Ghodemodni Folk Dance Goa Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Ghodemodni : शेकडो वर्षांपासून प्रचलित असलेली 'घोडेमोडणी'! नृत्यातून लोकसंकेतांचे दर्शन

Ghodemodni Folk Dance Goa: पिढ्यान्पिढ्यांपासून चालत आलेल्या परंपरांचे पालन अशा नृत्यांच्या सादरीकरणातून करून, त्यांचे अनुकरण पुढेही केले जावे म्हणून लोकोत्सवातून ही वीण घट्ट केली जाते.

राजेंद्र केरकर

घोडा हा सस्तन प्राणी पृथ्वीतलावर मानवी समूहाच्या आगमनापूर्वी कित्येक शतके अस्तित्वात होता. त्याचे चापल्य, सामर्थ्य आणि सजगता पाहून थक्क झालेल्या मानवी समाजाने आपल्या वाहतूक आणि खेळासाठी त्याचा उपयोग आरंभला. पुढे युद्धातही त्याची उपयुक्तता सिद्ध झाली.

गोव्यातल्या शिगमोत्सवात विशेषतः सत्तरी, डिचोली त्याचप्रमाणे महाराष्ट्रातल्या दोडामार्ग आणि कर्नाटकातल्या खानापूर तालुक्यातल्या कष्टकरी समाजात घोडेमोडणी या लोकनृत्याची परंपरा शेकडो वर्षांपासून प्रचलित आहे.

त्याद्वारे घोड्याशी असलेले ऐतिहासिक आणि सांस्कृतिक अनुबंध पाहायला मिळतात. जेव्हा स्वयंचलित वाहनांचा शोध लागला नव्हता, तेव्हापासून घोड्याचा वापर माणसाला एका जागेवरून दुसऱ्या जागी जाण्यासाठी प्रामुख्याने व्हायचा .

माणसाप्रमाणे दैवी शक्ती ही एखाद्या प्रदेशाची देखरेख आणि संचार करण्यासाठी घोड्याचा वापर करत असते अशी लोकश्रद्धा रूढ असल्याकारणाने मातीचे घोडे अर्पण करण्याची परंपरा भारतीय लोकमानसात प्रचलित आहे. कधीकाळी शत्रूविरुद्ध युद्ध लढताना, घोडा माणसाला उपयुक्त ठरला होता आणि त्यामुळे युद्धात, खेळात घोड्याचा वापर करण्याला महत्त्व लाभले होते.

घोड्यांच्या माध्यमातून जग जिंकण्याची महत्त्वाकांक्षा बाळगून शूरवीर योद्धे लढाई लढण्यासाठी शत्रू पक्षावर तुटून पडत आणि यशस्वी झाल्यावर घोड्याविषयी कृतज्ञता व्यक्त करत.

गावांच्या सीमांचे भुताखेतांच्या प्रादुर्भावापासून रक्षण करण्यासाठी देवचार, म्हारू, दाड, वेताळ घोड्याचा वापर करतात अशी भावना रूढ असल्याकारणानेच त्यांच्या मूर्ती अश्वारूढ चित्रित केलेल्या असतात. घोड्याचे टापा टाकत ऐटबाजीत चालणे मानवी समाजाला आकर्षित करत असल्याने, त्याच्या चालण्याच्या अनुकरणाला लोकधर्माने स्वीकारणे स्वाभाविक होते आणि त्यातूनच ‘घोडेमोडणी’ लोकनृत्याची परंपरा निर्माण झाली असावी.

