Digambar Kamat Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Goa Politics: दिगंबर कामतांच्या मंत्रिपदाचा भाजपला किती फायदा?

Digambar Kamat: दिगंबर हे मुरब्बी नेते म्हणून ओळखले जातात. त्यांना मुख्यमंत्रिपदाचाही चांगला पाच वर्षांचा अनुभव आहे. त्यामुळे ते या आव्हानांना पुरून उरतील अशी आशा बाळगायला हरकत नसावी.

Sameer Panditrao

मिलिंद म्हाडगुत

शेवटी आज, उद्या करता करता मंत्रिमंडळाचा एकदाचा विस्तार झाला. विस्तार म्हणण्यापेक्षा या प्रक्रियेला पर्यायी व्यवस्था म्हणणे जास्त संयुक्तिक ठरू शकेल. गोविंद गावडेंच्या जागी रमेश तवडकर आले, तर आलेक्स सिक्वेरांच्या जागी दिगंबर कामत. गोविंद यांना आधीच डच्चू देण्यात आला होता तर आलेक्सांना आरोग्याच्या कारणामुळे मंत्रिपद सोडावे लागले.

तसे पाहायला गेल्यास आलेक्सांना मंत्रिपद देऊन भाजपला काहीही फायदा झाला नाही. त्यांना मंत्रिपद दिल्यानंतर दक्षिणेतील कॅथलिक समाज भाजपच्या बाजूने वळेल अशी भाजपची समजूत होती. पण गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत आलेक्सांच्या नुवे मतदारसंघातसुद्धा भाजपला स्थान मिळू शकले नाही.

तिथे काँग्रेसला तब्बल तेरा हजारांची आघाडी मिळाली. खरे तर तेव्हाच आलेक्सांचे मंत्रिपद जाणार हे निश्चित झाले होते. फक्त त्याला मुहूर्त मिळत नव्हता एवढेच. आता त्यांच्या जागी आलेल्या दिगंबरामुळे भाजपला काय फायदा होऊ शकतो हे यामुळेच बघावे लागेल.

दिगंबर हे माजी मुख्यमंत्री. २००७साली रवि नाईक व प्रतापसिंग राणे यांच्या ‘तू तू मै मै’मुळे तडजोडीचा आमदार म्हणून दिगंबरांची मुख्यमंत्रिपदी वर्णी लागली होती. आता रवि नाईकनंतर प्रमोद सावंत यांच्या मंत्रिमंडळात मंत्री झालेले दिगंबर हे दुसरे माजी मुख्यमंत्री.

तेरा वर्षांच्या कडक वनवासानंतर दिगंबरांना हे मंत्रिपद मिळाले असले तरी १९९४पासून ते मडगावचे आमदार आहेत हे विसरता कामा नये. सुरुवातीला भाजप व नंतर काँग्रेस आणि आता परत भाजप असा जरी त्यांचा प्रवास असला तरी सुरुवातीची १९८९ची निवडणूक वगळता ते अजूनपर्यंत तरी पराभूत झालेले नाहीत, हेही तेवढेच खरे आहे.

तसे पाहायला गेल्यास ते गेली तीन वर्षे भाजपमध्ये आहेतच. पण लोकसभा निवडणुकीत भाजपला त्याचा अजूनपर्यंत तरी मोठा फायदा झालेला नाही. मडगावतून भाजपला दहा हजार मतांची आघाडी मिळवून देणार, असे त्यावेळी दिगंबरांनी सांगितले होते.

पण प्रत्यक्षात भाजपला फक्त अकराशे मतांच्या आघाडीवर समाधान मानावे लागले. भाजपचा दक्षिण गोव्यात पराभव होण्यामागे हेही एक महत्त्वाचे कारण मानले जात आहे. खरे तर सासष्टी तालुका हा भाजपच्या दृष्टीने अजूनही डोकेदुखीच ठरत आहे. मागच्या खेपेला या तालुक्यातील नावेली मतदारसंघ भाजपला मिळाला असला तरी तो विजय तीन कॅथलिक उमेदवारांच्या मत विभागणीमुळे मिळाला होता, हे काही लपून राहिलेले नाही.

त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीचा विचार केल्यास सासष्टी तालुक्यात भाजपला एक तारणहार हवा आहे. तो तारणहार त्यांनी आलेक्साच्या रूपात शोधण्याचा प्रयत्न केला होता. पण हा प्रयत्न त्यांच्या अंगलट आला. आता ते दिगंबरांवर डाव लढवू पाहत आहेत.

दिगंबर हे माजी मुख्यमंत्री असल्यामुळे ते मंत्री झाल्यास संपूर्ण सासष्टी तालुक्यावर आपले वर्चस्व प्रस्थापित करू शकतील आणि त्याचा फायदा भाजपला मिळू शकेल अशी आशा भाजप बाळगून आहे. पण सासष्टी तालुक्यातील मतदारांच्या मानसिकतेचा विचार केल्यास ही आशा फलद्रूप होईल की नाही हे सांगणे सध्या तरी कठीण आहे.

