Goa Diwali traditions Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Diwali 2025: ..पूर्वी सुकलेल्या गवतापासून नरकासूर बनायचा, गुराख्याच्या सेवेसाठी समर्पित केलेला गोडवा पाडवा; गोव्यातील दिवाळी

Goa Diwali traditions: गोव्यात पेडण्यापासून काणकोणपर्यंत वसलेल्या आदिवासी, बिगर आदिवासी व इतर कष्टकरी समाजामध्ये दिवाळीतील अनेक विधी, परंपरा कृषी संस्कृतीशी नाते सांगणाऱ्या आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

अ‍ॅड. सूरज मळीक

दिवाळी हा सण गोव्याबरोबर भारतातील अनेक प्रांतात दिव्याशी नाते सांगणारा प्रकाशपर्व म्हणून उत्साहाने साजरा केला जातो. गोव्यात पेडण्यापासून काणकोणपर्यंत वसलेल्या आदिवासी, बिगर आदिवासी व इतर कष्टकरी समाजामध्ये दिवाळीतील अनेक विधी, परंपरा कृषी संस्कृतीशी नाते सांगणाऱ्या आहेत. नरकासुर या दुष्ट राक्षसाला भर पहाटे दहन करून या दिवसापासून नवीन वर्षाची जणू सुरुवात होते.

गोव्यात पावसाळ्यानंतर येणाऱ्या शरद ऋतूमध्ये घडलेला बदल याच कालखंडात जाणवू लागतो. या दिवसात माळरानावर, पठारावर व सभोवतालच्या परिसरातदेखील पुष्पबहार अधिक प्रेक्षणीय असतो. आज गोव्यात ठीकठिकाणी रान भेंडीची फुले आपल्या उजळदार पिवळ्या रंगाने रस्त्याच्या कडेची शोभा वाढवत आहेत.

दिवाळी हा कृषी समाजातील लोकमानसासाठी खऱ्या अर्थाने आनंदाचा क्षण असतो. आपण लागवड केलेल्या पावसाळी भातशेतीच्या मळ्याचा रंग हिरवळीतून पिवळ्या छटेत परिवर्तित होताना त्यांचे मन प्रफुल्लित होते. शेतीला भरपूर भाताच्या कणसांची उत्पत्ती होण्याचा तो संकेत असतो.

गोव्यात नरकासुर हा पूर्वी सुकलेल्या गवतापासून बनविला जायचा. दिवाळीच्या काही दिवस अगोदर पिकलेले भात कापून ते सुकविण्यासाठी ठेवले जायचे आणि नरक चतुर्दशीच्या आदल्या रात्री हे गवत ज्यूटच्या गोणी मध्ये भरून नरकासुराची प्रतिमा बनविली जायची.

आज अनेक गाव या निसर्गाशी जवळीक साधणाऱ्या परंपरेपासून दूर जात आहेत. नरकासुर या वाईट शक्तीचे दहन करून उजळणारा नवीन दिवस म्हणजे सकारात्मक आयुष्य जगण्यासाठी नवीन वर्षाची सुरुवातच असते.

गोव्याबरोबर महाराष्ट्र व कर्नाटकातील काही भागांत दिवाळीतील विधी परंपरेत गाई गुरांना महत्त्वाचे स्थान आहे. खरे तर गायीपासून मिळणारे दूध, शेण व मूत्र याला आज आर्थिक दृष्टीने भरपूर महत्त्व आहे.

नरकासुराचे दहन करून जळलेल्या गवताची राख कपाळाला लावून घरी परतल्यावर आंघोळ केली जाते. आंघोळीसाठी पाणी उकळण्याअगोदर त्या भांड्याला गंध व पांढरा चुना लावून रंगविले जाते.

त्यानंतर त्याच्याभोवती झेंडूच्या फुलांबरोबर आंब्याची पाने गुंतून रंगीत माळ बांधली जाते. सांगे तालुक्यातील कोळंब या गावात या फुलांच्या माळेत कारीट व घोसाळे ही दोन रानवटी फळे महत्त्वाची मानलेली आहेत. त्यामुळे आदल्या दिवशी ही फळे शोधण्यासाठी माळरानावर जावे लागते.

