Diwali  Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Diwali In Goa: 'तिखशे फोव, वझ्या’त खाजीचे लाडू, फेणोरी, चुरमो'! गोव्यातील आगळीवेगळी दिवाळी

Diwali 2025: भारतभर साजरा केला जाणारा दिवाळी हा एक मोठा सण आहे. भारतभर ठिकठिकाणी वेगवेगळ्या कारणांनी आणि वेगवेगळ्या प्रकारे हा सण साजरा केला जातो.

गोमन्तक डिजिटल टीम

डॉ. संगीता साेनक

दिवाळी जवळ येऊ लागली, की वातावरणात उत्साह शिरू लागतो. सगळीकडे फटाक्यांचे आवाज, विविधरंगी दारूकाम, गोडधोड, सुंदर कपडेलत्ते, वेगवेगळे दागिने अशा अनेक गोष्टींची रेलचेल सुरू होते.

भारतभर साजरा केला जाणारा दिवाळी हा एक मोठा सण आहे. भारतभर ठिकठिकाणी वेगवेगळ्या कारणांनी आणि वेगवेगळ्या प्रकारे हा सण साजरा केला जातो. धनत्रयोदशीपासून सुरू होणारी दिवाळी बहुतेक ठिकाणी पाच दिवस साजरी केली जाते. काही ठिकाणी ही सुरुवात वसूबारसपासून होते. आपल्या कृषिप्रधान देशात या गोवत्सद्वादशीला गाय-वासराच्या पूजेला विशेष महत्त्व आहे.

उत्तर भारतात बहुतेक ठिकाणी दिवाळी सीता, राम, आणि लक्ष्मण यांच्या अयोध्येत पुनरागमनाचा दिवस म्हणून साजरी केली जाते. धनत्रयोदशीला म्हणजे कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील तेराव्या दिवशी दिवाळीची सुरुवात होते.

या दिवशी काही ठिकाणी कुबेराची, तर काही ठिकाणी धन्वंतरीची पूजा केली जाते. आख्यायिकेप्रमाणे देव दानवांनी केलेल्या समुद्रमंथनातून धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरी प्रकट झाला. तर कार्तिक अमावास्येला लक्ष्मी प्रकट झाली.

त्यामुळे त्या दिवशी लक्ष्मीपूजन केले जाते. उत्तर भारतात बलिप्रतिपदेच्या दिवशी कृष्णाने गोवर्धन पर्वत करंगळीवर उचलला म्हणून गोवर्धन पूजा अर्थात बैलांची पूजा केली जाते, तर दक्षिण भारतात हा दिवस वामनअवतारातील विष्णूने पाताळात पाठवलेला बळीराजा पृथ्वीवर परत येतो म्हणून साजरा केला जातो.

दिवाळीची सांगता यमद्वितीयेने म्हणजे भाऊबिजेने होते. बहीण भावाचे प्रेम साजरा करणारा हा दिवस. महाराष्ट्रात गड-किल्ल्यांच्या प्रतिमा केल्या जातात. या वर्षी तर शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळांच्या यादीत सूचीबद्ध केल्यामुळे या किल्ल्यांच्या प्रतिमा करण्यावर जास्त जोर देण्यात आला आहे.

भारतात आणि भारताबाहेरही अनेक ठिकाणी हा सण साजरा केला जातो. तसेच हिंदू धर्माप्रमाणे हा सण जैन, बौद्ध आणि शीख धर्मातही वेगळ्या कारणांनी साजरा केला जातो. जैनांचे २४वे गुरू तीर्थंकर भगवान महावीर अश्विन अमावास्येला मोक्ष पावले असे ते मानतात.

जैन लोक या दिवशी त्यांची आठवण करतात. गौतम बुद्धांचे प्रमुख शिष्य महामोग्गलान यांचे निर्वाण पण दिवाळीच्या दिवशीच झाले. त्यांच्या नावाने बौद्ध धर्मीय या दिवसांत दिवे लावतात. तर जहॉंगीर बादशहाच्या कैदेतून शिखांच्या सहाव्या गुरूंची आश्विन अमावास्येच्या दिवशी सुटका झाली. म्हणून शीख लोक हा दिवस साजरा करतात.

गोव्यात नरकचतुर्दशी हा दिवाळीचा मुख्य दिवस मानला जातो. आमच्या लहानपणी आम्ही जवळजवळ रात्रभर जागरण करायचो. गोव्यातील काही गावांत नरकासुराच्या पोकळ प्रतिमा करून त्या घरा-घरात नेऊन नाचवल्या जातात. मोठ्या प्रतिमा केल्या की त्याच्या आत कुणीतरी शिरून त्या नाचवतो.

लहानपणी आम्हाला खूप मजा वाटायची. काही मुले नरकासुराला घाबरायची. लहान मुले या नरकासुर प्रतिमेबरोबर मोठ्या माणसांसोबत जायची. सगळीकडे नाचवून झाल्यावर पहाटे श्रीकृष्णाकडून नरकासुरदहन झाल्यानंतर अभ्यंग स्नान व्हायचे. घरातील बायकांकडून पुरुषमंडळी आणि मुले यांचे औक्षण केले जायचे.

