Chorao Island Nature Conference Dainik Gomatnak
गोंयकाराचें मत

Chorao Island: चोहोबाजूंनी सुपारी, आंबा, फणसाची सावली आणि पर्यावरणाचा ध्यास; चोडण बेटावर भरलेले पहिलेच निसर्गसंमेलन

Chorao Island Nature Conference: निसर्ग आणि आपले नाते व त्याची जाणीव दृढ करणारी अशी संमेलने झाली पाहिजेत. हे विचारांचे आदानप्रदान होत राहिले पाहिजे. हे एका पिढीपासून पुढील पिढीपर्यंत पोहोचले पाहिजे.

गोमन्तक डिजिटल टीम

मधू य. ना. गावकर

मांडवीच्या पात्रातील चोडण बेटावर डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्याच्या कुशीत प्रथमच निसर्गसंमेलन भरले ही फार मोठी गोष्ट आहे. देवगी वाड्यावरील सायल्यांनी भागातील तातो कुळागरात एक दिवसाचे निसर्गसंमेलन केरी सत्तरीच्या विवेकानंद पर्यावरण फौज संस्थेने कै. सत्यवती पांडुरंग केरकर या सावित्रीच्या लेकीच्या नावे १७ रोजी भरवले.

या संमेलनाला गोमंतकीय युवापिढी मोठ्या संख्येने हजर होती. हे गोव्यातील पहिलेच निसर्गसंमेलन असावे. संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत शिंदे, सदस्य विठ्ठल शेळके, नारायण गावस, रमेश झर्मेकर, सनिश अवखळे, गजानंद शेट्ये, सूर्यकांत गावकर, संकेत नाईक, दीपक गावस, चंद्रकांत अवखळे, सूरज मळीक, तेजस पंडित, राजू परवार, देवता उमर्ये आणि संतोषी नाईक यांनी निसर्गसंमेलन यशस्वी होण्यास प्रचंड मेहनत घेतली.

पर्यावरण तज्ज्ञ युवापिढी आणि मार्गदर्शकाची सुव्यवस्था करून, सत्यवतीच्या आठवणींना उजाळा दिला. संमेलन सकाळी सूर्य उगवताना पक्ष्यांच्या निरीक्षणाने सुरुवात करताना अनेक शाळा, हायस्कूल, उच्च माध्यमिक, आणि कॉलेजचे विद्यार्थी सामील झाले होते. सूर्य सकाळी उगवताना आणि संध्याकाळी मावळताना सारखाच दिसतो.

मात्र उगवताना तो नवीन आशा घेऊन येतो आणि मावळताना साऱ्या जैवविविधतेचे अनुभव घेऊन जातो, तशाच प्रकारची सत्यवतीची शिस्त अनुभवाची शिदोरी तिच्या लेकरांनी सांभाळलेली त्या ठिकाणी पाहावयास मिळाली. तिच्या हाताखाली मोठी झालेली ही लेकरे आज मोठ्या हुद्द्यावर पोहोचली आहेत. पर्यावरणाचे काम मोठ्या प्रमाणात करतात. निसर्ग संमेलनाला मार्गदर्शन करण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रात पर्यावरणात काम करणारे नामांकित तज्ज्ञ हजर होते.

जंगलावर काम करणारे रोहित नानिवडेकर, भूगर्भतज्ज्ञ पंकज लाड, वाद्यावर अभ्यास करणारे गिरीष पंजाबी, कोकणातील रानमाणूस प्रसाद गावडे, फुलपाखराव काम करणारे पराग रागणेकर, पक्षी निरीक्षण करणारे विशाल सडेकर आणि ओंकार धारवाडकर,

केरी सत्तरीचे सत्यवती मातेचे पुत्र तथा पर्यावरण तज्ज्ञ राजेंद्र केरकर आणि गोवा जैवविविधता मंडळाचे सदस्य सचिव डॉ. सरमुकादम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. प्रवीण सबनीस, चंद्रशेखर गावस, माटोळीकार दत्ता नाईक, डॉ. विद्या गावडे, पत्रकार दशरथ मोरजकर, सर्पमित्र प्रदीप गवंडाळकर, शिल्पकार रमेश कुलकर्णी, जंगल चित्रकार अक्षय सावंत, आणि इतर पर्यावरण क्षेत्रात काम करणारे बरेच मान्यवर होते.