आंघोळ करून झाल्यावर चहा घेण्याअगोदर तुळशीसमोर येऊन कारीटाला नरकासुराचे प्रतीक मानून पायाने चिरडले जाते. काकडीच्याच कुळात येणाऱ्या या लहान आकाराच्या फळाची चव मात्र भरपूरच कडू असते. घरातील प्रत्येक माणसाला, पायाखाली चिरडून फोडलेल्या या कारीटातील कडवटपणाची चव आपल्या जिभेवर घ्यावीच लागते. या फळाचे शास्त्रीय नाव कुकुमिस ट्रिगोनस असे आहे.

कृषी संस्कृतीशी निगडित असलेल्या कुटुंबात गोरवा पाडवा साजरा करण्याची परंपरा आहे. हा दिवस पूर्णपणे गाई गुरांच्या पूजेसाठी समर्पित केला जातो. सकाळी उठल्यावर गाईच्या गोठ्याची साफसफाई केली जाते. मातीच्या जमिनीला शेणाने सारवून झेंडूच्या फुलांची माळ प्रवेशद्वारावर लावली जाते.

गाईगुरांना आंघोळ घातल्यानंतर त्यांना तेल लावून त्यांच्या माथ्यावर हळदीकुंकू लावून त्याची मनोभावे पूजा केली जाते. सर्व गायींच्या गळ्यात पिवळ्या केसरी झेंडूच्या फुलांची माळ घातली जाते. विशेष म्हणजे तांदळाच्या भातापासून बनवलेल्या भाकरी व वड्यांची माळ त्यांच्या गळ्यात बांधली जाते. घरातील माणसांबरोबर शेजारीसुद्धा या भाकरीचा तुकडा मिळवण्यासाठी आतुरलेली असतात. गाय ही त्यांच्यासाठी अन्नदात्री असते.

गायीच्या शेणाला पूर्वपार भरपूर महत्त्व लाभले होते. भात शेतीला गायीच्या शेणासारखे नैसर्गिक खत सहज उपलब्ध होणे कठीण. शेणाचे पोळे बनवून काही दिवस सुकवल्यावर त्यांचा जळणाच्या लाकडासारखा उपयोग केला जायचा.

गायीच्या शेणामुळे विविध धान्याच्या शेतीला भरपूर उत्पन्न लाभायचे. गायीच्या दुधाबरोबर त्यापासून अनेक पदार्थ बनवून त्यांची विक्री केली जायची.

गोरवा पाडाव्यात मातीच्या अंगणाला शेणाने सारवून घरातील महिला तुळशीसमोर शेणाचा वापर करून गाईच्या गोठ्याची आकृती जमिनीवर साकारली जाते. यामध्ये ती आपल्या गोठ्यात असलेल्या सर्व घटकांना दर्शवण्याचा प्रयत्न करते.

चौकोनी किंवा आयातकार आकाराचा गोठा बनवला जातो. या छोटेखानी गोठ्याच्या पुढच्या बाजूस तुळशीवृंदावन बनविले जाते. गोठ्याच्या प्रवेशद्वारातून आत येतात जणू कारीट रूपात गाई व वासरे गोठ्यात उभी असल्याचे दृश्य दिसते.

या गाईगुरांना बनवण्यासाठी लहान व मोठ्या कारीटांची गरज असते. मोठ्या आकाराच्या कारीटांना माडाच्या पानांच्या हिरांचा वापर करून लांबलचक हात व पाय लावल्याने त्या तरुण गाई असल्यासारख्या दिसतात तर लहान आकाराच्या कारिटांना अगदी लहान हीर लावल्याने ती वासरे असल्यासारखी दिसतात.