त्याचबरोबर दिगंबरांना मंत्री केल्यामुळे मडगाव शेजारच्या फातोर्डा मतदारसंघावर तीर मारता येऊ शकेल असेही भाजपला वाटत आहे. सध्या या मतदारसंघावर विजय सरदेसाईंचा दबदबा आहे. त्यात परत नगरपालिकांच्या निवडणुकाजवळ येऊ लागल्या आहेत.

मडगाव नगरपालिकेवर कब्जा करायचा असेल तर विजय यांना शह देणे आवश्यक आहे हे भाजप नेते चांगले जाणून आहेत. मंत्रिपदाद्वारा दिगंबर हे काम करू शकतील, असे त्यांना वाटत आहे. यातून आगामी विधानसभा निवडणुकीत फातोर्डा मतदारसंघाचा गड काबीज करता येईल अशी अपेक्षा त्यांना वाटते आहे.

पण त्याचबरोबर दिगंबराना मंत्रिपद दिल्यामुळे मडगावतील भाजपचे मूळ कार्यकर्ते जे नाराज झाले आहेत तिथेही लक्ष द्यावे लागेल. परवा शपथविधीला झालेल्या गर्दीत बहुतेक जण हे दिगंबराबरोबर आलेले मूळचे काँग्रेस कार्यकर्ते होते. अर्थात हे चित्र आता राज्यातील बहुतेक मतदारसंघात दिसत आहे हेही तेवढेच खरे.

शपथविधीच्या वेळी दिगंबरांनी आम्ही भाजप परत सत्तेवर आणण्याकरता शर्थीचे प्रयत्न करू असे सांगितले असले तरी ते शपथविधीपुरते भाषण होते, की काय हे कळायला मार्ग नाही. तसे पाहायला गेल्यास गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपबरोबर दक्षिण गोव्यातील जवळजवळ सर्व धुरंधर नेते होते.

तरीसुद्धा ते दक्षिण गोव्याचा किल्ला काबीज करू शकले नाही. शेवटी सर्व जनतेच्या हाती असते हे विसरता कामा नये. ’ये पब्लिक है सब जानती है’ असे म्हटले आहे ते उगाच नव्हे. दिगंबरांचा मडगावबाहेर किती प्रभाव आहे याचे आकलन करणेही तसे कठीणच आहे.

त्याचप्रमाणे दिगंबर कामतींचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यामुळे लोकांना त्यांच्याच २००७साली स्थापन झालेल्या मंत्रिमंडळाची आठवण यायला लागली आहे. त्यावेळचे दिगंबर कामतींच्या सरकारातील बरेच मंत्री या मंत्रिमंडळात असल्यामुळे ही आठवण येणे साहजिकच आहे.

त्याचबरोबर एक मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा अपवाद सोडल्यास बाकीचे सर्व मंत्री हे पूर्व काँग्रेसवासी असल्यामुळे हे सरकार ‘काँग्रेसयुक्त सरकार’ असल्याचा दावाही काहीजण करू लागले आहेत. दिगंबरांचे मागच्या विधानसभा निवडणुकीवेळचे भाजपवर जहाल टीका करणारे भाषणही व्हायरल करण्यात आले आहे.

हे पाहता ‘जर तर’ची अनेक आव्हाने दिगंबरांपुढे आहेत यात शंकाच नाही. पण दिगंबर हे मुरब्बी नेते म्हणून ओळखले जातात. त्यांना मुख्यमंत्रिपदाचाही चांगला पाच वर्षांचा अनुभव आहे. त्यामुळे ते या आव्हानांना पुरून उरतील अशी आशा बाळगायला हरकत नसावी.

आता खरेच दिगंबर दक्षिण गोव्यात - खास करून सासष्टी तालुक्यात - भाजपला तारक ठरतात की नाही, भाजपच्या मूळ कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन काम करतात की नाही, याचे उत्तर येणारा काळच देईल एवढे मात्र निश्चित!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mhaje Ghar Yojana: "म्हज्या गोंयकारांक चवथीचें गिफ्ट" मुख्यमंत्र्यांची घोषणा! माझे घर योजनेतून 450 कुटुंबांना मिळणार मालकी हक्क

Modi Express For Ganeshotsav: 'कोकणात' जाऊचो आनंद काय वेगळोच... गणेशोत्सवासाठी 'मोदी एक्सप्रेस' धावली, नितेश राणेंचा रेल्वेत फेरफटका Watch Video

12 कोटी कॅश, 6 कोटींचे दागिने, १ कोटी परकीय चलन आणि अलिशान कार; काँग्रेस आमदाराला अटक, गोव्यात केली होती छापेमारी

फोटो द्या आणि कलात्मक चित्र मिळवा! गोव्यात सुरू झालाय 'मारियो मिरांडा'च्या शैलीत स्वतःचं चित्र बनवून देणारा उपक्रम

Goa News Live Update: गव्यांची दहशत! मये तलावाजवळ गव्याची कारगाडीला धडक

SCROLL FOR NEXT