राजेंद्र पां. केरकर
जीवाश्मांच्या अभ्यासातून भारतातील केवडा वनस्पतीचा समृद्ध इतिहास आणि वारसा उलगडला आहे. शास्त्रज्ञांच्या पथकाने केलेल्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की सुमारे २.४ कोटी वर्षांपूर्वीच्या जीवाश्म पानांमध्ये आधुनिक केवड्याच्या पानांशी विलक्षण साम्य आढळते. या जीवाश्म पानांवर आधुनिक केवडा वनस्पतींमध्ये आजही आढळणारी काही वैशिष्ट्यपूर्ण रचनात्मक लक्षणे जतन झालेली आहेत.
सुमारे २.४ कोटी वर्षे जुन्या जीवाश्मांच्या विश्लेषणातून असे संकेत मिळाले आहेत, की मिठाईला सुगंध व स्वाद देण्यासाठी तसेच पारंपरिक औषधांमध्ये वापरली जाणारी केवडा वनस्पती हिमालयाच्या निर्मितीपूर्वीपासूनच अस्तित्वात होती. जगातील इतर अनेक भागांतून ही वनस्पती कालांतराने नामशेष झाली असली, तरी भारतीय प्रदेशात तिचे अस्तित्व टिकून राहिले.
दक्षिण आशियाई संशोधक चमू आणि लखनौ येथील बिरबल साहनी पुराश्म विज्ञान संस्थेच्या शास्त्रज्ञांनी आसाममधील माकुम कोलफिल्ड परिसरातून चार उत्तम प्रकारे जतन झालेली जीवाश्म पाने मिळवली. ही पाने सुमारे २.४ कोटी वर्षे जुनी असल्याचे संशोधनातून आढळले. संशोधकांनी या जीवाश्मांची तुलना विविध वनस्पती संग्रहालयांत जतन केलेल्या आधुनिक केवडा प्रजातींशी, वनस्पतिशास्त्रीय उपलब्ध माहितीच्या नोंदींशी तसेच जगाच्या विविध भागांत यापूर्वी सापडलेल्या जीवाश्मांच्या नोंदींशी केली.
सविस्तर अभ्यासातून असे स्पष्ट झाले की, हे जीवाश्म आधुनिक केवड्याच्या पानांशी मोठ्या प्रमाणात साम्य दर्शवतात. त्यामध्ये आजच्या केवडा वनस्पतींमध्येही दिसून येणारी वैशिष्ट्यपूर्ण लक्षणे जतन झालेली आहेत. यामध्ये लांब, तलवारीसारखी पाने, समांतर शिरा आणि पानांच्या कडांवरील वैशिष्ट्यपूर्ण काटे यांचा समावेश आहे.
आधुनिक प्रजाती आणि जगभरातील जीवाश्मांच्या नोंदींच्या तुलनात्मक अभ्यासातून या जीवाश्मांचा संबंध केवडा ज्या कुळातील आहे त्या प्रजातीच्या कुळाशी असल्याचे निश्चित झालेले आहे.या निष्कर्षांवरून असे दिसते की मानव पृथ्वीवर अस्तित्वात येण्याच्या लाखो वर्षांपूर्वीच या प्राचीन वनस्पतीवंशाची भारतात पैदासी झाली होती. जगाच्या इतर अनेक भागांतून हा वनस्पतीवंश नाहीसा होत असताना त्याचे अस्तित्व भारतीय प्रदेशात मात्र टिकून राहिले.
आज केवडा प्रजातीच्या वनस्पती प्रामुख्याने उष्णकटिबंधीय आणि उपोष्णकटिबंधीय प्रदेशांपुरता मर्यादित आहे. मात्र, युरोप आणि उत्तर अमेरिकेत सापडलेल्या ८.५ ते ६.६ कोटी वर्षे जुन्या जीवाश्मांच्या नोंदींवरून असे दिसून येते की त्याचे पूर्वज एकेकाळी उत्तर गोलार्धातील खूप मोठ्या भौगोलिक प्रदेशात पसरलेले होते.
सुमारे ३.४ कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीचे हवामान थंड होऊ लागल्यानंतर, या वनस्पती अनेक प्रदेशांतून हळूहळू नाहीशा झाल्या आणि त्यांचे अस्तित्व उष्णकटिबंधीय प्रदेशांपुरते मर्यादित राहिले. या निष्कर्षांमुळे भारतीय उपखंडाने प्राचीन वनस्पतीवंशांच्या अस्तित्वासाठी महत्त्वपूर्ण आश्रयस्थानाची भूमिका बजावली, हे अधोरेखित होते.