घोडेमोडणी नृत्याचे अनुकरण शिगम्यात करण्यामागे एकेकाळी युद्धप्रसंगी घोड्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान आणि त्याच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्याची मानवी प्रेरणा असली पाहिजे. घोड्याचा लाकडी मुखवटा आणि बांबूच्या

कामट्यापासून तयार केलेला सांगाड्यावरती वस्त्रांची मांडणी करून, डोक्यावर पागोटे परिधान करून आणि दोन्ही हाती धारदार तलवारी धारण करून योद्ध्यासारखा घोडेस्वार घोडेमोडणीच्या लोकनृत्यात सज्ज होत भारावलेल्या मनःस्थितीत त्यात सहभागी होतो. नृत्याच्या सादरीकरणावेळी त्याचा पदन्यास, ढोल, तासो आणि कासाळे या लोकवाद्यांच्या जल्लोषात संचारल्यागत पारंपरिक नृत्यशैलीचा आविष्कार या साऱ्यातून या लोकनृत्याची वैशिष्ट्ये गोव्यातल्या लोकमानसाला भावत आलेली आहे.

कर्नाटकातील कणकुंबीच्या माउली देवीच्या आणि महाराष्ट्रातील सावंतवाडीजवळच्या कुणकेरीतल्या भावकई देवीच्या शिगमोत्सवातील घोडेमोडणी तेथील प्रादेशिक लोकसंस्कृतीच्या वैशिष्ट्यांसह पेश होत असते.

घोडेमोडणी हे लोकनृत्य केवळ लोकरंजनाचा भाग नसून, त्यातून पारंपरिक यातुविद्या आणि धर्मविधींचेही दर्शन घडत असते.

सह्याद्रीच्या पर्वतरांगांनी वेढलेल्या सत्तरीतील डोंगुर्ली -ठाणे गावातील कोळगिरो आणि मंडळगिरो या लोकदैवतांच्या सान्निध्यात पाली, ठाणे, हिवरे खुर्द, हिवरे बुद्रूक, चरावणे , गोळावली आणि रिवे या सात गावांतील चौदा घोड्यांचे आगमन जेव्हा तेथील मंडळगिऱ्याच्या पारंपरिक पवित्र जागेवर होते आणि त्यानंतर लोकसंगीताच्या पार्श्‍वभूमीवर घोडेमोडणीचे सादरीकरण होते.

तेव्हा इथल्या जुन्या काळातल्या इतिहासाची पुनरावृत्ती होत असत्याचा आभास निर्माण होतो. दख्खनच्या पठारावरून जेव्हा हाती तलवारी आणि अश्वारूढ लढवय्यांचे आगमन झाले तेव्हा त्यांनी इथे वास्तव्यास असलेल्या आदिम जमातींचे शिरकाण करून, आपले वर्चस्व प्रस्थापित करून सीमा निर्धारित केल्या.

फाल्गुन महिन्याच्या शेवटी पौर्णिमेच्या मागेपुढे येणाऱ्या शिगमोत्सवात त्यांनी ज्या वेगवेगळ्या प्रथा, परंपरा निर्माण केल्या त्यात घोडेमोडणीसारख्या लोकनृत्याचे नियोजन केले.

पेडण्यातील मोरजी, इब्रामपुरातील हणखणे आणि मोर्ले पुनर्वसन वसाहतीतील गुळ्ळेच्या बारावंशाच्या सान्निध्यात होणारी घोडेमोडणी ही केवळ पारंपरिक नृत्य प्रकार म्हणून सादर होत नसते, तर त्यातून गावांतल्या भूतकालीन सांस्कृतिक, धार्मिक आणि ऐतिहासिक परंपरांचे दर्शन घडत असते.

घोडेमोडणी प्रकाराशी नाते सांगणारे नृत्य गुजरात, राजस्थानात काही ठिकाणी पाहायला मिळते. परंतु गोव्यातल्या या लोकनृत्याला यातुविद्या आणि लोकश्रद्धा यांचे तेजोवलय लाभलेले आणि त्यामुळे त्याचे वैशिष्ट्य अधिक खुलून दिसते.