निसर्ग संमेलनाचे उद्घाटन करण्यास मंचावर डॉ. प्रदीप सरमुकादम, तातो कुळागराचे मालक मच्छिंद्र कवठणकर, विवेकानंद संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत शिंदे आणि संस्थेचे मार्गदर्शक पर्यावरणतज्ज्ञ राजेंद्र केरकर यांनी तुळशीरोपाला पाणी घालून सत्यवती पा. केरकर यांच्या पर्यावरणीय कामाच्या आठवणींना उजाळा दिला. नंतर जगविख्यात पर्यावरणीय तज्ज्ञ प्रोफेसर माधव गाडगीळ यांना श्रद्धांजली अर्पण करून निसर्ग संमेलनाला सुरुवात झाली.

सत्यवती आईचे संस्कार प्रेम आणि शिस्तीचे शिक्षण घेत मोठे झालेले तिचे पुत्र राजेंद्र आणि सून पौर्णिमा पुढच्या पिढीला घडवण्यासाठी, सत्यवती आईच्या इच्छापूर्तीचे काम करतात.

क्रांतिकारी पांडुरंग आणि सत्यवती यांचे मातृपितृत्व लाभलेले पर्यावरणतज्ज्ञ राजेंद्र केरकर आज त्यांच्या आशीर्वादाने आणि विचारांनी जैवविविधता आणि पर्यावरण राखण्याचे व्रत बाळगून काम करीत अभयारण्य आणि म्हादई वाचवण्याचा प्रयत्न करीत आहेत.

कुळागराचे मालक मच्छिंद्र कवठणकरांनी आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर चारही दिशांनी खार पाण्याने वेढलेल्या चोडण बेटावरील पडीक जमिनीत थंडगार कुळागर उभे केले आहे. ते पाहत पर्यावरणवादी आणि संमेलनाला गर्दी करणाऱ्या लोकांना त्यांनी तोंडात बोटे घालण्यास लावली.

उघड्यावर बसूनसुद्धा चोहोबाजूंनी सुपारी, आंबा, फणस आणि मिरी मसाला झाडांची सावली देणाऱ्या पर्यावरणीय हिरव्या मंडपात पर्यावरणीय तज्ज्ञ वक्त्यांचे मार्गदर्शनपर ज्ञान ऐकण्याची व्यवस्था केली होती. एकेकाळी चोडण बेट व्यापारी बंदर होते, नंतर भात आंबा फणसांचे आगर बनवले, आज चोडण बेटावर कॉंक्रीट जंगले उभे राहत आहे. पण कवठणकरांनी पर्यावरणाचा ध्यास धरून कुळागर निर्माण करून निसर्ग संमेलन भरविले तो खरा पर्यावरणवादी होय.

जंगले कापून रबर लागवड केल्याने जंगलावर अत्यंत वाईट परिणाम होतात. अनेकांना याची माहितीच नव्हती. रोहित नानिवडेकर यांनी दिलेली माहिती अनेकांसाठी नवीन होती.

निसर्गातील प्रत्येक घटक महत्त्वाचा आहे. अगदी फुलपाखरूही संपूर्ण निसर्गचक्रात किती महत्त्वाचे आहे, याची जाण पराग रागणेकरांमुळे आली. धरणीमातेच्या अंगावर तोडफोड आणि जंगलतोड झाल्याने भूगर्भातील पाण्यावर आणि इतर जैवविविधतेवर होणाऱ्या बऱ्या वाईट परिणामाने मानव कसा अशांत बनला आहे,

त्यावर पंकज लाड यांचे भाष्य फारच अप्रतिम होते. पश्‍चिम घाटातील राखणदार पट्टेरी वाघ, अस्वल, बिबटे, गवे आणि हत्ती यांचे अस्तित्व नाकारून काहीच लाभ होणार नाही. वाघ एकत्र रात्रीत पस्तीस ते चाळीस किमी लांब प्रवास करतो.

चांदोली, राधानगरी, तिळारी, म्हादई अभयारण्य, महावीर मोले अभयारण्य, नेत्रावळी अभयारण्य, खोतीगाव अभयारण्य, काळी अभयारण्य आणि भीमगड अभयारण्यात वाघ येण्याजाण्याचा रस्ता (कॉरिडॉर) आणि त्यांच्यासाठी वाहणाऱ्या नद्यांतील पाणीसाठ्यांचे डोह अत्यंत आवश्यक आहेत.

