Chorao Island: कोटी वर्षांपूर्वी मांडवीच्या पात्रातही चार बेटे होती, 450 वर्षापूर्वीच्या मोडतोडीचा इतिहास; संस्कृती हरवत चाललेले 'चोडण बेट'

Chorao Island History: चोडण बेटाला उत्तरेकडून दक्षिणेकडे बराच लांब डोंगर दिला आहे. तो माडेलकडून मुर्डीपर्यंत पसरला आहे. त्या डोंगरावर पडणारा पाऊस चोडण बेटावरील जैवविविधता पोसतो.
Chorao Island, Salim Ali Bird Sanctuary, Goa mangroves, Mandovi river
Chorao Island, Salim Ali Bird Sanctuary, Goa mangroves, Mandovi riverDainik Gomantak
Published on
Updated on

मधू य. ना. गावकर

मांडवीने आपल्या मुखावर चोडण, दिवाडी, वाशी, आखाडा, जुवे (सांतईस्तेव) आणि कुंभारजुवा बेटे निर्माण करून अरबी समुद्राला थोपवून धरला आहे. हे जरी खरे असले तरी तिने पणजी शहरातील आल्तिनो टेकडी म्हणजे पूर्वकाळचे बेट त्याला तोफेच्या तोडी देऊन समुद्री खार पाण्यापासून जैवविविधतेचे रक्षण केले आहे. या सर्व बेटात चोडण बेट मोठे आहे. त्यानंतर दिवाडी, जुवे, कुंभारजुवा, आखाडा आणि वाशी.

इतिहासात डोकावल्यास एकेकाळी चोडण, दिवाडी आणि ओल्ड गोवा ही गावे मांडवीच्या तटावर मोठी व्यापारी बंदरे होती.

त्या परिसरातील देवदेवतांची देवालये पाहिल्यास ओल्ड गोवा किंवा जुने गोवे (गोवापुरी) आणि दिवाडी बेटावर शिवशंकराची मोठी देवालये होती आणि चोडण बेटावर विष्णू, देवकीकृष्णाची मोठी देवळे होती. तिथली हिंदू संस्कृती मुसलमान आणि ख्रिश्‍चनांनी मोडली, विध्वंस करून टाकली. याचे पुरावे आज त्या बेटावर गेल्यास पाहावयास मिळतात.

शिवाचे भक्त दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणात आहे आणि भगवान विष्णू किंवा देवकीकृष्णाचे भक्त वायव्य आणि उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात आहेत.

यावरून दक्षिण भारतातील आणि उत्तर भारतातील मोठमोठे व्यापारी त्या काळी मांडवी तटावरील या व्यापारी बंदर परिसरात येऊन स्थायिक होऊन त्यांनी देवदेवतांची मंदिरे आणि संस्कृती विद्यापीठ उभारून मोहंजदारोप्रमाणे हिंदू संस्कृती वाढवत त्या बेटाचा परिसर व्यापारी बंदरात नावारूपास आला असावा. तिसऱ्या किंवा चौथ्या म्हणजे सम्राट अशोकाच्या काळात बौद्ध अनुयायी गोव्यात येऊन स्थायिक झाल्याचा पुरावा खांडोळ्याची बौद्ध गुंफा आज आपल्याला देते.

मी १९७२-७३ साली चोडण बेटावर प्रथम पाय ठेवला. त्या काळी माडेल तारीवरून तांबड्या मातीच्या रस्त्याने चालत पाच-सहा किमी रस्ता पार करून पांडववाडा-गाठला होता. चालताना आंबा, फणस यांनी भरलेल्या मोठमोठ्या बागायती, त्यात सागवान, मारट, किंदळ, शिरस-शिवण, भेंडी, वड, गोळ असे महाकाय वृक्ष आणि भाताच्या पिवळ्या कणसाची शेती नदीच्या काठावर पाहावयास मिळाली होती.