गोव्यात सत्तरी, डिचोली, पेडण्यातल्या काही गावांत शिगम्यात सादर होणारी घोडेमोडणी नृत्याची परंपरा धारबांदोड्यात तांबडी सुर्लाजवळच्या तयडेत त्याचप्रमाणे फोंड्यातल्या पंचवाडी - मापा येथे प्रतीकात्मक सादर होत असलेली पाहायला मिळते.

सत्तरीतील पर्ये गावातल्या भूमिका मंदिराकडून सुरू होणारी घोडेमोडणी तुळशीमळा येथून जेव्हा मुस्लिमवाड्यावरच्या बाबल पिराच्या दर्ग्याकडे प्रवेश करते, तेव्हा मुजावर मुस्लीम कुटुंबे शतकोत्तर परंपरेनुसार या मिरवणुकीचे स्वागत करण्यास तत्पर असतात.

पर्येची भूमिका मध्ययुगात नावारूपाला आलेल्या साखळी शहराच्या बाजारपेठेची अधिष्ठात्री सप्तशती भूमिका वंदनीय ठरलेली असते आणि त्यामुळे ही घोडेमोडणी गावठणची सीमा असणाऱ्या हनुमान मंदिरापर्यंत जाते.

तेथे गावठणहून आलेल्या घोडेमोडणीच्या घोडेस्वाराशी त्यांची तलवारीला तलवार भिडण्याचा प्रातिनिधिक विधी होतो. दोडामार्गजवळ सासोली, वाळपईतील मासोर्डे असो अथवा डिचोलीतील सर्वण, गावकरवाडा आणि बोर्डेची घोडेमोडणी जुन्या काळातल्या पारंपरिक रीतीरिवाज आणि लोकसंकेतांचे दर्शन घडवतात.

एकेकाळी आपापल्या प्रदेशाच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी शूरवीरांनी प्राणाची बाजी लावून कैक युद्धे लढली, प्रसंगी धारातीर्थी पडले या गतकालीन इतिहासाच्या पैलूंचा आविष्कार जणू काही घोडेमोडणीच्या लोकनृत्यात होत असतो. पिढ्यान्पिढ्यांपासून चालत आलेल्या परंपरांचे पालन अशा नृत्यांच्या सादरीकरणातून करून, त्यांचे अनुकरण पुढेही केले जावे म्हणून लोकोत्सवातून ही वीण घट्ट केली जाते.

आज शासकीय आर्थिक पाठबळावर सादर केल्या जाणाऱ्या घोडेमोडणीत लोकविधी, परंपरांना फाटा देऊन, आकर्षक झगझगीत वेषभूषा आणि त्याला साजेसे झोकदार ढोल, ताशा आणि कासाळे यांच्या वादनातून निर्माण होणाऱ्या संगीतावरती लक्षवेधक सादरीकरण केले जाते. गोव्यातील ही लोकनृत्याची परंपरा इथल्या लोकश्रद्धा आणि विस्मृतीत गेलेल्या इतिहासाचे दर्शन घडवत असते!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: "त्यांच्या 'किल लिस्ट'मध्ये मी टॉपवर!", हत्येच्या कारस्थानाचा आरोप करत ट्रम्प यांनी मोडला इराणसोबतचा शांतता करार; युद्धाचा उडणार भडका?

Mangal Gochar: नशीब बदलणार, गरिबी हटणार! 'या' 5 भाग्यशाली राशींवर होणार पैशांचा पाऊस; 24 जुलैपासून मंगळ देवाचा महाधमाका

WhatsApp Username Feature: व्हॉट्सॲपच्या 'युझरनेम' फिचरने वापरकर्त्यांचा फायदा की सायबर गुन्हेगारांची चांदी?

Goa Politics: राजकारणात 'नव्या' पक्षांचा जुना खेळ

Goa Congress: अमित पाटकर अखेर काँग्रेस भवनात; आवश्यक दस्तऐवज संबंधित पदाधिकाऱ्याकडे सुपूर्द

SCROLL FOR NEXT