नरकासुर वधाचे प्रतीक म्हणून गोडधोड खायच्या आधी कडू कारीट पायांनी फोडून जिभेला लावले जायचे. या दिवशी आपल्या गोव्यात अनेक प्रकारचे पोहे केले जातात. फोडणीचे बटाटपोहे, गूळपोहे, कालवलेले पोहे, दुधातील पोहे, दही-ताकातील पोहे, नारळाच्या दुधात गूळ घालून केलेले पोहे इत्यादी.

आंबाड्याची करम आणि वाटाण्याची उसळ हे खास दिवाळीसाठी केलेले प्रकार. या दिवशी गोव्यात वडीलधार्‍या मंडळींना नमस्कार करण्यासाठी एकमेकांच्या घरी जायची पद्धत आहे. नरकासुराच्या संबंधात दोन-तीन आख्यायिका आहेत.

गोव्यात प्रचलित असलेली आख्यायिका अशी, की त्याने तप करून वर मिळवला होता की कुणीही नर त्याचा वध करू शकणार नाही. या वराने तो उन्मत्त झाला आणि त्याने अनेक क्रूर कामे केली. त्याने १६,१०० स्त्रियांना पळवून नेले आणि कैद केले.

शेवटी सत्यभामेच्या मदतीने कृष्णाने नरकचतुर्दशीच्या दिवशी त्याचा वध केला आणि नरकासुराच्या जुलूमांपासून लोकांना मुक्त केले. नरकचतुर्दशीचा दिवस नरकासुराचा अंत झालेला दिवस म्हणून साजरा केला जातो.

गोव्यात दिवाळीला लग्न झालेल्या मुलींना ‘वझें’ पाठवायची पद्धत आहे. दिवाळीचा फराळ, शेव, चिवडा, चकली, अनेक प्रकारचे लाडू, कापा (बर्फ्या), आणि खास गोव्याचे तिखशे फोव आणि चुरमो. याच्याबरोबरच अनेक फळे, भाज्या, कडधान्ये असे अनेक प्रकार या ‘वझ्या’त सामील असतात, खास करून नवीन लग्न झालेल्या मुलीला.

‘वझ्या’त खाजीचे लाडू खास असायचे. आता त्यांची जागा काजूच्या लाडवांनी घेतली आहे. काही लोक हे ‘वझें’ व्हडल्या दिवाळीला (तुळशीच्या लग्नाला) पाठवतात तर काही धाकट्या दिवाळीला. आईकडून आलेले जोडवे जाळण्याची पद्धत तुळशीच्या लग्नाला असते.

आम्हा मुलांची तर दिवाळीच्या दिवसांत चंगळच असायची. सुट्टी असल्याने आम्ही मुले एकत्र जमायचो. फराळाचे पदार्थ ताटामागून ताटे यायची. बहुतेक घरी चतुर्थी आणि दिवाळी असे दोनदा ‘खाजीकारां’ना बोलवायचे. त्यांच्याकडून दिवाळीचा फराळ करून घेतला जायचा. त्यांच्या हातांचे कसब बघण्यासारखे होते.

गोव्यातील फराळाचे पदार्थ भारतातील इतर भागांतील मिठाईपेक्षा वेगळे होते. तसे प्रत्येक भागाचे आपले असे खास वैशिष्ट्य असते म्हणा. फेणोरी (चिरोटे) हा खास दिवाळीला केला जाणारा पदार्थ. पेढे, गव्हाच्या पिठापासून साजूक तूप घालून केलेले लाडू, चुरमो माझ्या आजीचे आणि आईचे खास वैशिष्ट्य होते. ते पदार्थ घरीच बनायचे. आजकाल मात्र सगळेच विकत घेतले जाते किंवा ऑर्डर केले जाते.

दिवाळीची अजून एक गंमत असायची दिवाळी अंकांची. आम्हा मुलांना चांदोबा, कुमार, फुलबाग, किशोर असे कितीतरी दिवाळी अंक वाचायला मिळायचे. आताही आम्ही मराठी दिवाळी अंकांची आतुरतेने प्रतीक्षा करतो. वयोमानानुसार अंक बदलले, पण आतुरता मात्र तीच आहे. आजही दिवाळीची प्रतीक्षा असते तशीच दिवाळी अंकांचीही असते. अगदी उद्या असली तरी दिवाळी या सणाची भारतभर आतुरतेने प्रतीक्षा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ravi Naik: रवींना 'मगो'चे नेतृत्व मिळाले असते तर...?

Smriti Mandhana Wedding: नॅशनल क्रश क्लीन बोल्ड! स्मृती मानधना लवकरच लग्नबंधनात, 'या' संगीत दिग्दर्शकासोबत जुळली रेशीमगाठ

Virat Kohli: 'किंग'चा लाजिरवाणा कमबॅक: 7 महिन्यांनी परतला, पण फक्त 8 चेंडू खेळून 'शून्य'वर बाद; लज्जास्पद विक्रमाची नोंद VIDEO

कणखर गृहमंत्री ते संवेदनशील कृषीमंत्री: रवी नाईक यांच्या व्यक्तिमत्त्वाचं मुख्यमंत्री फडणवीसांकडून गौरवोद्गार

Ravi Naik: 'मी फक्त पुढे, सेनापती मात्र रवीच'; दिवंगत नेत्याला भावनिक आदरांजली

SCROLL FOR NEXT