Goa Carnival cultural significance and modernization
ऑगस्टो रॉड्रिग्ज
कार्निव्हलचा शेवटचा दिवस आहे. मुळात हा उत्सव गोव्याचा नाही परंतु स्थानिकांनी तो उत्साहाने स्वीकारलेला असल्यामुळे अजूनही तो प्रभावी आहे आणि त्याला देशी स्पर्श आहे. कार्निव्हल ही शुद्ध मौज आहे हे आपण प्रथम समजून घेतले पाहिजे. सुरुवातीच्या काळात चार दिवस चालणारा हा उत्सव लोकांचा होता. लोक एकत्र येत होते आणि आपसात हसत-खेळत हा उत्सव साजरा करत होते. मात्र हळूहळू बरेच काही बदलत गेले.
पन्नास वर्षांपूर्वी गोव्यातील खेड्यात, कार्निव्हलच्या काळात एकमेकांवर पाणी फेकले जात असे आणि एकमेकांच्या चेहऱ्यावर पावडर फासली जात असे. दिवसभर लहान मोठे गट यायचे, रंगाचा आणि पाण्याचा शिडकावा व्हायचा, नाटिका सादर व्हायच्या, स्थानिक खाद्य आणि पेये वाटली जायची.
त्या साऱ्यात एक प्रकारची मजा असायची, हास्यविनोद असायचा. दिवसाच्या शेवटी सार्यांचे केस आणि कपडे रंगीत बनलेले असायचे. अनेकदा शाळेत जाणाऱ्या मुलांच्या दप्तरांमध्ये रंग घुसायचा आणि आतील पुस्तकांनाही रंगीत करायचा, कुणाचा धर्म किंवा जात विचारली जात नसे. त्या वेळेत केवळ आनंदी भावनांकडे सार्यांचे लक्ष केंद्रित झालेले असायचे.
कार्निव्हल हा मूळ ब्राझीलमधील असा एक उत्सव आहे ज्याची नक्कल जगात कुठेही होऊ शकणार नाही कारण तो तिथल्याच नैतिकतेशी जुळणारा उत्सव आहे. आमचा कार्निव्हल हे त्याचे खूप दूरचे अनुकरण आहे. किंग मोमो, फ्लोटस, परेड हे शब्दही गोव्यात सुरुवातीच्या काळात कोणाला ठाऊक नव्हते.
ब्राझीलमधील चार दिवसांच्या दिमाखदार कार्निव्हलची छायाचित्रे आणि कथा गोव्यात पोचल्यानंतर कधीतरी किंग मोमो गोव्यात प्रकट झाला. किंग मोमो आल्याबरोबर कार्निव्हलमध्ये पैसा वाहू लागला, त्यात व्यावसायिकता आली आणि वर्षे लोटू लागली तशी कार्निव्हलमधली निरागस मजाही आटू लागली. आज या उत्सवात गुंतलेल्या पैशांकडे कोणी पाठ फिरवू इच्छित नाही.
आज कार्निव्हल निव्वळ पर्यटकांना आकर्षित करणारा उत्सव बनला आहे. त्यातील शुद्ध मौज-मजेचा अंश हरवला आहे किंवा हरवण्याच्या मार्गावर आहे. त्यातील ‘गुड टाइम्स’चा घटक आम्ही राखला नाही तर हा उत्सव केवळ गोंधळ बनून राहणार आहे. ग्रामीण भागातील गावकऱ्यांनी रचलेला हा उत्सव शहरात नेणे हेच चुकीचे होते. कार्निव्हल हा देखावा नाही तर तो भावनांचा आविष्कार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.