Rama Kankonkar Assault Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Rama Kankonkar: ‘पुरावा नाही’, ‘साक्षीदार फिरले’ हेच पुन्हा ऐकावे लागणार का? 'जेनिटो' यावेळीही सुटणार का?

Jenito Cardozo Arrest: लोकशाही हा जनतेचा राज्यप्रकार. त्याची अलिकडे सातत्‍याने पायमल्ली होत आहे. मातब्बर शक्ती गुन्हेगारांशी हातमिळवणी करतात, ज्यायोगे स्थानिक स्तरावर दहशत वाढते.

गोमन्तक डिजिटल टीम

लोकशाही हा जनतेचा राज्यप्रकार. त्याची अलिकडे सातत्‍याने पायमल्ली होत आहे. मातब्बर शक्ती गुन्हेगारांशी हातमिळवणी करतात, ज्यायोगे स्थानिक स्तरावर दहशत वाढते आणि कायदा व सुव्यवस्था कमजोर बनते. देशभर कमीअधिक प्रमाणात दिसणारी ही स्थिती गोव्यासाठी अपवाद ठरावी, अशी गोमंतकीयांची इच्छा आहे.

रामा काणकोणकरांवरील प्राणघातक हल्ल्यानंतर व्यक्त झालेल्या जनभावना त्याची साक्ष देण्यास पुरेशा आहेत. खरे तर हल्ला प्रकरणाच्या दोन्ही बाजूंचा लोकांना पुरता अंदाज आला आहे. म्हणूनच कुख्यात गुंड अशी पार्श्वभूमी लाभलेल्या जेनिटो कार्दोजला गजाआड केल्यानंतर रवि नाईक यांची आठवण काढणाऱ्या कित्येकांनी मुख्यमंत्री सावंत यांची मनोमन तारीफ केली. परंतु जेनिटोचा ह्या प्रकरणात खरंच हात आहे, हे पोलिसांना सिद्ध करता आले तरच कौतुकाला अर्थ राहील.

भक्कम पुरावे गोळा करण्यासह जामिनाला अटकाव करण्याचे आव्हान पोलिसांसमोर असेल. अपयश आल्यास पाणी गळ्याशी आल्याने ‘ते’ उचललेले पाऊल होते, असा अर्थ निघेल. ज्यांच्यावर हल्ला झाला ते काणकोणकर काय जबाब देतात ह्यावरही बरेच काही अवलंबून आहे. काणकोणकरांना सत्य कथनाचे धाडस दाखवावे लागेल. जेनिटो कार्दोज हे नाव गेल्या सतरा वर्षांत गुन्हेगारी वार्तापत्रांत वारंवार झळकले आहे.

आंदोलकांवरील हल्ल्यापासून ते खून प्रकरणांपर्यंत; तसेच खंडणी, गोळीबार आणि तडीपार आदेशापर्यंत त्याची गुन्हेगारी वाटचाल राहिली आहे. तथापि, कायद्यातील पळवाटा शोधून तो पुन्हा बाहेर आला. (ज्यांनी त्याला सहीसलामत सोडवले, त्यांनाही पुढे पश्चात्ताप करावा लागला.) २००८ साली आयरिश रॉड्रिग्ज व प्रजल साखरदांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्यात जेनिटो प्रमुख आरोपी होता, तेव्हा त्याचे वय होते केवळ २० वर्षे.

२०१५मध्ये पुराव्याअभावी त्याची निर्दोष सुटका झाली. तत्पूर्वी २०१३मध्ये राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली त्याला डांबण्यात आले. पण, अटक प्रक्रियेत त्रुटी आढळल्या व उच्च न्यायालयात तो आदेश रद्द ठरला. तेथून अनेक गुन्ह्यांत जेनिटोचा सहभाग असल्याचे आरोप होत राहिले. परंतु ‘पुरावा नाही’, ‘साक्षीदार फिरले’, हीच वाक्ये वारंवार न्यायालयीन आदेशांत उमटत आली. करंजाळे हल्ला प्रकरणात जेनिटो पोलिस कोठडीत आहे. मात्र, लोकांच्या मनात एकच प्रश्न आहे, तो यावेळीही सुटणार का?

जेनिटोचा गुन्हेगारी प्रवास हा इतिहास नाही तर कायदा सुव्यवस्थेतील त्रुटींचा उंचावत गेलेला आलेख मानला जातो. गोव्यात कधीकाळी गुंडांना राजकीय नेत्यांच्या सावलीचा आधार घ्यावा लागत असे. अलीकडे गुंडांनीच राजकीय क्षेत्र व्यापणे पसंत केलेय. भविष्यात जेनिटोलाही राजकीय क्षेत्रात यावेसे वाटल्यास नवल नसावे. त्याचे भविष्य कसे रेखावे हे गृहखात्याच्या हाती आहे. धनवान असो वा सर्वसामान्य.

अन्याय होत असल्यास, कुणी ‘ब्लॅकमेल’ करत असल्यास पोलिसांत धाव घेण्याऐवजी गुंडांचे साह्य घ्यावेसे वाटत असल्यास ते पोलिसांचे अपयश ठरते! म्हणूनच पोलिसांची जबाबदारी वाढते. गुंडांना शासन व लोकांचा विश्वास दोन्ही मिळवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करावी लागेल. हा बट्टा केवळ पोलिस खात्यासच नव्हे तर गोव्यालाही लागला आहे, याचे भान ठेवून पुढील पावले उचलावी लागतील.

आरोपपत्र दाखल करून खटला उभा राहतो इथपासून दोषीस शिक्षा होईल, असा निकाल लागेपर्यंत प्रत्येक स्तरावर पोलिसांचा कस लागेल. ‘सोडवण्यासाठीच पकडतो’, हा दिलासा गुंडांना मिळत असेल तर कसे व्हायचे? होत असलेले कौतुक सार्थ करण्याची ही संधी पोलिसांना निश्चितच आहे. पोलिसांना स्वत:ची प्रतिमा सुधारण्याची आणि लोकशाही हे जनतेचे राज्य आहे, याचा विश्वास स्वत:त आणि लोकांत निर्माण करण्याचीही ही नामी संधी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dinesh Karthik Captain: टीम इंडियाची कमान दिनेश कार्तिककडे: 'या' मोठ्या स्पर्धेत करणार नेतृत्व, भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांचे लक्ष

‘त्या’ मास्टरमाईंडलाही अटक करा! दक्षिण गोवा भाजपच्या माजी खासदाराची पोस्ट चर्चेत

"अशिक्षित आहात, म्हणूनच तुम्हाला सीमेवर पाठवलं", सैनिकाशी वाद घालणाऱ्या महिलेचा Video Viral; टीकेच्या वादळानंतर मागितली माफी

डिकॉस्ता X गावकर! गोवा विधानसभेच्या सभापतीपदासाठी सत्ताधाऱ्यांकडून गणेश गावकर मैदानात

Goa Politics: भाजपा आपामंदी पेटलें..

SCROLL FOR NEXT