आज चोडण बेटावर पाय ठेवताच माडेल तारीवरील मानस गायब होऊन भल्यामोठ्या भालकात्र शेतात सलिम अली पक्षी अभयारण्य दिमाखात उभे ठाकले आहे. आजच्या काळात चोडण, कारय, सडोती आणि आमाडी जरी एकच बेट पाहावयास मिळाले तरी कोटी वर्षांपूर्वी मांडवीच्या पात्रातही चार बेटे होती.

कालांतराने मांडवीने प्रवाहातून सुपीक गाळ आणून अगर भूकंप प्रवण क्षेत्राने ही चार बेटे एकत्र होऊन चोडण हे मोठे बेट उदयास आले. त्या बेटाला मांडवीने मोठ्या प्रमाणात जैवविविधतेचे आगर बनवलेले पाहावयास मिळते.

शिवाय, प्राचीन काळी वर्तुळाकार बेटाला डोंगराच्या पायथ्याशी संस्कृती आणि व्यापारीकरणाने भरभराटीस आलेल्या त्या काळच्या इतिहासाची साक्ष देणारे, मोडतोड झालेल्या पुराणवास्तूचे वाडे सर्वत्र पाहावयास मिळतात.

माडेल, वरांडो, केरे, काराभाट, बेलभाट, मुर्डी, पांडववाडा, आमाडी, खडपार, सडोती, खेराड, खुसावाडा, तळ्यान, बावठण, देवगी, गावाणा, कारय, लॉयेला, साऊद, भक्तावाडा, विठोजे, किल्ल, जल्लेव्हाळ अशा नावांनी हे बेट ओळखले जाते. त्या वाड्याच्या खालच्या भागात मरड, वायंगण आणि खाजन शेती पसरली आहे.

करंगुट, केनाळ, पाटणी, खोचरी, नवण, शिट्टा, काळोखी, कोथमीरसाळ, धवीखोचरी अशी भातबियाणी पेरणी करून कुंभाचे कुंभ भात पिकवून त्या राशी घरी आणत होते. गोव्यात चविष्ट आंबे चोडण बेटावर पिकतात.

मानकुराद, सावेर, मालगेस, फेर्नांद, कुलास, मुन्सराद, निकला आफोंन्स, पायरी, साकरीन, चिमुद, सालगाद, आखणा, बेनकुराद, करेल, भीष्म, अशा वेगवेगळ्या जातीच्या आंब्याच्या बागा या बेटावर होत्या. त्यात भर घातली आहे ती चिंच, कोकम, जांभूळ, बोर, करवंद, चिकू, कणेर, हासळ, चूरन, भेसड, आमारा, फातरफळ, बकुळीफळ, पेरू, जंगम या रानमेव्याने. अजब म्हणावे असे आदम वृक्षाचे मोठे झाड आज चोडण बेटावर साऊद वाड्यावर पाहावयास मिळते.

माझ्या बालपणी खांडोळ्याच्या देवळाय देवराईत आणि माशेलात मल्लीनाथ वाड्यावर आदम वृक्षांची जाडे पाहिली होती. बालपणी सवंगड्याबरोबर त्याची फळे खाण्यासाठी आम्ही जात होतो.

चोडण बेटावरच्या खळ्यामध्ये चोणकूल, खरचाणी, शेवटा, काकुंद्र, वाशी, शेतुक, पालू, तामसा, खेकडे, झिंगे, बुराटे ही रूचकर मासळी मोठ्या प्रमाणात मिळते. स्व. भाऊसाहेब बांदोडकर मुख्यमंत्री पदावर असताना मुद्दामहून पणजीकडून लॉंचने चोडण बेटावर हा सारा नजारा पाहण्यास जात होते.

या बेटावरील शेतीच्या रक्षणासाठी सतरा-अठरा मानशी पूर्वजांनी उभारलेल्या पाहावयास मिळतात. गोवा स्वातंत्र्यापूर्वी बेटावर जाण्यायेण्यास माडेल, सालय पोमुर्पा, आमाडी, कालवी, वायगणे, विठोजे आणि देवगी ठिकाणी होडीने प्रवास व्हायचा. नंतरच्या काळात पणजी शहरात जाण्यायेण्यासाठी लॉन्च व्यवस्था करण्यात आली.