प्रत्येक अभयारण्यात मादी वाघ एक दोन ठिकाणे सुरक्षित जागा निवडून आपले वास्तव्य त्याच परिसरात ठेवते.

तिथे नरवाघ बऱ्याच दूरवरून तिचा शोध घेत मादीकडे येऊन आपले कुटुंब वाढवतो आणि परत दुसऱ्या ठिकाणी जातो, मादीजन्म दिलेल्या बछड्यासोबत त्याच ठिकाणी थांबून त्यांना मोठे करते तिच्या पसंतीच्या जागेत जास्त प्रमाणात हिरवळ असल्याने हरण,

मेरू, ससे, गवा, कोल्हे, भेकर, हिरवे गवत खाण्यास येतात, शिवाय रानडुक्कर, कंदमुळे खाण्यास येतात आणि आयते तिच्या तावडीत शिकार होतात. हे सर्व वन्यप्राण्यांच्या फोटोचित्रासह वन्यप्राणी अभ्यासक गिरीष पंजाबी सांगत होते तेव्हा खरोखरच व्याघ्र प्रकल्प होणे किती गरजेचे आहे, याची समज प्रत्येक निसर्गप्रेमीस आली.

म्हादई आणि तिच्या उपनद्यांचा गोड्या पाण्याचा प्रवाह गोव्याला फक्त पस्तीस किमी लांब मिळतो. बाकी म्हादईचा प्रवाह गोव्याच्या सीमेकडून उगमापर्यंत कर्नाटक राज्यात आहे. तसेच पणजी ते गांजेपर्यंत मांडवी खार पाण्याने व्यापली आहे. चंद्रकांत शिंदे यांनी सांगितलेली म्हादईची प्रवाही माहिती तिचे वात्सल्य पटवून गेली. केवळ नदीला माता व स्वत:स पुत्र म्हणवून घेणेच पुरेसे नाही. पुत्रधर्म पाळला पाहिजे.

आपले पूर्वज निसर्गाचे पूजक होते. मातीशी एकनिष्ठ राहून जीवन जगत जंगल, शेती, फळबागायती आणि वाहणाऱ्या पाण्याची निगा राखून पर्यावरणीय जीवन जगून ते सुखी होते.

त्यांनी पैशासाठी या भूमातेशी प्रतारणा केली नव्हती. कॉंक्रीटची जंगले निर्माण न करता भविष्याची चिंता ठेवली होती. आज आपण डोंगर, जंगल, शेती, बागायती, पाणी आणि मत्स्यधन राखले तरच माणूस या पृथ्वीवर तग धरून सुखी राहू शकतो.

पर्यावरण आणि मानव यांचे नातेच असे अतुट आहे. कोकणचे रानमानव प्रसाद गावडे यांनी हेच नाते उलगडून सांगितले तेव्हा माझ्यासह अनेकांची अंत:करणे हेलावली. निसर्ग आणि आपले नाते व त्याची जाणीव दृढ करणारी अशी संमेलने झाली पाहिजेत. हे विचारांचे आदानप्रदान होत राहिले पाहिजे. हे एका पिढीपासून पुढील पिढीपर्यंत पोहोचले पाहिजे. तरच निसर्गरक्षणाची जाणीव पुढेही टिकून राहील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

निवडणुकांच्या तोंडावर कोल्हापुरात 1.30 कोटींचं गोवा बनावटीचं मद्य जप्त; राजस्थानच्या एकाला बेड्या; अणुस्कुरा घाटात मोठी कारवाई

Loliem: 'आमची शेती वाचवा'! गावकऱ्यांची आर्त हाक; प्रवाहातील अडथळ्यांमुळे नदीचे पाणी शेतजमिनीत गेल्याने धोका

Budh Shani Yog 2026: बुध-शनिचा दुर्मिळ 'दशांक योग'! 'या' राशींवर होणार धनाचा वर्षाव; बुद्धी आणि कष्टाचा सुवर्णसंगम

Formula 4 Racing Goa: ‘मोपा’वर रंगणार ‘फॉर्म्युला 4 रेसिंग थरार! ट्रॅक’ उभारणीसाठी हालचाली; 4 कोटींचा खर्च अपेक्षित

Bicholim: डिचोलीवर धोक्याची टांगती तलवार! ग्राहकांमध्ये चिंता, रोगराई फैलावण्याची भीती; काय आहे कारण? वाचा..

SCROLL FOR NEXT