अशा अभ्यासामुळे हवामानातील बदलांच्या काळात जैवविविधतेची उत्क्रांती कशी झाली, भारताने प्राचीन वनस्पतीवंशांसाठी आश्रयस्थान म्हणून कोणती भूमिका बजावली आणि भविष्यातील परिसंस्था हवामान बदलांना कशा प्रकारे प्रतिसाद देतील, हे समजून घेण्यास मदत होते.
एकेकाळी संपूर्ण गोव्यातला लोकमानस केवड्याच्या(Pandanus odorifer) यांच्या वनराईचे जतन आणि संरक्षण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असत. केगदीव्हाळ, केगदीमळ, केगदीगाळ , केगदीझर यांसारख्या स्थलनामांवरूनही या वनस्पतीला समाजात पूर्वी किती सांस्कृतिक महत्त्व होते, याची कल्पना येते.
सत्तरीतील कोपर्डे गावातील ब्राह्मणीच्या राईमध्ये, गावकऱ्यांनी या वनस्पतींचे संरक्षण केले आहे. जेव्हा या केवड्याला पिवळ्या रंगाची सुगंधी फुले येतात, तेव्हा मंदिराची व्यवस्थापन समिती या फुलांचा लिलाव करते आणि त्यातून मिळणारा पैसा मंदिराच्या विकासासाठी वापरला जातो.
गोव्यातील अनेक ठिकाणी असलेले ओढे आणि नद्या एकेकाळी केवड्याच्या दाट वनराईंनी समृद्ध होते. मात्र, आज या वनस्पतींना पाण्याच्या प्रवाहातील अडथळे समजून त्यांची मोठ्या प्रमाणावर आणि अविचाराने तोड केली जात आहे. प्रत्यक्षात, या वनस्पती भूजलपातळीचे पुनर्भरण करण्यास मदत करतात आणि आजूबाजूच्या पर्यावरणीय परिसंस्थेतही त्यांची महत्त्वाची भूमिका असते.
गोव्यात या सुगंधी फुलांना मोठी मागणी आहे. विवाहिता केसांतही फुले माळतात. भारताच्या इतर भागांत प्रचलित काही पौराणिक समजुतींमुळे ही फुले देवतांना अर्पण केली जात नाहीत; परंतु गोव्यात मात्र भक्तगण देवतांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही फुले आवडीने अर्पण करतात.
गोव्याच्या लोकजीवनात आणि लोकसंगीतातही केवड्याला विशेष स्थान आहे. गोव्यातील लोककलाकारांनी केवड्याच्या फुलांच्या मनमोहक सौंदर्याची तुलना तरुण स्त्रियांच्या सौंदर्याशी करणारी मधुर लोकगीते रचली आहेत. फुगडीच्या लोकगीतांमध्ये केवड्याच्या फुलांचा उल्लेख आढळतो. हालत ढोलत आयले
एक केगदीचे बोण गो... तर दुसऱ्या एका लोकगीतामध्ये केगडीच्या वनात फणा उभारून उभ्या असलेल्या नागाचा संदर्भ दिला आहे. केगदीच्या बनी... सखे नाग डोलतो....
मराठी भावगीतांच्या विश्वात तर केवड्याचा सुगंध सुरेल गाण्यांतून अजरामर झाला असून, केसांत केवड्याचे फुल माळलेली ललना आकर्षण बिंदू ठरल्याची वर्णने कवितांत आढळतात.
अशा प्रकारे, केवडा ही केवळ सुगंधी फुले देणारी वनस्पती नसून भारताच्या प्राचीन नैसर्गिक इतिहासाची, जैवविविधतेची, पर्यावरणीय संतुलनाची आणि गोव्याच्या सांस्कृतिक वारशाची साक्ष देणारी वनस्पती आहे. तिचे संरक्षण करणे म्हणजे आपल्या प्राचीन वनस्पती वारशाचे आणि स्थानिक लोकपरंपरांचेही संरक्षण करणे होय.
केगदी, केवडा, हातो या नावांनी ओळखली जाणारी ही वनस्पती गोव्यात ठिकठिकाणी एकेकाळी संरक्षित केली होती. म्हापसा शहराचा राखणदार म्हणून पुज्यनीय ठरलेला बोडगेश्वर हे लोकदैवत बोडगिणीच्या वनराईचे अधिष्ठाता होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.