ती लॉंच वरांडो, पोमुर्पा, आमाडी, लॉयला, विठोजे ठिकाणी जाणे येणे करून चोडणच्या लोकांचा प्रवास सुखकर करत होती. नंतरच्या काळात माडेल-रायबंदर आणि पोंबुर्फा-मुर्डी चोडण ठिकाणी फेरीबोटी आल्या.

चोडणच्या शेतीला अनेक नावांनी ओळखतात. त्यात भालकात्र खाजनात आज सलीम अली पक्षी अभयारण्य दिमाखात उभे राहिल्याने चोडणचे सौंदर्य वाढवले आहे. आता त्या अरण्यात कैक जातीचे हजारो पक्षी आढळतात.

शिवाय पात्रामाणे, वाराणा, चामेरे, धुकरमळा, खापामळी, दुबेणे, कावकोण, देवणी खाजन, कारय खाजन, पिसय, खाजन, केरे खाजन, काराभाट, खाजन, आणि कावाकातर खाजन या नावांनी शेती ओळखतात. वड, मारट, किंदळ, शिरस, गोळ, भेंडी, सागवान, शिसय, जांभूळ वृक्ष होते. शिवाय आमराईत दरवळणारे फणस मोठ्या प्रमाणात होते.

आज चोडण गावाला वळसा घालून फिरताना पूर्वी दिसणारे सुंदरतेचे प्रतीक म्हणजे कौलारू घरे दिसेनाशी झाली आहेत. त्या जागी सिमेंट कॉंक्रीटचे व्हिला, बंगले, सदनिका पाहावयास मिळतात. म्हणजे साडेचारशे वर्षापूर्वी झालेली मोडतोड, आज पुन्हा डोळ्यासमोर उभी राहत त्या काळचा इतिहास आजही आठवतो.

Chorao Island, Salim Ali Bird Sanctuary, Goa mangroves, Mandovi river
Chorao Ro Ro Ferry Pass: चोडणवासीयांना 'रो-रो फेरी' महागली! प्रतिट्रीप 5 रुपयांची वाढ; पास होणार वितरित

पोर्तुगिजांनी मोडतोड करण्यापूर्वी या बेटावर माडेल भागात भूमिका, मल्लीनाथ, देवकीकृष्ण, देवगी भागात सातेरी गोळेश्‍वर, पांडववाडा भागात पिसोखळनाथ, देवकीकृष्ण, गावाणा विष्णूदेव, काराभाट कात्यायनी, केरे गोपाळकृष्ण, कारय भूमिका, शिवाय इतर वाड्यांवर अनेक देवांची देवळे होती.

चोडण बेटावर चार-पाच ठिकाणी चर्च अगर कपेलही पाहावयास मिळतात. माडेल आणि साऊद ठिकाणी ‘होमखण’ होमकुंड उत्सव साजरे करतात. धालोत्सव आणि शिगमोत्सवही साजरे होतात.

Chorao Island, Salim Ali Bird Sanctuary, Goa mangroves, Mandovi river
Chorao: 7 दिवस बोट पाण्यात, पाणबुड्यांची कसरत; चोडण येथील फेरीबोट काढताना गाळाचा अडथळा

चोडण बेटाला उत्तरेकडून दक्षिणेकडे बराच लांब डोंगर दिला आहे. तो माडेलकडून मुर्डीपर्यंत पसरला आहे. त्या डोंगरावर पडणारा पाऊस चोडण बेटावरील जैवविविधता पोसतो. देवगी आणि पांडववाडा ठिकाणी पाण्याचे झरे आहे.

या डोंगराला जांभ्या दगडाचे मोठे वरदान लाभले आहे. शिवाय मँगनीजचे साठेही आहेत. त्या डोंगराला खापरा, रूई खुरीस, कॉवेंत, कामतान, वडाकडे घोंगाची पायण, चिमणी, सूर्लीकार, शिवराम नावांनी ओळखतात. डोंगरावर काजू बागायती आणि औषधी झाडे, झुडपे पाहावयास मिळतात. पण, आज पूर्वजांनी जपलेले हे वैभव नष्ट होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com