दत्ता दामोदर नायक
भाजप २०१२ साली गोव्यात सत्तेवर आला. २०२७ मध्ये विधानसभा निवडणुका होतील तेव्हा भाजपच्या कारकिर्दीला १५ वर्षे पूर्ण होतील. २०२७ मध्ये विजयी झाल्यास भाजप २० वर्षे सत्तेवर असेल. कोणताही एकच पक्ष मग तो भाजप असू द्या किंवा कॉंग्रेस इतका काळ सत्तेवर असणे हितावह नाही.
भाजप सत्तेत असताना गेल्या १३ वर्षांत काही सकारात्मक गोष्टी आहेत. उदाहरणार्थ मोपा विमानतळ. कॉंग्रेसच्या कारकिर्दीत मोपा विमानतळ झाला असता का, यावर मी साशंक आहे. दुसरे योगदान म्हणजे मांडवीवरचा तिसरा पूल, नवा जुवारी पूल, काणकोण तालुक्यातले पूल व हमरस्त्यांची बांधणी. सरकारने ’म्हजें घर’ सारखी योजना राबवली.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे मृदू स्वभावाचे, नम्र आहेत. ते अहंमन्यतेने वागत नाहीत. आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात ते परिपक्व झाले आहेत. स्वपक्षातील व विरोधी पक्षांतील नेत्यांना पुरून उरले आहेत.
पण, त्याचबरोबर अनेक क्षेत्रांत नन्नाकार आहे. शिक्षणव्यवस्था सुधारली नाही. फार मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण झाला नाही. नवी औद्योगिक गुंतवणूक गोव्यात आली नाही. कृषी व मत्स्यक्षेत्रातील वाढ नगण्य आहे. कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे. भ्रष्टाचार वाढला आहे. नगरनियोजन कायद्यात बदल केल्याने कोणतीच छाननी न करता एका दिवसात शेतजमिनीचे, माळरानांचे, डोंगर उतारावरील जमिनीचे निवासी किंवा औद्योगिक वापरासाठी रूपांतर होऊ शकते, इतपत प्रशासकीय व्यवस्था भ्रष्ट झाली आहे.
या दोन्ही बाजूंची तुलना करता, मार्च २०२७च्या विधानसभा निवडणुकीत सत्तांतर होणे गोव्याच्या दृष्टीने जरुरीचे आहे.
निवडणुकीपूर्वी धर्मभिरू व देवभिरू भाजपने देवापुढे शपथ घ्यावी ’भाजपला २० पेक्षा कमी जागा मिळाल्या तर आम्ही अन्य पक्षातील पक्षांतराला चालना देऊन पक्षांतरित आमदारांच्या मदतीने सरकार घडवणार नाही. आम्ही विरोधी बाकांवर बसून सकारात्मक विरोध करू.’
कॉंग्रेसच्या आमदारांनी देवापुढे घेतलेल्या शपथा दिगंबर कामत सारख्या अत्यंत देवभक्त आमदारानेही मोडल्या. भाजप देवाचा, धर्माचा, भारतीय संस्कृतीचा, ’प्राण जाए पर वचन न जाए’ म्हणणार्या श्रीरामाचा नैतिकतेचा सतत उद्घोष करतो. त्यामुळे देवासमोर घेतलेली शपथ भाजप मोडणार नाही अशी आशा आहे.
महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षापुढे ही शेवटची संधी आहे. मगो पक्षाने युतीतून बाहेर पडावे व भाजपविरोधी आघाडीत सामील व्हावे. किमान ६ ते ८ आमदार मगो पक्ष निवडून आणू शकतो. तसे झाल्यास मगो नेते सुदिन ढवळीकर हे गोव्याचे भावी मुख्यमंत्री बनू शकतात.
मगो, गोवा फॉरवर्ड, कॉंग्रेस एकत्र आल्यास सुदिनांप्रमाणेच विजय सरदेसाईंनाही मुख्यमंत्री बनण्याची नामी संधी आहे. स्वतंत्रपणे फारसे यश न मिळवू शकलेले आप, आरजीसारख्या पक्षांनी महाआघाडीत सामील व्हावे किंवा वैयक्तिक पातळीवर ह्या पक्षाच्या विद्यमान आमदारांनी, नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करावा. आतापासून उत्तर गोव्यात कॉंग्रेसने मोर्चेबांधणी सुरू केली पाहिजे.
सुयोग्य उमेदवार निवडून ही महाआघाडी भावी विधानसभा निवडणुकीत उतरली तर महाआघाडीला मडगाव, फातोर्डा, नुवें, नावेली, वेळ्ळी,
कुंकळ्ळी, बाणावली, कुडतरी, केपें, कुठ्ठाळी, सांत - आंद्रें, सांताक्रूज, मडकई, शिरोडा, प्रियोळ, कुंभारजुवे, साळगाव, थिवी, हळदोणे, पेडणे, मांद्रें, डिचोली, मये ह्या २३ मतदारसंघात विजय मिळू शकतो.
भाजपमध्ये फार मोठ्या प्रमाणावर असमाधानी नेते व कार्यकर्ते आहेत. त्यांचाही पाठिंबा महाआघाडीला मिळू शकतो. भ्रष्टाचार, घाऊक जमीनविक्री, प्रशासकीय शैथिल्य हे लोकांना छळणारे व गोव्याच्या अस्तित्वाला धोका असलेल्या ह्या प्रश्नांवर आवाज उठवत ते ऐरणीवर आणले पाहिजेत.
लोकांना सत्तांतर झालेले हवेच आहे. फक्त त्यांना हवाय तो सक्षम एकसंध पर्याय. त्यामुळे, गोमंतकीय मतदार महाआघाडीला भरघोस मतदान करेल.
ख्रिश्चन व मुस्लीम मतदार एकगठ्ठा महाआघाडीबरोबर असतील. हिंदू समाज एकसंध नाही. त्यामुळे, भाजपने दिलेल्या हिंदुत्वाच्या नार्यालाच तो भुलणार नाही. बहुसंख्य हिंदूंना सत्तांतर हवे असल्याने ते महाआघाडीला पाठिंबा देतील.
गोमंतकीयांना सत्तापरिवर्तन हवेच आहे. तसे ते करणे ही काळाची गरजही आहे. त्यासाठी महाआघाडी होणे अपरिहार्य आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.