गोठ्याच्या एका खोलीत रांधण्यासाठी चूल बनविली जाते. या चुलीवर ठेवलेले पातेलेसुद्धा कारीटापासूनच बनवले जाते. एका कार्याची दोन भाग करून त्यातील बिया बाजूला काढून त्या गोठ्याच्या मागे बनविलेल्या गायरीत टाकून त्यांचा पातेले म्हणून उपयोग केला जातो. यामध्ये गाईचे दूध घालून चमचे शिंप्यापासून बनविले जातात. गोठ्यात आढळणाऱ्या खरे कुदळी, पाटा वरवंटा याच्यासुद्धा आकृती शेणापासून बनवल्या जातात.

गोठ्याचे रक्षण करण्यासाठी सुकलेल्या गवताचा वापर करून बांबूच्या लहान काठीच्या साहाय्याने गुराख्याची प्रतिमा बनवली जाते. संपूर्ण गोठ्याला झेंडूच्या फुलांनी सजवून गुराख्याच्या गळ्यातदेखील माळा घातली जाते.

गोडवा पाडवा हा दिवस जणू गाईबरोबर गुराख्याच्या सेवेसाठी समर्पित केलेला असतो. दुपार झाल्यावर त्याला जेवण वाढले जाते. हा गुराखी दुसरातिसरा कोणी नसून मुरलीधर भगवान श्रीकृष्णाच्या रूपातच त्याच्याकडे पाहिले जाते.

जंगलनिवासी आदिवासी कुमारिका धिल्लो उत्सव साजरा करतात तर अनेक ठिकाणी तरुण पुरुष मंडळी धेणलो उत्सवात सहभागी होतात. पाऊस कुठे हरवला असा प्रश्न करणारे गाणे गात चौकोनी मखरात असलेली श्रीकृष्णाची मूर्ती आपल्या माथ्यावर धारण करून ताशाच्या गजरात घरोघरी फिरून आनंदोत्सव साजरा केला जातो.

पावसाळ्यात भात शेतीतील धान्य घरात आल्यावर त्यांना आनंद झालेला असतो. त्यामुळे नव्या भातापासून बनवलेल्या पोह्यांचा आस्वाद घेतला जातो.

गोव्याच्या काणकोण प्रदेशातील आदिवासी समाजातील काही लोक कर्नाटकातील देरिये येथे जाऊन स्थायिक झालेले आहेत. काळी व्याघ्र क्षेत्रापासून जवळच असलेल्या गावात बलिप्रतिपदेदिवशी ते आपल्या तुळशीसमोर शेणापासून जी आकृती साकारतात ती गोव्यातील पणसायमळ येथील कुशावती नदीच्या तीरी असलेल्या कातळ शिल्पाशी मिळती जुळती असते. प्रत्येक दिवशी एक एक गोलाकार रिंगण बनवून नऊ दिवसांमध्ये ते चित्र पूर्ण होते. या संपूर्ण आकृतीला झेंडूच्या फुलांनी सजवल्याने ते अगदी मनमोहक बनते. त्यांच्यासाठी हा अभिमन्यूचा चक्रव्यूहच असतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Smriti Mandhana Wedding: नॅशनल क्रश क्लीन बोल्ड! स्मृती मानधना लवकरच लग्नबंधनात, 'या' संगीत दिग्दर्शकासोबत जुळली रेशीमगाठ

Virat Kohli: 'किंग'चा लाजिरवाणा कमबॅक: 7 महिन्यांनी परतला, पण फक्त 8 चेंडू खेळून 'शून्य'वर बाद; लज्जास्पद विक्रमाची नोंद VIDEO

कणखर गृहमंत्री ते संवेदनशील कृषीमंत्री: रवी नाईक यांच्या व्यक्तिमत्त्वाचं मुख्यमंत्री फडणवीसांकडून गौरवोद्गार

Ravi Naik: 'मी फक्त पुढे, सेनापती मात्र रवीच'; दिवंगत नेत्याला भावनिक आदरांजली

Horoscope: 71 वर्षांनंतर महासंयोग! यंदाची दिवाळी 5 शुभ योगांची, 'या' राशींचे भाग्य उजळणार; शुभ कार्यांसाठी सर्वोत्तम काळ

SCROLL FOR NEXT