Goa Congress Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Goa Congress: गोव्यात काँग्रेस संपणार की पुन्हा उभारी घेणार? अस्तित्वाच्या आणि विश्वासार्हतेच्या सर्वात मोठ्या आवर्तनात पक्ष!

Goa Opposition Politics: गोव्याच्या राजकारणात काँग्रेस पक्ष सध्या एका मोठ्या अस्तित्वाच्या अन् विश्वासार्हतेच्या आवर्तनातून जात आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

यशवंत सावंत

गोव्याच्या राजकारणात काँग्रेस पक्ष सध्या एका मोठ्या अस्तित्वाच्या अन् विश्वासार्हतेच्या आवर्तनातून जात आहे. २०१७ च्या सत्तेचा सोपान गाठण्याच्या संधीचे सोने करण्यात आलेले अपयश असो वा २०२२ नंतर झालेली आमदारांची दलबदलू पळवापळव; या घटनांनी सामान्य मतदारांच्या मनात काँग्रेसबद्दल एक खोल अविश्वास निर्माण केला आहे.

पुन्हा एकदा गिरीश चोडणकर यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली असली, तरी पक्षापुढचा खरा प्रश्न केवळ संघटनात्मक नसून, लोकांचा गमावलेला ‘विश्वास’ पुन्हा संपादित करण्याचा आहे. २०१७ मध्ये १७ जागा जिंकूनही सत्तेपासून दूर राहिलेल्या काँग्रेसला गोमंतकीयांनी एक मोठी संधी दिली होती. मात्र, त्यानंतर झालेला आमदारांचा ‘आयाराम-गयाराम’ प्रकार आणि विशेषतः २०२२ च्या निवडणुकीनंतर झालेली ८ आमदारांची भाजपवारी, यामुळे काँग्रेस पक्ष पूर्णपणे हतबल असल्याचे चित्र निर्माण झाले.

चोडणकरांपुढील ‘अग्निपरीक्षा’

गिरीश चोडणकर यांनी यापूर्वी आपल्या अपयशाची नैतिक जबाबदारी स्वीकारली होती, ही त्यांच्या जमेची बाजू मानली जात आहे. मात्र, आता त्यांच्यासमोरचे आव्हान अधिक कठीण आहे. लोकांच्या मनात रुजलेला ‘काँग्रेस म्हणजे फुटिरांचा पक्ष’ हा शिक्का पुसून टाकणे हे त्यांच्यासाठी मोठे आव्हान आहे.

जोवर काँग्रेस पक्ष आपल्या ‘व्यवस्थापन दोषांचे’ प्रामाणिक विश्लेषण करून मतदारांसमोर येत नाही, तोपर्यंत केवळ राजकीय हालचालींनी मतदारांचे समाधान होणे कठीण आहे. गोव्यातील जनता आता आश्वासनांपेक्षा ‘कृती’आणि ‘स्थिरतेची’ वाट पाहत आहे. जर काँग्रेसने याही वेळी केवळ जुन्याच चौकटीतून काम केले, तर पक्षाची ‘विश्वासार्हता’ शून्यावर येण्याची भीती नाकारता येत नाही.

लढाई स्वतःच्या प्रतिमेशी

गोव्यात काँग्रेसची लढाई ही केवळ भाजपच्या विरोधातली नसून, ती स्वतःच्या प्रतिमेशीही आहे. गिरीश चोडणकर हे पुन्हा एकदा पक्षाला उभारी देतात की, जुन्याच चुका सुधारण्याच्या चक्रात अडकून पडतात, यावरच गोव्यातील काँग्रेसचे भवितव्य अवलंबून आहे. आता ‘विश्वासार्हता’ या एकाच मुद्द्यावर काँग्रेसचा पुढचा प्रवास निश्चित होणार आहे. त्यांना पक्षाचे प्रामाणिक कार्यकर्ते व उमेदवार तयार करावे लागतील. स्वतः निवडणूक लढवण्याच्या प्रयत्नात त्यांना शक्ती खर्च न करता संघटनात्मक कामात झोकून द्यावे लागेल.

तीच व्यवस्था तारू शकेल का?

लोकांचा सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, ज्या आमदारांना लोकांनी निवडून दिले, त्या आमदारांच्या मनातली खलबते काँग्रेस नेतृत्वाला आणि व्यवस्थापनाला का समजली नाहीत? जर माहिती होती, तर त्यांना रोखण्यात प्रदेश पक्षनेतृत्व अपयशी का ठरले? या प्रश्नांची उत्तरे आजही अनुत्तरित आहेत. पक्षाने प्रदेशाध्यक्षपदावर फेरबदल केले आहेत. चोडणकर यांच्याकडे पुन्हा सूत्रे सोपवली असली तरी, लोकांच्या मनात एक मूलभूत शंका आहे ‘जी समिती आणि व्यवस्थापन जुन्या अपयशाचे साक्षीदार होते, तीच व्यवस्था पुन्हा काँग्रेसला तारू शकेल का?’

प्रामाणिक हेतू तपासणार कसा?

कार्यकर्ते अनेक आहेत, हवशे-गवशे शेकडो असतात. तसेच निवडणुकीला तयार वर्गही मोठ्या प्रमाणावर आहे. हे सर्व कॉंग्रेसचा शिडीसारखा वापर करू शकतात. अनेक नेते भाजपातही असे आहेत, जे कॉंग्रेसच्या उमेदवारीवर दावा करून ऐनवेळी दगा करू शकतात. काही राजकीय पक्ष, मगोपही कॉंग्रेसचा वापर करू शकते. कॉंग्रेस स्वतःची प्रज्ञा वापरून यामधून वेगळी वाट चोखाळू शकेल, लोकांच्या मनात विश्‍वास निर्माण करू शकेल का, हा प्रश्‍न आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT