अनिल परुळेकर
पर्यावरण अभियांत्रिकी- (Environment Engineering) चा अभ्यास करताना माझ्याकडून कळत नकळत इकोलॉजी (Ecology)चाही थोडाफार अभ्यास झाला. त्या अल्पस्वल्प अभ्यासाने माझ्या विचारांना वेगळी दिशा मिळाली. माझ्या लक्षात आले की पर्यावरण अभियांत्रिकीमध्ये पर्यावरणा संबंधित प्रश्नांचा केलेला विचार मर्यादित स्वरूपाचा असतो. व्यापक स्वरूपात विचार करता लक्षात येते की पर्यावरण संबंधित समस्या निर्माण होण्यास प्रत्यक्षात कारणीभूत असतो, बिघडलेला इकॉलॉजिकल बॅलन्स.
इकॉलॉजीचे मूलभूत तत्त्व आहे ‘ जीवो जीवस्य जीवनम्’ . पृथ्वीतलावरील तमाम सजीवांचे अस्तित्व एकमेकांवर अवलंबून आहे. हे सहजीवन म्हणजेच इकॉलॉजिकल बॅलन्स - नैसर्गिक संतुलन. ज्या इकोसिस्टीममधील विविध प्रजाती उपलब्ध नैसर्गिक संसाधनांचा वापर आपल्या किमान गरजांनुसारच करत असतात तेथे हे संतुलन अबाधित असते.
जी एकमेव प्रजाती या निसर्ग नियमांचे पालन करत नाही तिचे वैज्ञानिकांच्या भाषेतील नाव आहे ‘होमो सेपिअन्स’. म्हणजे मनुष्यप्राणी. नवीन नवीन क्लृप्त्या लढवून ही प्रजाती दुसऱ्या प्रजातींच्या हक्कांवर आक्रमण करून हे संतुलन- इकॉलॉजिकल बॅलन्स बिघडवत असते.
या संतुलनात जसजसा बिघाड होतो तसतसा पर्यावरणाचा र्हास होत जातो. पर्यावरणाच्या र्हासाचे मूलभूत कारण आहे ‘होमो सेपिअन्स’ या प्रजातीची वाढती संख्या आणि त्या प्रजातींच्या सतत वाढत असलेल्या गरजा.
सजीवांच्या अस्तित्वासाठी जितका ऑक्सिजन आवश्यक आहे तितकाच कार्बन डायॉक्साईडदेखील आवश्यक आहे. सोलर एनर्जी फिक्सिंग करून तिचा वापर आपल्या वाढीसाठी करण्यासाठी वनस्पतींना गरज असते ती कार्बन डायऑक्साइडची. त्यानंतर सर्व सजीवांच्या अन्नाची साखळी सुरू होते वनस्पतींच्या आत्मबलिदानापासून.
अनादी काळापासून पृथ्वीवरील वातावरणात ऑक्सिजन आणि कार्बन डायॉक्साईड यांच्या मात्रेत नैसर्गिक संतुलन होते. ते संतुलन बिघडत गेले, जेव्हा माणसाने भूगर्भातील कोळसा आणि पेट्रोलिअम, ज्याला ‘फॉसिल फ्यूअल’ म्हणतात, ते बाहेर काढून आपल्या ऊर्जेच्या अतिरिक्त गरजा भागविण्यासाठी जाळण्यास सुरुवात केली तेव्हापासून.
फॉसिल फ्यूअलांच्या ज्वलनापासून त्यांच्यासोबत भूगर्भात लपलेली प्रदूषके भूपृष्ठावर येऊन हवेत मिसळू लागली. आजकाल वेगवेगळ्या मंचावरून, श्वासोच्छ्वासासाठी उपलब्ध हवेच्या ढासळत जाणाऱ्या गुणवत्तेबद्दल चिंता व्यक्त केली जाते. पण त्याला कारण असलेल्या अतिरिक्त ऊर्जा वापराबद्दल विशेष कोणी बोलताना दिसत नाही.
चिंता व्यक्त केली जाते की पुरेशा प्रमाणात ‘एअर क्वालिटी मॉनिटरींग’ केले जात नाही याबद्दल. ‘अँबिअंट एअर क्वालिटी मॉनिटरींग’ म्हणजे श्वासोच्छ्वासासाठी उपलब्ध हवेच्या गुणवत्तेचे निरीक्षण. ही फक्त एक सायंटिफिक ऍक्टिव्हिटी आहे. तिच्यायोगे समस्येचे मूल्यमापन(काही प्रमाणात) होते, निराकरण नाही. या मूल्यमापन प्रणालीच्यादेखील काही मर्यादा आहेत.
भारतात ‘अँबिअंट एअर क्वालिटी मॉनिटरींगची’ सुरुवात झाली ती केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळांच्या सहभागाने हवेची गुणवत्ता मापनाचा एक देशव्यापी प्रोग्राम सुरू केला तेव्हा. प्रोग्रामाचे नाव होते (NAAQM) ‘ नॅशनल अँबिअंट एअर कॉलिटी मॉनिटरींग’ प्रोग्राम.
सुरुवातीला गुणवत्ता मापनासाठी ३ पॅरामिटर्स निश्चित केले होते.(१)सस्पेनडेड पार्टिक्युलेट मॅटर्स(SPM), (२) सल्फर डाय ऑक्साईड(SO2), (३) ऑक्साईडस् ऑफ नायट्रोजन.(NOx)नंतरच्या काळात त्यात ओझोन(O3), कार्बन मोनोक्साईड(CO) अमोनिया (NH3)आणि ५ हेवी मेटलांची भर घालण्यात आली.
ऑक्साईडस् ऑफ नायट्रोजन ऐवजी नायट्रोजन डायॉक्साईड करून आणि SPM ऐवजी PM१० आणि PM२.५ असे बदल करून सुलभीकरण करण्यात आले. या पैकी PM२.५ हे अतिसूक्ष्म कण रेस्पिरेबल म्हणजे फुप्फुसात पोहोचणारे म्हणून जास्त धोकादायक आहेत असे ठरविण्यात आले.
हे सगळे पॅरामिटर्स निश्चित करताना हवेत असणारी किंवा असू शकणारी प्रदूषके विचारात घेतली आहेत. पण त्यापैकी अमोनिया आणि ५ हेवी मेटल्स ही प्रदूषके काही विशिष्ट परिसरातच आढळू शकतात. उदाहरणार्थ अमोनिया या वायूचा वापर खतं निर्मितीसाठी होत असल्याने झुआरीच्या खत कारखाना परिसराच्या हवेत तो आढळत असे.
ओझोन हा वायू नायट्रोजन ऑक्साईड आणि व्होलाटाईल ऑर्गेनिक केमिकल यांच्यात होणाऱ्या रिएक्शनमधून तयार होतो. ओझोन या अस्थिर वायुमध्ये तज्ज्ञांनी ‘गुड ओझोन’ आणि ‘बॅड ओझोन’ असा पंक्तीप्रपंच केला आहे. या बाबतही तज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत. पण इतर चार प्रमुख प्रदूषकांचा स्रोत आहे रस्त्यावर धावणाऱ्या असंख्य ऑटोमोबाइलस्मध्ये जाळले जाणारे पेट्रोलियम.
या पेट्रोलियमप्रमाणेच ऊर्जा निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात इंधन म्हणून वापरले जाणारे दुसरे फॉसिल फ्यूअल आहे दगडी कोळसा. त्याच्या ज्वलनातूनही तीच प्रदूषके हवेत ओतली जात असतात. सारांश म्हणजे, ढासळत चाललेल्या हवेच्या गुणवत्तेस कारणीभूत आहे माणसाचा अतिरिक्त ऊर्जेचा हव्यास आणि त्यासाठी जाळले जाणारे फॉसिल फ्यूअल. यावर उपाय म्हणून फॉसिल फ्यूअलचा वापरच बंद करायची मागणी करायचे धाडस कोणीही करणार नाही. कारण सर्वांनाच माहीत आहे की आता ते शक्य नाही. हा इकॉलॉजिकल बॅलन्स कुणी राखला पाहिजे व राखते कोण, याविषयी पुढील लेखात...
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.