबर त्याच्या एका बाजूला असलेल्या ‘काऱ्याचा मांड’ नामक डोंगरातून प्रवाहित होत असलेल्या झऱ्याचे पाणी माती व दगड धोंडे वापरून नियोजनबद्ध आपापल्या भाजीमळ्यात तसेच शेतात नेले जायचे.

शेती व्यवसायाबरोबर गाई गुरांचे पालन पोषणही ते करायचे. त्यामुळे त्यांना चरण्यासाठी सकाळसंध्याकाळ डोंगरावर नेणे हा त्यांचा नित्य नियम बनलेला होता. येथील चविष्ट गवताचे सेवन केल्याने गाई पौष्टिक आणि चविष्ट दूध द्यायच्या. दुधाची विक्री करून त्यांना आर्थिकदृष्ट्या आधार लाभला होता.

झाडाझुडपांमधून पायवाटेने प्रवास करत असताना एखाद्या काटा पायात रुतला तर रूमडाचा चीक घालून काटा सहज काढला जायचा. हे पारंपरिक ज्ञान आजही या गावातील शिरेत येथील कष्टकरी लोकमानसाकडे आहे.

वृक्षापासून उपलब्ध होणाऱ्या औषधी घटकाबरोबर एखाद्या जागेची ओळख पटवून देण्यासाठी वृक्षांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तोय्यार पाणथळाच्या डाव्या बाजूने असलेल्या डोंगराला ‘कारो’ नामक वृक्षावरून ‘काऱ्याचा मांड’ असे नाव पडले.

उजव्या बाजूला ‘रानान’ व मध्ये असलेल्या डोंगराला ‘इलबिनान’ असे नाव आहे. आज जरी हा जलाशय तोय्यार म्हणून प्रसिद्ध असला तरी पूर्वी त्याला ‘व्हडाचे मांड’ या नावाने ओळखले जायचे. मांड म्हणजे काही अंतरावर सपाट असलेली जागा असा अर्थ सांगितला जातो. जलाशयाच्या प्रत्येक भागाला असलेल्या नावावरून गावातील लोकमानसाचा या जलाशयाशी असलेला परस्पर संबंध दिसून येतो.

या पाणथळाचे दर्शन घेण्यासाठी डोंगरमाथ्यावर चढावे लागते. वर पोहोचल्या पुढच्या दिशेने खाली पाहिल्यावर त्याचे विहंगम दृश्य पाहता येते. पावसाळ्यानंतर चारही बाजूंनी उभ्या असलेल्या हिरवळीने नटलेल्या डोंगरामुळे हे तळे अधिक प्रेक्षणीय दिसते.

पायथ्याशी सुरू होणाऱ्या मार्गाच्या सुरुवातीलाच सुरंगीचे वृक्ष नजरेस पडतात. गावातील चिंबल ग्राम पंचायत कार्यालयाच्या सभोवताली सुरंगीची झाडे आजही राखून सुरक्षित ठेवलेली आहेत. हे वृक्ष गोव्यात खूप कमी ठिकाणी आढळतात. उन्हाळ्यात जेव्हा या वृक्षाला फुलांचा बहर येतो तेव्हा या पाणथळाकडे जात असताना ही फुले आपल्या अतिशय तीव्र सुगंधाने येणाऱ्या जाणाऱ्यांना भारावून टाकतात.

नवदुर्गा, मल्लिकार्जुन, कामाक्षी, सातेरी, जल्मी, भगवती, चिमुलकरीण, रामनाथ या दैवतांचे उपासक असलेल्या लोकमानसाला त्यांनी जगण्यासाठी प्रेरणा दिली. चिंबल हा गाव जेव्हा पोर्तुगीज अमदानीत होता तेव्हा तो काळ धार्मिक छळवादाचा होता.

पोर्तुगिजांनी धर्मांतराचे षड्यंत्र आरंभले तेव्हा ‘मोडेन पण वाकणार नाही’ अशा तर्‍हेचे विचार त्यांच्यात प्रज्वलित झाले. धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणार्थ ते आपल्या दैवतांसोबत विशेषत: नव्या काबिजादीतील काणकोण, फोंडा, सत्तरी यांसारख्या प्रदेशात जाऊन स्थायिक झाले.

गोवा मुक्तीच्या पाच दशकांपूर्वी पणजी शहराला गोडे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी तोय्यार पाणी थेट पणजीमध्ये नेण्याचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर या जलाशयाला तळ्याचे स्वरूप लाभले तेव्हापासून त्याला तळे असे नाव पडले. पोर्तुगीज कारकिर्दीत या डोंगराच्या पायथ्याशी एखादा माणूस चालत आत जाऊ शकतो अशा तर्‍हेचा अद्भुत भुयारी मार्ग बनवलेला पाहायला मिळतो.

येथून खाली असलेल्या भागात आजही पावसाळ्यात भेंडी, पडवळ, तांबडी भाजी तर उन्हाळ्यात विशेष करून घोसाळ्याची लागवड केली जाते. उन्हाळ्यात सुरंगीचा सुगंध तर पावसाळ्यात शिळकरी कस्तुराचे मधुर बोल आपल्याला वेगळ्याच विश्वात घेऊन जातात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs SA 1st Test: 15 वर्षांची 'दहशत' संपुष्टात! आफ्रिकेनं पहिल्या कसोटी सामन्यात भारताला नमवलं, 30 धावांनी पराभव

History of Bread: 14000 वर्षांपूर्वी बनलेला पाव, रुजला गोमंतकीयांच्या खाद्यसंस्कृतीत; जगभरात त्याचे किती आहेत प्रकार? वाचा..

Kunbi Kirat Kathiyawadi: पारोडा टेकडीवरील आजचा भूतनाथ हा त्या मूळ वेळीप देवतेचा अवशेष असावा; गुंतागुंतीचा इतिहास

Fishing Women India: ‘जाय गे'? डोक्यावर ‘पाटलो’ आणि मासळी घेऊन दारोदारी सकाळी येणारी ‘नुस्तेकान्नी’; सागरकन्येचा संघर्ष

‘सुपरस्पेशलिटी’ हॉस्पिटलमध्ये नेत्यांचे सर्व विशेष उपचार केल्याने, जनतेच्या हॉस्पिटलांमध्ये खाटा मोकळ्या राहतील, ही काय कमी समाजसेवा आहे?

SCROLL FOR NEXT